Reflection for the Ash Wednesday (02/03/2022) By: Br. Justin Dhavade.
राखेचा बुधवार
दिनांक:०२/०३/२०२२
पाहिले वाचन: योएल:२:१२-१८
दुसरे वाचन: २ करिंथ: ५:२०-६:२
शुभवर्तमान: मत्तय: ६:१-६, १६-१८
प्रस्तावना:
आज आपण आपल्या
कपाळाला राख लावून प्रायश्चित काळाला सुरुवात करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपण
केलेल्या पापांबद्द्ल योग्यप्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास
विनवणी करीत आहे.
योएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात परमेश्वर आपणांस आपली वस्त्रे न
फाडता आपली हृदये फाडून पश्चाताप करण्यास आवाहन करीत आहे. तो आपल्यापासून कधीही
दूर जात नाही, तर आपणच प्रत्येक वेळी त्याच्यापासून दूर जात असतो. म्हणूनच
संत पौल आपणास दुसऱ्या वाचनात परमेश्वराबरोबर समेट घडवण्याचा सल्ला देत आहे.
पश्चाताप करण्याचे तीन पैलू आहेत: अ) दानधर्म, ब) उपवास व क) प्रार्थना.
आजच्या शुभवर्तमानात योग्य पश्चाताप करण्यासाठी लागणाऱ्या ह्या तीन पैलूंचे
वर्णन केले आहे. ह्या प्रायश्चित काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे
प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा व शक्ती ह्या मिस्साबलीत
मागुया.
मनन चिंतन:
आज पासून आपण उपवास काळाला सुरुवात करत आहोत. आणि उपवासकाळ म्हणजे
परमेश्वराच्या जवळ येण्याचा काळ त्याच्या सानिध्यामध्ये वस्ती करण्याचा काळ. उपवास
या नावाचे दोन अर्थ आहेत.
उप म्हणजे परमेश्वराच्या जवळ, आणि वास म्हणजे परमेश्वरा मध्ये वस्ती होय.
बेनसिरा प्रवक्ता १७:०१ मध्ये म्हणतो
"प्रभूने मातीपासून मनुष्य बनविला आणि तो त्याला परत मातीतच पाठवतो"
ह्या वचनाद्वारे ख्रिस्त मंडळी आपल्या कपाळाला राख लावून आपणाला जाणीव करून देत आहे, की आपण माती आहोत, आणि मातीला मिळनार आहोत.
आजच्या पहिल्या वचनामध्ये योएल संदेष्टा आपल्याला म्हणत आहे की, “आतातरी परमेश्वराचे
वचन ऐका,
मनःपूर्वक मजकडे वळा उपोषण आत्र्कदन व शोक करून वळा, आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा.”
तर शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला, या उपवासकाळामध्ये योग्य ते प्रायश्चित घेण्यासाठी त्रिसूत्र सूचऊन देतो, ते म्हणजे प्रार्थना, उपवास आणि दानधर्म. या जगात जीवन जगत असताना मानव आपल्या शारीरिक
भौतिक व अध्यात्मिक गर्जाकडे दुर्लक्ष करतो. परमेश्वरापासून दूर जातो, परमेश्वरावरील असलेल्या विश्वासा मध्ये कमजोर पडतो, म्हणून परमेश्वरा बरोबर असलेले नाते भक्कम करण्यासाठी
ख्रिस्तसभा आजच्या दिवशी आपल्याला पाचारण करीत आहे. परमेश्वरा बरोबर आपले
नातेसंबंध भक्कम ठेवण्यासाठी आपणा प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे, प्रार्थना म्हणजे ख्रिस्ता बरोबर बोलणं त्याच्या बरोबर
संवाद साधन आहे. म्हणूनच ख्रिस्त आजच्या शुभवर्तमाना मध्ये म्हणतो आपल्या
गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल.
उपवास म्हणजे सैतानाच्या प्रत्येक मोहावर विजय मिळविणे मत्तय अध्याय ०४ मध्ये
आपण ऐकतो की, प्रभू येशूने चाळीस दिवस व चाळीस रात्र उपवास केला.
त्यानंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली व मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू येशू प्रार्थना व उपवास या दोन्ही सूत्राद्वारे
परमेश्वर पित्याशी एकरूप झाला होता. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाच्या
वाईट मोहावर विजय मिळविला. आपण देखील या प्रायचित काळामध्ये
जीवन जगत असताना आपल्यामध्ये काही वाईट सवयी असतील, कदाचित वाईट व्यसन असेल आपणाला भानगडी करण्याची सवय असेल, खोटं बोलण्याची सवय असेल, व्यभिचाराची प्रवृत्ती आपल्या मध्ये असेल, आणि अनेक प्रकारच्या वाईट सवयीचा मोह आपणाला असेल, या सर्व बंधनातून मुक्ती मिळविण्यासाठी आपणाला उपवास व
प्रार्थना करणं गरजेच आहे.
तर तिसरी गोष्ट म्हणजे दानधर्म बेनसिरा प्रवक्ता म्हणतो ३:३० "उफाळणारा
अग्नी पाण्याने शमतो दानधर्म केल्याने पाप शमन होते". तर स्तोत्रकार स्तोत्रसंहिता
४१:०१ मध्ये म्हणतो "जो दिनांची चिंता वाहतो, तो धन्य संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करील." ह्या
उपवास काळामध्ये योग्य ते प्रायश्चित घेऊन आपल्या पापावर क्षमा
मिळविण्यासाठी गरीब व दिन लोकांना मदतीचा हात पुढे करून दानधर्म करण्यास ख्रिस्त
मंडळी आपल्याला पाचारण करीत आहे. ह्या उपवास कालामध्ये जीवन जगत
असताना प्रार्थना उपवास आणि दानधर्म ह्या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी
परमेश्वराने आपल्याला कृपा शक्ती सामर्थ्य द्यावं म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आण.”
१.
आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ ह्या सर्वांना देवाने चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य प्रदान करावे, तसेच ह्या प्रायश्चित काळामध्ये
त्यांनी प्रार्थनेचे, उपवासाचे व दानधर्माचे महत्व आपल्या
दैनंदिन जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
जे लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श
करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
ह्या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने
आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे
समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
ह्या प्रायश्चित काळाद्वारे प्रभूने आपल्याला आपल्या पापांचा धिक्कार करून
प्रभूकडे येण्याची एक अनमोल संधी दिली आहे. ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन
देवाबरोवर, इतरांबरोबर,
पर्यावरणाबरोबर व स्वतःबरोबर समेट घडवून आणण्यास आपणास कृपा मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना प्रभूच्या आशीर्वादाने चांगली नोकरी मिळावी व
त्यांचे जीवन सुखमय व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.
थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व व्ययक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.