Friday, 6 November 2020


Reflection for the 32nd Sunday in Ordinary Time (08/11/2020) by Br. David Godinho.


सामान्य काळातील बत्तीसावा रविवार

 

दिनांक: ०८/११/२०२०

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६         

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३



 प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आपण उपासना वर्षाच्या अखेरीस आलेलो असताना आजची उपासना आपणा प्रत्येकास प्रभू येशूच्या येण्यासाठी सज्ज राहण्यास किंवा आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेल्या पाच शहाण्या कुमारींप्रामाणे तयारीत राहण्यास व त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास आव्हान करीत आहे. ही तयारी करण्यासाठी आपणांस गरज आहे ‘शहाणपणाची’ किंवा ‘ज्ञानाची’. शलमोनचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगितले आहे की, जो कोणी ज्ञानाचा शोध करील त्याला ते प्राप्त होईल. आणि हे दैवी ज्ञान आपणाजवळ असेलतर प्रभूच्या येण्याची परिपूर्ण तयारी करण्यास ते आपणांस मदत करेल. म्हणून आजच्या प्रभू भोजनात सहभागी होत आसताना प्रभू येशूच्या येण्याची आपण प्रत्येकाने पाच शहाण्या कुमारींप्रमाणे सतत जागृतेने वाट पाहण्यास आणि त्यासाठी तयारीत असण्यास लागणारी कृपा प्रभू जवळ मागुया. 

 पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६         

ज्ञान तेजोमय आणि अक्षय आहे अशा शब्दात आजच्या पहिल्या वाचनात आपणांस ज्ञानाची महती सांगितलेली आहे. कारण ज्ञान किंवा शाहाणपणा हा परमेश्वराचा एक गुणधर्म आहे. जो कोणी ज्ञानाच्या शोधात आहे त्यांस ते सापडेल आणि परमेश्वराच्या मार्गाने चालण्यास ते आपणांस मार्गदर्शन करील आणि त्यामुळे आपण परमेश्वराच्या येण्याच्या तयारीत असण्यासाठी ज्ञानाची आवड धरणे गरजेचे आहे.

 दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८

मृत्यूमुळे दुःख वाटणे हे सहाजिकच आहे; परंतु हा वियोग फक्त काही काळापुरता असतो. ख्रिस्ताचे अनुयायी ह्या नात्याने आपण पुनरुत्थानावर विश्वास ठेवून, जे ख्रिस्तामध्ये झोपी गेले आहेत म्हणजेच मरण पावले आहेत, ते खात्रीने जिवंत होणार आहेत ही आशा बाळगणे नितांत गरजेचे आहे. म्हणून पुनरुत्थानावर विश्वास ठेवून प्रभू येशूच्या येण्याची सतत तयारी करण्यास संत पौल आव्हान करीत आहे आणि त्याच्या पुन्हा येण्याचा विसर पडू देऊ नका आणि ह्याविषयी अजाण राहू नका असा बोध संत पौल थेस्सलनीकरांस करत आहे.

शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३

प्रभू येशूच्या पुन्हा येण्याच्या तयारीत राहण्याची आणि दक्षतेची अत्यंत गरज आहे हे व्यक्त करण्यासाठी प्रभू येशूने आपणासमोर दहा कुमारींचा दाखला मांडला आहे. ह्या कुमारीका दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या, त्यात पाच शहाण्या व पाच मूर्ख होत्या. जेव्हा वर आला तेव्हा त्या झोपेतून उठून दिवे नीट करू लागल्या. पाच ज्या शाहाण्या होत्या त्या पूर्ण तयारीनिशी आल्या कारणाने वरासोबत लग्नसोहळ्यात सहभागी होऊ शकल्या, परंतु मूर्ख कुमारींनी पुरेशी तयारी केली नव्हती आणि म्हणून त्यांस प्रवेश नाकारण्यात आला. प्रभूच्या येण्यास सतत तयार राहण्यास संत मत्तय आपणास आव्हान करीत आहे.

 बोधकथा:

राजू नावाचा एक गरीब माणूस एका लहानशा गावात राहत होता. जरी तो गरीब असला तरी तो मनाने व हृदयाने श्रीमंत होता. कोणात्याही व्यक्तीला मदत करायला तो सतत धावत असे. कोठे गरीब व्यक्ती किंवा भिकारी माणूस दिसला, तर तो लगेच त्याला काही तरी खावयास देई. अशा चांगल्या सद्गुणांनी तो वाढलेला होता. राजू कॉलेज पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. एकदा एका वर्तमान पत्रात हॉटेलसाठी जागा आहे ते पाहून तो त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत जातो. त्या ठिकाणी पोहचल्यावर त्याला एक गरीब भिकारी भेटतो. राजूला त्याची दया येते म्हणून तो त्याला काहीतरी खायला देण्यासाठी जवळच्या दुकानात जाऊन काही खायला घेऊन येतो व त्या भिकाऱ्याला देतो व तसाच मुलाखत देण्यासाठी पुढे निघून जातो. त्या नोकरीसाठी मुलाखत द्यावयाला खूप लोक आलेले होते. जेव्हा राजू मुलाखत द्यावयास जातो, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. ज्या गरीब भिकाऱ्याला राजूने काही खावयास दिले होते, तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो त्या हॉटेलचा मनेजर होता. त्याने राजूला सांगितले की, तू ही मुलाखत पास झालेला आहेस कारण मी भिकाऱ्याच रूप घेऊन त्या रस्त्यावर उभा होतो, कोणीही मला मदत करावयास पुढे आला नाही परंतु तू माझ्या जवळ आला मला खायला दिले. आणि तू खरोखरच माझ मन जिंकल आहेस त्याच बक्षीस म्हणून तुझी ह्या जागे साठी निवड झाली आहे. तू उद्या पासून कामावर ये. दुसऱ्यांना मदत करण्याच्या ह्या गुणधर्मामुळे त्याला ती नोकरी भेटू शकली.

मनन चिंतन:

वेळेवर न आल्यामुळे बस किंवा रेल्वे चुकल्याचा अनुभव, पुरेशी तयारी न केल्यामुळे कामात किंवा परीक्षेत अपयश आल्याचा अनुभव,  तसेच संगीत खुर्ची हा खेळ खेळत असताना पुरेशी दक्षता न घेतल्यामुळे खेळातून बाद होण्याचा अनुभव आपण घेतलेला असेल. सेमिनरीमध्ये ‘सरप्राईज टेस्ट’ नावाची चाचणी घेण्याची एक पद्धत आहे. एखादा विषय शिकविताना प्रोफेसर कधीही चाचणी घेतात. जो कोणी चांगल्याप्रकारे रोज जे काही शिकविलेले आहे त्याची उजळणी करतो तो चांगल्या गुणांनी पास होतो व जो शेवटच्या क्षणाला आभ्यास करावयास थांबतो तो चांगले मार्क्स घेऊ शकत नाही. अशाप्रकारचे अनेक अनुभव आपण अनुभवलेले आहेत.

आजची उपासना आपणास प्रभू येशूच्या पुन्हा येण्यासाठी तयार राहण्यास सांगत आहे. स्वर्ग राज्याच्या गोष्टी सांगण्यासाठी प्रभू येशू लोकांशी निगडीत असलेल्या, त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टींचा दाखल्याद्वारे वापर करत असे. आपल्या शिष्यांनी आपल्या पुन्हा येण्यास कशाप्रकारे तयार रहावे हे सांगण्यासाठी प्रभू येशू त्यांच्यासमोर दहा कुमारीका ज्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या त्यांचा दाखला ठेवत आहे.

यहुदी लोकांची लग्नसमारंभ साजरा करण्याची परंपरा अशी होती. त्यांचे लग्न हे सायंकाळी वधूच्या घरी होई, तदनंतर दोघेही नवविवाहित जोडपे वराच्या घरी लग्नसमारंभ साजरा करण्यासाठी जात असे. तेव्हा वाटेत ह्या नवीन जोडप्याला त्यांचे नातेवाईक किंवा इष्ट-मित्र त्यांचा सत्कार करावयास त्यांच्या घरी चहापाण्याच्या छोट्याश्या कार्यक्रमास बोलावत असत आणि म्हणून ह्या नवविवाहितांना वराच्या घरी पोहचण्यास बराच वेळ होई. जेव्हा वर घराच्या जवळ येई, तेव्हा काही कुमारीका आपल्या हातात दिवे घेऊन त्यांच्या स्वागतास जात असत आणि नंतर लग्नमंडपात ते सर्व एकत्र जात आणि दरवाजा बंद केला जाई आणि हा लग्न समारंभाचा कार्यक्रम काही दिवस चालत असे. अशी ही यहुदी लोकांची परंपरा होती.

प्रभू येशूच्या येण्यास ‘तयारीत रहाणे किंवा जागृत रहाणे’ हे फार महत्त्वाचे आहे ते दाखविण्यासाठी त्याने ही लग्नाची परंपरा घेऊन हा दहा कुमारींचा दाखला सांगितला आहे. ह्या दाखल्यातील काही गोष्टी रूपकात्मक आहेत त्या पुढील प्रमाणे:

१) वर: ह्या दाखल्यातील वर आहे तो म्हणजे खुद्ध प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्या पुन्हा येण्याची आपण आतुरतेने वाट पहायला हवी.

२) दहा कुमारीका: ह्या कुमारीका म्हणजे येशूचे शिष्य आहेत. त्यांतील पाच शहाण्या व पाच मूर्ख. शहाणा व्यक्ती कोण? आणि मूर्ख व्यक्ती कोण? मत्तयच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने ह्या विषयी आपणास सांगितलेले आहे. जो कोणी माझी (येशूची) वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो शहाणा व्यक्ती होय, याउलट जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो मूर्ख व्यक्ती होय.

३) दहा कुमारींनी सोबत आणलेले दिवे: हे दिवे प्रभू येशूच्या ‘पुन्हा येण्यावरील’ आशेचे आणि विश्वासाचे दिवे आहेत. प्रेषितांचा विश्वाससांगिकार प्रकट करताना आपण म्हणतो की, प्रभू पुन्हा येणार ह्यावर माझा विश्वास आहे, कारण प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे तो केव्हा येणार हे आपणांस ठाऊक नाही, परंतु तो येणार आहे हे मात्र नक्की म्हणून आपण आपले विश्वासाचे व आशेचे प्रतिमात्मक दिवे जळते ठेवेणे गरजेचे आहे. हे विश्वासाचे आणि आशेचे दिवे जळते ठेवण्यासाठी प्रभू आपणांस वारंवार आवर्जून सांगत आहे. लूकच्या शुभवर्तमानात १२:३५-३६ मध्ये प्रभू येशू सांगतो की, तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. आणि पुढे तो म्हणतो की, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा.

४) दिवे जळते ठेवण्यासाठी लागणारे तेल: दाखल्यात सांगितल्याप्रमाणे ‘तयारी’ ही ‘पुरेसे तेल’ ह्या शब्दात केली आहे. हे पुरेसे तेल म्हणजे प्रभू येशूच्या शिकवणूकीचे पालन करून ते आपल्या कृतीत उतरविणे होय. मत्तय २५:३५-४६ मध्ये आपणास चांगले कृत्ये करण्याची एक यादी दिलेली आहे ती म्हणजे, भुकेल्यांस अन्न, तहानेल्यास पाणी, जे परके आहेत त्यांस राहावयास जागा, उघडे आहेत त्यांस वस्त्र, आजाऱ्यांना व बंदिवानांना भेट. अशा प्रकारे चांगली कामे करून तसेच हे सर्व करताना प्रार्थनेची सोबत घेऊन आपण प्रभू येशूच्या येण्यास परिपूर्ण तयारी करू शकतो. 

मृत्यू हा अटळ आहे. दोन नोव्हेंबर ह्या दिवशी आपण सर्व मृतांचा दिवस साजरा केला. हा दिवस आपणास जाणीव करून देतो की, आपण एक दिवस मारणार आहोत व त्यासाठी सतत तयारीत असणे फार गरजेचे व महत्वाचे आहे, कारण मरण कधी येणार हे आपण सांगू शकत नाही. वरील बोधकथेत सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात चांगले गुण अंगिकारले पाहिजेत. आज आपल्या समाजात, परिसरात अनेक लोक कोरोनामुळे पिडीत आहेत, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तसेच आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती खालावलेली आहे अशा लोकांना आपण आपल्या परीने मदत करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या समाजात अत्याचार, अन्याय, अशांती पसरलेली आहे हे सर्व दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत व अशाप्रकारे प्रभू येशूच्या पुन्हा येण्याची तयारी आपण केली पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपले प्रेषितकार्य करताना सातत्याने परमेश्वराचा अनुभव यावा व हा अनुभव त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातून इतरांना द्यावयास प्रयत्नशील राहण्यास त्यांस परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. आपण सर्वांनी आपल्या जीवनात सतत जागृत राहून म्हणजेच प्रभू येशूची शिकवण आपल्या कृतीत उतरवून प्रभू येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खी, आजारी व बेरोजगार आहेत, विशेषतः जे कोरोना सारख्या भयानक रोगाने पिडीत आहेत अशा लोकांस मदतीचा हात देण्यास तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे संशोधक कोरोनावर लस शोधत आहेत त्यांना वेळीच परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे व ह्या कोरोना महामारीतून सर्व लोकांचा बचाव व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.    

No comments:

Post a Comment