Thursday 12 May 2022



          Reflection for the
5th Sunday of Easter (15/05/2022) By  Bro. Justin Rithesh Dhavade


पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार

दिनांक: - १५/५/२०२२

पहिले वाचन: - प्रेषितांची कृत्ये १४:२१-२७

दुसरे वाचन: - प्रकटीकरण २१:०१-०५

शुभवर्तमान: - योहान १३:३१-३५


“जशी मीं तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीती करावी”. 



प्रस्तावना

आज देऊळमाता पूनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे आणि आजची उपासना पूनरुत्थित प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संकट, दुःख आणि  छळवनूकीला सामोरे जाऊन परमेश्वरावर भक्कम श्रद्धा ठेवण्यास आवाहन करीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की, संत पौल आणि त्याचे सोबती सुवार्तेसाठी अतोनात छळ सहन करायला तयार होते कारण खरा ख्रिस्ती श्रद्धावंत चार भिंतीच्या आत अडकून पडून राहूच शकत नाही, तर तो पूनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार. तसेच शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त आपणास प्रेमाची आज्ञा देत आहे, कि, तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे. जर तुमचे एकमेकावर प्रेम असेल ह्या वरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.

आजच्या उपासनेमध्ये सहभाग घेत असताना पूनरुत्थित प्रभू येशूख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे, आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये व इतर ठिकाणी प्रेम करण्यास कमी पडलो असेल, तर त्याबद्दल क्षमा मागूया किंवा या जगामध्ये जीवन जगत असताना आपणावर येत असलेले दुःख, छळ किंवा संकट याद्वारे आपण विश्वासामध्ये डगमगत असेल तर ख्रिस्ताने आपणाला विश्वासाच्या दानाने परीपूर्ण करावं, म्हणून पूनरुत्थित प्रभू येशूख्रिस्ताकडे कृपा, शक्ती आणि सामर्थ्य मागूया.

मनन चिंतन

आजच्या शुभवर्तमानात पूनरुत्थित प्रभूयेशूख्रिस्त म्हणतो, “मी तुम्हावर प्रेम केले, तसे तुम्हीही एकमेकावर प्रेम करावे म्हणजे तुम्ही माझे शिष्य व्हाल”. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेमाची आज्ञा दिली  कारण तो स्वतः प्रेम आहे. संत योहन म्हणतो, “ जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे” (१ योहान ४:८).

प्रभू येशू ख्रिस्तानं मानवावर एवढं प्रेम केलं की त्यांने मानवाच्या तारणासाठी स्वतःचा जीव क्रूसावर समर्पण केला. हे सत्य असून काही लोक अजून ख्रिस्ताच्या प्रेमापासून दूर आहेत. तर काहीकांनी त्या ख्रिस्ताच्या प्रेमाला ओळखले नाही.

मी येथे तुम्हाला एक सत्य घटना सांगू इच्छितो. एक ख्रिस्ती कुटुंब होतं आईवडील आणि त्यांची एकुलती एक मुलगी अशा तीन व्यक्तींच कुटुंब होतं आई वडील धार्मिक होते, दररोज मिस्साला जायचे, नित्यनियमाने घरी रोझरीची प्रार्थना करायचे आणि आध्यात्मिक जीवन जगणारे होते. त्यांची मुलगी एका ऑफिसमध्ये काम करीत असताना एका अन्यधर्मीय व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली. त्यांच्या प्रेमाला काही महिने निघून गेले. एक दिवस तिच्या आई-वडिलांना कळालं की आपली मुलगी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. आणि तो मुलगा अन्यधर्मीय आहे. आई वडील धार्मिक होते नीतीच जीवन जगत होते. म्हणून त्यांची इच्छा होती की आपली एकुलती एक मुलगी, तिचे लग्न आपल्या ख्रिस्ती धर्मामध्येच व्हावं. धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने, पवित्र मीस्साबळीमध्ये तिचा लग्न संस्कार व्हावा, ही त्यांची इच्छा होती. म्हणून एक दिवस संधी पाहून तिच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमामध्ये एवढी गुरफटून गेली होती की ती आपल्या आई-वडिलांना म्हणाली की मी स्वःताच्या जीवाला हानी पोहचवणार पण त्या मुलाला सोडणार नाही. मुलीचे हे शब्द ऐकताच त्या आईवडिलांना भरपूर दुःख झालं. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण आपल्या मुलीला घेऊन रिट्रिट सेंटरला प्रार्थनेसभेसाठी जाऊया. ते आपल्या मुलीला घेऊन रिट्रिट सेंटरला गेले. तेथे चार दिवसाची प्रार्थना सभा होती. पहिल्या दिवसापासूनच सर्व लोक त्या रीट्रिट सेंटरमध्ये प्रभू येशूख्रिस्ताची स्तुति आराधना आणि गौरव करत होते. रीट्रिटचा पहिला दिवस निघून गेला. त्या मुलीच प्रार्थनेमध्ये मन लागत नव्हतं कारण तिच मन त्या मुलाकडेच लागलेलं होतं दुसरा दिवस ही निघून गेला. तरीदेखील त्या मुलीचं काहीच परिवर्तन झालं नाही. रीट्रिटच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला धर्मगुरूनी पवित्र साक्रामेंन्त उघडे केले आणि सर्व लोक जिवंत देवाची पूनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुति आराधना करीत असताना, पूनरुत्थित खिस्तानं तिला एक दृष्टांत दिला त्या दृष्टांतात तिने पाहिले कि प्रभू येशू ख्रिस्त मोटार गाडी घेऊन त्या रीट्रिट सेंटरमध्ये आला व तिला स्कूटरवर आपल्यामागे बसवलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरवलं, शॉपिंग सेंटर, मॉल, थिएटर, मार्केट आणि जगामध्ये कोणती सुंदर जागा उरली नसेल अशा सर्व ठिकाणी तिला फिरवलं. ज्वेलरीच्या दुकानांमध्ये जाऊन तिला दागिन्याने सजवलं आणि पुन्हा आणून त्या रीट्रिट सेंटरमध्ये सोडलं. जेव्हा तिने हे सर्व दृश्य बघितलं तेव्हा तिचे डोळे उघडले. ती मोठ्या दुःखाने रडायला लागली. तिने मनामध्ये विचार केला कि मी ज्या मुलावर प्रेम करते त्याने मला कधीच थेटर मध्ये नेऊन पिक्चर दाखवलं नाही. मी ज्या मुलावर प्रेम करते त्याने मला कधीच शॉपिंग करून दिली नाही. मी ज्या मुलावर प्रेम करते त्यांनी माझ्या हातात छोटीशी अंगठी देखील घातली नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तर मला जगाच्या कानाकोपर्यामध्ये फिरवलं मला दागिन्याने सजवलं मग तो ख्रिस्त त्या मुलापेक्षा कितीतरी जास्त पटीने माझ्यावर प्रेम करीत आहे. लगेच तिने आपला निर्णय बदलला ती आपल्या आई-वडिलांना म्हणाली कि तुम्ही म्हणणार त्याच मुला बरोबर मी माझं लग्न करणार. काही काळानंतर एक ख्रिस्ती व्यक्ती बरोबर तिचं लग्न झालं आणि पुढचा आयुष्य तिने सुखामध्ये व आनंदामध्ये घालवलं.

पूनरुत्थित प्रभू येशूख्रिस्त प्रेम आहे आणि तेच प्रेम तो आपणा प्रत्येक मानवावर करित आहे. पण कधी कधी आपण त्याच्या प्रेमाला ओळखत नाही. आपण आपणाला वाटतो तोच मार्ग पकडतो आणि नाशाकडे वळतो व आपल्या जिवाचा नाश करून घेतो. आज आपण ख्रिस्ताच्या प्रेमाला ओळखू .या आपण ख्रिस्ताच्या प्रेमापासून कुठेतरी दूर गेलो असेल तर आज आपण क्षमा मागूया आणि प्रभू येशूने अपणा प्रत्येकाला परमेश्वरावर, आपल्या कुटुंबावर व शेजाऱ्यावर खरं प्रेम करण्यासाठी कृपा शक्ती आणि सामर्थ्य द्यावं, म्हणून पूनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, एकमेकांवर प्रेम करण्यास आम्हाला शिकव.

१. आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे व कार्याद्वारे प्रभूचा अनुभव प्रत्येक भाविकापर्यंत पोहचवावा व सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

२. जे निराश होऊन देवापासूनदूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून यावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखविलेल्या मार्गावर चालावे आणि जीवनाचे सार्थक करावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

३. आपणा प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. प्रेम ही काळाची गरज आहे. म्हणून आपली प्रीती सर्वांचे हित साधणारी असावी. त्यात स्वार्थ व दुजाभाव नसावा. सर्वाबरोबर समेट, शांती व सलोखा असावा म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या सर्व मिशनरी बंधू-भगिनींना त्यांचे कार्य जोमाने सुरु ठेवून प्रभूची सुवार्ता जगाच्या काना कोपऱ्यात पसरविण्यास सामर्थ्य व कृपा लाभावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी ठेवूया.

 

No comments:

Post a Comment