Wednesday, 16 March 2022

Reflection for the Third Sunday of Lent (20/03/2022) By: Fr. Suhas Pereira.



उपवासकाळातील तिसरा रविवार




दिनांक: २०/०३/२०२२

पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ, १३-१५.

दुसरे वाचन: १ करिंथ. १०:१-६, १०-१२.

शुभवर्तमान: लुक १३:१-९.

 


प्रस्तावना:

आज आपण उपवासकाळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला आपल्यात बदल, नाविन्य आणण्याचं आवाहन करीत आहे. आजच्या उपासनेची तिन्ही वाचने परमेश्वराच्या दयेबद्दल आणि करुणेबद्दल बोध देत आहेत. आपण पुन्हा-पुन्हा पापात पडतो परंतु परमेश्वर आपल्याला बदलण्याची नवीन संधी देत असतो. कारण तो आपला प्रेमळ पिता आहे. परंतु परमेश्वराचे माणसावरील प्रेम जरी अथांग आणि अमर्याद असले, तरीसुद्धा परमेश्वर आपल्या सहकार्याशिवाय आपलं तारण करू शकत नाही, आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणूनच या उपासकाळात तो आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप करून, जीवनाचं नूतनीकरण करून आपल्या जीवनाद्वारे प्रेम, करुणा, क्षमा आणि सेवेची फळे देण्यास निमंत्रण देत आहे.

देवाने मोशेची इस्रायलचा पुढारी आणि मुक्तिदाता म्हणून निवड करून इस्रायली लोकांप्रती आपली दया आणि आपले प्रेम कसे दाखवले हे आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो कि देव हा दयाळू आणि त्याचबरोबर शिस्तबद्ध आणि शिस्त लावणारा पिता आहे. म्हणूनच आपण पापी जीवनापासून दूर राहिलो पाहिजेत. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपण देव आपल्या प्रजेला शिस्त कशी लावतो, त्याच्या मार्गावर चालण्यास कसे शिकवितो, पश्चाताप करण्यास आमंत्रण देतो आणि जीवनाचा जीर्णोद्धार करून पवित्र आत्म्याची फळे आपल्या जीवनात देण्यास कशी प्रेरणा देतो याबद्दल ऐकतो.

आजची उपासना आपल्याला सांगत आहे, कि सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन सर्वांसाठी शक्य आहे. परंतु त्यासाठी आपल्याला गरज आहे पश्चातापाची, परमेश्वराकडे वळण्याची. आणि हे चाळीस दिवस प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या सणाची तयारी करत असताना आपण पश्चाताप करून देवाकडे, स्वर्गाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर हाच आपल्यासाठी खऱ्या सुखाचा, आनंदाचा आणि खऱ्या जीवनाचा स्रोत आहे. त्या परमेश्वराकडे ह्या मिस्साबलीच्या सुरुवातीला आपण आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची क्षमा मागू या आणि पश्चात्तापी अंतःकरणाने देवाकडे वळूया.

 


मनन-चिंतन:

त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलातानेआधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल" (लूक १३, -). प्रभू येशूचे हे शब्द ऐकल्यावर आपल्याला कदाचित प्रश्न पडेल, कि ह्या रविवारचे शुभवर्तमान हे खरोखरच शुभ-वर्तमान किंव्हा शुभ-वार्ता आहे का? खरं पाहिलं तर आजच्या शुभवर्तमानचे शब्द हे स्पष्ट चेतावणी आणि इशारा देणारे शब्द आहेत: "जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल". ह्या शब्दांद्वारे प्रभू येशू यहुदी अमजतील लोकांना चेतावणी देत होता. परंतु हि चेतावणी फक्त त्या काळासाठी आणि इतरांसाठीच नव्हती तर आजच्या काळासाठी आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहे. प्रभूच्या आजच्या शुभवर्तमानाला आपल्याला सर्वांना आपल्या निद्रावस्थेतून जागं करून सांगवायचं आहे, कि जीवनात थोडं गंभीर बना. आजचं शुभवर्तमान आपल्याला जीवनात निश्चयी आणि निर्धारी बनण्यास बोलावत आहे."जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल". जर आपण आपल्या निद्रावस्थेतून उठून पश्चात्तापी बनलो आपल्या जीवनाचा कायापालट करून देवाच्या मार्गावर राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न केला, तर आपले तारण होईल, नाश होणार नाही; आपल्याला आजच्या शुभवर्तमानात आपला न्याय करू पाहणाऱ्या न्यायाधीश देवाचे दर्शन होणार नाही तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपली सदैव काळजी वाहणाऱ्या आणि आपण पापात राहून आपला नाश होऊ नये म्हणून सदैव प्रयत्न करणाऱ्या आणि आपलं रक्षण करणाऱ्या प्रिय पित्याचे दर्शन होईल.

मग प्रेमळ स्वर्गीय पित्याचे दर्शन घडवणाऱ्या प्रभू येशूच्या या चेतावणीचा आपल्यासाठी काय अर्थ होऊ शकतो? आजच्या शुभवर्तमानचा अर्थ आपल्यासाठी असा होऊ शकतो: परमेश्वर पित्याच्या प्रेमाचा अनुभव घे, त्याच्या पवित्र आत्म्याला तुझे हृदय आणि जीवन उघड, त्याच्या पवित्र शब्दाला तुला स्पर्श करून नव्हे करावे म्हणून तू तुझे अंतःकरण उघड. वेळ आणि संधी आहे तोपर्यंत पश्चाताप कर आणि देवाकडे वळ. फळ नं देणाऱ्या आणि जमिनीला उगीच भार होणाऱ्या अंजिराच्या झाडाप्रमाणे होऊ नकोस. कारण असे झाड तोडून दिले जाईल. आणि ज्याप्रमाणे असे फळ देणारे झाड तोडून टाकले जाईल, त्याप्रमाणेच पापात राहणाऱ्या आणि पश्चाताप करणाऱ्या मनुष्याचा पापामुळे नाश होईल.

परंतु फळ देणाऱ्या अंजिराच्या झाडाच्या दाखल्याचा तसाच अंत होत नाही. तो दाखला पुढे सांगतो, कि अंजिराचे झाड फळ देत नसले आणि तोडून टाकायच्या लायकीचे असले तरी त्या झाडाचा माळी मात्र दयाळू आणि चांगला होता. त्या माळ्याने ते अंजिराचे झाड चांगल्या जमिनीत किंव्हा मातीमध्ये लावले होते. आणि आता तो माळी ते अंजिराचे झाड तोडून टाकता अजून थोडा वेळ तसेच राहू द्यावे अशी विनंती आपल्या मालकाला करतो. त्या झाडाने फळ द्यावे म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं वचन तो माळी आपल्या मालकाला देतो. या ठिकाणी आजची उपासना आपल्याला अजून एक महत्वाचा संदेश देत आहे: आजचं शुभवर्तमान आपलं पाप ओळखून पश्चाताप करण्यासाठी आपल्याला आवाहन करते. आजच्या शुभवर्तमानात पश्चातापाची गरज दाखवून देणारा आणि त्यासाठी आमंत्रण देणाऱ्या देवाचे दर्शन होते. त्याचप्रमाणे माळ्याच्या प्रतिमेत आपल्याला सदैव मदत करू इच्छिणाऱ्या आणि आपल्या प्रति सहनशील आणि संयमी असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचे देव आणि मानवमधील मध्यस्थ म्हणून दर्शन होते. ज्याप्रमाणे माळ्याला त्या अंजिराच्या झाडाला अजून एक संधी द्यावयाची होती, त्याप्रमाणे प्रभू येशू सुद्धा आपल्या बाजूने असतो, आपल्याला सहाय्य्य करतो. तो सदैव आमची काळजी घेतो आणि आम्हाला नवजीवन, सार्वकालिक जीवन लाभावे आणि आम्ही पुष्कळ, अमाप प्रमाणात फळं द्यावीत म्हणून तो आपल्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदानसुद्धा करतो.

आपण काय केले पाहिजे? आपली जबाबदारी काय आहे? आपण आपल्या झोपेतून उठलो पाहिजेत, नव्या जीवनाची एक नवीन सुरुवात केली पाहिजे, आणि अंजिराच्या एका चांगल्या झाडाप्रमाणे चांगली फळे दिली पाहिजेत. इतकेच नव्हे, तर इतरांनी सुद्धा चांगले जीवन जगावे, चांगली आणि भरपूर फळं द्यावीत आणि त्यांचं जीवनसुद्धा प्रभूच्या मळ्यात फुलावे म्हणून ख्रिस्ताप्रमाणे आपल्यालासुद्धा माळी बनून इतरांच्या जीवनरूपी रोपट्याची काळजी घेण्याचं आवाहन आजचं शुभवर्तमान करीत आहे.

प्रभू येशू ख्रिस्त हा एक संय्यमी आणि काळजीवाहू माळी हा स्वर्गीय पित्याजवळ आपल्या सर्वांचा मध्यस्थी बनतो. त्याच्यावरील श्रद्धेत आपण पश्चातापाचा मार्ग धरू या आणि देवाकडे वळण्याचा प्रयत्न करू या. प्रभू येशूच्या मध्यस्थीद्वारे आपलं जीवन फुलावं आणि त्याच्या प्रेरणेने इतरांचं जीवन फुलवण्यासाठी आणि चांगलं बनवण्यासाठी आपण सदोदित कार्य करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१)    आमचे परमगुरु फ्रान्सिस आणि अखंड ख्रिस्तसभेची धुरा वाहणाऱ्या सर्वांनी ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा आणि ख्रिस्ती मूल्यांच्या आधारावर ख्रिस्तसभा सदैव मजबूत ठेवण्यासाठी त्यांना कृपा आणि सदबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२)     रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांतील युद्धाचा अंत व्हावा, तेथील सार्वजनिक जीवन पूर्ववत होऊन सुरळीत चालावे, जी लोकं बेघर झाली आहेत त्यांना योग्य अशी मदत मिळावी त्याचप्रमाणे या दोन्ही राष्ट्रांत शांती आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी जागतिक नेत्यांनी कार्यरत राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३)     आपल्या धर्मग्रामात, सभोवताली आणि कुटुंबात जी लोकं आजारी आहेत, त्यांना तुझ्या दयेने आणि कृपेच्या स्पर्शाने बरेपण लाभावं आणि त्यांच्या जीवनात आनंद यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४)     आपल्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व मृतजणांना परमेश्वराने दया दाखवावी आणि त्यांना प्रेमाचं आलिंगन देऊन स्वर्गराज्यात त्यांचा स्वीकार करावा आणि त्यांना चिरंतन शांती द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५)     आपल्या सर्व वयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment