Reflection for the Seventh Sunday in Ordinary Time (20/02/2022) By: Br. Gilbert Fernandes.
सामान्य काळातील सातवा रविवार
पहिले
वाचन:
१ शमुवेल २६:२, ७-९, १२-१३, २२-२३.
दुसरे
वाचन:
१ करिंथ. १५:४५-४९.
शुभवर्तमान: लुक ६:२७-३८.
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण सामान्य काळातील सातवा रविवार साजरा करीत
आहोत. आजची उपासना आपल्याला दयेने, क्षमेने व प्रेमाने वागण्यास बोलावीत आहे. आजची
वाचने आपल्याला आपल्या योग्य आणि चुकीच्या निवडी बद्दल सूचना देतात. योग्य निवडी
आपल्याला देवाकडे घेऊन जातात आणि चुकीच्या निवडी आपल्याला देवाकडून दूर नेतात आणि
त्यामुळे देवाशी व एकमेकांशी असलेले आपले नाते तुटते.
पहिल्या
वाचनात आपल्याला योग्य निवडी विषयी एक उत्तम उदाहरण पहायला मिळते ते म्हणजे,
दाविदने, शौल ह्या देवाच्या अभिषिक्त राज्याचा आदर केला व त्याच्या अपराधांची
क्षमा केली. या उलट शौलाने मात्र चुकीच्या निवडी करणे चालूच ठेवले आणि त्यामुळे
त्याला त्याच्या जीवनात दुःख सोसावे लागले. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला
सांगतो कि, पहिल्या आदामाने देवाची आज्ञा मोडून, चुकीची निवड करून जगात मृत्यू
आणला, तर येशू, दुसरा आदाम याने देवाची इच्छा पूर्ण करून, योग्य अशी निवड करून
आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त केले. आजचे शुभवर्तमान आपल्याला आपल्या मानवी
नातेसंबंधातील योग्य निवडीबद्दल येशूची नैतिक शिकवण देते.
पवित्र असणे
म्हणजे प्रभुने दिलेल्या सुवर्ण नियमांचे पालन करणे. प्रभू येशूख्रिस्तसुद्धा
दयाशील व क्षमेशिलतेचा मार्ग जोपासून देवासारखे बनण्यास पाचारण करतो. पोप
फ्रान्सिस म्हणतात, “दया हे देव व मानव ह्यांना जोडणारा पूल होय.” म्हणून आपण
देखील दया दाखवू या आणि एकमेकांना प्रेमाने वागवू या आणि त्यासाठी लागणारी कृपा
परमेश्वराकडे ह्या मिस्साबलीदानातून मागु या.
मनन चिंतन:
प्रेम हा
शब्द फक्त दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि उच्चारला तर दोन ओठांमध्ये
स्पर्श होतो. प्रभू येशूख्रिस्ताचा संदेश हा प्रेमाचा होतो, त्याची भाषा प्रेमाची
होती आणि म्हणूनच त्याने संपूर्ण जगाला फक्त प्रेम, दया, क्षमा व शांतीचा संदेश
दिला. तो म्हणतो कि, जे तुमचा द्वेष करितात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप
देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना
करा. एकाने दुसऱ्यावर प्रेम करणे, दुसऱ्याने तिसऱ्यावर प्रेम करणे व सर्वत्र
प्रेमाचे वातावरण पसरवणे यालाच खरा धर्म, यालाच खरी सेवा व यालाच खर प्रेम
म्हणतात.
प्रभू
येशूख्रिस्ताने मानव जातीवर एवढे प्रेम केले कि, त्यांच्याखातर त्याने स्वतःचे
सर्वस्व अर्पण केले. त्याने प्रेम केले व प्रेम करायला शिकविले, त्याने दया केली व
दया करायला शिकविले. येशू आम्हाला फक्त आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याची शिकवण देत
नाही तर त्याने आपल्या कृतीतून प्रेमाचे सर्वात स्पष्ट आणि अप्रतिम उदाहरण देखील
दिले. वधस्तंभावर टांगतांना त्याने प्रार्थना केली कि, हे पित्या, त्यांना क्षमा
कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना ठाऊक नाही. हे सर्व त्याला साध्य झाले
त्याचे एकच कारण म्हणजे मनुष्य जातीवर त्याने अफाट असे केलेले प्रेम होय.
जो तुझ्या
एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर; आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो
त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. यामध्ये येशू आम्हाला आव्हान करतो
कि, आपण इतरांना पूर्णपणे क्षमा केली पाहिजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घृणा
किंवा सूड उगवण्याची भावना असता कामा नये. आपण इतरांच्या उणीवांबद्दल धीर धरावा
आणि प्रत्येकांवर, अगदी आपल्या शत्रूंवरही प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे. आज
आपल्या प्रत्येकाला हे विचारण्याची गरज आहे कि, माझ्या आयुष्यात मी शत्रू म्हणतो
असे कोणी आहे का? असे कोणी आहेत जे मला खरोखर आवडत नाहीत? असे लोक आहेत जे खरोखर
मला शाप देतील? येशू ख्रिस्त सांगतो कि, क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. आपण
क्षमा केली पाहिजे, कारण केवळ क्षमाच आपल्याला बरे करते. आपण आपल्या टीकेच्या
तीक्ष्ण जिभेला आळा घालून, सूड घेण्याची वृत्ती सोडून, शेजाऱ्यांच्या चिडचिडी
वर्तनाला सहन करून क्षमा करण्यास सुरुवात करूया.
आपण सर्वजण
ख्रिस्ती आहोत. ख्रिस्तामध्ये आपण राहिलो पाहिजे तेव्हाच आपल्याला जीवन प्राप्त
होईल, आपल्या जीवनाच नुतनीकरण होईल व आपल्या जीवनात नवचैतन्य येईल. ज्याप्रमाणे
ख्रिस्त हा नवचैतन्याचा झरा बनला; त्याच नवचैतन्याने आपण सुद्धा त्या झऱ्याचे पाणी
लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे. जेव्हा परमेश्वर पाऊस पाठवतो तेव्हा तो पाहत नाही कि
कोण शत्रू व कोण चांगले व कोण वाईट. तो सर्वांना समानतेने देतो कारण त्याचं प्रेम
हे सीमापलीकडचे आहे. त्याच्या प्रेमाला आपण सीमित करू शकत नाही.
मानवजात ही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या व भाषेच्या नावाखाली खूप
काही धर्मयुद्धे,
जातीवाद करून लोकांच्या मनावर
त्यांनी ह्या सर्व विचारांचा पडदा घातला होता. त्यामुळे लोक त्यांच्या जातीपुरते, त्यांच्या धर्मापुरते व भाषेपुरते
मर्यादित राहिले. अशामुळे मानवधर्म नष्ट होत गेला. येशूख्रिस्त हा मानवधर्म स्थापन
करण्यासाठी आला होता व ह्या मानवधर्माचा मुलभूत पाया होता तो म्हणजे प्रेम होय.
आपण सर्वजण
ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. त्यामुळे आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे ‘मानवजात’ वाचविण्याची. ही फक्त प्रेमाने, क्षमेने आणि दयाळूपणानेच बचावली जाऊ
शकते. त्यासाठी आपण स्वतःपासून ख्रिस्ताचे कार्य सुरु ठेवायला देऊळमाता आज आपणा
सर्वांना प्रेमाने आमंत्रण करीत आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: "हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्या क्षमेची व प्रेमाची
लेकरे बनव."
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी
ह्यांना आपल्या कार्याकडे देवाच्या नजरेतून पाहण्याचे धैर्य लाभावे आणि
त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या सेवाकार्यात सतत बदल करत राहावे म्हणून आपण
प्रार्थना करू या.
२) आपल्यावरील दुःखामुळे, अडीअडचणी आणि संकटांमुळे आपण निराश न
होता येशूच्या कृपेने जीवनाकडे अधिक आशेने पाहावे आणि तसे इतरांना आपल्या
कृतीद्वारे शिकवावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे
म्हणून आपण सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी
सदैव तत्पर असावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) जे आजारी आहेत, यातनेत आहेत, अन्याय, अत्याचार, हिंसा यांना बळी पडलेले आहेत अशा
सर्वांनी स्वर्गीय भाकरीत कृपेचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या
वैयक्तिक,
कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी
प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment