Wednesday, 3 November 2021

 Reflection for 32nd Sunday in Ordinary Time (07/11/2021) By Br. Brian Motheghar.    



सामान्य काळातील बत्तीसावा रविवार


दिनांक: ७/११/२०२१

पहिले वाचन: १ राजे १७:१०-१६

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ९:२४-२८

शुभवर्तमान: मार्क १२:३८-४४



"ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे."

प्रस्तावना: 

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय भविकांनो, आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला औदार्य आणि दैवी कृपा ह्या विषयावर मनन चिंतन करावयास बोलावत आहे. 

ज्या प्रमाणे ख्रिस्ताने स्वतःचे आपल्या तारणासाठी उदारपणे बलिदान केले, त्याप्रमाणे ख्रिस्तसभा आज आपल्याला उदार होण्यास पाचारण करत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला औदार्य आणि आदरातिथ्य ह्याचा धडा शिकवत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात आपण संदेष्टा एलिया आणि सारफथ येथील विधवा ह्यांच्यातील संवादाद्वारे घडलेल्या चमत्काराबद्दल ऐकतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात इब्रि लोकांस लिहिलेल्या पत्रात लेखक आपल्याला ख्रिस्ताच्या समर्पणाविषयी सांगत आहे. आजचं शुभवर्तमान आपल्याला विधवेची उदारता ह्या विषयावर मनन चिंतन करावयास सांगत आहे. 

जरी आजची तिन्ही वाचने गरिबांच्या उदारपणा विषयी सांगत असली तरी ती आपल्याला आपल्या श्रीमंतीत किंवा गरिबीत दुसऱ्यांचा विचार करण्यास किंवा देवाला देवाचा वाटा देतांना कसलीच कुरकुर न करता देण्यास सांगत आहेत. असे आपल्या जीवनात घडावे म्हणून आपण आजच्या उपासना विधीत प्रार्थना करूया. 

 


मनन-चिंतन

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय भाविकांनो आजच्या उपासनेमध्ये आपल्याला दोन विधवांचा बोध ऐकावयास मिळतो. दोन विधवा ज्यांनी पवित्र शास्त्रात प्रसिद्धी प्राप्त केली आहे. विधवा ज्या एकमेकांपासून सात शतकांनी विभिन्न होत्या, तरी त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत: त्यांच्या विश्वासाने, त्यांच्या स्वार्थत्यागाने, औदर्याने, आणि त्यांच्या प्रेमाने. सदगुणी लोकांचे हे चार कोनशिले शतकानुशतके लक्षात राहीले पाहिजे होते, तरीसुद्धा त्यांची नावे विसरली जातात. कोणीही त्यांची नावे लिहिली नाहीत. तरी सुद्धा त्यांच्या त्यागाचे धडे आपणाला जीवनाची नवीन वाट दाखवतात.

आजच्या पहिल्या वाचनात एलिया देवाचा संदेष्टा हा सारफथ येथील विधवेच्या उदारतेची (औदार्याची) आणि तिच्या विश्वासाची चाचणी घेतांना आपण बघतो. जसे आजच्या युगातील लोकांना सर्वकाही हवे-हवेसे वाटते, त्याच प्रमाणे एलिया संदेष्ट्याने तिच्या उपजीविकेचे जे काही होते नव्हते त्याची तिच्याकडे वारंवार मागणी केली. ती विधवा गरीब असतांना सुद्धा तिने संदेष्ट्याला उदार मनाने सर्वकाही दिले.

भविष्याची भीती हा उदारता आणि समृद्धीचा एक सर्वात मोठा शत्रू आहे. एलियाला ठाऊक होते की, विधवेला तिच्या भविष्याबद्दल भिती वाटत होती आणि तिची भीती खरी होती. म्हणजेच, त्या क्षणी तिची परिस्थिती होती ती तिच्या नियंत्रणाबाहेरची होती. म्हणून, एलिया संदेष्ट्याने तिच्या भीतीला संबोधले आणि तिची भीती नाहीशी करण्यास सुरुवात केली: " भिऊ नको!" मग, त्याने भाकीत केले की: " इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही." खरोखरच ती भविष्यवाणी त्या गरीब विधवेच्या जीवनात खरी ठरली आणि तिला व तिच्या मुलाला कशाचीच कमतरता भासली नाही. देवावरील तिच्या विश्वासाने तिला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. ह्याशिवाय तिची परिस्थिती सुध्दा सुधारली ज्याची तिने कधीच अपेक्षा केली नव्हती. तिच्या जीवनाचा कायापालट झाला, दारिद्र्यातून विपुलता प्राप्त झाली, विपन्नावस्थेतुन विलासात आणि निष्कांचनापासून उत्कर्षात तिच्या जीवनाचं रुपांतर झालं.

आजचे दुसरे वाचन आपल्याला ख्रिस्ताच्या औदार्या विषयी सांगत आहे. स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवून ख्रिस्ताने उदारपणे आपल्या स्वतःचे "जिवंत, पवित्र व देवाला ग्रहनिय असे यज्ञ अर्पण केले" (रोम. १२:१). जे काही ख्रिस्ताने आपल्या दुःख आणि मरणाद्वारे उदारपणे दिले किंवा गमावले, ते त्याने त्याच्या पुनरुत्थानाने आणि स्वर्गारोहणाद्वारे विजयीपणे मिळवले. हेच ख्रिस्ताचे त्याच्या सर्वोच्च उदारतेसाठी देवाचे सर्वोच्च असे बक्षीस होते.

आजचं शुभवर्तमान हे पहिल्या वाचना प्रमाणेच आहे. ईश्वरी कृपेवर विश्वास ठेऊन शुभवर्तमानातील विधवेने सुध्दा पहिल्या वाचनातील विधवे प्रमाणे आपल्या उपजीविकेचे होते नव्हते ते सर्व काही देवाला अर्पण केले. तिने उदारतेने दिले कारण तिला ठाऊक होते की, ज्या देवावर ती विश्वास ठेवते, ज्या देवाची सेवा करते, तो देव तिच्याकडे कानाडोळा करणार नाही. तिने सुद्धा आपल्या संपूर्ण विश्वासाने व भविष्याची चिंता न करता, भविष्याबद्दल असलेल्या भीतीवर मात केली व आपले स्वतःचे संरक्षण करण्याच्या प्रवृत्तीवर तिने विजय मिळविला आहे.

आजच्या उपासनेद्वारे आपल्याला अनेक असे धडे शिकावयास मिळतात. पहिल्या प्रथम म्हणजे, आजच्या वाचनांतील सर्व पात्रे ही उदार होती. दुसरे म्हणजे, त्यांचा दैवी कृपेवर पूर्ण विश्वास होता. आणि हि पात्रे आपल्याला औदार्य व समृद्धी ह्या साध्या तत्वांची शिकवण देत असतांना आपल्याला आठवण करून देतात की: “देणाऱ्याला, कधीच कमी पडत नाही.” आणि “धन्य ते हात जे देतात आणि धन्य सुद्धा ते हात जे मिळवतात.”

ज्या प्रमाणे आयुष्यात दुर्मिळता किंवा टंचाईचे क्षण, परीक्षेचे क्षण सुद्धा असतात. त्याच प्रमाणे दैवी कृपेवर विश्वास ठेवण्याचे सुद्धा क्षण असतात आणि हे क्षण कधी-कधी आपल्यासाठी महान आशीर्वादाचे क्षण सुद्धा बनून जातात. म्हणून तोबीत आपणाला एक सल्ला देतो, तो असा की: “सोन्याचा साठा करण्यापेक्षा दानधर्म करणे अधिक चांगले!... परोपकारी आणि नीतीची (उदारतेची) कृत्ये करणाऱ्यांना जीवनाची परिपूर्णता लाभते” (तोबीत १२:८-९). आणि शेवटी, आपला महान प्रदाता परमेश्वर (उत्पत्ती २२:१४) ह्या नात्याने, “देव आपल्या सपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील” (फिलीप्पै. ४:१९). त्याला आपल्या गरजा ठाऊक आहेत आणि त्या कशा पूर्ण कराव्यात हे ही ठाऊक आहे. आपल्याला फक्त त्याच्या दैवी कृपेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. म्हणून आपण ख्रिस्ताकडे त्याच्या सारखे उदार हृदय प्राप्त होण्यासाठी विनंती करूया, जेणेकरून आपण उदारपणे त्याच्या प्रेमाची पेरणी करू शकू. कारण: “संतोषाने (आणि उदारतेने) देणारा देवाला प्रिय असतो” (२ करिंथ. ९:७)

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे देवा आम्हांला उदार हृदय दे.”

१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, महागुरूस्वामी, सर्व धर्मगुरू, व्रतस्थ, प्रापंचिक आणि सर्व व्यक्ती ज्या ख्रिस्त सभेची धुरा वाहतात त्यांना प्रभू परमेश्वराचे उदार हृदय प्राप्त व्हावे व त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी चांगले फळ द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या सामाजिक राजकीय नेत्यांसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांनी गोरगरिबांच्या, दिनदुबळ्याच्या, व असुरक्षित लोकांच्या गरजा पुरवाव्यात व त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे गरीबांचा छळ करतात व जे त्यांच्या मानवी प्रतिमेच्या सन्मानाला तडा देतात आणि मानवी तस्करी करतात त्यांनी आपला मार्ग बदलून पश्चाताप करून देवाकडे वळावे व मानवाला मानवाचा दर्जा द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपणा स्वतःसाठी आपण प्रार्थना करूया. आपला देवा बरोबर, आपल्या शेजाऱ्याबरोबर व आपणा स्वतःबरोबर समेट घडवून शांती व सुख आपल्या हृदयात, आपल्या घरात व आपल्या समाजात नांदावे व त्यासाठी आपण सतत झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे लोक आपल्या समाजात, राज्यात व देशात युद्ध घडवून आणतात, तसेच ताण तणाव व तंटे घडवून आणतात ज्यामुळे सर्व समाज जीवाला घाबरून बसला आहे, त्यांच्या हृदयाचे परमेश्वराने आपल्या सुज्ञपणाने परिवर्तन करावे व त्यांना सत्याच्या प्रकाशात बोलावून त्यांचा दयेने न्याय करावा व त्यांना शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आपल्या घरात किंवा समाजात जे कोणी लोकं आजारी आहेत, खाटेला खिळले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा व स्पर्शाचा लाभ व्हावा आणि परमेश्वराने त्याच्या इच्छे नुसार त्यांना आरोग्य द्यावे. तसेच आपल्या घरांतून जे कोणी देवाघरी गेले आहेत त्यांना स्वर्गीय नंदनवनात सार्वकालिक जीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

७. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या व्ययक्तिक, कौटुंबिक आणि   सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 

1 comment: