Friday, 19 May 2023

 




Reflections for the Homily of Ascension of Our Lord      (21-05-2023) By Br. Reon Andrades.




प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा


दिनांक: २१/०५/२०२३

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०.


प्रस्तावना:

आज आपण ख्रिस्ताचा स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. ख्रिस्ताचे स्वर्गरोहण आपणास एक नवा आशेचा किरण घेऊन येत आहे. आजच्या दिवशी शिष्य दुःखी झाले कारण त्यांचा मसीहा/ प्रभु त्यांच्यापासून निघून गेला आणि स्वर्गात विराजमान झाला. तर दुसरीकडे ते आनंदीही झाले, कारण त्याने दिलेले वचन पूर्ण करावयास तो गेला आहे, ते म्हणजे पवित्र आत्म्याचे दान. आजची तीनही वाचने आपणास प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाची साक्ष व पवित्र आत्म्याचा वर्षाव यांची प्रचिती देत आहे. आपणही प्रभूच्या स्वर्गरोहणाचे साक्षीदार बनावेत व आपणासही पवित्र आत्म्याचे दान लाभावे म्हणून आपण या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

स्वर्गरोहण हा ख्रिस्ती श्रद्धेच्या सहा घटका मधला एक घटक आहे. हे सहा घटक म्हणजे ख्रिस्तजन्म (देहधारण), मरण, पुनरुत्थान, स्वर्गारोहण, पेंटेकॉस्ट व पुनरागमन. आजच्या पहिल्या वाचनात व शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचे स्वर्गरोहण व त्याने दिलेल्या आज्ञा याची प्रचिती आपणास येते. संत पौल, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाविषयी तसेच त्याचे ज्ञान व शहाणपण आपल्याला आशेचं जीवन जगण्यास किती महत्त्वाचं आहे याची आपणास आठवण करून देत आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आणि ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाशी संबंधीत असलेल्या तीन मुद्यावर विचार करूया.


१. स्वर्गरोहाणाचे तथ्य

पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ४० दिवस आपले दर्शन देत राहिला. त्या काळात त्यांनी त्यांना स्वर्गराज्याविषयीची शिकवण दिली.  चाळीस दिवसानंतर जेव्हा त्याची स्वर्गात जाण्याची वेळ आली तेव्हा त्याने त्यांना त्याची सुवार्ता इतरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सोपविली.  शिष्याने व तेथे हजर असलेल्या अनेकांनी येशूला स्वर्गात चढताना पाहिले. अनेकांनी ह्याची  ग्वाही दिली आहे आणि त्यांची ही साक्ष खरी आहे. येशूचे स्वर्गारोहण ही एक काल्पनिक गोष्ट नसून, ती सत्य घटना आहे. तो स्वर्गात चढून पित्याच्या उजव्या बाजूला विराजमान झाला आहे. सर्व दूत व संतगण त्याची महिमा व गौरव गात आहेत. तो मेला नाही, तर तो जिवंत आहे. तो दूर देखील नाही, तर तो आपणामध्ये आहे, कारण त्याने नमूद केल्याप्रमाणे तो आपणाबरोबर जगाच्या अंतापर्यंत आहे.

 

२. स्वर्गरोहणाचे फळ

स्वर्गरोहणाची घटना आपणास दोन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावयास भाग पाडते, त्या म्हणजे पवित्र आत्म्याचे दान व ख्रिस्ताचे पुनरागमन.

अ. पवित्र आत्म्याचे दान

पवित्र आत्म्याची देणगी विषयी बोलताना प्रभु म्हणतो मी जातो हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवून देईल” (योहान १६:७). प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले हे वचन त्याने पेंटेकॉस्टच्या दिवशी पूर्ण केले. कारण तो म्हणाला होता की, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. पवित्र आत्म्याचे दान मिळता शिष्य निर्भीडपणे अथवा कोणाला न घाबरता ख्रिस्ताची सुवार्ता जगाला पसरवू लागले. ते अन्य भाषा देखील बोलू लागले. पेत्राच्या एका प्रवचनाने हजारो माणसांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने शिष्यांनी अनेक लोकांना आरोग्याचे दान दिले व चमत्कार देखील केले. परंतु त्यांनी तो आत्मा त्यांच्यापूर्ती ठेवला नाही तर इतरांना देखील तो दिला. आज शिष्यां प्रमाणे आपण त्या आत्म्याची वाट पाहत नाही, कारण तो आपणास आपल्या बाप्तिस्माच्या वेळेस दिलेला आहे. पण आपण त्याचा वापर चांगल्या कामासाठी करतो का? आपण तो आत्मा इतरांना देतो का? आपल्याला त्या आत्म्याची जाणीव आहे का?

ब. पुनरागमन

जेव्हा शिष्य आकाशात टक लावून पाहत होते, तेव्हा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन माणसे त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. ती त्यांना विचारू लागली गालीलच्या नागरीकांनो इथे तुम्ही आकाशाकडे काय पाहत उभे राहिलात? येशू स्वर्गात गेला आहे. ज्याप्रमाणे तो वर गेला आहे त्याचप्रमाणे तो परत येणार आहे (प्रेषितांची कृत्ये १:११). येशू ख्रिस्त आपणास जागा तयार करावयास गेला आहे. तो म्हणतो, माझ्या पित्याकडे भरपूर जागा आहे जर ती नसती तर मी तसे तुम्हाला सांगितले असते. म्हणून आपणास खात्री आहे की एके दिवशी, जेव्हा तो पुन्हा जगाचा न्याय करावयास येणार आहे तेव्हा आपण त्याच्या बरोबर स्वर्गराज्यामध्ये असू. यासाठी आपण नेहमीच तयारीत असणे गरजेचे आहे, कारण आपणास ठाऊक नसलेल्या वेळेस तो येणार आहे.


३. ख्रिस्ताचा आदेश

वर स्वर्गात जाण्यापूर्वी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आदेश दिला की, जेव्हा तुमच्यावर पवित्र आत्मा उतरेल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग पृथ्वीच्या कानाकोपर्यात माझी साक्ष तुम्ही लोकांना सांगाल (प्रेषितांची कृत्ये १:८). आज आपणास वर आकाशाकडे पाहण्यास बोलावले नाही, तर ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास व त्याचा प्रचार करण्यास, आपणास पाचारण केले आहे. मत्तय लिखित शुभवर्तमान अध्याय २८ ओवी १८-१९ मध्ये आपण ऐकतो की, स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार दिला आहे, तेव्हा साऱ्या राष्ट्रांना माझे शिष्य करा. अनेक वेळेस आपण आपल्या आरामदायी जीवनातून बाहेर पडायला कमी पडतो. ख्रिस्तासाठी आपण आव्हान स्वीकारत नाही. याप्रकारे आपण ख्रिस्तानी दिलेला आदेशाचे पालन करत नाही. ज्या प्रकारे शिष्यांनी सुवार्ता प्रचाराची भूमिका पार पाडली, त्याच प्रकारे आज आपणही सुवार्ता प्रचाराचे कार्य जोमाने सुरू ठेवूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू, स्वर्गीय सुख प्राप्त करण्यास आम्हांस साहाय्य कर.”

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशयबिशप्सधर्मगुरूधर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य बहाल करावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावाम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत करम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपणा सर्वाना पवित्र आत्म्याचे दान लाभावे व देवास अनुरूप असे जीवन आपण जगावे व ख्रिस्ताची साक्ष इतरांस आपण आपल्या वर्तणुकीतून द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितोत्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व सर्व आजारातून त्यांची सुटका करावीम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिककौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment