Friday, 25 February 2022

Reflection for the Eighth Sunday in Ordinary Time (27/02/2022) By: Br. Jeoff Patil.


सामान्य काळातील आठवा रविवार

दिनांक: २७/०२/२०२२

पहिले वाचन: बेनसिरा २७:४-७.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:५४-५८.

शुभवर्तमान: लूक ६:३९-४५.




प्रस्तावना:

चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. आज आपण सामान्य काळातील आठवा रविवार साजरा करीत आहेत. आजची उपासना आपल्याला चागुलपणा ह्या विषयावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावत आहे.

जशी कुंभाराच्या मटक्याची परीक्षा भट्टीत होते, तसीच माणसाची परीक्षा त्याच्या संभाषणातून होते. कारण, माणसाच्या बोलण्यावरून त्याची मनोवृत्ती कळून येते. आजचे पहिले वाचन आपल्याला कोणत्याही माणसाचे मत ऐकल्याशिवाय त्याची स्तुती करू नये असे सांगत आहे.

दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे कि, प्रभू येशूमध्ये तुमचे श्रम व्यैर्थ नाही म्हणून तुम्ही स्थिर आणि अढळ रहा. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू हा ख्रिस्त असला पाहिजे. ख्रिस्ताविना आपण कुठल्याही कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.

आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त छोट्याश्या दाखल्याद्वारे काही बोध वचने घेऊन आपला स्वभाव चांगल्या झाडासारखा व प्रेमळ अंतःकरणाचा असावा, असे आपणास सांगत आहे.

तर आजच्या उपासना विधीत घेत असतांना आपल्या स्वतःच्या अंतःकरणात प्रेम कि द्वेष आहे? हे पाहूया आणि आपली जीवन शैली व वागणूक चांगली व प्रेमळ बनावि म्हणून देवाची शक्ती व कृपा मागुया.

 

मनन चिंतन:

नाते कुठलेही असुद्या फक्त ते हात आणि डोळ्यांसारखे असले पाहिजे. कारण, हाताला लागले कि डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात. आज आपण चांगुलपणा ह्या विषयावर मनन चिंतन करीत असतांना आजची उपासना आपल्याला सांगत आहे कि, जे आपल्या अंतःकरणात भरलेले आहे तेच पाण्या मुखावाटे निघते. ज्या परमेश्वराने संपूर्ण विश्वाची व मानवजातीची निर्मिती केलेली आहे; तोच परमेश्वर सर्व लोकांकडून अपेक्षा करत आहे कि, आपल्या जीवनात चांगली फळे यावी.

आजच्या तिन्ही वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याला एक चांगली अशी सूचना करीत आहे. ती म्हणजे आपला जीवनवृक्ष चांगला असू द्या, म्हणजे त्याला चांगली फळे येतील. आपले ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ताच्या शिकवणुकीवर व ख्रिस्ती मूल्यांवर आधारित असले पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की, जसा कुंभाराच्या मडक्याची परीक्षा भट्टीत होते, तशीच माणसाची परीक्षा त्याच्या संभाषणातून होते. म्हणून आपले बोलणे, वागणे व चालणे चांगले पाहिजे. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, जेव्हा आपण चांगले जीवन जगतो; म्हणजेच पापाच्या मोहाला बळी पडत नाही तेव्हा देव आपल्याबरोबर असतो, तोच आपला सांभाळ करतो. तसेच शुभवर्तमानात येशू ख्रिस्त लहानशा दाखल्यासारखी काही बोधवचने देऊन आपले जीवन, स्वभाव, बोलणे व चालणे चांगली असावीत असे सांगतो.

रोंन डन हे आपल्या एका गोष्टीमध्ये दोन वेदीसेवकाविषयी सांगतात, त्यामधील एक युरोप मध्ये जन्माला आलेला आणि दुसरा अमेरिकेला जन्माला आलेला होता. एके दिवशी दोन्ही वेदीसेवक चर्चमध्ये धर्मगुरूंना मदत करत असताना मिस्साच्या वेळेला त्यांच्या हातातून वाईन खाली कार्पेट- वरती पाडली. दोन्ही धर्मगुरूंनी ह्या गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला. युरोपमधील धर्मगुरूने त्या वेदीसेवकाच्या कानशिलात मारली आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून तो वेदीसेवक पुढे भविष्यात नास्तिक हुकूमशहा म्हणून जोशीफ ब्रोज युगोसलावियामध्ये प्रसिद्ध झाला, तर दुसरा अमेरिकेतील वेदीसेवक ज्याला धर्मगुरूंनी जवळ घेतले आणि म्हटले, चूक जरी झालेली असेल तरी घाबरू नको, ठीक आहे, भविष्यात तू चांगल्या गोष्टी करशील याचा मला विश्वास आहे, आणि तोच वेदीसेवक आज थोर बिशप फुल्टन जे. शिन म्हणून ओळखले जातात.

प्रिय बंधु आणि भगिनींनो आयुष्यात प्रेमाने ज्या गोष्टी साध्य होतात त्या गोष्टी आपल्याला इतर कोणत्याही गोष्टींनी साध्य करता येत नाहीत आणि हेच ब्रीदवाक्य आपणास वरील गोष्ट किंबहुना आजची उपासना दाखवून देत आहे. जगामध्ये जगत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला या गोष्टींचा अनुभव आलेला असेलच. प्रत्येक वेळेला कुणाला काही न देता आपण बऱ्याच गोष्टींची अपेक्षा केलेली असेल. बायबल म्हणते जे पेराल तेच उगवेल. ज्याप्रमाणे आपण पेरले असेल त्याचा मोबदला आपणास त्या पिकाच्या माध्यमातून तीस पट, साठ पट आणि शंभर पटीत मिळणार आहे. परंतु, आपण पेरताना किंबहुना देताना पूर्ण मनाने आणि हृदयाने दिलेलं नसेल किंवा पेरलेलं नसेल तर, आपल्याला मिळणार पीक देखील त्याप्रमाणेच कमकुवत किंवा कमी दर्जाचे मिळत असते.

समाजात कार्य करताना आपणास दुःख, संकटे, अडी-अडचणी यांचा आपल्या दैनंदिन जीवनात सदोदित सामना करावा लागत असतो. असं म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारीया उक्तीप्रमाणे आपण कार्य करीत असताना जरी समाजात आपली निंदा झाली, आपला तिरस्कार झाला, तरी आपण आपला चांगुलपणा कदापि सोडू नये. ख्रिस्ताने घालून दिलेल्या कित्याप्रमाणे आपल्या जीवनात प्रेम, दया, क्षमा आणि शांती या गुणांचा अवलंब करून आपलं जीवन मार्गक्रन केले पाहिजे आणि ख्रिस्ताचे देवराज्य ज्या करिता ख्रिस्त या जगात अवतरला ते पूर्णत्वास नेण्यास आपण कारणीभूत ठरलो पाहिजे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१.    आपले पोप महाशय फ्रान्सिसमहागुरुस्वामीधर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी आपल्या प्रेमळ सेवाकार्याद्वारे व सुवार्तेद्वारे सर्व ख्रिस्ती भाविकांना देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    आपले राजकीय नेते स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्वीकारता आपली इच्छा, योजना व कृतीला फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मी-पणा, अहंकार, नावलौकीक इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्वीकाराव्यात म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.

३.    आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे; म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.

४.    ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे – विशेषकरून; आजारी, गरीब, शोकांकीत, तुरुंगात अडकून पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आनंदाचा, कृपेचा आणि चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.

५.    थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

 

1 comment: