Friday, 4 February 2022

Reflection for the Fifth Sunday in Ordinary Time (06/02/2022) By: Br. Aaron Lobo


सामान्य काळातील पाचवा रविवार

 


पहिले वाचन:  यशया ६: १-२, ३-८.

दुसरे वाचन:  १ करिंथ १५: १-११.

शुभवर्तमान:  लुक ५: १-११.

“माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”

प्रस्तावना:

          आज संपूर्ण ख्रिस्तसभा सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रभू येशूच्या संर्पकात येते तेव्हा ती व्यक्ती सामान्य व्यक्ती राहत नाही तर त्या व्यक्तीचे परिवर्तन होते. आजच्या उपासनेत आपण अशाच प्रकारच्या व्येक्तींचे उदाहरणे ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याचे परमेश्वराबरोबर झालेल्या संभाषणाविषयी आपण वाचतो. ज्यावेळेस त्याला देवाचा अनुभव येतो त्यावेळेस त्याला देवाच्या महिमेची व स्वतःच्या अयोग्यतेची जाणीव होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचनातही संत पौल आपणास प्रभू येशूची भेट झाल्यानंतर आपल्या जीवनात घडलेल्या परिवर्तनाचे वर्णन करतो व येशू ख्रिस्ताची महानता व स्वतःच्या अयोग्यते विषयीचे वर्णन करतो. तसेच आजच्या शुभवर्तमानात जेव्हा पेत्र प्रभू येशूने केलेला चमत्कार पाहतो, तेव्हा तो सुद्धा प्रभू येशूची महानता व स्वतःची अयोग्यता समजतो.

          देवाचा अशाप्रकारे अनुभव आल्याने जर आपण त्याच्यावर व त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचा कायापालट होईल. जर आपण आपल्या विश्वासात दृढ राहिलो तर यशया संदेष्टा, संत पौल आणि पेत्राप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास पात्र बनतो. विश्वास हा शब्द, जरी ऐकायला लहान किंवा सामान्य असला तरी  त्याच्यात फार सामर्थ्य आहे. विश्वासाविना आपण काहीही करू शकत नाही. आपल्या जीवनात व आपल्या कार्यात देवाचा शब्द, देवाचा अनुभव व विश्वास हे फार महत्वाचे आहेत. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असतांना आपण सुद्धा देवाचा शब्द विश्वासाने ऐकावा, त्याने दाखवलेल्या मार्गावर चालावे व त्याचा अनुभव घ्यावा, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन: 

गेल्या रविवारी, येशूला त्याच्या स्वतःच्या गावी, नाझरेथमध्ये कसे नाकारण्यात आले ह्याविषयी आपण ऐकले. लोकांना येशू ख्रिस्ताच्या दैवीपणावर व त्याच्या पावित्रातेवर संशय होता. ज्या कारणाने ते येशूचा बहिष्कार करतात. त्यांच्या अविश्वासुपणाच्या विपरीत आपण आजच्या शुभवर्तमानात पेत्रामध्ये विश्वासाचे उदाहरण पाहतो.

शुभवर्तमानाच्या सुरवातीस आपण वाचतो कि, रात्रभर कष्ट करून सुद्धा पेत्र व त्याच्या साथीदारांना एकही मासळी सापडली नव्हती. म्हणून ते हताश होऊन आपली जाळी धूत होते. अशावेळेला प्रभू येशू तिथे येतो व लोकांना शिकवण्यासाठी पेत्राच्या रिकाम्या बोटीत प्रवेश करतो व लोकांना शिकवण्यास सुरवात करतो. एखाद्या अयशस्वी व्यक्तीच्या जीवनात जर आपण पाहिले तर ती व्यक्ती जे त्या व्यक्तीने गमाविले आहे त्याच्यावरच विचार करीत असते. इतर गोष्टींवर किंवा देव-धर्मात सुद्धा त्याला रुची नसते. तरी पण पेत्र आपल्या तोट्यावर जास्त लक्ष न देता, येशू ख्रिस्ताचा आपल्या मचव्यात स्वीकार करतो व त्याने शिकवलेले शब्द ही ऐकतो.  ह्या क्षणापासून त्याच्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरवात होते. आपल्या जीवनातही आपण अनेक वेळा निराषित, हताश किंवा अयशस्वी ठरतो. तेव्हा आपणास जीवनात कसल्याच गोष्टीला अर्थ सापडत नाही आणि जीवन नकोनकोसे वाटते. पण अशा परिस्थितीत येशू आपल्या जीवनाच्या मचव्यावर प्रवेश करतो व आपल्या जीवनाचा कायापालट करतो. देवाचे शब्द ऐकणे व त्याचे स्वीकार करण्याचा अर्थ म्हणजे येशूला आपल्या जीवनाच्या मचव्यात स्वीकार करणे होय.

त्या नंतर येशू पेत्राला आपली मचवा खोल पाण्यात घेण्यास व तिथे आपली जाळी टाकण्यास सांगतो. पेत्र हा अनुभवी कोळी होता. रात्रभर परिश्रम करून सुद्धा काही सापडले नव्हते. त्याला त्याच्या अनुभवातून माहित होते कि, तिथे मासे सापडणार नाही कारण ती जागा व ती वेळ प्रतिकूल होती. प्रभू येशू, एक सुतार एका अनुभवी कोळी माणसाला मासळी कशी धरावी हे सांगतो ह्याचे पेत्राला नकीच नवल व आश्चर्य वाटले असेल. परंतु पेत्र आपल्या अनुभवावर, ज्ञानावर व आपल्या कौशल्यावर अवलंबून राहत नाही. यांचा गर्व न करता, नम्रतेने तो येशूने सांगितलेल्या शब्दांचा मान ठेवतो व त्याच्या इतर सहकाऱ्यांबरोबर जाळी टाकतो. त्याच्या ह्याच विश्वासामुळे त्याची रिकामी जाळी आणि मचवा आता मासाळीने भरून जाते. ज्यावेळेस आपण सुद्धा देवाने दाखवलेल्या मार्गावर चालतो तेव्हा आपल्या जीवनातही असेच चमत्कार घडतात. परमेश्वराने दाखवलेले मार्ग अनेक वेळा आपल्याला पटत नाही किंवा समजतही नाही तरी सुद्धा आपण येशुवरच्या आपल्या विश्वासात दृढ राहून त्याने दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.

येशूने केलेले चमत्कार पाहून पेत्र त्याच्यातच गुंतून न जाता त्या चमत्काराद्वारे येशू ख्रिस्ताच्या दैविपणा ओळखून घेतली. आपली अयोग्यता व पापवृत्ती स्वीकारून तो येशूला, “माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे” असे म्हणतो. परंतु हे जरी त्याच्या ओठावरील शब्द असले तरी त्याच्या हृदयात, “येशू, मला कधीच सोडून जाऊ नकोस” ही प्रार्थना होती. त्याची ही नम्रता व परिवर्तन पाहून येशू ख्रिस्त त्याला आपला शिष्य म्हणून निवडतो व मासे धरणाऱ्याला माणसे धरणारा बनवतो. संत पेत्राप्रमाणेच पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याने सुद्धा आपली अयोग्यता स्वीकारल्या नंतर देवदुताने नखऱ्याचा स्पर्श त्याने त्याच्या तोंडी करून त्याच्या पापी जीवनाला पवित्र केले व देवाचा संदेष्टा होण्यात त्याला पत्र बनविले. संत पौल जो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता तो सुद्धा येशूचा अनुभव घेतल्यानंतर आपले पापी जीवनावर पश्चाताप करतो व येशू त्याचे आपला श्रेष्ठ शिष्य म्हणून निवड करतो.

अनेक वेळा आपण आपल्या जीवनात आलेल्या समस्यांत गुंतून जातो व आपल्या सोबत असलेल्या प्रभू येशूला विसरून जातो. आपल्या जीवनात आपण सुद्धा कधी-कधी चामत्कारांत मग्न राहतो पण चमत्कार करणाऱ्या देवाला विसरतो. ज्यावेळेस आपण जीवनात घडलेल्या वाईट परिस्थितीमध्ये विश्वासाने देवाचे वचन ऐकतो, परमेश्वराचा आपल्या रिकाम्या मचव्यात स्वीकार करतो, त्याने दाखवलेल्या मार्गावर चालतो व त्यालाच आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतो त्यावेळेस परिस्थिती कितीही गंभीर असली तरीही आपण यशस्वी ठरतो. देवाचे खरे शिष्य होण्याचा अर्थ हाच आहे कि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर आपला विश्वास दृढ ठेवावा व तो आपल्या रिकाम्या मचव्याला काठोकाट भरावे. आपलाही संत पेत्राप्रमाणे विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझी सुवार्ता प्रकट करण्यास आम्हाला कृपा दे.”

१.    ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ या सर्वांनी त्यांच्या कार्याद्वारे व शुभसंदेशाद्वारे येशु ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास त्यांना शक्ती-सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    ‘पिक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत’ म्हणून अनेक तरुण तरुणींनी प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावे, तसेच ज्या तरुण तरुणींनी देवाच्या पाचारणाला होकार दिला आहे अशा सर्वांना ऐहिक मोहांपासून परमेश्वराने अलिप्त ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे युवक युवती देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी नैतिक मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    ह्या पवित्र मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताचे शिष्य खरे सेवक बनून देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

 

 

 

No comments:

Post a Comment