Reflections for the homily of the Third Sunday in the Season of Lent (12/03/2023) by Br. Trimbak Pardhi.
प्रायश्चित काळातील तिसरा रविवार
दिनांक: १२/०३/२०२३
पहिले वाचन: निर्गम १७:३-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८
शुभवर्तमान: योहान ४:५-४२
प्रस्तावना:
आज आपण उपवासकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना
आपल्याला जीवंत पाण्याविषयी सांगत आहे.
आजच्या पहिल्या वाचनामध्ये मोशे परमेश्वराच्या वचनानुसार खडकातून
पाणी काढून इस्रायली लोकांची तहान भागवित आहे. तर दुसऱ्या वाचनात
संत पौल म्हणतो की, “आपण विश्वासामुळे नीतिमान ठरलेलो आहोत.
येशू ख्रिस्ताद्वारे आपणाला शांती मिळालेली आहे. आणि पवित्र आत्मयाद्वारे आपल्या
अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.”
आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त शमरोनी स्त्री
यांच्यामधील एक अर्थपूर्ण असा संवाद प्रस्तुत करत आहे. येशू एक शमरोनी स्त्रीला जीवंत
पाण्याविषयी सांगत आहे. येशू ज्या पाण्याचा उल्लेख करतो तो जीवंत पाणी
म्हणजे देवाचा शब्द होय. देवाचा शब्द ऐकून आत्मिक तहान
भागविण्यासाठी आज प्रभू ख्रिस्त आपणास बोलावित आहे.
ख्रिस्ताची आत्मिक तहान पुन्हापुन्हा रिकामी होत नाही तर ती जीवनाचा वाहता झरा
आहे. हा झरा जीवंत आहे आणि त्याचे पाणी सतत खळखळत असतो. त्याचे पोषण स्वर्गातून होत असते. अंतरंगातील/अंत:कर्णातील हा जीवंत झरा कधीच मरणार नाही, कारण येशू ख्रिस्ताच्या नदीशी तो जोडलेला आहे.
बोध कथा:
एका अत्यंत धार्मिक अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा बुद्धीने
अत्यंत तल्लख होता. सर्वच परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी
उत्तीर्ण होत असे. तो पुढे एक मोठा सरकारी अधिकारी बनला. त्याच्या ऑफिसमधील जवळजवळ सर्वच अधिकारी लाच घेणारे होते.
त्यामुळे या प्रामाणिक माणसाची त्यांना अडचण वाटू लागली. त्यांनी चक्रे फिरवली व त्याची बदली
अतिशय गरीब व दुर्गम अशा खेड्यात करून घेतली. देवाचीच ही इच्छा असे मानून काही
कुरकुर न करता तो तेथे जाण्यास राजी झाला. तिथे गेल्यावर त्याने त्या प्रदेशाची पाहणी केली. गाव
अतिशय गरीब होता. गावामध्ये काहीच सुधारणा झालेली नव्हती.
त्या प्रामाणिक माणसाने त्या गावाचे मागे राहण्याचे/ प्रगती न झाल्याचे कारण शोधून काढले. त्याला आढळले की, तेथे एक धरण होते.
त्याला कालवेही (canal) काढलेले होते, पण त्यांना भगदाडे
पाहून धरणातून कालव्यात सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते. ते वाटेतच झिरपून जात होते. त्याचे कालवे सुधारण्यास सरकारकडे निधी मागितला, पण तेथे त्याची दाद कोण घईना.
शेवटी देवावर भरवसा ठेवून त्याने एक युक्ती लढवली. जवळ
असलेल्या तुटपुंज निधीत स्वतःच्या पगारातील काही रक्कम घालून त्याने कालव्यात
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जाड प्लास्टिकचा कपडा अंथरला. खुद्द त्याच्या
हाताखालच्या अधिकार्यांनी त्याला वेड्यात काढले. शेवटी काम पूर्ण होऊन पाणी सोडण्यात आले आणि
काय आश्चर्य पाण्याचा एक थेंबही वाया न जाता शेतकऱ्यांच्या शेतात पाणीपुरवठा झाला. सर्वत्र सुजलाम सुफलाम झाले. सर्व
वर्तमानपत्रांत त्याचा गौरव करण्यात आला. एका अधिकार्याचा देवावरील व स्वतःवरील विश्वासामुळे तहानलेला गाव पाण्याने तृप्त झाला. आज आपण अशाच एका आगळ्यावेगळ्या
तृप्तीची गोष्ट आजच्या उपासनेत ऐकणार आहोत.
मनन चिंतन:
पाणी हा मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. सर्व
सजीवांना जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय जीव-जंतू, झाडे-झुडपे जीवंत राहू शकत नाही. आपणास पाणी हे विहीर, तलाव, पाऊस, नदी आणि
समुद्रापासून मिळत असते. पाण्याचा फरक एकच की समुद्राचे पाणी
खारट असते आणि नदीचे पाणी मात्र गोड असते. पाण्याला भावना
नसतात, मरण नसते व स्वतःच्या हालचालीसुद्धा नसतात आणि त्याची आपणाला रात्रंदिवस गरज भासते. अधिक करून पिण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी
किंवा बागायतीसाठी आपणास पाण्याची
गरज भासते.
येशू हा जीवंत पाण्याचा झरा आहे. ज्याप्रमाणें आपणास पाण्याची गरज
भासते त्याचप्रमाणे जीवनातील विविध प्रसंगी आपणास येशूची गरज भासते. ज्या प्रमाणे
नदीच्या काठावर असलेले सर्व वृक्ष-वेलींना पाणी टवटवीत व तेजस्वी
ठेवते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये वस्ती करतो
तेव्हा आपल्या जीवनाचा कायापालट होतो व आपणास आध्यात्मिकता प्राप्त होते.
आजच्या उपासनेत आपल्याला ह्या जीवंत पाण्याविषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात मोशेने देवाच्या
आज्ञेप्रमाणे इस्रायली लोकांना मिसर देशातून सफीदिम म्हणजे पठार या
गावी घेऊन आला़. तेथे पाण्याची फारच टंचाई होती. तेव्हा लोक कंटाळले व मोशेविरुद्ध
कुरकुर करू लागले. ते म्हणाले “आम्हाला व आमच्या मुलाबाळांना तहानेने मारण्यासाठी तू आम्हाला ह्या रानावनात आणले आहेस काय?” तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला, परमेश्वर मोशेला म्हणाला नाईल नदीच्या
पाण्यावर जि काठी तू आपटली होतीस ती काठी घेऊन होरेब पर्वत ज्याँला
सिनाई पर्वत असेही म्हणतात, तेथे जा. ज्या खडकावर मी
सांगेल त्या खडकावर ती काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल. मोशेने तसे करताच त्या खडकातून धो धो पाणी वाहू लागले
व इस्रायली जनता त्या पाण्याने ती तृप्त झाली.
आजच्या शुभवर्तमानात येशू जुडेया प्रांतातील गालीलात जात असताना
शमरोन येथील सुखार नावाचा गावापाशी आला. दुपार झाल्याने शिष्य अन्न/जेवण आणण्यासाठी
नगरात गेले होते. येशू गावाबाहेरच्या विहिरीपाशी बसला होता. तेथे एक शमरोनी बाई
पाणी भरण्यासाठी आली. येशूने तिच्याजवळ पाणी मागितले. ह्या येशूच्या तिच्या सोबत व्यवहारावर तिला अतिशय नवल वाटले, कारण त्याकाळी यहुदी लोक शम्रोनी लोकांशी कोणतेही संबंध ठेवीत
नसत. तीने आपले आश्चर्य व्यक्त केले, त्यावर येशू तिला
म्हणाला, “तू मला ओळखले असते तर तूच माझ्याकडे पाणी मागितले असते व मी
तुला जीवंत पाणी दिले असते. जे पिल्याने तुला पुन्हा कधी तहान लागणार नाही.”
येशू शम्रोनी स्त्रीला टप्याटप्याने देवळाकडे वळवितो व पुढे ती स्त्री ख्रिस्ताची
सुवार्तिका होते. ख्रिस्तावर श्रद्धा
ठेवते व गावातील सर्वांना येशूबद्दल सांगते. ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यासाठी ईश्ज्ञानाची गरज नाही फक्त त्याला वैयक्तिक जीवनात ओळखणे महत्वाचे आहे.
येशूच्या काळात शास्त्री व परुशी सामान्य जनतेला देवाचा शब्द सांगायचे
सोडून अवजड नियम मात्र त्यांच्यावर लादत होते. लोक देवाचा शब्दासाठी तहानलेले
होते. ते मेंढपाळ
नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले होते. म्हणून आज येशूचे बोलणे ऐकण्यासाठी ते
हजारोंच्या संख्येने जमतात. आजही देव शब्दाच्या रूपात असलेले जीवंत पाणी तहानलेल्या आत्म्यांना
तृप्त करत आहे. सदोदित खळखळ करत आहे. जीवंत पाण्याचा झरा कधीच वाहायचा थांबत
नाही व मरतहि नाही. कारण हा झरा येशूच्या नदीशी जोडलेला
आहे म्हणूनच आजोबानी नदीत पाणी पाहिले,
वडिलांनी विहिरीत पाहिले, मी नळात पहिले, माझ्या
मुलाने बाटलीत पाहिले, परंतु पुढची पीढी कुठ बघणार हा विचार करा.
श्रद्धावंतांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”
१.
आपल्या ख्रिस्तसभेचे दूरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना परमेश्वराने शारीरिक,
मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी
त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
जे कोणी जीवनात निराश आहेत, हताश आहेत, अशांना
परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासाने
जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३ जे
कोणी देवापासून दुरावलेले आहेत; त्यांना ह्या प्रायश्चित काळात
देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
या प्रायश्चित काळात आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण देऊन परमेश्वराच्या शाश्वत
जीवनाच्या पाण्याचा आस्वाद दुसऱ्यांना द्यावा व ह्याद्वारे परमेश्वराची प्रचिती
आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना व्हावी म्हणून आपण प्रभुचरणी प्रार्थना करूया.
५.
थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक
हेतू प्रभू चरणी मांडूया.
No comments:
Post a Comment