Reflection for the Second Sunday of Lent (13/03/2022) By: Fr. Benher Patil.
उपवास काळातील दुसरा रविवार
दिनांक:१३/०३/२०२२
पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८.
दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र ३:१७-४:१.
शुभवर्तमान: लूक ९:२८-३६.
प्रस्तावना:
आज आपण उपवास काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या
उपासनेचा मुख्य विषय म्हणजे: परिवर्तन किवा रुपांतर. मनुष्य आध्यात्मिक जीवनात दुर्बळ
आणि कमकुवत असतो. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जर आपल्याला खर आणि परिपूर्ण जीवन जगायची
इच्छा असेल तर, आपण पाप, वाईट सवयी, दुर्गुण ह्याकडे पाठ फिरवणे नितांत गरजेचं आहे.
आजची तिन्ही वाचने आपल्याला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि सामर्थ्याने आपल्या
दैनंदिन जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आमंत्रण देतात आणि प्रोत्साहित करतात. त्यासाठी लागणारी ईश्वरी कृपा आणि सामर्थ्य
आपणास प्राप्त व्हावी म्हणून ह्या मिस्साबलीत परमेश्वर पित्याकडे याचना करूया.
मनन-चिंतन:
एक ग्रीक तत्वज्ञानी हेराक्लीटस म्हणतात कि, “ह्या जगात सर्व
काही प्रवाही आहे, काहीही स्थिर नाही.” दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे, ह्या जगात
अस्तित्वात असणारे सर्वकाही कालानुरूप बदलत असत. ह्याचंच एक साध आणि जिवंत उदाहरण म्हणजे
वसंत ऋतू. वसंत ऋतूत आपल्याला संपूर्ण सृष्टीचा कायापालट झालेला आढळतो. एरवी सुकून
गेलेली, निस्तेज झालेली अवघी वसुंधरा, ह्या ऋतूत हिरविगार व नानाविविध रंगाच्या फळा-फुलांनी
सजलेली आणि नटलेली पाहायला मिळते. चराचरावर जादू करणारा आणि आसमंत गुंगून टाकणारा हा
तिचा नविन अवतार डोळे दिपवणारा आणि मनाला प्रफुलीत व प्रसन्न करणारा नसेल तर नवलच म्हणव
लागेल.
उपवासकाळ हा आपल्यासाठी एकप्रकारे आध्यात्मिक वसंत ऋतुच आहे.
ह्या पवित्र काळात ख्रिस्तसभा आपणास मानवी जीवनाचा कायापालट करून अशाच प्रकारचा मन्मानाला
आणि देवाला प्रसन्न करणारा वसंत ऋतू फुलविण्यासाठी आवाहान करत आहे. विशेषकरून आजची
तिन्ही वाचने आपल्या विश्वासातील तीन नायक: अब्राहाम, पौल आणि अर्थातच येशूच्या अध्यात्मिक
परिवर्तनाच्या अनुभवाचे वर्णन करतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, परमेश्वर,
आपला आदिपिता अब्राम, जो एक मूर्तिपूजक होता त्याच नाव बदलून अब्राहाम, म्हणजे खऱ्याखुऱ्या
देवाला मानणारा, आज्ञाधारक, अन विश्वास ठेवणारा असं करतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल
असा युक्तिवाद करतात कि, जर एखाद्याला ख्रिस्ती व्हायचं असेल तर, जुने नियम, परंपरा
आणि रूढी पाळायची काही आवश्यकता नाही. ते असा बोध करतात कि, आपलं दयनीय अवस्थेतील शरीर
व आत्मा, खुद्द ख्रिस्त त्याच्या सामर्थ्याने रुपांतरीत करणार आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूच्या दैवी रूपांतराचे वर्णन
आढळते. येशू ख्रिस्त फक्त एक साधासुधा मानव नव्हता तर, तो खुद्द देवाचा परमप्रिय पुत्र
होता, तो मानवदेहात वस्ती करणारा खुद्द परमात्मा-परमेश्वर होता हे येशूच्या रूपांतराद्वारे
सिद्ध होते. ख्रिस्ताच्या रूपांतराचा मुख्य उद्देश म्हणजे परमेश्वर पित्याशी सल्लामसलत
करून, त्याची येशूच्या दु:ख, मरण आणि पुनरुत्थानासाठी असलेली तारणदायक योजना ह्याची
खात्री करून घेणे हि होती. त्याचा दुसरा हेतू म्हणजे, येशूच्या निवडलेल्या शिष्यांना
त्याच्या दैवी वैभवाची जाणीव करून देणे हा होता, जेणेकरून त्यांनी त्यांच्या ऐहिक महत्वाकांक्षा
आणि राजकीय पराक्रमी मसिहाची स्वप्ने सोडून द्यावी आणि परीक्षेच्या आणि संकटांच्या
वेळेला त्यांना बळ मिळावे. त्याचप्रमाणे येशूच परिवर्तन आपणा प्रत्येकास आपल्या वैयक्तिक
जीवनाच परिवर्तन करण्यास चालना देते आणि आव्हान करते.
बाप्तिस्मा संस्काराद्वारे आपणसुद्धा देवाचे पुत्र आणि कन्या
बनले आहोत. पण दुर्दैवाने त्यासाठी साजेसं असं जीवन आपण नेहमीच जगण्याचा प्रयत्न करत
नाही. तर आपल्या पापी आणि भ्रष्ट जीवनाद्वारे आपण ख्रिस्ती जीवनाला काळिमा फासतो. आपल्या
वाईट आचरण आणि सवयींद्वारे आपण देवाच्या प्रतिमेला म्हणजे स्वतःला कलंक लावतो. देव
आपला पिता ह्याच्या आज्ञा न पाळता, त्याचे वचन न ऐकता आपण आपले परमेश्वर पित्याबरोबरचे
संबंध तोडून अयोग्य जीवनाची वाट धरतो. अश्या प्रसंगी आजची वाचणे आपणास पुन्हा एकदा
देवाकडे येण्यास साद घालतात.
अस म्हटलं जात कि, मानवाचं दानव होणं हे त्याच दुर्दैव आणि
हार आहे. मानवाचा महा-मानव होणे हा त्याचा चमत्कार आहे आणि मानवाचं खऱ्या अर्थाने माणूस
होणे हे त्याचे यश आहे. पण मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणू इच्छितो कि, एका ख्रिस्ती
माणसाचं ख्रिस्तासारख दैवी होणे किंवा त्याच्या वैभवात सामील होणे हा त्याचा मान आणि
त्याच्या उत्पन्नकर्त्या परमेश्वराचा खरा सन्मान आहे. म्हणूनच सैतानी मोहांना, भूल-थापांना
बळी न पडता, त्याउलट देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं
परिवर्तन करून, ते सुंदर आणि पवित्र, देवाला मान्य असं करण्यासाठी देवाची कृपा आणि
पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपणास मिळावे म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.”
१. आपले पोप फ्रान्सीस, महागुरू आणि चर्चच्या सर्व नेत्यांनी ख्रिस्त, आमचा उत्तम मेंढपाळ ह्याची वाणी ऐकून त्याच्या वचनाप्रमाणे चालण्यास त्याच्या कळपाला म्हणजेच ख्रिस्तसभेला प्रेमाने आणि करुणेने मार्गदर्शन करावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
२. समाजात जे वंचित, रोग, अत्याचार आणि अन्यायाने ग्रस्त आहेत, अश्या देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करूया, त्यांना दयावंत आणि प्रेमळ परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव यावा आणि सर्व अनिष्टापासून त्याचं देवाने सौरक्षण कराव म्हणून प्रार्थना करूया.
३. जे पापी जीवन जगत आहेत, कुमार्गाला लागलेले आहेत आणि जीवनात भरकटलेले तसेच निराश आहेत, अशा सर्व व्यक्तीस देवाने संन्मार्गास लावावे, त्याचं परिवर्तन करावे, आणि त्यांना स्पर्श करून सुंदर आणि पवित्र जीवन जगण्यास सुबुद्धी द्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
४. आपल्या जगात जिथे युध्द, अशांती आणि अराजकता आहे तेथे परमेश्वराने शांती आणि न्याय प्रस्थापित करावा आणि सर्व राजकीय नेत्यांनी आपले स्वार्थी हेतू बाजूला सारून जगाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी झटण्यास त्यांना बुद्धी आणि कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. वैदकीय क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व डॉक्टर्स, परिचारिका, प्यारामेडीक्स आणि संशोधक, ह्यांनि समाजातील आजारी आणि गरजू लोकांची करुणेने आणि समर्पित वृत्तीने सेवा करण्यास पवित्र आत्म्याने सक्ष्यम कराव म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
६. येथे हजर असलेल्या सर्वाना अध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यास, देवाची खरी लेकरे बनण्यास, आणि ख्रिस्ताचे खरे अनुयायी होण्यास शक्ती आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
७. थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment