Thursday, 18 November 2021

  

Reflection for the Solemnity of Christ The King (21/11/2021) By Br. Aaron Lobo.    


ख्रिस्तराजाचा सण



दिनांक:२१/११/२०२१

पहिले वाचन: दानियेल ७:१३-१४.

दुसरे वाचन: प्रकटीकरण १:५-८.

शुभवर्तमान: योहान १८:३३ब-३७.

 

प्रस्तावना:

          ‘भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभू की जय’. होय माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेची तिन्ही वाचणे आपणास देवराज्याचे आणि ख्रिस्तराजाची खरी ओळख पटवून देत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात मनुष्याचा पुत्र एक यशस्वी राजाप्रमाणे आकाशातून येण्याविषयी आपण वाचतो. त्याच प्रमाणे दुसऱ्या वाचनातही येशू ख्रिस्त हा राज्यांचा राजा आहे व तोच आदि व अंत आहे, ह्याबद्दल आपण वाचतो. आजच्या शुभवर्तमानात “तू राजा आहेस का?” ह्या पिलाताने विचारलेल्या प्रश्नावर येशू ख्रिस्त आपली खरी ओळख जगासमोर दाखवून देतो व आपले राज्य ह्या जगाचे नसून स्वर्गराज्याचे आहे हे पटवून देतो.

          येशू ख्रिस्त हा खरोखर राजा आहे का? जगाची निर्मिती करणारा व पापी लोकांचे तारण करणारा येशू ख्रिस्त आपल्या वैयक्तिक जीवनाचा राजा म्हणून आपण ओळखतो का? अनेक वेळा आपण धनसंपत्ती, मनोरंजन, गप्पा-गोष्टी आदि गोष्टींना आपल्या जीवनात महत्वाचे स्थान देतो, व प्रार्थना किंवा देवधर्म विसरून जातो. येशू ख्रिस्त ह्या राज्यपदेसाठी पात्र असतांना सुद्धा आपण त्याला खालच्या दर्जेचं स्थान देतो. आजच्या मिस्सा बलिदानात सहभागी होत असतांना, अशा व इतर अनेक पापांसाठी आपण प्रभूकडे क्षमा मागुया व त्याला उत्तम असा दर्जा देऊन त्याला आपल्या जीवनाचा खरा राजा म्हणून ओळखून घेण्याची कृपा मागुया.

 


मनन चिंतन:

          एखादा राजा किंवा महत्वाची व्यक्ती आपल्यासमोर उपस्थित असल्यास आपण त्यांना सन्मानाने संबोधतो. आपण त्यांच्यासमोर नम्रतेने वागतो. अशा महत्वाच्या व्यक्तीसमोर आपल्याकडून नम्रतेची वागणूक अपेक्षित असते. इतिहासावर जर आपण नजर टाकली तर आपल्यासमोर अशा अनेक राजांचे उदाहरणे दिसून येतात कि, ज्यांनी आपल्या राज्यपदाच्या शक्तीचा गैर वापर करून आपल्या स्वार्थासाठी, आपल्या प्रजेचा छळ व त्यांच्यावर अन्याय केला.

          राजा हा शब्द ऐकल्यावर एक महान, बलवान, गौरवशाली व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येते. ज्या वेळीस लोकांनी येशू ख्रिस्ताला पिलातासमोर उभे केले व तो याहुद्यांचा राजा आहे असे आरोप त्याच्यावर केले, त्या वेळेस पिलाताच्या मनात सुद्धा असेच विचार आले असतील, म्हणूनच तो येशू ख्रिस्ताला वारंवार “तू राजा आहेस काय?” असे प्रश्न विचारतो. परंतु प्रभू येशू हा इतर राज्यांसारखा राजा नव्हता. राज्यांचा राजा असून सुद्धा प्रभू येशूने ‘राजा व राज्य’ ह्या शब्दांना एक नवीन ओळख दिली.

          गेल्या काही दिवसांपासून आपण येशूच्या जीवनावर व त्याच्या कार्यावर मनन चिंतन केले. प्रभू येशू ख्रिस्त हा कोणत्या प्रकारचा राजा आहे हे त्याच्या जीवनावरून व कार्यावरून आपणास कळून चुकते. एका बाजूला हेरोद राजा व कैसर आपली धन, दौलत, संपत्ती व सैन्य दाखवून राज्यपद लोकांसमोर दर्शवतात तर दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त आपले प्रेम, दया, करुणा, सहानुभूती व आपल्या सेवेद्वारे दैवी राज्यपद दाखवून देतो. गव्हाणी व क्रूस हे त्याचे राजासन होते.

          आपल्या प्रजेवर वर्चस्व गाजवण्या ऐवजी येशू ख्रिस्त त्यांचा मेंढपाळ म्हणून सांभाळ करतो, त्यांना स्वर्ग राज्याकडे नेतो व त्यांच्या तारणासाठी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देतो. खरे तर येशू ख्रिस्ताचे राज्य हेच आहे; इतरांवर अमाप प्रेम करून त्यांच्या (शारीरिक व आध्यात्मिक) जखमा बरे करणे, स्वतःचा विचार न करता इतरांच्या सेवेसाठी सतत तयार असणे, आपल्या जवळ जे असेल – नसेल ते इतरांना वाटणे, अशा सगळ्या कार्यांद्वारेच आपण येशू ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्य ह्या पृथ्वीतलावर प्रस्थापित करू शकतो व ह्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबातून, शेजाऱ्यांकडून, मित्र-मंडलीपासून व आपल्या सहकाऱ्यांपासून केली पाहिजे.

          अशा प्रकारच्या राज्याबद्दल ऐकण्यास बरे वाटते परंतु, त्याची स्थापना करणे सोप्पे नाही. ह्या करिता सर्व प्रथम येशू ख्रिस्ताला आपण आपल्या मनाने, शरीराने, व हृदयाने राजा म्हणून ओळखून घेतले पाहिजे. त्यांने दिलेली शिकवण व त्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आपली तयारी असली पाहिजे. तसेच त्या मार्गावर चालतांना आपल्या समोर आलेल्या अडचणींना सामोरे जाण्यास आपण तयार असलो पाहिजे. कालवरी डोंगरावर क्रुसावर खिळलेले असतांना सर्वांनी येशूची थट्टा-मस्करी केली, त्याला नाकारले पण, तरी सुद्धा त्याच्या बरोबर उजव्या बाजूला खिळलेल्या  त्या चोराने त्याच्याकडे नम्रतेने पाहिले व त्याचे खरे राज्यपद ओळखून घेतले, आणि म्हणून त्याला स्वर्गाचे राज्य प्राप्त झाले. त्याच प्रमाणे आपण सुद्धा आपल्या विश्वासाच्या डोळ्याने गोर-गरीबांमध्ये, तसेच समाज्यातील उपेक्षितांमध्ये, संत मदर तेरेजाप्रमाणे येशू ख्रिस्ताला पाहूया व त्याची सेवा करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ‘हे दयाळू ख्रिस्त राजा तुझ्या प्रजेची प्रार्थना ऐक.’

१.    प्रभूची सुवार्ता पसरविणारे आपले पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व प्रापंचिक ह्या सर्वाना ख्रिस्त राजाचा आशिर्वाद मिळून ख्रिस्त राजाची सुवार्ता पसरविण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२.    आपल्या राजकीय नेत्यांनी ख्रिस्त राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करून, योजलेले प्रकल्प पूर्ण करावेत व लोकांची उनत्ती करावी म्हणून राजकिय नेत्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३.    ख्रिस्त राजा आपल्या कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्त राजाची शिकवणूक आपल्या कुटुंबात यावी व नेहमी त्याला शरण जाऊन त्याने आपल्या कुटुंबात राहून प्रत्येकाचा सांभाळ करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आजारी लोकांवर ख्रिस्त राजाचा आशीर्वाद यावा व आजाराने ग्रासलेल्या लोकांची आजारातून सुटका व्हावी व ख्रिस्त राजाच्या प्रेमाचा व सत्याचा खरा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


 


ख्रिस्त राजाच्या सणाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा

1 comment:

  1. Dear Brother. The homily you wrote on the Christ the King, is excellent. Thank you.
    Louis

    ReplyDelete