Reflection for the SOLEMNITY OF THE ASCENSION OF THE LORD (29/05/2022) by Fr. Benher Patil
प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा
दिनांक: २९/०५/२०२२पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३शुभवर्तमान: लुक २४:४६-५३
प्रस्तावना:
प्रिय बंधू-भगिनीनो, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थित काळातील सातवा रविवार साजरा करीत
आहे. आजच्या दिवसाचं विशेष महत्व म्हणजे प्रभू येशूचे वैभवी स्वर्गारोहण. आजची
वाचने आपणास स्पष्टपणे सांगतात कि पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने चाळीस दिवस
वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शिष्यांना दर्शनं दिली, त्यांना देवराज्याची शिकवण दिली आणि पवित्र आत्म्याच्या
आगमनाची शाश्वती देऊन तो सर्वासमक्ष मोठ्या वैभवाने वर स्वर्गात घेतला गेला.
येशूचे स्वर्गरोहण आपणासाठी एक आशेचा किरण आहे आणि ते आपल्या विश्वासाचं प्रखर
सत्य आहे,
ज्याद्वारे आपणास असा बोध होतो कि, आपणसुद्धा स्वर्गासाठी निर्माण केलेले असून, आपलं ऐहिक जीवन संपल्यावर ख्रिस्तासारखे आपणसुद्धा
स्वर्गाराज्यात देवाबरोबर निरंतर वास करणार आहोत.
मनन चिंतन:
येशूचे गौरवी पुनरुत्थान हे ख्रिस्ती धर्माचा आणि श्रद्धेचा
गाभा आहे. हे रहस्य आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतरची महान घटना म्हणजे
ख्रिस्ताचे वैभवी स्वर्गरोहण. हा सोहळा साजरा करत असताना त्यातून आपल्याला काय
शिकायला मिळते? अथवा
त्याचं आपल्या ख्रिस्ती जीवनात काय आणि किती महत्व आहे, ह्या बाबीवर मनन-चिंतन करणे गरजेचे आहे.
आपल्याला कदाचित शंका येत असेल कि येशू वर स्वर्गात गेला
म्हणजे नक्की कुठे आणि कश्यासाठी गेला? पहिल्या प्रथम, येशूचे स्वर्गरोहण आपल्याला जाणीव करून देते कि तो स्वर्गात
देवपित्याकडे परत गेला. पवित्र शास्रात ह्या सत्याचा उलगडा केलेला पाहायला मिळतो.
योहानाच्या अध्यायात (१६:२८) येशू म्हणतो कि, “मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.” आजच्या दुसऱ्या वाचनात
संत पौल ह्या सत्याला दुजोरा देत म्हणतो कि, परमेश्वर पित्याने ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले; आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत, आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे
बसविले.
दुसरी गोष्ट म्हणजे येशूचे स्वर्गरोहण हे त्याच्या
दैवत्वाची साक्ष देते. तो खरा देव आणि प्रभूचा प्रभू असून स्वर्ग आणि संपूर्ण
सृष्टी त्याच्या हातात आहे. त्याने जगातील सर्वावर: पापावर, सैतानावर, मरणावर विजय मिळवून स्वर्गात म्हणजे त्याच्या गौरवात प्रवेश
केला आहे. त्याने अभिवचन दिल्याप्रमाणे तो स्वर्गात पहिल्या प्रथम आपल्यासाठी जागा
तयार करावयास गेला आहे (“मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन
तुम्हाला आपल्याजवळ घेईन”, योहान १४:२). त्याचप्रमाणे तो देवाच्या उजवीकडे आपला सामर्थ्यशाली तारणकर्ता
आणि मध्यस्त बनून बसला आहे. येशू स्वर्गात जाण्याचं तिसर आणि महत्वाचं कारण म्हणजे
पवित्र आत्म्याचं दान. येशू म्हणतो, “मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलों तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन” (योहान १६:७).
येशूचे स्वर्गरोहण ही आपणा प्रत्येकासाठी विशेषकरून खूप
फायदेशीर बाब आहे. ह्या घटनेद्वारे ख्रिस्त आपल्याला मानव कोण आहे आणि त्याच स्थान
काय आहे हे दाखवून देतो. जो ख्रिस्त वर स्वर्गात घेतला गेला त्याने काळाची पूर्तता
होताच मानवी अवतार धारण केला (गलतीकरांस ४:४-७). ज्याप्रमाणे येशूच्या मानवी
रुपाद्वारे (Incarnation) खुद्द
देव मनुष्य झाला आणि आम्हामध्ये वस्ती करून राहायला (योहान १:१४). त्याचप्रमाणे
येशूच्या स्वर्गरोहणाने (Ascension) मानवाला देवाबरोबर राहण्याचं सदभाग्य मिळालं आहे.
ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे खुले करून त्याच्या स्वर्गीय वैभवात
सहभागी होण्याचा मान दिला आहे.
ख्रिस्ताचे स्वर्गरोहण हे निश्चितच आमच्यासाठी स्वर्गीय
जीवनाची सुरुवात आहे. ह्या घटनेद्वारे त्याच्या वैभवात सहभागी होण्याची आशा
पल्लवित झाली आहे. पण तत्पूर्वी आपण ह्या जगातील जबाबदारी दिवसेंदिवस विशासुपणे
पार पाडली पाहिजे. येशूने ज्याप्रमाणे परमेश्वर पित्याने सोपविलेलं तारणकार्य आणि
मिशन सर्वस्वीपणे आणि चोखपणे पार पाडले. त्याचप्रमाणे आपले ह्या ऐहिक जगातील जीवन, कार्य आणि मिशन आहे ते प्रेमाने आणि देवाच्या इच्छेप्रमाणे
पार पाडून त्याच्या स्वर्गीय वैभवात आपणास वाटा मिळावा म्हणून ह्या ख्रिस्त-यागात
देवाकडे याचना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे ख्रिस्ता आम्हासाठी देव
पित्याकडे मध्यस्ती कर.
१. आमचे पोप फ्रान्सीस, बिशप्स, सर्व मिशनरी धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांनी येशूच्या
स्वर्गारोहणामुळे नविन चैत्यन्याने आणि आशेने प्रेरित होऊन तसेच पवित्र
आत्म्याच्या सामर्थ्याने प्रोस्ताहीत होऊन जगातील आपले सुवार्ताकार्य आनंदाने पार
पाडण्यास देवाची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.
२. ह्या जगात जिथे अशांतता व अराजकता आहे तसेच जिथे
भ्रष्टाचार फोफावलेला आहे अश्या ठिकाणी, शांतीचा राजपुत्र ख्रिस्ताने राजकीय लोकांचं परिवर्तन करावं
आणि त्यांना जगाच्या कल्याणासाठी प्रेरित करावं म्हणून प्रार्थना करू या.
3. आपल्या समाज्यातील असंख्य बेरोजगार तरुण आणि तरुणी ह्याना
नोकरी मिळावी, जे
भरकटलेले आहेत त्यांना सन्मार्गास लावावे तसेच जे वासना आणि व्यासानांच्या आहारी
गेलेले आहेत अश्यांची सुटका करावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.
४. ह्या मे महिन्यात सर्व ख्रिस्ती भाविकांच्या पवित्र
मरीयेवरील भक्तीला उधान यावं, तिचा योग्य तो मान सन्मान करावा आणि तिचा कित्ता आपल्या
डोळ्यासमोर ठेऊन आपलं ख्रिस्ती जीवन पवित्र, नम्र, आणि शांतीने जगावे आणि आपापले मिशन-कार्य आज्ञाधाराकपणे
तसेच आनंदाने पार पाडण्यास ईश्वरी कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.