आजची उपासना आपल्याला देवाच्या
प्रेमाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आमंत्रित करीत आहे. पहिल्या वाचनात आपणास सांगण्यात आले आहे की,
देवाची सुवार्ता व साक्ष इतरांना देताना आपल्याला आमोस संदेष्ट्याप्रमाणे अनेक
संकटाना सामोरे जावे लागेल. अनेकजण आपला तिरस्कार करतील; पण परमेश्वर आपल्याला
एकटे सोडणार नाही. ज्या कार्यासाठी परमेश्वर आमोसला बोलावितो, ते कार्य तो सिद्धीस
नेतो. संत पौल दुसऱ्या वाचनात आपल्याला आठवण करून देतो की, बाप्तिस्माद्वारे आपण
सर्वजण देवामध्ये एक झालो आहोत. म्हणून देवाची सुवार्ता ही फक्त निवडलेल्या
लोकांसाठी नाही; तर सर्वांसाठी आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या
शिष्यांना देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास अधिकाराने पाठवतो. आपण सर्वजण देवाची निवडलेली
प्रिय आहोत. आजही येशू ख्रिस्त आपल्याला त्याचे कार्य व सुवार्ता इतरांना देण्यास
बोलावीत आहे. आपल्या जीवनाद्वारे देवाचे प्रेम इतरांपर्यंत पोहोचविणे हे आपले
कर्तव्य आहे; म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करू या.
सम्यक विवरण:
पहिले वाचन:
पहिल्या वाचनात अमासिया, आमोस ह्या
संदेष्ट्याला त्याच्या देशात परत जाण्यास सांगतो; कारण शलमोन
राजाच्या मरणाअगोदरच इस्रायलची दोन भागांमध्ये विभागणी झाली होती; यहुदी आणि इस्रायल.
आमोस हा यहुदिया प्रांतातून
इस्रायल प्रांतात देवाची शुभसंदेश सांगण्यासाठी आला होता. पण आमोस अमासियाला
सांगतो की, मी स्वतःहून आलो नाही, तर देवाने मला त्याची
सुवार्ता सांगण्याकरिता पाठविले आहे.
आमोस इस्रायल प्रांतात धन-दौलत
मिळवण्यासाठी आला नव्हता;
कारण मेंढपाळ म्हणून तो त्याच्या कार्यात आनंदी होता. आमोस हा
उपदेशक नव्हता, अर्थात संदेष्टा बनणे हे त्याच्या
विचारापलिकडचे होते, परंतु देवाने त्याला पाचारण केले आहे
असे तो ठामपणे सांगतो व देवाचा संदेश देत इस्रायलच्या काना कोपऱ्यात फिरतो,
हे आमोसाचे उदाहरण लक्षणीय आहे.
दुसरे वाचन:
संत पौल इफिसकरांस ईश्वस्तवन करण्यास
सांगतो, कारण देवाने आपणा
सर्वांना येशूच्या रक्ताने त्याची लेकरे (दत्तक) म्हणून स्विकारले आहे. अर्थात
ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या पवित्र आत्म्याचे वतनदार झालो आहोत. आणि देवाचा
कृपाशिर्वाद आपणावर सदैव हजर आहे. पुढे संत पौल म्हणतो की, ज्या
ख्रिस्तावर आपण पूर्वीपासून आशा ठेवली आहे, त्या येशूचा गौरव
आणि महिमा गाणे अवश्य आहे.
आपण ऐकलेल्या सुवार्तेवर
विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.
ख्रिस्ताने आपणावर पवित्र आत्मा पाठवून शिक्का मोर्तब केला आहे. ख्रिस्तामुळेच
आम्हांला मुक्ती मिळाली आहे.
शुभवर्तमान:
अविश्वास
असला तरीही सुवार्ताप्रसाराचे कार्य पुढे चालू ठेवणे आवश्यक होते, म्हणून येशूने बारा
जणांना या कामगिरीवर पाठवले. प्रेषितांनी बरोबर काय घ्यावे, कोणती
वस्त्रे घालावी वैगेरे शुभवर्तमानाच्या तपशिलात वर्णिले आहे त्यात कदाचित फरक आहे;
पण ते इतके महत्त्वाचे नाही. “प्रवासात जास्त
ओझे घ्यायचे नाही” हे सूत्र सर्वांनीच सांगितले आहे.
सुवार्ताप्रसाराचे कार्य शिरावर घेतलेल्या व्यक्तींनी अन्नपाणी, मुक्कामाची जागा वैगेरे गोष्टींची उगाच चिंता करू नये. आपल्यावर सोपवलेली
कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यात श्रोत्यांच्या जीवन
मरणाचा प्रश्न गुंतला आहे हे त्यांनी कायम मनात ठेवले पाहिजे. यहुदी लोक परक्या
ठिकाणी गेले तर तेथून परतताना अनेकदा तिकडची धूळ तिकडेच झटकून टाकीत. पण या
प्रसंगी त्यांनी सुवार्ता नाकारल्याचे चिन्ह, रीतसर साक्ष
म्हणून ते करायचे होते.
ह्या बारा जणांना येशूने भुते
काढण्याचे सामर्थ्य दिले. तथापी सुवार्तेची घोषणा करणे हेच त्यांचे मुख्य कार्य
होते हे आपणाला १२ ओवीमध्ये दिसते. “ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी
त्यांनी घोषणा केली.” ह्या घोषनेतूनच भुते काढणे व
आजाऱ्यांना बरे करणे ही कार्य होतात. तेलाभ्यंग करणे हे येथे प्रतीकात्मक आहे.
मनन-चिंतन:
प्रभू येशूच्या मरणाने व
पुनरुत्थानाने आपल्याला नवीन जीवन मिळाले आहे. हे जीवन जे येशूमध्ये आपल्याला
मिळालेलं आहे, ते आशीर्वादाच जीवन आहे; ते आशा असलेल जीवन आहे; ते जीवन देवाच्या
अधिकाराने भरलेलं जीवन आहे आणि आजच्या शुभवर्तमानात आपण तेच पाहतो, प्रभू येशू
त्याच्या शिष्यांना अधिकार देऊन जोडी-जोडीने देवाराज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी
पाठवितो. येशू ख्रिस्त देवाचे कार्य (Mission) आपल्या शिष्यांबरोबर वाटतो,
जेणेकरून हरवलेली मेंढरे देवाची सुवार्ता ऐकून पश्चात्तापी अंतःकरणाने देवाकडे परत
येतील. ‘येशू जीवन घेण्यासाठी नव्हे; तर जीवन देण्यासाठी आला आहे’ (योहान १०:१०).
म्हणून हे जीवन विपुलतेने सर्वांना मिळावे ह्यासाठी येशू त्याच्या शिष्यांना सुवार्ता
पसरविण्याची जबाबदारी देतो.
येशूने निवडलेले शिष्य हे महान
नव्हते; पण येशू ख्रिस्ताने त्यांना महान व सक्षम केले. ते परिपूर्ण नव्हते; पण
येशू ख्रिस्ताने त्यांना परिपूर्ण केले. जो कोणी स्वतःला देवापुढे नम्र करतो,
परमेश्वर त्याला दैवी कृपेने भरतो व सुवार्ता घोषविण्याचे कार्य त्याच्या हाती
देतो. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो आणि त्याला अनुसरतो, परमेश्वर त्याच्याद्वारे
देव राज्याची सुवार्ता इतरापर्यंत पोहचवतो.
‘सुवार्ता’ ह्या शब्दाचे मूळ ‘euaggelion’ ह्या
ग्रीक शब्दात आहे. हा शब्द ग्रीक नव्या करारात ७२ वेळा आला आहे. ‘Euaggelio’ हा ग्रीक शब्द - सुवार्ता सांगणे, गाजवणे, घोषित करणे अशा पर्यायी अर्थाने नव्या करारात ५५ वेळा वापरण्यात आलेला
आहे.
सुवार्ता ही येशू ख्रिस्ताची
सुवार्ता आहे (मार्क १:१,२ गलती १:७). तो दीनांना सुवार्ता सांगण्यास ह्या जगात आला (मत्तय ११.५,
लूक ४.१८). सुवार्ता ही देवाची सुवार्ता आहे (१ थेसल २:२, ८, ९) कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की,
त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला (योहान ३.१६).
संत पौल सुद्धा सुवार्तेचा अर्थ
वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून आपल्याला सांगत आहे. सुवार्ता ही सत्याची आहे (गलती २.५, १४, कलसै १.५). सुवार्ता आशेची आहे (कलसै १.२३). सुवार्ता शांतीची आहे (इफिस
६.१५). सुवार्ता जीवन, पुनरुत्थान, आणि
अमरत्व ह्यांविषयी आहे (२ तिम १.१०, २.८). सुवार्ता ही
तारणाविषयी आहे (इफिस १.१३).
प्रिय भाविकांनो, सुवार्ता ही सर्व
जगासाठी आहे. प्रभू येशू लूकच्या शुभवर्तमानात म्हणतो, ‘मला इतर नगरांत पण
देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे; कारण त्यासाठीच
मला पाठवले आहे’ (लूक ४.४३). म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना
अधिकार देऊन देवाची सुवार्ता घोषविण्यास बाहेर पाठवले.
प्रभू येशूच्या द्वारे परमेश्वराने
देऊ केलेले तारण सर्व जगासाठी आहे, हे सर्व जगाला कळले पाहिजे. त्यासाठी येशूने जी
शेवटची महान आज्ञा दिली ती ही होती की, ‘तुम्ही सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला
सुवार्ता सांगा’ (मार्क १६:१५).
आज आपण पाहतो की, माणसे
परमेश्वरामध्ये जीवन जगत नाही; कारण त्यांना अजूनही परमेश्वर सापडलेला नाही. कितीतरी
माणसे आशेने जीवन जगत नाही. ते संकटात आहेत. ते त्रासामध्ये आहेत, टेन्शनमध्ये
आहेत. नेहमी निराशेमध्ये असतात. वेगवेगळ्या तणावातून ते जातात. कारण अजूनही देवाची
सुवार्ता त्यांनी ऐकलेली नाही. देव हा जीवन देणारा देव आहे, ह्याचा अजूनही त्यांना
अनुभव आलेला नाही.
आज प्रभू येशू आपल्या सर्वांना
सुवार्ता पसरविण्यासाठी पाठवत आहे; कारण प्रभूला आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात
आनंद द्यायचा आहे. जे प्रभूच्या सुवार्तेचा स्वीकार करतात, ते जीवन देवाच्या
नावाने जगतात. असिसिकर संत फ्रान्सिस म्हणतात, ‘हे प्रभो, मला तुझ्या शांतीचे साधन
बनव.’ आपण सर्वजण असिसिकर संत फ्रान्सिस ह्यांच्यासारखे देवाच्या सुवार्तेचे साधन
बनून देवाची सुवार्ता
इतरापर्यंत पोहोचावी म्हणून देवाकडे
कृपा मागुया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे
प्रभू आमची प्रार्थना ऐक.
1. आपल्या
ख्रिस्तसभेचे आधारस्तंभ परमगुरु, महागुरू, धर्मगुरू यांनी प्रेषित कार्य करण्यास प्रयत्न करावे, यासाठी त्यांना परमेश्वराकडून शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभू कडे
प्रार्थना करूया.
2. आजच्या तरुण पिढीने
प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी ईश्वरी पाचारणाला प्रतिसाद द्यावा म्हणून
प्रार्थना करूया.
3. आपल्या
धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना परमेश्वराचा
गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांचे आजार व दुःखे हलकी व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करूया.
4. आपल्या देशातील
राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या समाजातील गरीब लोकांसाठी विकासाची कार्य करावेत व
त्यातून खरा समाज बांधावा, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना
करूया.
5. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतू साठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment