Thursday, 30 March 2023

 



Reflections for the homily of the Palm Sunday in the Holy Season of Lent (02/04/2023) by Br. Jordan Dinis.




झावळ्यांचा रविवार


दिनांक: ०२/०४/२०२३

पहिले वाचन: यशया ५०:४-७

दुसरे वाचन: फिलिपिकरांस पत्र २:६-११

शुभवर्तमान: मत्तय २६:१४-२७:६६




प्रस्तावना:

आज देऊळमाता झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. आज आपण येशूचे येरुशलेमात मोठ्या जल्लोषात झालेल्या पदार्पणाची आठवण करतो. येशू हा दाविद पुत्र, परमेश्वराच्या नावाने आला होता, म्हणून त्याच्या स्वागतास सर्व येरुशलेमवासी झावळ्या घेऊन त्याच्या वाटेवर आले. झावळ्या उंचावून, वाटेवर कपडे टाकून व फुले उधळून होसान्नाच्या तालात जल्लोष करीत त्यांनी येशूचे आपल्या शहरात स्वागत केले. परमेश्वराच्या नावाने येणारा ख्रिस्त किंवा मसीहा आज आपल्यामध्ये आला आहे, म्हणून ते त्याला शरण गेले.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, आपल्या निवडलेल्या लोकांना, आध्यात्मिक व नैतिक मार्गदर्शन करून, त्यांना आपल्या करारात एकत्र ठेवण्यासाठी, देवाने संदेष्ट्यांची निवड केली. हा परमेश्वराचा संदेश त्याने न घाबरता दिला. त्यांनी सत्याची बाजू घेत इस्राएली लोकांचा सांभाळ केला.

दुसऱ्या वाचनात संत पौल  फिलिपीकरास लिहिलेल्या पत्रात आपणास ख्रिस्ताच्या नम्रपणाविषयी सांगत आहे. त्याने स्वतःचे दैवीपण सोडून, स्वतःला रिक्त केले आणि तो सेवक झाला व क्रुसावर मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. आजच्या शुभवर्तमानात आपल्याला येशूच्या दु:ख सहना सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे. आपण पवित्र आठवड्याची सुरवात करीत असताना, आपण प्रभूच्या प्रेमाचा आदर्श आपल्या शब्दातून आणि कृतीतून इतरांना देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून या त्याच्या प्रेमाखातर कोणताही क्रू वाहण्यास व त्याची सुवार्ता जगजाहिर करण्यास आपण तत्पर असू.


बोध कथा:

एक कुंभार होता. त्याच्याजवळ दोन मके होते. एका लांब काठीला बांधून तो त्या दोन्ही मडक्यांमध्ये तलावावरून पाणी भरून आणत असे. त्याच्यातले एक चांगले होते, तर दुसऱ्याक्याला एक छिद्र पडलेला होता. तो कुंभार ती दोन्ही मकी भरून तलावातून पाणी आणत असे. घरी पोहोचेपर्यंत एक मके भरलेले तर दुसरे रिकामे असायचे. काही दिवसाने त्या छिद्रे असलेल्या मटक्याने धन्याला विचारले, मी तर निरुपयोगी आहे. तुम्ही माझा उपयोग का करता? तुम्ही माझ्या पाणी साठवून ठेवू शकत नाही. माझ्या मध्ये तुम्ही पाणी वाहू शकत नाही कारण मी त्यासाठी असमर्थ आहे. त्यापेक्षा मला फेकून का देत नाही? तुम्ही च़ांगले कुंभार आहात. चांगली मकी घडवू शकता. त्यावर कुंभार उद्गारला, मी तुझा वापर दर दिवशी करतो. मला माहित आहे कि, मी तुझ्यात पाणी साठवून ठेवू शकत नाही. तुला पडलेल्या छिद्रातून तुझ्यात भरलेले पाणी वाटेतच सरते. ह्याची मला जाणीव आधीच होती म्हणून, ज्या वाटेवरून मी तुला आणत होतो त्या वाटेवर मी फुलझाडांचे बी पेरले होते. आज बघ ज्या बाजूच्या वाटेवर मी तुला घेऊन जातो त्या वाटेवर सुंदर अशी फुले उमललेली आहेत, तर दुसऱ्या बाजूला काहीच नाही. मी तुझा वापर ती फुलझाडे शिंपण्यासाठी केला, म्हणूनच आज सुंदर अशी फुले त्या वाटेवर उमललेली आहेत. जरी आपण स्वतःच्या नजरेत निरूपयोगी असलो तरीसुद्धा परमेश्वर आपला उपयोग त्याचे कार्य पूर्ण करावयास करतो. तो आपणास फेकून देत नाही तर आपणास तो सुंदर आणि परिपूर्ण असे बनवत असतो.


मनन चिंतन:

आज आपण झावळ्यांचा रविवार किंवा प्रभू येशूचा दु:ख साहनाचा रविवार साजरा करत आहोत. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे, आजपासून आपण पवित्र आठवड्यात पदार्पण करत आहोत. याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे जल्लोषमय वातावरणात येरुशलेमात झालेले येशूचे पदार्पण आणि त्याज तीव्रतेने त्याचा झालेला धिक्कार या दोन गोष्टीवर मनन चिंतन करणे गरजेचे आहे.

आज आपण झावळ्या उचलून येशू हा दावित पुत्र आहे आणि प्रभुच्या नावाने जो येणार होता तोच ख्रिस्त आहे याची घोषणा करतो. हे आपले शब्द नव्हेत, तर येशूने जेव्हा येरुशलेएत प्रवेश केला तेव्हा यहुद्यानी उद्गारलेले हे जल्लोषमय शब्द आहेत. त्या शब्दांचा आज आपण पुनरुच्चार करतो. ह्या प्रसंगावर जर आपण प्रकाश टाकला तर आपल्याला कळून चुकेल की, येशूला येरुशलेमेतून जेव्हा बाहेर काढण्यात आले होते, तदनंतर पहिल्यांदाच येशू येरुशलेमेत पाऊल टाकत आहे. त्याला ठाऊक होते की, हा त्याचा अखेरचा प्रवास असणार आहे. येशु पूर्वेकडील प्रवेशद्वाराने येरुशलेमेत प्रवेश करत आहे. पूर्व दिशा ही महत्त्वाची आहे, कारण यहेज्केल संदेष्ट्याच्या भविष्यवाणी अनुसार मसीहा हा पूर्वीकडून येणार आहे. ह्याच आशेने सर्व येहुदी व संदेष्टे पूर्वेकडे पूर्वेकडील प्रवेशद्वाराशी मसीहाच्या स्वागतासाठी उभे होते. प्रभू येशूला ठाऊक होते की, जे लोक माझी वाहवाह करता, होसान्ना गातात तेच लोक त्याला मारण्याचा कट रचना आहेत. प्रभू येशूला सर्व काही जाणीव असूनसुद्धा, तो त्याच्या मनातले दुःख लपून लोकांच्या जल्लोषात सहभागी होतो, कारण त्याला आपणावर असलेले त्याचे प्रेम दर्शवायचे होते. जरी आपण पाप केलें तरी तो आपल्याला वाईट टाकत नाही. तो आपल्या पाठीशी सदाकाळ असतो. प्रभू येशू हा राज्यांचा राजा आहे, तरी पण जेरुसलेमात तो गाढवावर बसून प्रवेश करतो.

आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त घोड्यावर किंवा उंटावर बसून येत नाही, तर एका गाढवाच्या पिल्लावर बसून येत आहे. गाढवाप्रती आपण नकारात्मक हावभाव दर्शवितो. समाजाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर गाढव हा प्राणी अपात्र व निरुपयोगी मानला जातो. गाढवाच्या अंगाला देखील हात लावण्यास किंवा त्याच्या बाजूला उभे राहण्यास आपण टाळाटाळी करत असतो. आशाच नको असलेल्या गाढवावर आज येशु ख्रिस्त स्वार होत आहे. येशूने गाढवाचा वापर का केला असावा? हा प्रश्न आपल्याला प्रत्येकाच्या मनाला बोचत असणारच. येशू ख्रिस्त गाढवाच्या वापराद्वारे आपणास संदेश देऊ इच्छितो की, मी सज्जनास नव्हे तर पापी लोकांच्या तारणासाठी या धर्तीवर आलो आहे. ज्यांना समाजाने तुच्छ, अशिक्षित, कमजोर, भिकारी, गरीब मानले आहे अश्या समाजामध्ये नको असलेल्या लोकांसाठी येशू ख्रिस्त या धर्तीवर आला होता. पवित्र मरिया स्वतःला प्रभूची दासी म्हणून संबोधित आहे. योहान बाप्तिस्ता स्वतःला येशू ख्रिस्तापेक्षा कमी लेखतो. मदर तेरेजा स्वतःला देवाच्या हातातील खडू, संत फ्रान्सिस असिसीकर स्वतःला देवाचें शांतीचे साधन म्हणून संबोधितो व संत पौल देखील स्वतःला ख्रिस्तामध्ये वेडा म्हणून जाहीर करत आहे. या वरून आपणाला समजते की,  बोधकथेमध्ये दर्शविल्याप्रमाणे, देवाने त्याच्या तारण कार्यासाठी श्रीमंत, बुध्दीवान, सुशिक्षित किंवा ज्ञानी लोकांची निवड केली नाही, तर जे स्वतःला कमजोर, नम्र, तुच्छ मानत असत त्याची त्याने निवड केली. आज येशूला आपणाकडून पैशाची गरज नाही, आपला अहंकार, मीपणाचीही गरज नाही तर, येशूला आपल्यामधील त्या गाढवाची गरज आहे, त्या साधेपणाची, त्या आज्ञाधारकपणाची, त्या एकनिष्ठतेची गरज आहे. बोधकथेत नमूद केल्याप्रमाणे या आपल्या उणिवांचा वापर परमेश्वर त्याच्या कार्यासाठी करणारा आहे व संतांसारखे आपलेही जीवन सुंदर व परिपूर्ण बनवणार आहे. ख्रिस्तामध्ये आपणाला नवीन बनवण्याची शक्ती व सामर्थ्य आहे, पण आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया की, आपण प्रभूला आपले जीवन अर्पण करण्यास तयार आहोत काय?


श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद: ‘हे दयावंत पिता आमची प्रार्थना ऐकून घे.’

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारेपोप महाशयबिशप्सकार्डीनल्ससर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेतह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.    

२. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येश्याच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.

४. जे लोक दुःखीकष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


Friday, 24 March 2023

 



Reflections for the homily of the Fifth Sunday in the Holy Season of Lent (26/03/2023) by Br. Jostin Pereira.



प्रायश्चित काळातील पाचवा रविवार

दिनांक: २६/०३/२०२३

पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र :-११.

शुभवर्तमान: योहान ११:-४५.


विषय: पुनरुत्थान  जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल” (योहान ११: २५).



प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित काळाततील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. येशू ख्रिस्त म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. त्याच्या शब्दांवर आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्याने हे विश्वासाचे रहस्य आपल्यासाठी उलगडून ठेवले आहे. येशूने मृत लाजरस भोवती गुंडाळलेली मृत्युरूपी वस्त्रे सोडून त्याला मुक्ती दिली. त्याच प्रकारे आमच्या जे काही विचार व ज्या पापवृत्ती आम्हाला परमेश्वराकडे जाण्यास अडखळे निर्माण करतात, त्या गोष्टीपासून आपली सुटका व्हावी, आपणास प्रभुमध्ये पुनरुत्थान व नवजीवनाचा अनुभव यावा, आपण नवनिर्मिती बनावे म्हणून या मिसाबलिदान आज परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

आजचा रविवार आपणास पवित्र आठवड्याचा जवळून अनुभव घेण्यास आव्हान करीत आहे. आजची उपासना, पुनरुत्थान व जीवन या ख्रिस्ती जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर भर देत आहे. जीवन, मृत्यु आणि पुनरुत्थान हे एक रहस्य आहे. आपण सर्वजण या जगात जन्म घेत असतो. आपल्या सर्वांना देवाने जीवनाचे वरदान बहाल केले आहे. काही दिवसानी आपणही हे जग सोडून जाणार आहोत. परंतु हे जग सोडून आपण कुठे जातो हे महत्त्वाचे आहे.

आज प्रभू परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे कि, पुनरुत्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल (योहान ११: २५). आपण देवाकडून आलो आहोत आणि आपल्याला देवाकडे परत जायचे आहे. देवाच्या योजनेप्रमाणे आपण या जगात येत असतो आणि त्याच्याच योजनेप्रमाणे आपण हे जग सोडून जात असतो. पण आपण, आपले जीवन कसे जगतो हे महत्त्वाचे आहे. स्वर्गात जावे हे सर्वांचे स्वप्न आहे. पण प्रश्न उभा राहतो आपण स्वर्गात कसे जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वर्गात जाण्याची तयारी आम्ही सर्वांनी केली पाहिजे. यासाठी आजच्या उपासनेत आपल्याला जीवन, मरण आणि पुनरुत्थान यांवर मनन-चिंतन करण्यास ख्रिस्तसभा आपणास बोलावित आहे.

आजच्या पहिल्या वाचनात येहेज्केल संदेष्टा बाबिलोनच्या हद्दपारी खितपत पडलेल्या इस्रायली लोकांमध्ये नवजीवनाची आशा उत्पन्न करतो. तो म्हणतो, “परमेश्वर त्यांची थडगी उघडून त्यांना नवजीवन देईल.  दुसऱ्या वाचना संत पौल रोमकरास आवाहन करतो कि, केवळ शारीरिक पातळीवर जीवन न जगता त्यांनी आध्यात्मिक नवजीवनाची वाट स्वीकारावी. आजच्या शुभवर्तमानात चार टप्प्यामध्ये हा प्रवास सादर करण्यात आलेला आहे.

१. देवाच्या गौरवासाठी दुःख

लाजरसच्या मृत्युमुळे दु:खी झालेल्या बहिणींचे सांत्वन करण्यासाठी येशू बेथानी येथे जातो. त्याच्या थडग्याजवळ येशूने सांडलेले अश्रू दुखी बहिणीना दिलासा देणारे होते.

२. मी पुनरुत्थान आहे

प्रभुजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. या शब्दात मार्था व मारिया यांची ईश्वरावरील गाढ श्रद्धा दिसून येते. येशू त्यांना सांगतो की, लाजरस फक्त शेवटच्या दिवशी नव्हे तर आता पुन्हा उठवला जाणार आहे. हे येशूचे आत्मप्रकटीकरण करणारे शब्द आहेत: पुनरुत्थान व जीवन मीच आहे.

३. विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील

धोंडा बाजूला सारा, ह्या येशूच्या आदेशामुळे उपस्थितांमध्ये क्षणभर चुळबूळ उडाली. लाजरसच्या बहिणींना भावनावेग आवरेनासा झाला. येशु मात्र लाजरसला अंधारातून प्रकाशाकडे, मरणातून जीवनाकडे आणि बंधनातून मुक्तीकडे घेऊन जाण्याच्या हेतूने त्याला साद घालतो. लाजरस बाहेर ये.

४. येशूच्या नवजीवनाचा अनुभव

मेलेला लाजरस जीवंत होतो. प्रभू येशू त्याला जीवन देतो. येशू आपल्यालासुद्धा नवीन जीवन देण्यासाठी आलेला आहे. पुनरुत्थानाचे जीवन, हे अनंतकाळचे जीवन आपल्या सर्वांना येशू देण्यासाठी आलेला आहे. पुनरुत्थान फक्त शारीरिक मृत्यूनंतर नसून तर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीत अनुभवण्यास आजची उपासना आपणास सांगते. आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा कि, माझ्या जीवनातील कोणकोणत्या गोष्टी मला मृत्यूकडे घेऊन जात आहेत? व कोणकोणत्या गोष्टी मला नावाजीवनाकडे घेऊन जाणार आहेत व त्यासाठी मी काय केले पाहिजे? मरणाचा अनुभव आणणाऱ्या गोष्टी म्हणजे दु:, ताटातूट, बेरोजगारी, आजार व आपणावर होणारे अत्याचार इत्यादी आहेत. ह्या सर्व संकटांवर ख्रिस्ताच्या सहायाने आपण जेव्हा मात करतो, तो खरा पुनरुत्थानाचा अनुभव होय.

 आपल्या सर्वांसाठी येशू ख्रिस्त या जगात आला आणि आपल्या पापांकरीता तो क्रुसावर मरण पावला. हा प्रायश्चितकाळ अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी आपले सर्वस्व देवाला अर्पण करूया  पापी जीवनाचा त्याग करून, प्रभू येशू ख्रिस्ताचा दु:ख सहन आणि पुनरुत्थानाचा सोहळा पाहण्यासाठी आपण तयार असूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

पवित्र ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सिससर्व बिशप्सधर्मगुरू व्रतस्थ जे येशूच्या मळ्यात कार्य करत असताना त्यांनी श्रद्धावंतांची पुनरुत्थानावरील श्रद्धा बळकट करण्यासाठी सतत कार्यरत राहण्यास पवित्र  आत्म्याची कृपा त्यास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

सरकारी पुढाऱ्यांनी जनतेच्या फायद्यासाठी कार्य करण्यास व शांतीचेनीतीचेएकोप्याचे राज्य बांधण्यासाठी  झटण्यास लागणारी कृपा त्यांस मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

जे कोणी देवापासून दुरावलेले आहेतत्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा  त्यांनी देवाच्या   प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

. जेव्हा-जेव्हा आपल्या जीवनात कष्ट, दु: येते आणि आपले सर्व प्रयत्न व्यर्थ होतात, सर्व आशा-निराशा होताततेव्हा प्रभूवरील विश्वास आणि श्रद्धा भक्कम करण्यासाठी त्याच्या योजनेला प्राधान्य देण्यास  लागणारी कृपा आपण परमेश्वराजवळ मागुया.

आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक  व्ययक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.