Thursday 5 May 2022

Reflection for the Fourth Sunday of Easter (08/05/2022) By: Br. Jeoff Patil.




पुनरुत्थान काळातील चौथा रविवार

दिनांक: ०८/०५/२०२२

पहिले वाचन: प्रेषित. १३: १४, ४३-५२

दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७

शुभवर्तमान: योहान १०:२७-३०

 


विषय: "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात."


 प्रस्तावना:

आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे, “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.”

आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपणास सार्वकालिक जीवनाची आठवण करून देतो आणि सांगतो की, अनेकवेळा आपणास देवाचे वचन ऐकने जमले पाहिजे जेणेकरून आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होऊ. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, स्वर्गात उद्धार पावलेल्या साक्षात्कार राजासनामध्ये ‘मेंढपाळ येईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. तर शुभवर्तमान आपल्याला  येशू ख्रिस्त आपणा सर्वांचा उत्तम मेंढपाळ व आपण त्याची मेंढरे आहोत ह्याची जाणीव करून देत आहे.

प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते बहकले होते. आपले सर्वांचे जीवन कृपेने भरलेले असावे असे प्रभूला वाटते. मात्र आपण त्याला आपल्या जीवनाचा मेंढपाळ म्हणून स्वीकारायला हवे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात मागूया.

 


मनन चिंतन:

ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, एकदा एक अमेरिकन प्रवासी सीरिया देशात प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान एक गोष्ट त्याच्या निदर्शनास आली. त्यांने बघितले की, तीन मेंढपाळ आपले कळप घेऊन त्यांना पाणी पिण्याकरिता तलावावर आले होते. बघता-बघता सर्व मेंढरे एकमेकांमध्ये विखुरली. कोणाची कुठली मेंढरे हे ओळखता येत नव्हते.

अमेरिकन प्रवासी स्वतःच्या मनामध्ये म्हणू लागला, कदाचित मेंढरांना आपला मेंढपाळ कोण हे ओळखता येणार नाही! परंतु तसे काही झाले नाही पहिल्यांदा एक मेंढपाळ बाहेर आला त्याने आपल्या मेंढरांना नावाने हाक मारली व त्याची मेंढरे त्याच्यामागे चालून गेली, तसेच दुसऱ्याने केले आणि तिसऱ्यानेही. कारण, त्या मेंढरांना आपल्या मेंढपाळाचा आवाज ठाऊक होता. म्हणूनच, त्या आवाजाच्या दिशेने ती मेंढरे गेली.

माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो,आज आपण उत्तम मेंढपाळ रविवार साजरा करीत आहोत. ख्रिस्त आपला उत्तम मेंढपाळ आहे. ख्रिस्त आपणास सांगत आहे की, माझ्या मेंढरांना मी ओळखतो, ती माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात.

ख्रिस्त आपला प्रिय आणि उत्तम मेंढपाळ असल्यामुळे त्याला आपल्या विषयीच्या सर्व गोष्टींची जाणीव आहे. आपले दुःख, संकटे, अडचणी, त्रास आणि वेदना ह्या सर्व गोष्टी ख्रिस्ताला ठाऊक आहेत. ख्रिस्त म्हणूनच म्हणतोय "देव पित्याने तुम्हा सर्वांना माझ्याकडे सोपविलेले आहे". उत्तम मेंढपाळ म्हणून ख्रिस्त त्याला दिलेल्या मेंढराची जबाबदारी वाहतो. आपण सर्व त्याला दिलेली मेंढरे म्हणजेच अखिल ख्रिस्तसभा देव पित्याकडून मिळालेली एक महान देणगी किंवा जबाबदारी आहे. आणि ख्रिस्त ती जबाबदारी यथायोग्यपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो किंबहुना ती जबाबदारी त्याने त्याच्या मरणाने पूर्ण केली आहे.

एक उत्तम मेंढपाळ म्हणून ख्रिस्ताकडे त्याच्या मेंढराकरिता एक महत्वाची योजना आहे. ही महत्वाची योजना म्हणजे ख्रिस्त आपणास सार्वकालिक जीवनाची महान देणगी देण्याचे आश्वासन देत आहे. मेंढपाळ म्हणून ख्रिस्त आपणाला हिरव्यागार कुरणांमध्ये नेण्याचे तसेच मंजूळ झऱ्याचे पाणी पाजण्याचे आश्वासन देतो. म्हणजेच ख्रिस्त एक उत्तम मेंढपाळ म्हणून आपला योग्य प्रकारे सांभाळ करतो. आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात तो पुरवितो. मग अशा उत्तम मेंढपाळांच्या मागे जाऊन आपलं जीवन सार्थ करण्यातच आपल्या जीवनाचं सार आहे, हे ख्रिस्ती माणसाला कळलं पाहिजे.

प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य जो ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, ती एक उत्तम मेंढपाळ बनतो. उत्तम मेंढपाळ म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या मेंढरांची काळजी घेणे. आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून आपल्या मेंढराना ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. ज्या वेळेला आपली मेंढरे कळपापासून दूर जातात, बहकली जातात, वाट चुकतात त्यावेळेला उत्तम मेंढपाळ म्हणून त्यांना वाट दाखवणे व मार्गस्थ करणे ही आपली प्रामाणिक जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे पौल आणि बार्नबस त्यांच्या लोकांचे उत्तम मेंढपाळ होऊन त्यांनी त्यांच्या लोकांना मार्ग दाखवला त्याप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनामध्ये मार्ग चुकलेल्या लोकांना मार्ग दाखवावा.

आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या म्हणजे ख्रिस्ताला आपण काय आहोत आणि आपण काय करतो हे सर्व ठाऊक आहे. आपल्या चिंता, दुःख, आपल्या वेदना आणि अडी-अडचणी या सर्व ख्रिस्ताला ठाऊक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्त प्रेम आहे, देव प्रेम आहे. देवाचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे, हे आपल्या जीवनात आपण ओळखलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. आपल्या मेंढरांना आपण ओळखलं पाहिजे आणि आपली वाणी आपल्या मेंढरांनी ओळखली पाहिजे.

शेवटी एक उत्तम मेंढपाळ म्हणून ख्रिस्ताप्रमाणे जगण्यास व त्याच्या प्रमाणे आपल्या जीवनात आचरण करण्यास शिकलं पाहिजे. जर आपण आपल्या जीवनात ख्रिस्त अनुभवला तर तो अनुभव इतरांना एक उत्तम मेंढपाळ म्हणून इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्याकरिता कारणीभूत ठरू शकतो. ख्रिस्त आपणा सर्वांना सार्वकालिक जीवनाचे आश्वासन देत आहे, त्याच पद्धतीने ख्रिस्ताप्रमाणे आपण आपल्या जीवनात जगु आणि वागू, तरच आपण इतरांना ख्रिस्ताचे सार्वकालीक जीवन अनुभववण्यास प्रवृत्त करू शकु. त्याकरिता लागणारी कृपा, शक्ती आणि सामर्थ्य आपणास मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझ्या मेंढरांना तुझे साहाय्य दे.”

१.           ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, महागुरू, धर्मगुरू, धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.           जो ख्रिस्त आपल्या सर्व मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला व जिवंत होऊन सर्वाना नवजीवन दिले तो ख्रिस्त मेंढपाळ आपणाला अधिक पवित्र बनवण्यास धैर्य व शक्ती देवो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.

३.           जी मेंढरे मेंढपाळाची वाणी ऐकत नाही आणि जी माणसे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले आहेत. अशांना परमेश्वराच्या मदतीने सन्मार्गावर चालण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

४.           जी कुटूंबे वेगळी झाली आहेत. जेथे प्रेम, शांती व दया नाही अशा कुटुंबात प्रेम, शांती व दया प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.           हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस. आज आपण इथे एकत्रीत जमलो असताना आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगावे व आपले जीवन कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.           आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment