Thursday, 12 November 2020

Reflection for the 33rd Sunday in Ordinary Time (15/11/2020) by  Br. Roshan Rosario



सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार


दिनांक: १५/११/२०२०

पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६

शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०



प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्या समोर ‘प्रतीक्षा करणे’ किंवा ‘वाट पाहणे’ ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे. ‘कशाप्रकारे आपण वाट पहायला हवी?’ ह्यावर आजची वाचने आपणांस सल्ला देत आहेत. देवाने आपल्याला भरपूर अशा गुणांनी व दानांनी आशीर्वादित केलेले आहे. आपल्या क्षमते व योग्यतेनुसार देवाने आपणांस ह्या दानांनी व गुणांनी भरलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार ही आपली श्रध्दा व विश्वास आहे आणि म्हणून आपण त्याच्या पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत. ही वाट पाहत असताना आपण न काम करता, बेकार बसू नये; किंबहुना ज्या गुणांनी परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केले आहे त्यांचा मोठ्या जबाबदारीने वापर करून प्रभूच्या येण्याची तयारी करावी ही देवाची आपल्याकडून  अपेक्षा आहे. ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपण प्रार्थना करूया की, जीवनात चांगला व योग्य मार्ग धरून प्रभूने दिलेल्या गुणांचा त्याच्या गौरवासाठी वापर करावा जेणेकरून तो परमेश्वर आपणास भेटावयास येईल तेव्हा म्हणेल की ‘शाब्बास, भल्या व विश्वासू दासा.’

 पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३१९-२०३०-३१

          आजच्या पहिल्या वाचनात स्त्रियांची भूमिका कशी असावी ह्या विषयी सांगत आहे. येथे स्त्री आपल्या घरातील कुटुंबियासाठी अन्नवस्त्राची तरतूद करण्याची जबाबदारी पार पाडताना दाखवली आहे. तिची जबाबदारी ऐवढयापुरतीच मर्यादित नाही. घराबरोबर आर्थिक बाबतीत, व्यवसायातही तिचा सहभाग असतो. ती गरजवंताची काळजी घेते आणि इतरांना  योग्य शिक्षण देण्याची कार्य करते. या कर्तबगार स्त्रीचा पती व तिची मुले तिचा आदर व बहुमान करतात. हयाला कारण तिची कर्तबगारी आहे; पण ती स्वतः देवाला बांधलेली आहे. तिची देवावर अढळ निष्ठा आहे, ही तिच्या सफल जीवनाची मुळ प्रेरणा आहे.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला येशूच्या दुसऱ्या आगमनाविषयी सांगत आहे. ही घटना घडेल तेव्हा ते आपणाला समजेल की नाही यावर पौलाने उत्तर दिले आहे की प्रभूचा दिवस चोर येतो तसा येईल म्हणजे ते येणे अनपेक्षित आणि न सुचणारे असेल. सावधगिरीचा इशारा देताना येशूने सांगितले तेच पौल सांगत आहे. त्यासाठी त्या दिवसासाठी आपल्याला सतत तयार असावे त्यासाठी आराम न करता व झोपेत न असता आपणास सतर्क रहायला पाहिजे.

 शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०

     आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताने रुपयांच्या दृष्टांताद्वारेविश्वासू व प्रामाणिक कसे राहायचे ह्याचे महत्व दाखवून दिले आहे. परदेशी जाणाऱ्या मनुष्याने आपल्या दासांना आपली मालमत्ता वाटून दिली. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. आपल्या पैशाचा व वेळेचा विश्वासूपणे उपयोग करून जबाबदारी दाखवणे हा त्या मागचा हेतू होता. ज्यांनी विश्वासूपणा आणि जबाबदारी दाखवली ते शाबासकीस पात्र ठरले, याउलट ज्यांनी विश्वासुपणा व जबाबदारी दाखवली नाही ते शाबसकीस पात्र ठरले नाहीत.

 बोधकथा:

जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका असते, जी सांगते की, तुमच्या कृतीतून घडणाऱ्या आणि घडवण्याच्या परिणामांचं तुम्ही स्वत: कारण आहात. बिरबलच्या चातुर्यकथांमधली बादशहाच्या मेव्हण्याची गोष्ट आपणास ठाऊक आहे. एकदा बेगम बादशहाकडे हट्ट धरते, ‘बिरबलापेक्षा माझा भाऊ जास्त हुशार आहे. बिरबलाच्या जागी माझ्या भावालाच प्रधान करा.धर्मसंकटात सापडलेला बादशहा म्हणतो, ‘मी दोघांची परीक्षा घेऊन निर्णय देईन.त्यानंतर एकदा बादशहा निवांत बसलेला असताना त्याच्या कानावर एका बैलगाडीच्या घुंगरांचा आवाज पडतो. तो मेव्हण्याकडे त्याबाबत चौकशी करतो. मेव्हणा धावत जाऊन पाहून येतो आणि सांगतो, ‘काही बैलगाडय़ा राजवाडय़ासमोरच्या रस्त्यावरून चालल्या आहेत. त्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आहे.बादशहा विचारतो, ‘काय आहे त्या बैलगाडय़ांत?’  मेव्हणा पुन्हा धावत जाऊन पळत येतो, ‘तांदळाची पोती आहेत.असं अनेक वेळा होतं. बैलगाडय़ा कुठून आल्यात?’, ‘कुठे चालल्या आहेत?’, ‘तांदूळ कुठला आहे?’ वगैरे एकामागून एक प्रश्न बादशहा विचारत जातो आणि दरवेळी धावत जाऊन मेव्हणा तेवढय़ा प्रश्नाचं उत्तर घेऊन माघारी येतो. हेलपाटय़ांनी पार थकून जातो. त्यानंतर बादशहा बिरबलाला बोलावून घेतो आणि त्याच्याहीकडे त्या एका बैलगाडीच्या घुंगरांच्या आवाजाची चौकशी करतो. बिरबल मुजरा करून बाहेर पडतो तो थेट दोन-तीन तासांनी परत येतो. आल्यानंतर सांगतो, ‘त्या ५५ बैलगाडय़ा होत्या. सर्वामध्ये मिळून उत्तम प्रतीचा साधारण हजार मण बासमती तांदूळ होता. एक व्यापारी तो विकण्यासाठी शेजारच्या राज्यातल्या बाजारपेठेत घेऊन चालला होता. आपल्या कोठारात तांदूळ भरायचाच होता. मी मालाचा दर्जा तपासला, किंमतही वाजवी होती. एकरप्रमाणे खरेदी होतेय म्हटल्यावर व्यापाऱ्यानं किंमत आणखी कमी केली. गाडय़ा खाली करून घेण्याची व्यवस्था करून मी आपल्याकडे आलो, त्यामुळे थोडा उशीर झाला. घुंगरांच्या आवाजाची आपण चौकशी केलीत, त्यामुळे फटक्यात आपले एक महत्त्वाचे काम झाले.बादशहा समाधानानं हसतो आणि बेगम आणि तिचा भाऊ लाजिरवाणे होतात. 

मनन चिंतन:

          प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे आपण प्रभू येशूच्या पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत किंवा त्याच्या पुन्हा येण्याची तयारी करीत आहोत. ही तयारी आपण आपल्या विश्वासूपणात व जबाबदारीत दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. हे दाखविण्यासाठी प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात रुपयांचा दृष्टांत आपणासमोर ठेवत आहे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे धनी तीन दासांना ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे जबाबदारीची कामे पूर्ण करण्यास सोपवून देतो आणि दिलेल्या रकमेच्या प्रमाणातच परतीची अपेक्षा करतो. आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत हे देव जाणतो, तसेच आमच्याकडून जेवढे योग्य तेवढीच त्याला अपेक्षा आहे. आपल्या कामात यशस्वी झालेल्या दोघा नोकरांना धन्याकडून सारखीच शाबासकी मिळते. जरी त्यांना दिलेली  जबाबदारी व त्यांनी साधलेले कार्य भिन्न असले, तरी त्यांना मिळालेले प्रतिफळ मात्र समानच आहे. आपणास दिलेली जबाबदारी जरी थोडी असली, तरी योग्य व आवश्यक ते प्रयत्न आपण केलेच पाहिजेत त्याला पर्याय नाही. कारण आपल्या योग्यते व क्षमतेप्रमाणे परमेश्वराने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे आणि त्यानुसार आपण ती जबाबदारी पार पडणे गरजेचे आहे. आपणांस कमी जबाबदारी दिलेली आहे म्हणून आपण बेजबाबदार राहिलो तरी चालेल अशी मनोभावना अंगीकारणे चुकीची आहे. तिसऱ्या नोकराने धन्याचा उद्देश ओळखला नाही. त्याने सेवेपेक्षा सुरक्षिततेला महत्त्व दिले हीच त्याची चूक होती. सेवेसाठी आपणासमोर उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा ही देवाची अपेक्षा आहे व त्याचे प्रतिफळ आपणास चूकणार नाही. देव त्या धन्यासारखा कठोर, कसून काम करवून घेणारा आहे अशी चुकीची भावना आपण ठेवली, तर त्याला प्रीतीने, खुलेपणाने व मनःपूर्वक प्रतिसाद देणे आपणास कठीण होईल. त्याने दिलेल्या देणग्यांचा उपयोग आपण जबाबदारीने केला पाहिजे. ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार राहण्याचा हाच मार्ग आहे. ‘तयार असणे’ म्हणजे बेकार बसून वाट पाहणे नव्हे, तर आपणाला दिलेल्या संधीचा जास्त लाभ घेऊन सोपवलेली जबाबदारी पार पाडणे होय.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी यांनीं देऊळमातेच्या उन्नतीसाठी दिलेली आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनीना बाप्तिस्मा संस्काराद्वारे दिलेल्या आपल्या ख्रिस्ती जबाबदारीकडे दुर्लक्ष न करता ती विश्वासाने पार पाडण्यास त्यांना देवाची कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.

३) हे दयावंत परमेश्वरा आम्ही विशेषकरून ह्या जगात कोरोनाग्रस्त झालेल्या लोकांसाठी प्रार्थना करतो. ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून तुझ्याकडे याचना करतो.

४) आपण आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया की, येशूच्या शिकवणीप्रमाणे चालून परमेश्वराचा आमच्या कामाद्वारे गौरव होण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment