Thursday, 11 November 2021

Reflection for 33rd Sunday in Ordinary Time (14/11/2021) By Br. Brijal Lopes.    



सामान्य काळातील तेहतिसावा रविवार

दिनांक: १४/११/२०२१

पहिले वाचन: दानिएल १२:१-३

दुसरे वाचन: इब्री. १०:११-१४, १८

शुभवर्तमान: मार्क १३:२४-३२



 

प्रस्तावना:  

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना पश्चाताप करून मनपरिवर्तनासाठी बोलावीत आहे. प्रत्येक व्यक्ती हि देवाच्या सानिध्यात राहून, जगामध्ये परमेश्वराचे कार्य, त्याच्या लोकांमध्ये पोहोचविण्याचे कार्य करत असते. परमेश्वर आपणा सर्वांना जागृत राहून जगात त्याचे कार्य करण्यास पाचारण करत आहे. परमेश्वराचे कार्य करताना आपणास भरपूर दुःख व वेदना होणार आहेत ह्याची जाणीव परमेश्वर आपणास देताना सावधगिरीचा संदेश आपणास देतो.

आजच्या पहिल्या वाचनात आपणास येणाऱ्या दुर्दैवी आपत्तीविषयी आणि त्यामुळे नीतिमान व अनीतिमान लोकांचे कसे विभाजन होणार आहे याचे वर्णन केले आहे.  तसेच, आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, ख्रिस्ताने स्वयं स्वतःला, आपल्याला पापांतून शुद्धतेकडे नेण्यासाठी व त्याद्वारे शुद्ध जीवन जगण्यासाठी अर्पण केले आहे. आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास येणाऱ्या अंताविषयी व त्यासाठी जागृत राहण्याचा इशारा देत आहेत.

परमेश्वराला स्विकारण्यासाठी व त्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपणास कृपा व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आपण बालक दिन साजरा करीत आहोत. प्रत्येक बालकांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करूया.




मनन चिंतन: 

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, जीवनाच्या शेवटी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे आपण आपल्या जीवनात इतरांची केलेली सेवा व दुसरी त्यांच्यावर केलेले प्रेम. प्रत्येक व्यक्तीला देवाने जीवन दिले आहे व त्याद्वारे त्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी व इतरांना जीवन बहाल करण्यासाठी बोलावले आहे.

एकदा एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते. ठरलेल्या दिवशी त्याला शिक्षा देण्यासाठी, त्याला त्या ठिकाणी आणले जाते. तो फाशीचा दोर गळ्याभोवती बांधला जात असताना तो गुन्हेगार व्यक्ती क्षणभर आपले डोळे बंद करतो आणि एका नव्या स्वप्नाकडे धाव घेतो. त्या स्वप्नांमध्ये जणूकाही तो त्या शिक्षेपासून पळून जातो व पळत असताना त्याचं लक्ष सभोवताली असलेल्या पर्यावरणावर पडते. निळे आकाश, हिरवीगार पृथ्वी, पक्षी व इतर वनस्पती इत्यादी ज्यांची त्याने पूर्ण जीवनभर सुध्दा कल्पना केली नव्हती तो ती त्या वेळी करत होता. पर्यावरणाचे दर्शन घेता- घेता तो आपल्या घरी पोहोचतो व घरी पोहोचल्या बरोबर आपल्या पत्नीला हाक मारतो व पत्नी त्याला बघता क्षणीच आलिंगन देण्यास येते त्याच वेळी त्याचे डोळे उघडतात व दोरा गळ्याभोवती आवळला जातो. त्या व्यक्तीने कदाचित कल्पना केली असेल की, त्याला दुसरी संधी मिळाली आहे. जीवन जगण्यासाठी ज्या कल्पनात्मक जीवनात त्याने नवीन मार्ग बघितला, नवीन जीवन त्याने पाहिले ते म्हणजे लाभलेल्या नवीन दृष्टीकोनाद्वारे.  

हे विश्व नक्की काय आहे? हे कदाचित त्याला जाणवले असेल, काय आहे हे विश्व? हे विश्व म्हणजे सुंदर जागा. ज्या जागेवर नवीन जीवन, नवीन अनुभव मानवाला होऊन जातो. नव्या मार्गावर हे जीवन नक्की काय आहे? हा प्रश्न नक्की त्या मानवाला पडला असेल. जीवन हे देवाचे दान आहे. नवीन, चांगल्या गोष्टी बघण्यासाठी, नवीन गोष्टी ऐकण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी. कदाचित त्या व्यक्तीला दुसरी संधी मिळाली असती तर, किती सुंदर जीवन जगला असता?

हि कथा सांगण्यामागे नक्की काय हेतू आहे? हि कथा सांगण्यामागे उद्देश हाच आहे की, त्या व्यक्तीला दुसरी संधी मिळाली नाही. त्याने स्वप्न पाहिले पण, प्रत्यक्षात ते तो त्याच्या जीवनात उतरवू शकला नाही. पण, देव आपल्याला दिवसेंदिवस संधी देत असतो. परमेश्वर आपणास शिक्षा करत नाही तर. आपल्या पापांची क्षमा करतो व त्या पापांना तिलांजली देऊन नवीन जीवन, शुद्धतेने व निर्मळ अंत:करणाने जगायला सांगतो.

मरण अटळ आहे. कधी येईल माहित नाही. कथेमधील तरुणासारखे आपण जे ख्रिस्ताला भेटणार आहोत, जीवनाच्या अंती किंवा विश्वाच्या अंति. कोणतीही घटना असुद्या आपणास मनन चिंतन करायचे आहे. आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला आहे का की, आपण समर्पित केलेल्या सेवेद्वारे व प्रेमाद्वारे आपण समाधानी आहोत का? ज्याप्रमाणे कथेतील तरुणाला दुसरी संधी दिसली, त्याचप्रमाणे ती संधी आपणास तयारी करण्यासाठी मिळाली आहे. त्या घटनेसाठी सज्ज होण्यासाठी व त्यासाठी आतापासून तयारी करण्यासाठी, देवाला शरण जाण्यासाठी व दुसऱ्या संधीचा वापर स्वर्गात जाण्यासाठी करणार आहोत का? ख्रिस्ताने जसे आपणावर प्रेम केले व आपणा सर्वांची सेवा केली, त्याचप्रमाणे आपण इतरांपर्यंत ख्रिस्ताची सेवा व त्याचे प्रेम पोहोचवणार किंवा देणार आहोत का?

जीवनाच्या चढ-उतारात प्रवास करताना आपण निराश होतो, खचून जातो. आपणास वाटते जीवन हे दुःखाने भरलेले आहे. अशा परिस्थितीत आपण आपली श्रद्धा देवावर ठेवूया. आकाश व पृथ्वी नष्ट होईल परंतु देवाची वचने नष्ट होणार नाहीत. कितीही समस्या, अडचणी, दुःखे व वाईट प्रसंग येतील पण, ख्रिस्त आपणासमोर आहे, आपल्या बाजूला व आपल्या बरोबर आहे. तो कधीच आपणास सोडून जात नाही. आपणास त्याच्या सोबत राहायचे आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे. आजच्या उपासनेत भाग घेत असताना ख्रिस्त आपल्या जीवनात येत आहे. जसे आपण त्याला स्विकारतो तसाच तो ही आपल्या जीवनात येतो व आपणामध्ये वस्ती करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१.    विश्वव्यापी ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले  परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ, ह्यांनी ख्रिस्ताचे कार्य अंगीकारून आपल्या कार्याद्वारे इतरांना देवाकडे आणण्यासाठी व देवाच्या लोकांची श्रद्धा बळकट करून योग्य ती धार्मिक प्रगती घडवून आणावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    जे भाविक आजाराने त्रस्त आहेत, जे खाटेला खिळलेले आहेत, आर्थिक समस्यांनी व नोकरी व्यवसायाने बेरोजगार आहेत. अशा सर्व लोकांना ख्रिस्ताने सहकार्य करावे व देवाच्या उपस्थितीची जाणीव त्यांच्या जीवनात व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    आज आपण बालकदिन साजरा करीत आहोत. जे बालक व बालिका दारिद्र्यरेषेखाली आहेत, तसेच अपंग व समाजातून बहिष्कृत केले आहेत. अशा सर्वांना देवाने सामर्थ्य द्यावी व ज्या संस्था अशा बालकांकरीता झटत आहेत, त्यांना वेळोवेळी सहकार्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    ह्या पवित्र ख्रिस्तयागात आपण सर्वजण एकत्र जमले असताना आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया, ख्रिस्ताने आपणा सर्वांना त्याच्या प्रेमाने, दयेने स्पर्श करून आपणा सर्वांना सामर्थ्य द्यावे व आपणा सोबत ख्रिस्ताची वस्ती असावी म्हणून प्रार्थना करूया.

५.    थोडावेळ शांत राहून आपण आपल्या व्ययक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

 


No comments:

Post a Comment