पुनरुत्थान
काळातील पाचवा रविवार
दिनांक: ०७/०५/२०२३
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९
शुभवर्तमान: योहान १४:१-१२
प्रस्तावना:
आज देऊळमाता
पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशुचे
अनुकरण करण्यास पाचारीत आहे; कारण येशु हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आजच्या पहिल्या वाचनात, पवित्र आत्म्याने
परिपूर्ण अश्या सात पुरुषांची निवड करण्यात आली आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनात, पेत्र आपल्याला ख्रिस्तावर श्रद्धा
ठेवण्यास व येशूच्या वंशात एक याजकपण, निवडलेले लोक होण्यास पाचारण करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात, येशू ख्रिस्त
आपल्याला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. येशू म्हणतो, ‘मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. एक मनुष्य म्हणून आपण
पित्याच्या ह्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास अपयशी ठरलो असाल किंवा आपण रस्ता
चुकलो असाल तर आपल्या पापांची क्षमा मागून भक्तिभावाने आजच्या ह्या मिस्साबलीत
सहभागी होऊया.
मनन चिंतन:
ख्रिस्ताठायी माझ्या
प्रिय बंधुनो आणि भगिनींनो, आपण पुनरुत्थान काळामध्ये आहोत आणि या पुनरुत्थान काळामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजयाची घोषणा करीत असतो. आज आपण पुनरुत्थान काळातील
पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणास सांगत आहे कि, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रभू येशू
ख्रिस्ताच्या जीवन, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे, प्रभू येशु ख्रिस्ताने आपल्याला नवीन मार्ग, सत्य आणि जीवन दिलेले
आहे. पोप
बेनेडिक सोळावे, आपल्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारे लिहितात की, जेव्हा प्रभू येशू
ख्रिस्त आपल्याला सांगतो की, मी उत्तम मेंढपाळ आहे; मी दार आहे; मी जीवनाची भाकर आहे; मी जिवंत पाण्याचा झरा
आहे आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे मी, मार्ग, सत्य व जीवन आहे अशा प्रकारचे उद्गार जेव्हा येतात तेव्हा
आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त विपुलतेच्या जीवनाविषयी आपल्याला संदेश देत आहे; आश्वासन देत आहे. आपल्या जीवनामध्ये
जेव्हा आपल्याला चांगली दिशा लाभते तेव्हा आपण आनंदी होत असतो; जेव्हा
आपल्याला सत्य कळते तेव्हा आपण मुक्तीच्या मार्गाकडे जात असतो. जेव्हा आपल्याला नवजीवनाचे वरदान
लाभते तेव्हा आपले जीवन प्रफुल्लित होत असते.
एक गोष्ट सांगाविशी वाटते, एकदा एक वडील आपल्या
मुलाला घेऊन जत्रेत जातो आणि जत्रेत भरपूर गर्दी असल्यामुळे ते विभक्त होतात, दूर जातात. वडील दिसत नाही म्हणून
तो मुलगा घाबरून जातो, भयभीत होतो. रडू लागतो. तो मुलगा रडत आहे असे बघून एक चांगला माणूस त्या मुलाजवळ
येतो त्याचा हात पकडतो त्याला आधार देतो आणि चांगल्या प्रकारे सुखरूपपणे त्याच्या
वडिलांजवळ घेऊन जातो. आपल्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे घडत असते. जेव्हा आपल्याला चांगला
मार्ग सापडत नाही; तेव्हा आपण दिशाहीत होतो. पाप मार्गाकडे जातो. आपण भयभीत होतो, घाबरून जातो. या क्षणी प्रभू येशू
ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की, मी मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग हा कशाप्रकारे आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा
मार्ग हा कोणता आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग हा त्यागाचा, कष्टाचा, अरुंद आणि क्रुसाचा
मार्ग आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग हा अरुंद, त्यागाचा, कष्टाचा आणि क्रूसाचा
जरी असला तरी हा मार्ग तिमिरातून तेजाकडे नेणारा आहे. असत्याकडून सत्याकडे
नेणारा आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. सर्वकालिक जीवनाकडे
नेणारा मार्ग आहे. जर आपल्याला विपुलतेच जीवन जगायचं असेल तर आपल्या जवळ एकच
मार्ग आहे तो म्हणजे प्रभू येशूचा क्रुसाचा मार्ग आणि या कृसाच्या मार्गाद्वारे आपल्याला
सर्वकालिक उत्तम जीवन लाभत असते.
प्रिय बंधू-भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला आपले जीवन प्रिय असते. आपण चांगलं जीवन जगावं, इतरांना मदत करावी, इतरांच्या सहाय्यामध्ये
राहावं, इतरांचा
आधार आपल्याला मिळावा, एकमेकांसोबत सुखी, समाधानी, शांतीच, आनंदाचं जीवन जगाव ही आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आणि
यासाठी आपण नेहमी कष्ट घेतले पाहिजे. प्रिय बंधू-भगिनींनो दुसऱ्यांच्या रस्त्यात काटे टाकून आपल्या जीवनाचा
रस्ता आपण फुलवू शकत नाही. इतरांना पाप मार्ग किंवा चुकीचे मार्गदर्शन देऊन आपण
सत्याच जीवन जगू शकत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन हे परमेश्वराचं आपल्याला मिळालेलं वरदान आहे.
प्रिय बंधू-भगिनींनो, आपण काही गोष्टीविषयी
जबाबदारी घेणे फार महत्त्वाचे आहे. ते म्हणजे परमेश्वराला प्रथम स्थान देणे. परमेश्वराची इच्छा
आपल्या जीवनामध्ये काय आहे? हे जाणून घेणे आणि त्या इच्छेप्रमाणे जगणे फार महत्त्वाचे
आहे.
दुसरे म्हणजे परमेश्वराच्या शब्दाला महत्त्व देणे. परमेश्वराचा शब्द
आपल्याला मार्गदर्शक आहे. परमेश्वराच्या शब्दावर चालणे हे फार महत्त्वाचे आहे आणि
परमेश्वराचा शब्द आपल्याला नेहमी चांगलं मार्गदर्शन देत असतो. तिसरे
म्हणजे विद्वान किंवा ज्ञानी व्यक्तींच्या सानिध्यात राहणे. कारण ज्ञानी व्यक्तींचे
मार्गदर्शन आपल्याला कधीच चुकीच्या मार्गावरती नेत नसते. चौथे म्हणजे सातत्याने
सत्याचा मार्ग पत्करणे. सत्याचा मार्ग हा कठीण असतो, हे खरे आहे परंतु तो
कठीण सुद्धा नसतो. सत्याचा मार्ग म्हणजे आपण अचूक माहिती देणे. सत्याचा मार्ग हा कठीण
आहे,
भरपूर असे श्रम करावे लागतील परंतु सत्याने सत्याचा मार्ग जेव्हा आपण पत्करतो
तेव्हा आपल्याला चांगलं जीवन मिळते. ते म्हणजे विपुलतेचे परिपूर्ण असे जीवन मिळत असते.
आजच्या मिस्साबलिदानामध्ये
आपण सर्वजण प्रार्थना करू या, हे प्रभू येशू ख्रिस्ता
तू परमेश्वराचा मार्ग आहेस
या मार्गावरती चालण्यासाठी आम्हाला प्रेरणा दे. तू सत्य आहेस, या सत्य
वचनावरती आम्हाला जगता यावे म्हणून आम्हाला कृपा दे. आम्हाला विपुलतेच जीवन
लाभाव म्हणून आम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी तू आम्हाला तुझा आत्मा दे, जेणेकरून आम्ही तुझ्या
शब्दाप्रमाणे वागावे, तुझी इच्छा जाणून घ्यावी आणि आम्हाला विपुलतेचे सार्वकालिक
जीवन नेहमी लाभाव. आमेन.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हाला
तुझे साक्षीदार बनव.”
१. आपल्या ख्रिस्तसभेचे पोप महाशय फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू
व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, त्यांना
प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून
प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करु या.
२. पापी, जकातदार
व समाजाने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबरोबर प्रभू तुझे कार्य आम्हाला प्रेरणा देवो
जेणेकरून आम्ही तुज्या सुर्वार्तेची घोषणा सर्व ठिकाणी पसरू म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करू या.
३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले
आहेत. अशा सर्वांना त्यांच्या रोगांपासून मुक्तता
मिळावी, त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन
जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे वासना, व्यसन यांच्या अधीन गेले आहेत, जे मृत जीवन जगत आहेत
त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना
करू या.
५. पर्यावरणाची काळजी घेऊन स्वच्छ व सुंदर विश्व
बनविण्यासाठी आम्ही झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment