Friday, 2 July 2021

Reflection for the 14th Sunday in Ordinary Time (04/07/2021) By Bro. Jeoff Patil



सामान्य काळातील चौदावा रविवार

यहेजकेल: - २:२-५

२ करिंथ: - १२:७-१०

मार्क: - ६: १-६

“जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”


प्रस्तावना

    आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपल्या पाचारणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, परमेश्वर यहेजकेल संदेष्ट्याला इस्त्रेलाचा उद्धार करण्यासाठी पाचारण करीत आहे. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे आपण बढाई मारू नये, म्हणून त्याने आपल्या शरीरात एक काटा रुतला असल्याचे सांगतो. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त संदेष्ट्याचा सन्मान त्याच्या देशात होत नसतो, असे विधान मांडून आपला शिष्यांना आपल्या कार्यामध्ये स्थिर राहण्यासाठी ताकीद देत आहे. प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्ताचा सुवर्तिक असतो. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. परमेश्वराच्या मळ्यात कार्य करीत असतांना स्तुती बरोबर निंदा, टीका आपल्या वाट्याला येणार आहेत; परंतु आप ह्या कार्यामध्ये न डगमगता सतत पुढे जाण्यास आपल्याला परमेश्वराची विशेष कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

पहिले वाचन

    इस्रायलच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा काळ हा संदेष्ट्यांचा काळ होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुवून काढावा असे हे संदेष्टे समाज धुवून काढीत. म्हणूनच परमेश्वराने यहेजकेल संदेष्ट्याची निवड केली. इस्राएल लोकांच्या फितुरीमुळे देवाने त्यांना हद्दपार करून गुलामगिरीत वाढविले. लोकांची सुटका केल्यावर देवाने यहेजकेल ह्यास आपला संदेष्टा म्हणून निवडले होते. आत्म्याने माझ्याठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले”. या वाक्यावरून आपणास कळते की देवाने त्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करून इस्राएल लोकांना आपला संदेश देण्यासाठी निवडले आहे.

दुसरे वाचन

    संत पौलला ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आपण जरी अशक्त व दुर्बल असलो तरी ख्रिस्त आपल्या अशक्तेत प्रट होत असतो, हे त्याला दाखवायचे आहे. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे ह्या शब्दांद्वारे संत पौल आपणास त्याला झालेल्या पाच जणांची साक्ष देतो. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी गर्विष्ठ बनवू नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा, ह्या वाक्यातून संत पौल आपल्याला विपुल ते प्रकटीकरणे झालेली होती हे स्पष्ट करून देतो. प्रकटीकरणाच्या ह्या विपुलतेमुळे तो डून जाऊ नये म्हणूनच संत पौल बढाई मारू नये म्हणून ख्रिस्ताने त्याच्या शरीरात एक काटा रुतलेला आहे असे तो म्हणतो. कारण त्याने गर्वपणा धारण न करता नम्रपणा धारण करावा व ख्रिस्ताची साक्ष द्यावी असा होईल.

शुभवर्तमान

    संत मार्क आपल्या शुभवर्तमानात येशूला खरा प्रवक्ता किंवा संदेष्टा असे संभोधितो. येशू गालीलात असताना त्याला आपल्या गावी जाण्याची इच्छा झाली होती. म्हणून येशू गालीलातून निघण्या अगोदर आपल्या नाझरेथ या गावास भेट देतो. ज्या दिवशी येशूने आपल्या गावास भेट दिली तो दिवस शब्बाथ दिवस होता. शब्बाथ दिवशी यहुदी लोक देवळात प्रार्थना करण्यासाठी जात असत आणि येशूने तिथे उपदेश केला होता, त्याचा तो उपदेश ऐकून लोक अतिशय प्रभावित झाले. काहींच्या मनात खवळल उडाली, तर काहीजण एकमेकास विचारपूस करत होते. ह्याला हे सर्व ज्ञान कोठून प्राप्त झाले? हा सुतार नाही काय? हा मरीयेचा मुलगा ना? अशा शब्दात त्यांनी त्यांची अवहेलना केली होती. ह्या त्यांनी केलेल्या अव्हेलनेला येशू ने म्हटले होते, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात त्याचा अपमान होतो. प्रेषित कार्यामध्ये आपला सतत सन्मान होणार असे नाही, तर निंदा, भेदभाव, टीका, छळ अशा संकटांना सामोरे जावे लागते. असे ठाम मत संत मार्क आपल्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे.

मनन चिंतन

    मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले’. प्रत्येक ख्रिस्ती माणूस हा प्रेषित आहे. बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाल्यामुळे अनेक अधिकार आपणास प्राप्त झालेले आहेत. आपण नावाने केवळ ख्रिस्ती असलो व आपलं कार्य शून्य असेल, तर आपण ख्रिस्ती असणे केवळ ढोंगीपणा चे लक्षण ठरेल. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत असताना आपण स्तुती बरोबर निंदा, टीका, छळ आपल्या वाट्याला येणार आहे; परंतु अशा परिस्थितीमध्ये न डगमगता येशू ख्रिस्ताच्या दुखः सहनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले मिशन कार्य पुढे चालू ठेवणार आहात का? आजची तिन्ही वाचणे आपल्याला सांगत आहेत कि, देवाची सुवार्ता सांगत असतांना जरी अडचणी आणि दुःखे आली तरी डगमगू किंवा घाबरू नये तर धैऱ्याने आपण सुवार्ता पसरवली पाहिजे. परिपूर्ण आनंद हा अपमान, गैरसमज व दुःख सहन करण्यात आहे, असे असिसिकर संत फ्रान्सिस म्हणतात. 

    एकदा संत फ्रान्सिस असिसिकर आपल्या घरातून बाहेर भिक्षा मागण्यास गेले होते. त्यांना येण्यास उशीर झाला. जेव्हा ते आपल्या घरात परत आले तेव्हा त्यांनी दरवाजा वाजवला. घरातून एक बंधू बाहेर आला. हा बंधू संत फ्रांसिसचे स्वागत करण्याऐवजी त्याचा अपमान व निंदा केली व त्यांना घराबाहेर काढले कारण तो बंधू नवीन असून संत फ्रान्सिस ह्यांना ओळखत नव्हते. संत फ्रान्सिसच्या मते हाच परिपूर्ण आनंद आहे, असे बोलत ते देवाची स्तुती करत बाहेर गेले. आजच्या शुभवर्तमानामध्ये देखील आपल्यालादिसून येते कि येशूचा देखील त्याच्या स्वतःच्या गावात पमान व निंदा करण्यात आली. परंतु येशू मागे न जाता, देवाची सुवार्ता सर्वांना पसरवित तो पुढे गेला. पल्यापैकी बर्‍याच लोकांना वाटते की श्रद्धा म्हणजे भक्ती करणे, नोव्हेना व प्रार्थनेत सहभागी होणे. भक्ती हा श्रद्धेचा भाग असला तरी भक्ती म्हणजे श्रद्धा नव्हे. श्रद्धा म्हणजे परमेश्वर पित्याला शरण जाणे. आपला सर्वस्व चांगले आणि वाईट त्याच्या हातात सोपविणे येशू ख्रिस्ताप्रमाणे टीकेची पर्वा न करता देव राज्य उभारण्यासाठी धडपड करीत राहणे, हे आपल्याला आजच्या वाचनात सांगण्यात आले आहे. 

    आज ख्रिस्तसभेमध्ये अशा काही व्यक्ती आहेत की, केवळ आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी सेवेचा वापर करतात. मी ख्रिस्तसभेसाठी काय करतो यापेक्षा माझ्यासाठी ख्रिस्तसभा माझ्यासाठी काय करते? हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटतो. काहीवेळा मिस्साला येणे, दानधर्म करणे, कायद्याचे पालन करणे एवढीच त्यांची भूमिका असते. तुम्ही आणि मी आजचे संदेष्टे आहोत. ख्रिस्ताचे संदेष्टे म्हणून आपण सुरुवात कुठून करावी? प्रथम माझ्या स्वतःच्या घरातून, गावातून, नगरातून, राज्यातून आणि मग देशात. आज प्रभू येशूख्रिस्त, त्याच्या वाचनाद्वारे आपणा सर्वांना पाचारण करीत आहे. त्याचा प्रेषित होण्यास मी तयार आहे का? माझा वेळ मी त्याच्यासाठी देऊ शकेल का? केवळ मान, प्रतिष्ठा न मिळता, कुठलीही अपेक्षा न करता, मी निस्वार्थीपणे देवाचे कार्य करण्यास तयार आहे का? आजच्या शुभवर्तमानाद्वारे कार्य करीत असताना, येणाऱ्या अडचणींना, निंदेला व टीकेला सामोरे जाण्यास आपणा सर्वांना ख्रिस्ताकडून विशेष कृपा शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद:- नम्र होऊनी प्रभू तुज करितो प्रार्थना.

1.  ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून, त्याचे कार्य जगभर पसरविणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वाना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

2.  आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

3.  आपण प्रेषित कार्य करीत असताना कौतुकाबरोबरच येणाऱ्या टिकेला, अडचणींना सामोरे जाता यावे व अश्या प्रसंगाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

4.  आमच्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत त्यांना तुझा स्पर्श लाभू दे. तसेच जे लोक तुझ्या पासून दूर जात आहे त्यांना तुझ्या प्रेमाची हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.   

5.  आता आपल्या स्वतःच्या कौटुंबिक हेतूसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment