Thursday, 7 July 2022

Reflection for the homily of 15th Sunday in Ordinary  Time (10/07/2022) By Br. Brian V.  Motheghar

   

                                                            





सामान्य काळातील पंधरावा रविवार





दिनांक :  १०/०७/२०२२

पहिले वाचन: अनुवाद ३०:१०-१४

दुसरे वाचन:  कलस्सेकरांस पत्र १:१५-२०

शुभवर्तमान:  लुक १०:२५-३७


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना जात-पात, धर्म व मतभेद विसरून खऱ्या अंत:करणाने शेजाऱ्यावर प्रीती करण्यास आमंत्रित करत असून, शाश्वत जीवनप्राप्ती करून घेण्यासाठी बोलावीत आहे.

अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, मोशे लोकांना परमेश्वराने दिलेल्या आज्ञांची आठवण करून देतो आणि आज्ञेशी प्रामाणिक राहण्यासाठी आवाहन करत आहे. संत पौल कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश देवाचे सदृश रूप आहे. तो उत्पत्तीपासून महान आणि सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानामध्ये ‘चांगल्या शमरोनीच्या’ दाखल्याद्वारे शाश्वत जीवनाची पूर्तता, प्रेम व बंधुत्वामुळे होते असे समजून येते. कारण प्रेमामुळे आपुलकी निर्माण होते व निस्वार्थी प्रेमापोटी केलेल्या कार्याला चांगले फळ लाभते.

ह्या पवित्र मिसाबलिदानात सहभागी होत असताना आपण सुद्धा एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करून व बंधुप्रितीचे नाते निर्माण करून शाश्वत जीवनात सहभागी होण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असावे म्हणून प्रभूचे कृपासामर्थ्य मागुया.

 

मनन-चिंतन:

शाश्वत जीवनप्राप्ती मिळविण्यासाठी येशूने शास्त्राला नियमशास्त्र पालन करावयास सांगितले, आणि नियमशास्त्र हे परमेश्वरावर व शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने व बुद्धीने प्रीती करण्यास सुचविते (अनुवाद ६:४-७). प्रभू येशू आपल्याला चांगला व्यक्ती होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास सांगतो. परंतु शास्त्र्याने विचारले “माझा शेजारी कोण”? तेव्हा येशू ख्रिस्त चांगल्या शोमरोनीचा द्रूष्टांत देऊन स्पष्ट करतो.

वेबस्टर शब्द्कोशाप्रमाणे ‘शेजारी’ म्हणजे जो आपल्या जवळ आहे तो व्यक्ती होय. हिंदू, मुस्लीम, आणि बौद्ध यासारख्या  प्रत्येक धर्मामध्ये शेजाऱ्यावर प्रेम करण्यास वेगवेगळ्या रीतीने सुचवण्यात आले आहे. येशुसाठी जो व्यक्ती गरजेमध्ये आहे तो शेजारी होय’ मग तो श्रीमंत किंवा गरीब असो, काळा किंवा गोरा असो, ह्यामध्ये रंग, धर्म, जात-पात ह्यावरून शेजारी निवडता येत नाही.

आपल्या समाज्यात व शेजाऱ्यात अनेक व्यक्ती नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, अन्याय यासारख्या घटनेला बळी पडतात. पुष्कळ व्यक्ती आजार, गरिबी, वृद्धत्व, हिंसा ह्यामुळे दु:ख सोसत आहेत. ह्या सर्व व्यक्ती आपल्याकडून काही मदतीची अपेक्षा करत असतात. त्यांना कधी-कधी पैशाची, अन्नाची किंवा वस्तूंची गरज असते. तसेच काही वेळा त्यांना सल्ला, हास्य, आलिंगन किंवा आपला काही वेळ ह्याची गरज असते. जर आपण बाप्तिस्मा स्विकारलेले ख्रिस्ती व्यक्ती आहोत तर त्यांना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

आज आपल्यासमोर ‘चांगल्या शोमरोण्याचा’ आदर्श आहे. त्याने जखमी व्यक्तीच्या जखमा बांधल्या व त्याची काळजी घेण्यासाठी खर्चाला पैसे  हि दिले. अँन लॅडर म्हणतात की “सर्वांशी दयाळूपणाने वागा. कारण जगाला दयेची खूप गरज आहे.” तसेच मार्क टाईन म्हणतात कि, “करुणेची भाषा हि बहिरे ऐकू शकतात व आंधळे वाचू शकतात.”

शास्त्री परुषांस येशूने शेवटी म्हंटले की, त्या शोमरोनी प्रमाणे ‘जा आणि तूही तसेच कर’ आणि ही येशूची आज्ञा आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. ही आज्ञा परिपूर्णपणे जीवनात उतरवलेली व्यक्ती म्हणजे मदर तेरेसा. तिचा शिक्षकी पैसा असल्यामुळे ती शिकवण्यात मग्न होती; परंतु एक दिवस कलकत्त्याच्या रस्त्यावर जेव्हा ती एक अर्धमेलेली स्त्री पाहते त्या दिवसापासून ती आजाऱ्या व समाज्यातील नाकारलेल्या व्यक्तींची काळजी व सेवा करण्याचा निर्णय घेते. ती संपूर्ण मनाने व जीवाने अश्या व्यक्तींची शेवटपर्यंत सेवा करते व तिचे अनुयायी आज पर्यंत तसे काम करत आहेत.

चांगल्या शोमरोनाच्या ह्या दाखल्याद्वारे प्रभू येशू आपल्याला शेजाऱ्यावर व आपल्या शत्रूवर प्रेम व दया करण्यास प्रेरणा देत आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : ‘हे प्रभू आम्हांला प्रेम करण्यास प्रेरणा दे’.


१.    ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणारे आपले पोप, बिशप्स धर्मगुरू व धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाचे कार्य करण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    आपल्या समाजातील व शेजोळातील सर्व लोकांनी एकमेकांवर प्रेम करावे व चांगले आनंदी जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    ह्या वर्षी संपूर्ण भारत देशात योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी व सर्वत्र हिरवळ पसरून देशाचा विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    संपूर्ण जगभरात ज्या लोकांवर अन्याय व अत्याचार होत आहे त्यांना प्रभूची शांती व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरजा साठी म्हणून आपण प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment