Reflections for the Homily of Pentecost
Sunday (31-05-2020) By Dn. Jackson Nato.
पवित्र आत्म्याचा सण
(पेन्टेकॅास्टचा सण)
दिनांक:
३१/०५/२०२०
पहिले
वाचन:
प्रेषितांची कृत्ये २:१-११
दुसरे
वाचन: १
करिंथ १२:३ब-७, १२-१३
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि
भगिनींनो आज आपण पेंटेकॉस्टचा सण साजरा करीत आहोत. पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा
दिवस. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्म्याने
प्रेषितांवर अग्नीच्या जिभांच्या रूपाने अवतरण केले व त्यांना सुवार्ता
प्रचारासाठी सुसज्ज केले.
आजच्या प्रभू शब्द वेदीवर नजर टाकली तर,
आपल्या लक्षात येते की, आजची तिन्ही वाचणे पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांना मिळालेल्या
सामर्थ्यांचे वर्णन करतात. पहिल्या वाचनात आपण पाहतो की पवित्र आत्मा शिष्यांना
विभिंन्न भाषा बोलण्याचे दान देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की पवित्र आत्म्याद्वारे
मिळालेली ही दाने स्वतःच्या गौरवासाठी नव्हे; तर, ख्रिस्तसभेच्या बांधिलकीसाठी
आहेत. तर, शुभवर्तमानात ख्रिस्त शिष्यांना पवित्र आत्मा देऊन सुवार्तेच्या प्रचाराचे
आदर्श देतो व त्यासाठी सक्षम बनवतो. पवित्र आत्मा हा आपना प्रत्येकामध्ये
बाप्तिस्माद्वारे संचारीत आहे. हाच आत्मा आपल्याला ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या
शब्दांद्वारे व कृतीद्वारे पसरविण्यास प्रेरित करत असतो. आपल्या शब्दाने
दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यास व कृतीने त्यांना मदत करण्यास उत्तेजन देत असतो.
पण पवित्र आत्म्याने रुजू घातलेल्या या प्रेरणेचे रोप फक्त आपल्या सहकार्याने वाढू
शकते. म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला आपण होकार द्यावा व सुवार्ता
प्रचाराच्या कार्यात सहभागी होण्यास लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण ह्या मिसाबलिदानात
विशेष प्रार्थना करू या.
पहिले
वाचन:
प्रेषितांची कृत्ये २:१-११
पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा. दिवस.
यहुदी लोकांच्या तीन महत्वाच्या सणांपैकी एक महत्वाचा सण होता. वल्हांडणाच्या सात
आठवडय़ानंतर हा सण साजरा केला जातो. ह्या सणाचे उद्दिष्ट प्राथमिकदृष्ट्या वार्षिक
शेतीच्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याचं असतं. जिथे गव्हाचे पहिले पीक देवाला
अर्पण केले जात असे. पण काही कालावधीनंतर देवाने सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या
दहा आज्ञाच देखील या दिवशी स्मरण केले जात असे. ज्या लोकांना या दिवसापासून सूट
हवी होती त्यांना वगळून सर्वांसाठी या सणानिमित्त यरुशलेमेला येणे सक्तीचे होते. म्हणून
यहुदा व त्याबाहेरील प्रांतात असलेले हजारो यहुदी या सणाला हजर होते त्यामुळे
संपूर्ण शहर लोकांनी गजबजलेल होत. म्हणून या सणाची निमित्त साधून परमेश्वराने
पवित्र आत्म्याच्या वर्षावांसाठी हा दिवस निवडला होता यात काही शंका नाही. ख्रिस्ताची
शिकवण ही जागतिक होती. एवढेच नव्हे तर सर्वधर्म समावेशक होती. हेच सर्वसमावेशक
वैशिष्ट शिष्यांच्या वेगवेगळ्या भाषा उच्चारणातून उघडकीस येते आणि म्हणूनच
पेत्राने जो संदेश दिला तो सर्व लोकांसाठी होता व तो संदेश त्यांना पोहचावा व
ख्रिस्ताची ओळख सर्वांना व्हावी हा यामागचा हेतू होता.
दुसरे
वाचन: १
करिंथ १२:३ब-७, १२-१३
या वाचनात आपण पाहतो की पवित्र
आत्म्याची दाने ख्रिस्ती लोकांच्या जीवनात उघडपणे दिसत होता. हे सर्व होणे गरजेचे
होते. जेणेकरून जी लोक परधर्मीय होती, मूर्तिपूजक
होती त्यांना समजून चुकावे कि; ज्या देव-देवीसमोर ते माथा टेकत आहेत हे सर्व खोटे
देव आहेत. पण, ख्रिस्त मात्र खरा देव आहे. ज्याचा सृष्टीवर ताबा आहे. जी दाने
ख्रिस्ती लोकांना पवित्र आत्म्याने दिली होती, ती ख्रिस्ताकडून होती. त्याचा वापर
ते परिस्थितीला अनुकूल असा करत. पुढे ह्या दानाचे स्पष्टीकरण देताना संत पौल सांगतो
की, ही दाने स्वतःच्या गौरवासाठी नव्हे तर समाजाच्या व ख्रिस्तसभेच्या
बांधिलकीसाठी दिली गेली होती.
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३
ख्रिस्ताने, खोळीचे दरवाजे बंद असताना सुद्धा मधे जाणे हे पुनरूत्थित ख्रिस्ताच्या
दैवी शरीराचे वैशिष्टय़ दर्शविते की, जो मेला होता तो आता त्यांच्यासमोर जिवंत आहे.
हा जिवंत येशू त्यांना शांतीने वंदन करतो जेणेकरून ते शांती अनुभवतील. त्यानंतर
येशू शिष्याना त्यांचे मिशनकार्य स्पष्ट करतो. ज्या कार्याची सुरुवात ख्रिस्ताने केली
ते पुढे नेण्यास त्यास आज्ञा करतो. एवढेच नव्हे तर या कार्यासाठी त्यांना पवित्र
आत्मा देऊन सक्षम करतो.
मनन
चिंतन:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण पुनरुत्थान काळातील शेवटचा रविवार म्हणजेच
पेंटेकॉस्ट सण साजरा करत आहोत. पेंटेकॉस्ट म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा
पन्नासावा दिवस. ज्या दिवशी प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला. पेंटेकॉस्ट म्हटलं तर
पहिल्या प्रथम आपल्याला ज्याची आठवण येते ती गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा.
पेंटेकॉस्ट आणि पवित्र आत्मा यांची आपण लगेच सांगड घालतो. कधी-कधी आपण पेंटेकॉस्ट
म्हणजेच पवित्र आत्मा हा निष्कर्ष लावतो. पण जर या शब्दाचा आपण खोलवर अभ्यास केला
तर, त्याचा अर्थ व त्याचे महत्त्व खऱ्या अर्थाने आपल्या समजूकीस येते. मुळात
पेंटेकॉस्ट आणि पवित्र आत्मा ह्यांच्यात जवळजवळ काहीही नाते संबंध नाही.
पेंटेकॉस्ट
हा ग्रीक भाषेतील शब्द ज्याचा अर्थ म्हणजे पन्नासावा दिवस. वल्हांडण सणानंतर
पन्नासाव्या दिवशी पिकाच्या कापणीचा सण यहुदी साजरा करत असत. ह्या सणाचा उद्देश
म्हणजे धांन्याच्या पिकाची समाप्ती झाली आहे याची आठवण करणे व त्याबद्दल देवाला
धन्यवाद देणे असा होता. पण या शब्दाचा आपण शाब्दिक अर्थ पाहिला तर, फक्त पन्नासावा
दिवस असा होतो. व त्यापलीकडे कापणीचा सण किंवा पवित्र आत्मा यांच्याशी काहीही
संबंध नाही. पण आजच्या पहिल्या वाचनावर जर आपण नजर टाकली तर, आपल्या लक्षात येते
की, कशाप्रकारे पेंटेकॉस्टची ओळख पिकाच्या कापणीच्या सणांबरोबर झाली व तो दिवस
पवित्र आत्म्याशी जोडला गेला.
आजच्या
तिन्ही वाचनांमधील सर्वव्यापी घटक जो आपल्याला पवित्र आत्म्याची उपस्थिती दर्शवितो
तो म्हणजे "शब्द" पहिल्या वाचनात आपल्याला पाहण्यास मिळते की शिष्य
पवित्र आत्म्याद्वारे वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो
की, “कुणीही पवित्र आत्म्याशिवाय ख्रिस्त हा देव आहे हे ओळखू शकत नाही व तसे
बोलूही शकत नाही.” तर, शुभवर्तमानात ख्रिस्त शिष्याना म्हणतो,“तुम्हांस शांती असो.”
या तिन्ही वाचनातून आपल्याला शब्दाचे किंवा वाचेचे महत्त्व लक्षात येते.
शब्दावर
जर आपण मनन चिंतन केले तर आपल्या लक्षात येते की, शब्द हे आपल्याला सामान्य वाटतात
की, जे सहज उच्चारले जातात. पण, तेच शब्द कधी-कधी एवढे सामर्थशाली होतात की,
त्याद्वारे चांगल्या किंवा वाईट गोष्टीचे आपल्याला दर्शन होतं. म्हणून या शब्दांचे
महत्त्व जाणून त्याला वाचा फोडण्या अगोदर आपण त्यावर विचार केला पाहिजे. कारण
शब्दांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जर एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा
आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहाचवायचे असतील तर त्यासाठी शब्दांची गरज असते. पण या
शब्दांचा वापर जर, जपून केला नाही तर, त्या पासून अपायकारक परिणाम उद्भवतात. म्हणून
म्हणतात की, “धनुष्यातून
निघालेले बाण व तोंडातून निघालेला शब्द यांना आवर नसतो” म्हणून तेच सोडण्याअगोदर
त्यावर खोल विचार करावा. कारण, तोंडातून बाहेर येण्याअगोदर त्या शब्दांची किंमत
शून्य असते. पण, एकदा का ते बाहेर आले त्याची खरी किंमत कळते. ते कुणाच्या मनात
किती खोलवर बसतात याचा अंदाज आपण लावू शकत नाही.
आपल्या
तोंडातून निघणारे शब्द हे दोन प्रकारचे असतात. सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक
शब्द हे जग घडवतात, माणसे जुळतात, मने जिंकतात. पण नकारात्मक शब्द जग
उद्ध्वस्त करू शकतात, आपापसात कधीही न भरणारी दरी निर्माण
करू शकतात, आपापसामध्ये दुरावा निर्माण करू शकतात. सकारात्मक
शब्द हे निस्वार्थी असतात. त्यात दुसऱ्यांना प्रोत्साहित करण्याची शक्ती असते. उलट
नकारात्मक शब्दामागे स्वार्थ असतो. दुसऱ्यांच्या भावना दु:खावल्या तरी चालेल पण
आपला हेतू किंवा उद्देश मात्र पूर्ण व्हायला हवा अशा प्रकारची भावना नकारात्मक
शब्दामध्ये असते. जुन्या करारात आपण नजर टाकली तर, आपल्याला
बाबेल स्तंभाचे उदाहरण लक्षात येईल. मनुष्याने स्वार्थापोटी स्तंभ उभारण्यास
सुरुवात केली जेणेकरून त्या बुरुजाचे टोक स्वर्गाला लागेल. यात त्यांचा मीपणा
होता. स्वार्थ होता. त्यांना त्यांचे नाव उंच करायचे होते. पण, ह्याच स्वार्थामुळे
त्यांची पांगापांग झाली. ते परस्परांना न समजणाऱ्या भाषा बोलू लागले. कारण
त्यांच्या भाषेत मीपणा होता व ते जे एकत्र होते ते विभागले. या उलट पवित्र आत्म्याद्वारे
शिष्य वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. आणि त्याद्वारे जातीने, धर्माने,
भाषेने व संस्कृतीने विभागलेल्या लोकांना एकत्र आणले. जे लोक
वेगवेगळ्या भाषा बोलत होते, वेगवेगळ्या पंथाचे होते, त्यांना
शिष्यांनी पवित्र आत्म्याद्वारे एकत्र केले. कारण, शिष्यांचे शब्द हे सकारात्मक
होते. त्यांच्यात कोणताही स्वार्थ नव्हता. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की,
“पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले भाषेचे दान हे आपल्या स्वतःच्या गौरवासाठी नव्हे,
दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हे तर, समाजाच्या व चर्चच्या बांधिलकीसाठी
आहेत.” आणि जेंव्हा हि दाने आपण अशा प्रकारे योग्यतेने वापरतो तेव्हा आपण
त्यांच्यातील सकारात्मक व प्रेरणादायी गुणाला वाव देत असतो.
शब्द हे मृत असतात पण तोंडातून बाहेर पडताच ते जगायला
सुरुवात करतात. म्हणून या शब्दांचे जगणं दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण बनतात किंवा
ते दुसऱ्यांच्या जीवनावर वार करतात हे आपण ठरवतो.
शब्द
कडू असतात आणि गोडहि असतात. पण, त्याची चव दुसऱ्यांना देण्याअगोदर प्रथम आपणच
चाखावी. आपल्या शब्दात किती गोडवा आहे किंवा किती कडूपणा आहे हे आपण चाखल्याशिवाय
कळणार नाही. किती गोडवा किंवा किती कडूपणा आपण दुसऱ्यांना देतो हे आपण अनुभवल्याशिवाय
कळणार नाही. म्हणून तोंड उघडण्याअगोदर आपण नेहमी तीन प्रश्न विचारायला हवे: १) मी
जे सांगतो ते सत्य आहे का? २) हे सांगणे गरजेचे आहे का? ३) माझ्या शब्दात दया
आहे का? हे प्रश्न जर आपण काही बोलण्याअगोदरच स्वतःला विचारले
तर ते आपल्याला योग्य शब्द उच्चरण्यास, चांगले बोलण्यास मदत
करतील. आपण आपल्या जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कि, आपल्या शब्दात शक्ती
आहे. ते कुणाचे जीवन उभारू शकतात तर, कुणाचे जग उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून
आपण शब्द जपून वापरायला हवे , त्यास काचेच्या तुकड्यांप्रमाणे
हाताळायला हवे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो तुझ्या आत्म्याचे दान
आम्हाला दे.”
१. ख्रिस्त प्रेमाचा दिवा तेवत ठेवण्यास
हातभार लावणारे आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू,
व्रतस्थ व प्रापंचिक ह्यांना चांगले आरोग्य मिळावे व हे कार्य अखंड
चालू ठेवण्यास पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करू या.
२. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या
संसर्गाने भयभीत झाले आहे. सामाजिक व आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. हे भय पवित्र
आत्म्याच्या धैर्याने दूर व्हावे व संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी आपण
प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आज अनेक स्थलांतरित व निर्वासित
आपल्या गावाकडे जाण्यास प्रवास करत आहेत त्यांच्या या प्रवासात येणारे अडथळे दूर
व्हावे व सुखरूप आपल्या कुटुंबियाकडे पोहोचावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत असलेला
आपला देश अनेक नैसर्गिक आपत्तीशी सामना करत आहे, हे आपत्ती दूर व्हाव्या व उद्ध्वस्त
झालेले त्यांची घरे व जीवन पुनर्स्थापित व्हावीत यासाठी आपण विशेष प्रार्थना करू
या.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक,
व वयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete