Wednesday, 1 March 2023

 



Reflections for the homily of the Second Sunday in the Season of Lent (05/03/2023) by Fr. Benjamin Alphonso.




प्रायश्चित काळातील दुसरा रविवार

दिनांक: ०५/०३/२०२३

पहिले वाचन: उत्पती १२:१-४

दुसरे वाचन:  तीमथी १:८-१०

शुभवर्तमान: मत्तय १७:१-९





प्रस्तावना:

आज आपण उपवासकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आज आपण प्रभू येशूच्या रूपांतराविषयी ऐकत आहोत. आजची उपासना येशूचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी आमंत्रित करीत आहे. पहिल्या वाचनात आपण ऐकणार आहोत की, आब्राहाम देवाच्या हाकेला प्रतिसाद देतो देवाने सांगितल्याप्रमाणे करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल तीमतीला देवाची सुवार्ता पसरवण्याचे कार्य अखंड चालू ठेवण्यासाठी बोध करत आहे. तर प्रभू येशूचे रूपांतरद्वारे शिष्यांना प्रभू येशूचे गौरवमय प्रकाशाचे दर्शन होते, याबाबत आजच्या शुभवर्तामानात आपण ऐकतो. देवाचें पाचारणही आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर अवलंबून नव्हे तर ते देवाच्या कृपेवर अवलंबून असते. अब्राहामाची देवावरची अढळ श्रद्धा व संत पौलाची सुवार्ताप्रसाराची जिध्द आपल्यात निर्माण व्हावी म्हणून ह्या मिसाबलिदान आपण प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

प्रभू येशू ख्रिस्त या जगाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी आले होते. जो कोणी प्रभू येशूचा स्वीकार करतो व ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे त्या सर्वांचे आध्य कर्तव्य आहे कि प्रत्येकाने येशूची सुवार्ता पसरविली पाहिजे. आजची तीनही वाचने आपणा सर्वांना येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी व इतरांचा विश्वास दृढ करण्यास पाचारण करीत आहे. आपणा सर्वांचा विश्वास बळकट व्हावा आपल्या जीवनाद्वारे आपणही इतरांना ख्रिस्ती विश्वासात वाढवण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. आपणा सर्वांचा विश्वास हा छोट्या झुडपासारखा नव्हे तर मोठ्या वृक्षासारखा हवा, जेणेकरून कितीही पाऊस किंवा वादळ आले तर वृक्ष पडणार नाही कारण विश्वासात वाढत असतांना आपल्याला भरपूर संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकतो की अब्राहामाच्या सुद्धा विश्वासाची परीक्षा घ्यावी लागली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले, म्हणून आपण त्यांना विश्वासाचा पिता म्हणून संबोधितो.

आजच्या शुभवर्तामानात आपण येशूच्या रूपांतराविषयी ऐकतो. येशूने आपल्या बरोबर त्याचे जवळचे तीन शिष्यांना एकत्र घेऊन तो डोंगरावर गेला. ते शिष्य पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान होता. येशू जेव्हा कुठेहि जायचे तेव्हा हे तीन शिष्य येशू बरोबर असायचे. जेव्हा येशूने त्यांना डोंगरावर एकांत जागी नेले तेव्हा काय झाले आपल्याला ठाऊक आहे. येशूची वस्त्रे शुद्ध झाली. मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि मोशे व एलिया त्याच्याशी संभाषण करीत त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी येशूला विनंती केली की आपण येथे तीन मंडप उभारू व येथेच राहू. तसेच आकाशवाणी सुद्धा झाली कि हा माझा परम प्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका.

जेव्हा आपल्याला देवाचा अनुभव येतो किंवा देवाचा साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला वाटतं की, आपण जिथे देवाच्या सहवासात आहोत तेथेच राहाव. आपल्याला वाटत नाही की, हे क्षण दुसऱ्यांनाही लाभावेत किंवा याची दुसऱ्यांनाही जाणीव व्हावी. परंतु येशू ख्रिस्त आपणा प्रत्येकाला सांगत आहे कि, जो अनुभव तुम्ही घेतला आहे, त्या विश्वासा तुम्ही इतरांनाही घेऊन जा व दुसऱ्यांनाही त्याचा अनुभव घेऊ द्या.

सियोनाची संत कॅथरीन ह्यांना एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टान्त दिला, त्यावेळेला प्रभू येशूने संत कॅथरीनला विचारले माझ्या मुली जर मी प्रकाशाची ज्योत घेऊन तुझ्याकडे आलो आणि तू मेणबत्ती घेऊन आली तर तुला प्रकाश कसा मिळेल. तेव्हा संत कॅथरीने उत्तर दिले जर मी छोटी मेणबत्ती घेऊन आली तर मला कमी प्रकाश व ऊर्जा मिळेल, पण जर का मी मोठी मेणबत्ती घेऊन आली तर मला जास्त प्रकाश व शक्ती मिळेल. प्रभू येशू संत कॅथरीनला म्हणाला माझे प्रेम अगदी तसेच आहे. मी नेहमी प्रेम देतो व प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे, कार्याप्रमाणे प्रेम मिळते.

प्रभु ख्रिस्ताच्या प्रेमाच्या आमंत्रणाला उत्तर देऊन अनेक तरुण-तरुणींनी आपले घरदार सोडले आहे. कितीतरी धर्मगुरु, धर्मभगिनी व धर्मबंधू प्रभूच्या मळ्यात कार्य करत आहे. देवाची सुवार्ता मोठ्या आनंदाने, विश्वासाने पसरवित आहेत. देवाच्या वचनांवर विश्वास ठेवून ब्राहामासारखे सर्व काही सोडून प्रभूच्या मळ्यात कार्य करत आहेत. काही वेळा त्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागते परंतु ते देवावरचा विश्वास सोडत नाहीत कारण आब्राहामासारखा त्याचा विश्वास मजबूत आहे.

आपणही आपल्याला दिलेल्या पाचरणास प्रतिसाद दिलेला आहे व आपापल्या परीने शुभवर्तमान पसरवित आहोत. परंतु ह्या उपवास काळात आजची उपासना पुन्हा एकदा आठवण करून देत आहे कि, जो विश्वास आपल्याला मिळालेला आहे तो आपणापर्यंत न राहता तो आपण दुसऱ्यांनाही दिला पाहिजे. आपापल्या परीने देवाची सुवार्ता इतरापर्यंत पोहोचवावी म्हणून देव आपणास बोलावित आहे. हे देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारी कृपा ह्या पवित्र मिस्साबालीदानात मागुया.


श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे दयाळू प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपण आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरु, धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मबंधू यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया की, प्रभू परमेश्वराची सुवार्ता प्रचाराचे कार्य त्यांनी आनंदाने व धैर्याने करावे व त्यांचा विश्वास नेहमी मजबूत राहावा म्हणून प्रार्थना करूया.

२. आपण सर्व ख्रिस्ती लोकांसाठी विशेष प्रार्थना करूया, त्यांचा विश्वास मजबूत व्हावा व धैर्याने, आनंदाने येशूची सुवार्ता त्यांनी सर्वत्र पसरवावी म्हणून त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया.

३. आपण सर्वांनी ऐहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व येशूप्रमाणे आपलेही रूपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपण जे आजारी आहेत, जें दु:खी आहेत, अडचणीत आहेत यांसाठी प्रार्थना करूया, प्रभू येशूने त्यांना स्पर्श करून त्यांना बरे करावे व त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून विशेष प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment