Reflection for the 18th Sunday in Ordinary Time (01/08/2021) By Dn. David Godinho
सामान्य काळातील अठरावा रविवार
दिनांक: ०१/०८/२०२१
पहिले वाचन: निर्गम १६:२-४, १२-१५
दुसरे वाचन: इफिसकरांस ४: १७, २०-२४
योहान ६: २४-३५
विषय: - आम्ही भुकेलेलो आहोत.
प्रस्तावना
आज आपण
सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास आपल्या
जीवनातील एका मुलभूत गोष्टीवर म्हणजे भुकेवर मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे. प्रत्येक
व्यक्तीस कशाची ना कशाचीतरी भूक लागलेली असते. आणि ती भूक भागवण्यासाठी किंवा
तृप्त करण्यासाठी ती व्यक्ती अतोनात प्रयत्न करीत असते.
आजची वाचनेदेखील
आपणास ह्याच विषयावर बोध करीत आहेत. पहिल्या वाचनामध्ये आपण वाचतो कि, इस्त्राएली लोकं
परमेश्वराविरुद्ध कुरकुर करतात; तर शुभवर्तमानात अनेक लोक आपली शरीरिक भूक
भागविलेल्या प्रभूच्या शोधात असलेली आपणास आढळून येतात. प्रभू त्यांस सांगतो कि,
शारीरिक भूक भागविण्यासाठी नव्हे तर आत्मिक भूक भागविण्यासाठी प्रयत्नशील असा. आपण
कशासाठी भुकेले आहोत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. व ह्या ख्रिस्तयागात सहभागी
होऊया.
मनन चिंतन
भूक लागणे ही
एक नैसर्गिक बाब आहे. प्रत्येक जीवाला भूक–तहान लागते. आपणा प्रत्येकाला सुद्धा
त्याचा अनुभव आहे. आणि ही भूक थांबविण्यासाठी आपण काही ना काही करीत असतो. बायबलमध्ये
अनेक अशी उदाहरणे आपल्या निदर्शनास येतील. आदाम व एवेने भुकेमुळे एदेन बागेतील
झाडाची फळे खाल्ली (उत्पत्ती ३). आब्राहामाने त्याच्या जवळ आलेल्या तीन पुरुषांना
भुकेले पाहून जेवण तयार केले व त्यांस दिले (उत्पत्ती १८). दुष्काळात धान्य
मिळविण्यासाठी मिसर देशात आलेल्या आपल्या भावांना योसेफाने धान्य पुरविले
(उत्पत्ती ४२). आणि भुकेमुळे इस्त्राएल प्रजेने देवाविरुद्ध कुरकुर केली तेव्हा
देवाने अरण्यात त्यांना जेवण पुरविले व त्यांची भूक थांबविली, ह्याचे वर्णन आजच्या
पहिल्या वाचनात करण्यात आले आहे. तसेच भुकेमुळे दावीद राजाने अहिमालेख राजाकडून पवित्र
भाकर घेऊन ती खाल्ली व त्यांनी आपली भूक भागविली (१ शमुवेल २१). दुष्काळात आपली
भूक भागविण्यासाठी एलिया प्रवक्त्याने साराफत येथील विधवेकडून भाकर भाजून खाल्ली (१
राजे १७). एवढेच नव्हे, तर गेल्या रविवारी आपण शुभवर्तमानात ऐकले कि, प्रभू येशूने
पाच हजार भुकेल्या लोकांना जेवण घातले (योहान ६). एवढेच नव्हे, तर भुकेमुळे शेतातून
जात नसतांना शब्बाथ दिवशी येशूच्या शिष्यांनी देखील शेतातील कणसे मोडून खाल्ली (मत्तय
१२). आणि भुकेमुळे प्रभू येशूने अंजिराच्या निष्फळ झाडाला शाप दिला (मार्क ११), हे
देखील आपण ऐकलेले आहे.
ह्या सर्व उदाहरणांवरून आपणाला प्रत्यक्ष
शारीरिक भुकेचे महत्त्व समजते; पण प्रभू येशू म्हणतो कि, शारीरिक भुकेपेक्षा, आध्यात्मिक
भूक भागविणे फार गरजेचे आहे आणि म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, “मनुष्य केवळ भाकरिने
नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल” (मत्तय ४:४). आज
अनेक लोकांजवळ जगाच्या सर्व सुखसोयी आहेत; परंतु त्यांच्या जीवनात समाधान आणि शांतीची
उणीव आहे.
टॉम फिलीप हा वयाच्या चाळीसाव्या वर्षी अमेरिकेतील एका
मोठ्या व प्रसिद्ध कंपनीचा अध्यक्ष झाला होता. जगातील सर्व सुख- होईल त्याच्या
पायाखाली होत्या. त्याचा मोठा असा बंगला होता, चांगले कुटुंब होते, चांगल्या
गाड्या होत्या. मर्सिडीज सारखी नावाजलेली गाडी त्याच्याजवळ होती. असा हा
सुप्रसिद्ध व श्रीमंत माणूस सर्वकाही त्याच्याजवळ असूनही जीवनात आनंदी नव्हता.
काहीतरी कमी असल्याचा भास त्याला रोज होत असे. एके दिवशी न्यूयॉर्क शहरात जात असता
त्याला एक धार्मिक अनुभव झाला. त्या अनुभवाने त्याच्या जीवनाचा कायापालट झाला.
त्या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणतो की, माझ्या जीवनात ज्याची कमतरता होती ती मला
समजली आणि ती म्हणजे प्रभू येशूख्रिस्ताची कमतरता. जगातील कुठल्याही सुख- सोयी
आपल्याला खरे समाधान देणार नाहीत किंवा आपली अध्यात्मिक भूक भागवू शकणार नाहीत;
फक्त आणि फक्त परमेश्वरच आपली भूक भागवू शकतो. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात, “ हे
परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण केली आहेत आणि तुझ्यात विसावा
घेतल्यावाचून ती अस्वस्थच राहतील”. हेच प्रभू येशूख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपणा
प्रत्येकास सांगत आहे की, “नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने
ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांस सार्वकालिक जीवनासाठी
टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा”. आणि हे अन्न म्हणजे खुद्द
प्रभू येशू ख्रिस्त जिवंत स्वर्गीय भाकर होय. जो ही भाकर खातो त्याला भूक व तहान
लागणार नाही.
आपण, ही जिवंत भाकर कशाप्रकारे मिळवू शकतो?
१. नवीन मनुष्य धारण करावा: - इफिसकरांस पत्र ह्यातून घेतलेल्या
दुसऱ्या वाचनात, आपणास सांगितले आहे ते म्हणजे, पहिल्या प्रथम आपण आपला जुना जीवितक्रम
म्हणजे कपट, वासना यांतून मुक्त होऊ, म्हणजेच अंधकारमय जीवनाचा त्याग करून
सत्यापासून निर्माण होणारा नवा मनुष्य धारण करावा.
२. येशूचा शोध करावा: - ज्याप्रकारे लोकांनी प्रभू येशूचा शोध करीत त्याच्या मागे
आले, तसेच आपणही प्रभू येशूच्या शोध करायला पाहिजे. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे
तो आपणास जे गरीब, भुकेलेले, तहानलेले, वस्त्रहीन, परके, उघडे, आजारी, लोकांमध्ये
सापडेल (मत्तय २५).
३. येशूवर विश्वास ठेवणे: - येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे त्याने
केलेले कार्य आपणही करणे. त्याच्या शब्दांप्रमाणे आपले जीवन जगणे. आज कोरोना महामारीत
अनेक लोक बेरोजगार झाले आहेत; अनेक लोकांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे.
अशा सर्वांना आपल्यापरीने मदत करणे म्हणजेच येशूवर विश्वास ठेवणे होय. जेव्हा आपण ह्या
बंधू-भगिनींची सेवा करू, त्यांना मदत करू, तेव्हा आपण सार्वकालिक जीवनासाठी / अन्नासाठी
श्रम करू व ज्याप्रमाणे गरीब व गरजवंतामध्ये संत मदर तेरेसा ह्यांना येशूचा अनुभव
आला, त्याचप्रमाणे आपणास देखील प्रभूचा अनुभव येईल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: - हे परमेश्वरा, आमची प्रार्थना
ऐक.
१. ख्रिस्तसभेच्या पुढार्यांनी मोशे व आहारोन प्रमाणे
त्यांच्या हाती सोपविलेल्या प्रजेचे, अध्यात्मिक तहान - भूक भागविण्यास सतत कार्यरत असावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी ह्या कोरोनाच्या काळात
लोकांच्या उद्धारासाठी झटावे, तसेच जे गरीब, बेरोजगार व निराश्रित आहेत अशांना
सहाय्य करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपणा सर्वांना परमेश्वराने योग्य प्रमाणात पाऊस द्यावा व
सर्व शेतकरी बंधू - भगिनींना त्यांच्या श्रमाचे चांगले फळ मिळावे, म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. ह्या कोरोना महामारीचा लवकरात लवकर अंत व्हावा,
परमेश्वराने आपला सर्वांचा ह्या महामारीपासून बचाव करावा, व जी लोकं या आजाराला
बळी पडली आहेत त्या सर्वांना त्याचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा, म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक गरजांसाठी
प्रार्थना करूया.