Wednesday, 18 November 2020

Reflection for the Solemnity of Christ the King (22/11/2020) by         Br. Suhas Farel




ख्रिस्तराजाचा सण

दिनाक: २२/११/२०२०

पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६

शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६



प्रस्तावना :

आज सामान्य काळातील चौतीसावा रविवार. ख्रिस्ती धर्माच्या दिनदर्शिकतेनुसार आज वर्षाचा शेवटचा रविवार. आजच्या दिवशी देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. आजच्या ह्या आनंदाच्या दिवशी देऊळमाता आपल्या प्रत्येकाला आठवण करून देत आहे की, ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृद्याचा, आत्म्याचा, शरीराचा आणि कुटुंबाचाही राजा आहे. ख्रिस्ताचे हे राजासन कोणत्याही माणसाकडून नव्हे तर खुद्द स्वर्गातील पित्याकडून लाभले आहे. म्हणूनच ख्रिस्ताचे राज्य हे काही वेळापुरती मर्यादित नसून अनंतकाळाचे राज्य आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संदेष्टा यहेज्केलद्वारे आपण ऐकणार आहोत की, परमेश्वर त्याच्या हरवलेल्या मेंढराचा शोध करून त्यांचा मेंढपाळ होतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला येशू ख्रिस्त हा मेलेल्यांचा नसून जीवनतांचा देव आहे आणि त्या ख्रिस्ताच्या विश्वासात आपण खंबीर असलो पाहिजे असा बोध करत आहे. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकणार आहोत की, परमेश्वर हा त्याच्या दुतासह येईल व आपल्या सर्वांचा न्याय करील. त्यामुळे आपण आपले जीवन परमेश्वराच्या आज्ञेत राहून जगण्यासाठी आणि परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर सदोदित राहण्यासाठी विशेष करून या मिस्साबलिदनामध्ये प्रार्थना करूया.

पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७

          आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकणार आहोत की, देव आपल्या मेंढरांना शोधून काढणार आहे. ज्याप्रमाणे एखादा मेंढपाळ कळपामध्ये आपली मेंढरे शोधून काढून त्यांना हिरव्यागार प्रदेशात चरायला घेऊन जातो. त्याप्रमाणेच आपला देव त्यांच्या लोकांना त्यांच्या दयनीय परिस्थितीमधून काढून उत्तम ठिकाणी नेईल.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६

          दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकणार आहोत की, ज्याप्रामाणे आदमाने जगात पाप आणले आणि मरणास कारणीभूत ठरला. ख्रिस्ताने आपल्या रक्ताने ते पाप धुवून मरणावर विजय मिळविला. त्यामुळे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते जरी मेले तरी ते ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठतील. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मरणावर विजय मिळविला आहे.

शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६

          शुभवर्तमानामध्ये आपण ऐकणार आहोत की, आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो तेव्हा ती मदत देवाला पोहोचते. शुभवर्तमानामामध्ये दोन लोकांचे गट पाहायला मिळतात. एक गट जो इतरांना मदत करतो, संकटात नेहमी धावून येतो आणि दुसरा गट जो इतरांकडे दुर्लक्ष करतो. जी लोक चांगली कामे करतात त्यांना देवाच्या राज्यात नेहमी स्वीकारले जाते. परंतु जी लोक दुष्कर्म करून, इतरांना दुःख देतात त्याचे नेहमी हाल होतात. ते सार्वकालिक शिक्षेस पात्र ठरतात.

 मनन चिंतन:

ख्रिस्त राज्याची सुवार्ता ह्या जगी सांगाल का

आलेलूया, आलेलूया गौरवे गर्जाल का ?

          आज सामान्य काळातील चौतीसावा रविवार. ख्रिस्ती धर्माच्या दिनदर्शिकतेनुसार आज वर्षाचा शेवटचा रविवार. आजच्या दिवशी देऊळमाता ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे. ज्याप्रमाणे आपण प्रस्तावनेमध्ये ऐकले की ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृदयाचा, आपल्या आत्म्याचा, शांतीचा, शरीराचा व कुटुंबाचा राजा आहे. त्याचे राज्य हे अनंतकाळाचे राज्य आहे. म्हणूनच वधस्तंभावर खिळलेल्या दोन चोरांपैकी एकाने येशूला म्हटले की, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा आणि ताबडतोब प्रभूने त्याला त्याच्या तारणाचे अभिवचन दिले. “तू आज माझ्याबरोबर स्वर्गलोकात असशील.” व त्या वधस्तंभावरच त्या अपराध्याला सार्वकालिक जीवन मिळाले.

          यावरून आपल्याला कळते की, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचे नेहमी तारण होते. फक्त त्यांचेच नाही तर त्यांच्या कुटुंबाचेही तारण होते. प्रेषितांची कृत्ये: १६:३१ एका पास्टरने लोकांना प्रश्न विचारला, ‘तुम्हापैकी किती जणांना सार्वकालिक जीवन पाहिजे? किती जणांना वाटते की आपल्या भावाचे, बहिणीचे तारण व्हावे? किती जणांना वाटते की माझ्या नवऱ्याचे, बायकोचे तारण व्हावे?’ काही जणांचे हात अर्धेच उभे आहेत. नवऱ्याला किंवा बायकोला तारण मिळो वा न मिळो मला त्याचे काही पडले नाही.

          एकदा एका धर्मगुरूंनी आपल्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला की, किती जणांना स्वर्गात जायचं आहे? सर्वांनी एकदम सरळ हात वर केला परंतु एका माणसाने घट्ट हाताची घडी घातली. फादरांनी त्याला कुतूहलाने विचारले, काय रे भावा तुला स्वर्गात जायचे नाही काय? त्यावर तो माणूस म्हणाला, फादर त्या बाकावर वर हात करून ती बाई बसली आहे ना ती माझी बायको आहे. आणि जर का ती स्वर्गात जाणार असेल तर मी कधीच स्वर्गात जाणार नाही. She can turn even heaven into hell. आपल्यापैकी बहुतेक जणांची हीच कथा आहे. म्हणून जेव्हा मी विचारले की आई-बापांना, बहिणीला-भाऊला स्वर्ग मिळावा, तारण व्हावे कोणाला वाटते तेव्हा हात पटकन वर गेले परंतु नवऱ्याला आणि बायकोला तारण प्राप्त व्हावे असे विचारल्यावर काही हात वरती येण्यास कुचबुजले. वाईट वाटून घेऊ नका. परंतु बायकोला नेहमी वाटत असते की सर्व प्रसंगांचे कारण हा नवराच असतो. म्हणून दर रविवारी बायको नवऱ्याला खेचत ओढत चर्चमध्ये आणत असते आणि फादारांचे प्रवचन चालू झाले की नवऱ्याला टोमणे मारणे चालू. कधी कधी नवरा बायकोला ताणे मारत असतो. बायकोला वाटते नवऱ्याने बदलायला हवं, नवऱ्याला वाटते बायकोने बदलायला हवं. सासूला वाटते सुनेने, सुनेला वाटते सासूनं, मुलांना वाटते मुलींनी, मुलींना वाटते मुलाने आणि हे असेच चालू राहते. प्रत्येकाला वाटते की दुसऱ्याने बदलायला हवे. परंतु मदर तेरेजाचे वाक्य लक्षात ठेवा, if you want to bring the change, be the change. आज आपल्या सर्वांना पश्चातापाची गरज आहे आणि पश्चाताप करायचा तो म्हणजे कसा? बायबलमधील पौलाचे करंथिकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये ७:१० मध्ये सांगते, पश्चाताप हा दोन प्रकारचा असतो. जागतिक पश्चाताप आणि आध्यात्मिक पश्चाताप.

          पेत्र आणि जुदास. एकाने देवाला नाकारले तर दुसऱ्याने देवाचा विश्वासघात केला. दोघांनीही पश्चाताप केला; फरक इतकाच की पेत्राने येशूवर पाहिले आणि त्याला तारण प्राप्त झाले. दुसऱ्या बाजूला जुदासने चाळीस नाण्यावर, जगावर विचार केला आणि स्वतःला फासावर टांगविले.

          आज देऊळमाता आपल्याला ख्रिस्त जो राजा आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आमंत्रित करीत आहे. आजवर आपण खूप अशा राजांच्या कहाण्या ऐकल्या असतील. बरेचसे राजे उदयास आले आणि धुळीस मिळाले. कारण त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम केले. स्वतःच्या स्वार्थासाठीच जगले. त्यांनी जनतेचा विचार कमी आणि स्वतःचा विचार जास्त केला. काही चांगले राजेही होऊन गेले त्यात शंका नाही. परंतु प्रत्येक राजाची एक प्रजा होती. राजवाडा होता. सिहासन होते. परंतु आजचे शुभवर्तमान आपल्यासमोर एक वेगळ्याच राजाला प्रदर्शित करत आहे. असा राजा ज्याने हिऱ्या-मोत्यांचा नव्हे तर काट्यांचा मुकुट परिधान केला होता. जो राजवाडयात नाही तर गाईच्या गोठयात जन्माला आला. असा राजा ज्याने लोकांचे प्राण घेतले नाही तर लोकांना नवजीवन प्राप्त करून दिले. ज्याने आपले साम्राज्य वाढविले नाही तर आपल्या राज्यांत लोकांना सामावून घेतले. कारण त्याला लोकांच्या मनात, हृदयावर राज्य करायचे होते. म्हणून मरतेवेळीसुद्धा त्याने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली. अशा या राजाचा सण साजरा करत असताना आपल्या प्रत्येकाला त्याच्या स्वर्गीय राज्याचा अनुभव यावा. तसेच येशूच्या दयेचा व करुणेचा स्पर्श आपणा सर्वांना व्हावा म्हणून प्रार्थना करूया. आमेन.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभोतुझे राज्य आम्हामध्ये येवो.

१. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्या सर्वांनी आपल्या कार्याद्वारे व शुभवार्ताद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषित करून सर्वत्र ख्रिस्ताच्या प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.


२. समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही अशा लोकांना ख्रिस्त राजाच्या कृपेने व आशीर्वादाने न्यायाचे वरदान मिळावे. त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबले जावे आणि त्यांना समाजाने सन्मान व आदर देऊन त्यांचा समाजामध्ये स्वीकार करण्यात यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.


३. आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे व आपल्या देशाची व लोकांची निःस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


४. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत, विशेषतः जे कोरोना रोगाने बाधित आहेत, त्यांना ख्रिस्तराजाचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.


५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment