Wednesday, 21 July 2021

                                    

 Reflection for the 17th Sunday in Ordinary Time (25/07/2021) By       Dn. Julius Rodrigues


सामान्य काळातील सतरावा रविवार 


दिनांक २५-७-२०२१

पहिले वाचन २ राजे ४:४२-४४

दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ४:१-६

शुभवर्तमान योहान ६:१-१५


"पाच भाकरी आणि दोन लहान मासे"



प्रस्तावना

आज देऊळ माता सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात देवाने संदेष्टा अलीशाद्वारे केलेल्या चमत्काराविषयी या वृत्तांत ऐकणार आहोत. परमेश्वराच्या अगम्य आशीर्वादामुळे गव्हाच्या वीस भाकरी व काही हिरवी कणसे माणसांना पुरवून उरल्या. त्याचप्रमाणे आजचे शुभवर्तमान पाच हजारांना जेवण ह्या येशूच्या चमत्काराविषयी सांगत आहे. ह्यातून आपणास एकच उपदेश मिळतो की, आपण नेहमीच आपल्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना देण्यासाठी तयार असले पाहिजे. परमेश्वर आपल्याला त्याचे प्रतिफळ देत असतो. आपणामध्ये घेण्याची वृत्ती कमी होऊन, देण्याची वृत्ती वाढावी म्हणून प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण

पहिले वाचन : २ राजे ४: ४२-४४

       शंभर जणांना जेवण घालणे हे त्यांना शक्य नव्हते. परंतु हे शंभर लोक बहुदा संदेष्ट्याच्या समुदायातील होते. वीस भाकरी फार लहान होत्या व त्या इतक्या जणांना पुरे पडल्या नसत्या म्हणून सेवकाने चकित होऊन प्रश्न केला, तेव्हा देवाने दिलेला संदेश एलिशा सांगतो कि, अन्न भरपूर होईल व त्यातून काही अन्न उरेल. असे देवाने सांगितलेल्या भविष्यवाणी द्वारे घडले.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र : ४:१-६

       यहुदी व परराष्ट्रीय यांना ख्रिस्तामध्ये कसे एक करण्यात आले. याविषयी सांगितल्यावर पौलाने त्यांच्या करिता अशी प्रार्थना केली की, त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीने एक व्हावे.

       विश्वासणाऱ्याचे वैयक्तिक आचारण ख्रिस्ताला शोभेल असेच असावे. एकमेकांच्या उणीवा दिसत असल्या तरीही, एकमेकांशी अति नम्रतेने व सौम्येतेने वागा. सहनशिलतेने एकमेकांचे दुःख सहन करा. ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकांस वागवून घ्या. हेच पाचारणास शोभेल असे आचारण आहे.

शुभवर्तमान योहान ६:१-१५

कोणतीही परिस्थिती येशू ख्रिस्ताला अवघड वाटत नव्हती. दैवी सामर्थ्याने तो रोग्यांना बरे करी. पाच हजार लोकांना भाकर व मासलीने तृप्त केले. हे देवाचे सामर्थ्य होते. यावरून तेथे जमलेल्या लोकांनी येशू हा देव आहे हे ओळखायचे होते. या उद्देशाने येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केला. म्हणून त्यास चिन्ह म्हटले आहे. तरी त्या लोकांनी त्याचे दैवत्व मानले नाही ते त्याला फक्त संदेष्टा म्हणत.

तो देव आहे व हजारों लोकांस अन्न देण्यास समर्थ आहे यावर शिष्यही विश्वास ठेवत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या पाच भाकरी हातात घेतल्या व देवापित्याचे आभार मानले. तो त्या मोडत राहिला. त्याने आपले सामर्थ्य प्रकट केले. सर्वजण जेवून तृप्त झाले. हाच प्रभू आपल्या गरजा पुरवून शांती व समाधान देतो.

 

मनन चिंतन

God loves the cheerful giver (2 Cor 9:7). संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो, आणि आपण हे अनेक वेळेस घेतलेले आहे. देणे आणि घेणे ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनात अनुभवत असतो. आपण देवू ही शकतो आणि घेऊ ही शकतो. जो हात देत असतो तो सदासर्वदा प्रगती होत असते आणि जो हात घेतो त्याची नेहमीच अधोगती होत असते; आणि हे सर्व आम्हाला आमच्या रोजच्या जीवनातील अनुभवावरून माहित आहे. संत तुकाराम महाराज आपल्या २८४५ ह्या अभंगामध्ये म्हणतात, “पाहिजे तो कळवळा| मग बळा काय उणे||

                              तुका म्हणे उदारपणे| का उणे मानावि||

ह्याचा अर्थ असा आहे की, कोणत्याही कार्यात त्याबद्दलचा कळवळा असणे गरजेचे आहे. मग त्या कार्यासाठी लागणारे सामर्थ्य देखील अंगी सहज येते. तुकोबाराय शेवटी म्हणतात की, त्याप्रमाणेच जो खऱ्या अर्थाने उदारपणे लोकांना मदत करून केव्हाही मागेपुढे पहात नाही; मग भले त्याच्या स्वतःकडे काहीही नसले, तरीदेखील त्याचा उदारपणा किंवा दानशूरपणा कमी होत नाही, उलट ते म्हणतात, अशा माणसाकडे काही उणे आहे असे मानू देखील नये.

आजच्या वाचनाद्वारे आपणास देण्याचे महत्त्व किती आहे, हे समजून देत आहे. असाच एक शुभवर्तमानातील दाखला तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. येशु भंडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत, हे पाहत होता. त्यावेळेस अनेक असे धनवान श्रीमंत लोक मोठ्या मोठ्या रकमा भांडारात टाकत होते. अशा वेळेस त्या ठिकाणी एक गरीब बाई आली आपल्याकडे असलेले एकूते एक नाणे त्या भांडारात टाकते आणि हे पाहताच प्रभू येशू आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांस म्हणतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक दान टाकलेले आहे”.

वरील उताऱ्यावरून ती विधवा बाई आपणास उदारपणाचा कित्ता घालून देत आहे. त्या बाईने किती रक्कम टाकली याकडे लक्ष न देता, आपल्याकडे जे आहे त्यातून आपण  इतरांना किती देतो हे महत्वाचे आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की कोणी एका मनुष्याने आपल्याला झालेल्या उत्पादनातून थोडेसे अन्न म्हणजेच वीस भाकऱ्या व काही धान्याची हिरवी कणसे ही देवाच्या माणसाकडे घेऊन आला. आणखी  पुढे आपण ऐकतो की, शाप्रकारे परमेश्वराने त्या ठिकाणी चमत्कार घडवून आणला.

तशाचप्रमाणे शुवर्तमानातही एका लहानशा बालकाने दाखविलेल्या पाच भाकरी व दोन माशांच्या उदारतेमुळेच येशू पाच हजारांना भोजन देऊ शकला. त्या लहान बालकाकडे अगदी त्याच्यापुरता होईल इतकेच होते. परंतु त्यांनी स्वार्थी भावना मनात आणली नाही. असे म्हणतात, लहान मुले, ही देवाघरची फुले,’ ह्याचा साक्षात्कार त्या छोट्याशा बालकाने सिद्ध करून दिला. जे आपल्याकडे होते ते सर्व काही सरळ हाताने इतरांना दिले. दुसऱ्याची भूक तृप्त व्हावी यासाठी स्वतः खुशीने अर्पण केले.

आपण नेहमी बोलत असतो, अतिथी देवो भव!” म्हणजे घरी असलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार झालाच पाहिजे कारण ते देवाच्या रूपात येत असतात. आज हाच अनुभव खुद्द येशू आपणास देत आहे. आपल्याकडे आलेल्या सर्व लोकांचा पाहुणचार करतात, त्यांची आध्यात्मिक व शारीरिक भूक आपण भागवत असतो.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळेस स्वार्थी वागत असतो. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, अशांना आपण मदतीचा हात देत नाही, इतरांना आधार हस्ते मदत करत करत नाही. ह्या महामारीच्याकाळात अनेक अशा लोकांनी सरळ हस्ते इतर लोकांना मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे काही जण फक्त स्वतःचात विचार करून स्वार्थीपणाची भूमिका बजावत आहेत.

आज पाच हजारांना भोजन हा चमत्कार खरा आहे, की खोटा, यावर आपण आपले लक्ष केंद्रित न करता, ह्या चमत्काराद्वारे येशू आपणा सर्वांना उदारपणाचा, दानशूरपणाचा महामंत्र शिकवत आहे. पुढे तो आपणास सांगत आहे की, घेणारे होऊ नका, तर देणारे व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे God loves the cheerful giver.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आमची ओंजळ तू प्रेमाने भर

१. ख्रिस्तसभेचे पुढारी पोप फ्रान्सिस तसेच बिशप्स व इतर सर्व सहकारी वर्ग, ह्यांनी देव प्रीतीचा संदेश संपूर्ण जगाला आपल्या कार्याद्वारे द्यावा, व असे करण्यासाठी त्यांना परमेश्वराचे योगदान लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. हे परमेश्वरा, सृष्टीतील वस्तूवर व्यक्तींवर अवलंबून न राहता, तुझ्यावर विसंबून राहण्या शिकव व आमचा विश्वास वाढव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. समाजात जास्तीत जास्त देण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन जे गोर- गरीब आहेत, जे गरजवंत आहेत; अशा सर्वांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आजही आपल्या देशात अनेक लोकांना एक वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही, अशा लोकांची तू भूक भागवण्यासाठी उदार नागरिकांना पुढे पाठव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपण आपल्या वैक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थाना करू या.

No comments:

Post a Comment