Thursday, 24 March 2022

Reflection for the Fourth Sunday of Lent (27/03/2022) By: Fr. Benjamin Alphonso.


उपवास काळातील चौथा रविवार




दिनांक:२७/०३/२०२२

पहिले वाचन: यहोशवा ५:९-१२

दुसरे वाचन: २ करिंथ. ५:१७-२१

शुभवर्तमान: लुक १५:१-३, ११-३२

 


प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित्त काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. देवाच्या दयेचा, क्षमेचा व अस्सिम प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला आमंत्रित करीत आहे. यहोशवाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणाला कळून येते की, इस्रायली लोकांनी जुनी जीवनपद्धती सोडून, नवीन जीवनाला प्रारंभ केला होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात सांगतो की, परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आपला स्वतःबरोबर समेट केला, जर कोणी ख्रिस्ताठायी असेल, तर तो नवीन उत्पत्ती आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात उधळ्या पुत्राच्या दाखल्याबद्दल आपण ऐकणार आहोत.

आपण सुद्धा आपले जीवन उधळ्या पुत्राप्रमाणे जगून देवाच्या प्रेमापासून दूर गेलो आहोत, परंतु आज आपण देवाच्या प्रेमाचा स्विकार करण्याची ती वेळ आली आहे. उधळ्यापुत्राप्रमाणे जेव्हा आपण पश्चातापी अंत:करणाने परमेश्वराकडे धाव घेतो, तेव्हा तो दयाळू बाप आपला स्विकार करण्यास सतत तयार असतो. म्हणून पश्चातापी अंत:करणासाठी आजच्या पवित्र मिस्सालीदानात भक्तीने सहभागी होताना प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

बापा मी रडतो, घरी परत येतो

पुत्र नव्हे तर चाकर तुझा

स्विकार कर माझा

देव दयाळू व क्षमा करणार आहे. जो कोणी देवाकडे पश्चातापी अंत:करणाने जातो देव त्या व्यक्तीला क्षमा करायला तयार असतो, ह्याची प्रचिती आजच्या तिन्ही वाचनामध्ये आपल्याला येते. असं म्हणतात की, लोकं नवीन तंत्रज्ञान शोधतात परंतु, देव नवीन हृदयाला शोधतो; लोकं चांगल्या पद्धतीच्या शोधात आहेत, तर देव चांगल्या लोकांच्या शोधात आहे.”

पाप व वाईट कृत्ये आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतात. परंतु तोच देव आपल्याला पुन्हा बोलावत असतो. माणसावर (देव) ईश्वराच्या करुणेचा वर्षाव होऊन जे लोकं देव पित्याच्या प्रीतीपासून, करूणेपासून व क्षमेपासून दूर गेले आहेत, अशा लोकांना पुन्हा दैवी करुणेचा, प्रीतीचा व क्षमेचा अनुभव यावा व तो अनुभव उधळ्या पुत्राचा दाखल्याद्वारे आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे. ह्या दाखल्यातून समजते की, प्रत्येकाला दैवी करुणेच्या स्पर्शाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवन उधळ्या पुत्रासारखे आहे. आपल्या वाईट वागणुकीमुळे, कृत्यामुळे व इतरांबरोबर चांगले संबंध नसल्यामुळे आपण दूर गेलो आहोत. पण, जेव्हा आपण हा दाखला वाचतो तेव्हा हा दाखला आपल्या समोर एक आवाहन ठेवत असतो, ते आहे मन परिवर्तन करण्याचे आवाहन. हा दाखला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणतो, शैतानाकडून ख्रिस्ताकडे आणतो, इतकेच नव्हे तर, चांगला पश्चाताप करावयास शिकवतो. खरा पश्चाताप करून आपण देवाकडे व शेजाऱ्याजवळ येतो. ह्या दाखल्यातून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की, ख्रिस्त हा प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे. त्याचे प्रेम व त्याची माया ही अपार आहे.

ह्या दाखल्यात पित्याच्या प्रेमाविषयी वर्णिले आहे. देवाची माया कधीही उणी पडत नाही. आपल्या पापांसाठी देवाचा एकुलता एक पुत्र आम्हास तारावयास क्रुसावर मरण पावला. आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून क्षमेचा धडा गिरवण्यास शिकवले आहे. आपण ह्या जगात ख्रिस्ताचे प्रेम द्यावयास आलो आहोत, म्हणूनच आपणामध्ये शास्त्री व पुरुशी लोकांची वृत्ती दिसायला नको.

 

बोधकथा:

अमळनेरच्या शाळेत सानेगुरुजी शिक्षक म्हणून काम करीत होते. ह्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सानेगुरुजी स्वतःच्या जेणामध्ये खाडे पाडून पैसे वाचवत. शाळेचे मुख्याध्यापक गोखले सरांना हे कळलं. ह्या गोष्टीचे खूप दुःख वाटले त्यांनी गुरुजींना आपल्या घरी रोज जेवण्यासाठी येण्यास सांगितले. एकदा साने गुरुजी गोखले सरांच्या घरी जेवले. दुसर्‍या दिवशी त्यांनी गोखले सरांना पत्र लिहून आपली त्यांच्या घरी जेवण्याची असमर्थता कळवली, जे सुग्रास अन्न आपल्या देशबांधवांना मिळणं अशक्य आहे ते मी खाऊ शकत नाही.” अस त्यांनी पत्रातून कळवलं. ते पत्र वाचून गोखले सरांचं जीवन बदललं. नेहमी सुटा-बुटात, ऐषो-आरामात, चैनीतल्या जीवनातून त्यांची मुक्तता झाली. त्यांनी आपल्या गरजा कमालीच्या कमी केल्या गोखले सरांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. त्यातच त्यांनी प्राणाहुती गेली.

छोट्या भावाने पश्चाताप करून त्याची चूक कबूल केली व तो आपल्या पित्याकडे परतला. त्याने आपल्या पित्याबरोबर समेट केला. दयाळू मनुष्य दुसऱ्या माणसाला क्षमा करून आपल्या जवळ घेत असतो. आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करूया बापाला म्हणूया, हे पित्या मी तुझ्याकडे धावत येतो माझा स्विकार कर.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो दया कर व आमची प्रार्थना ऐक.

१.    आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी, त्यांचावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमलेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी सोडवाव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आज जगात अनेक गरीब राष्ट्रांतील लोकांना तसेच आपल्या समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय व छळ सहन करावा लागत आहे; अशा सर्व लोकांना प्रभूने, त्यांच्यावर अन्याय व छळ करणाऱ्यांना क्षमा करण्यास प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगून आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे व उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    आपल्या धर्मग्रामाच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.

 

 

No comments:

Post a Comment