Friday, 27 October 2023

 Reflections for the 30th Sunday In Ordinary Time (29/10/2023) by Br. Justin Dhavade.


सामान्य काळातील तिसावा रविवार



दिनांक: २९/१०/२०२३

पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६

दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०

शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०  

प्रस्तावना:

“तू आपला परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण मनाने प्रीती कर”.

       ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देऊळमाता सामान्यकाळातील तिसावा रविवार साजरा करीत आहे. आणि आजची उपासना आपणास परमेश्वरावर व आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्यास पाचारण करीत आहे. प्रेम हा मानवी मनाचा अत्युच्च नी सर्वांना हवाहवासा वाटणारा एकमेव अविष्कार आहे, व प्रेमालाच आपल्या रहस्यमय जीवनातील एकमेव महत्वाची बाब समजली जाते. कारण प्रेमामुळेच आपण त्यागी वृत्ती आत्मसात करतो व निस्वार्थी अंगी बाळगतो, ह्याची जाणीव ख्रिस्ताला होती.

       ख्रिस्ताला ठाऊक होते कि, प्रेमाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे व प्रेम असे एक माध्यम आहे कि, जे अशांततेत शांतता, तर दुभांगातेत एकता निर्माण करू शकते. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो कि, परमेश्वरावरील व शेजार प्रीती हि सर्वात महत्वाची आहे. ख्रिस्ताच्या ह्या आज्ञांचे तंतोतंत पालन करून ह्या भूतलावर प्रीती प्रस्थापित करण्यास व सर्वत्र प्रेमाचे वातावरण निर्माण करण्यास ख्रिस्त आज आपणा प्रत्येकास बोलावित आहे.

मनन चिंतन:

       प्रीती, ह्या शब्दात फार महत्व आहे. जेथे प्रीती असते तेथे विश्वास असतो. कारण देव प्रीती आहे. म्हणून प्रभू येशूने देवप्रिती आणि परस्पर प्रीतीची आज्ञा आपल्याला दिलेली आहे. परमेश्वर अखिल मानवजातीवर प्रीती करतो. आपण मानव आहोत, या एकाच कारणामुळे तो आपणावर प्रीती करतो. देवाची प्रीती प्राप्त करून घेण्यास हे एवढेच एक कारण पुरे आहे. मानवी प्रीतीची पराकाष्ठा होऊन ती संपुष्टात आली तरी देवाची प्रीती आपणाला अंतर देणार नाही. देवाची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, ह्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो. देवाचे नियम, आज्ञा पाळणे म्हणजे देवावर प्रीती करणे. ह्याचीच येशू ख्रिस्त आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. येशू ख्रिस्त सर्व लोकांवर प्रीती करतो असे नवीन करारात पुन:पुन्हा आढळते. जे त्रासलेल  व गांजलेले आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्त जगात होता. तो हरवलेल्याना शोधावयास व तारावयास आला होता.

       गरजवंत व ज्यांचे कुणीच नाहीत अशांसाठी आपण आपल्या अंत:करणाचे दरवाजे उघडायला हवेत. प्रभू येशू सर्वदा आपल्यावर प्रेमपूर्वक कृपादानाचा वर्षाव करीत असतो. आपल्या प्रिय भक्तगणांसाठी आणि त्याला शरण येणा-या प्रत्येक श्रद्धावंतांसाठी प्रभू येशू अदभूत चमत्कार करण्यास तयार आहे. आपण त्याच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याची प्रीती-आज्ञा आचरणात आणून, श्रद्धेने जीवन जगण्यास सदा तत्पर असलो पाहिजे.

आजच्या समाजात प्रेम या शब्दाचा दुरुपयोग होऊन या शब्दाचं महत्व आणि मूल्य कमी होत आहे. जर आपल्या प्रेमाचं रूपांतर ख्रिस्ताच्या प्रेमाच्या प्रतिमेत केले गेले, तर प्रेमाला पुन्हा त्याचं महत्व आणि मूल्य प्राप्त होऊ शकतं. जर आपलं प्रेम दोन्ही दिशाकडे वळाल, तरचं ते खरं, ख्रिस्ती आणि ख्रिस्ताच्या प्रेमासारखं होऊ शकतं आणि त्या दोन दिशा म्हणजे: देवाकडे दर्शविणारी दिशा आणि मानवाकडे दर्शविणारी दिशा होत.

आजच्या मिस्सात सहभागी होत असताना आपण स्वत:हालाच प्रश्न विचारू या की माझं देवावरील व एकमेकावरील प्रेम कोणत्या स्वरूपाच आहे? माझ्या प्रेमात मी, माझं  अशा स्वार्थीवृत्तीचा कलह लागलेला आहे का? येशू सारखी देवावर व इतरांवर प्रीती करण्यासाठी शक्ती व ताकद, प्रेमाचा उगम व सागर ह्याच्या कडून मागूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला प्रेमळ बनव.

१) आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि ख्रिस्तसभेच्या कार्याची धुरा स्वीकारलेल्या सर्वानी प्रभूची देवप्रीती आणि शेजारप्रीतिची आज्ञा समजून आपल्या जीवनाद्वारे आणि कार्याद्वारे या प्रेमाच्या आज्ञेची शिकवणूक इतरांना द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.

 ) आपल्या पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, दुःखात आहेत, जीवनाला कंटाळलेले आहेत अशा सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद यावा आणि त्यांना लवकरात लवकर या सर्व त्रासातून मुक्तता मिळावी व नवीन जीवन जगण्याचा मार्ग दिसावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

)  आपल्या देशातील धार्मिक, राजकीय व सामाजिक प्रश्नावर सखोल चिंतन व्हावे विधायक मार्ग शोधण्यासाठी सर्वस्तरावर चांगला सुसंवाद घडावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

 4) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा आपण प्रभुचरणी मांडूया.


Tuesday, 17 October 2023

  Reflections for the 29th Sunday in Ordinary Time & Mission Sunday 22/10/23 by Br. Glen Fernandes 


सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार मिशन रविवार

पहिले वाचन: यशया  ६०:१ - ६    

दुसरे वाचन: रोमकरास पत्र १०: ९-१८

शुभवर्तमान: मत्तय २८: १६-२०



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहोत. आजचे पहिले वाचन यशया या पुस्तकातून घेतलेले आहे. आजच्या वाचनात आपण सियोनचा गौरव ऐकत आहोत. परमेश्वराच्या लोकांना सांत्वन करताना म्हटले आहे की उठ, चमक, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि परमेश्वराचे  तेज तुमच्यावर उठेल. अंधाराने  पृथ्वी व्यापली आहे, परंतु परमेश्वराचा प्रकाश हा लोकांवर येऊन लोकांना तेजमय करेल. आजचे दुसरे वाचन संत पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले आहे. संत पौल शिकवतात की जर आपण येशू हा प्रभू आहे असं जर आपल्या मुखाने प्रकट केले आणि, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवला तर आपले तारण होईल. संत पौल पुढे म्हणतात की  ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.

आजच्या शुभवर्तमानात आपण संत मत्तयच्या शुभवर्तमानातील "मिशनरी आदेश" ऐकत आहोत. येशूने शिष्यांना सर्व लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आणि बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवले कारण आता सर्व पुरुष आणि स्त्रिया मुक्तीच्या फळांचा आनंद घेऊ शकतात. मरणातून उठलेल्या ख्रिस्ताचा आदेश केवळ पहिल्या शिष्यांनाच नाही तर आपल्या सर्वांना उद्देशून आहे.

जागतीक  मिशन रविवारी, ख्रिस्ती भाविक पवित्र मिस्साबलिदान  साजरे करण्यासाठी आणि जगभरातील सुवार्तिकरणाच्या कार्यासाठी संकलनात योगदान देण्यासाठी एकत्र येतात. हा वार्षिक उत्सव चर्चच्या जीवनासाठी मिशन कार्याचे महत्त्व प्रतिबिंबित करण्याची संधी देतो. हे आपल्याला आठवण करून देते की आपण जगभरातील पवित्र देऊळमातेबरोबर  एक आहोत आणि आपण सर्वजण ख्रिस्ताच्या मिशनला पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.

बोधकथा :

एस.डी. गॉर्डन यांनी स्वर्गात प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाबद्दल एक सुंदर कथा सांगीतली आहे. भव्य स्वागत समारंभ संपल्यावर, मुख्य देवदूत गॅब्रिएल त्याच्या शंकांचे निरसन करण्यासाठी येशूकडे आला. तो म्हणाला, “मला माहित आहे की पॅलेस्टाईनमधील फारच कमी लोकांना माहिती आहे की तुम्ही तुमच्या दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे त्यांचे तारण केले आहे. परंतु संपूर्ण जगाने ते जाणून घेतले पाहिजे आणि तुमचे शिष्य बनले पाहिजे.  तुमची कृती योजना काय आहे?" प्रभू येशूने उत्तर दिले, “मी माझ्या सर्व प्रेषितांना सांगितले आहे की त्यांनी माझ्याबद्दल इतर लोकांना सांगावे आणि त्यांच्या जीवनातून माझा संदेश सांगावा. एवढेच आहे.” देवदूत  गॅब्रिएलने विचारले, "समजा त्यांनी तसे केले नाही तर? तुमचा प्लॅन बी काय आहे?" येशूने उत्तर दिले, “माझ्याकडे दुसरी योजना नाही; मी त्यांच्यावर अवलंबून आहे.” या जागतीक मिशन रविवारी, पवित्र देऊळमाता आपल्याला आठवण करून देत आहे की येशू आपल्या सभोवतालच्या इतरांद्वारे त्याला स्वीकारले जावे यासाठी आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून आहे.

मनन चिंतन:

प्रिय मित्रानो आज आपण जागतिक मिशन दिवस साजरा करीत आहोत. दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलच्या मते, चर्च तिच्या स्वभावात "मिशनरी" आहे कारण तिचा संस्थापक, प्रभू येशू ख्रिस्त हा पहिला मिशनरी होता. देव पित्याने देव पुत्र, आपला प्रभू येशू याला देवाच्या प्रेमाचा आणि तारणाचा संदेश देऊन जगात पाठवले. अशाप्रकारे, चर्चचे सुवार्तिक मिशन हे मूलत: देवाचे प्रेम, दया, क्षमा आणि तारणाची घोषणा आहे, कारण हे आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानवजातीला प्रकट झाले आहे.

मिशन रविवार ख्रिस्ताची शुभवार्ता पसरविण्यासाठी आपल्याला आपल्या  जबाबदारीची आठवण करून देत आहे. आज खऱ्या अर्थाने विश्वाला प्रभूच्या प्रेमाची आणि सुवार्तेची गरज आहे  कारण जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत त्यांची संख्या वाढली आहे. ख्रिस्ताची वाट पाहणाऱ्यांची संख्या ह्या जगात अजूनही अफाट आहे.  संत. जॉन पॉल दुसरे यांनी त्यांच्या पत्रात  रिडेम्पटोरिस मिशनमध्ये म्हटले आहे की, 'जेव्हा आम्ही आमच्या लाखो बंधू आणि बहिणींचा विचार करतो, ज्यांना ख्रिस्ताच्या रक्ताने सोडवले गेले आहे परंतु जेव्हा ते देवाच्या प्रेमाच्या अज्ञानाने जगतात तेव्हा आम्ही समाधानी होऊ शकत नाही.’ ते लिहतात की, ‘भूतकाळातल्या प्रमाणे आजही, तो (ख्रिस्त) पृथ्वीवरील सर्व लोकांना त्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी जगाच्या राजमार्गांवरून पाठवतो.’

आज आपण कशाप्रकारे ख्रिस्ताच्या शुभवर्तमान पसरविण्याच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे? आपण अनेक प्रकारे सहभागी होऊ शकतो विशेषकरून, प्रभूचे अनुकरणीय आणि पारदर्शक ख्रिश्चन जीवनाद्वारे, प्रार्थनेद्वारे आणि आर्थिक मदतीद्वारे. ख्रिस्ताचा उपदेश करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे खरोखर ख्रिश्चन जीवन जगणे - प्रेम, दया, दया, करुणा आणि क्षमा आणि सेवेच्या भावनेने भरलेले जीवन. प्रभूचे हे ध्येय पूर्ण करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे खरोखर ख्रिश्चन जीवन जगणे - प्रेम, दया, दया, करुणा, प्रार्थना आणि क्षमाशील आत्म्याने भरलेले जीवन. महात्मा गांधी म्हणायचे: "माझे जीवन हाच माझा संदेश आहे." त्यांनी अनेकदा ख्रिस्ती मिशनर्‍यांना “गुलाबाचे प्रेषित” बनण्याचे  आव्हान दिले. गुलाब उपदेश करत नाही. ते फक्त त्याचा सुगंध पसरविते  आणि त्याच्या अप्रतिम सौंदर्याने सर्वांना आकर्षित करते. म्हणून, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रचार करत असलेली सुवार्ता नाही, तर आपण जगत असलेले जीवन आहे. अशाप्रकारे सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी सुवार्तेचा प्रचार केला. त्यांचे परराष्ट्रीय शेजारी म्हणायचे: “हे ख्रिस्ती एकमेकांवर कसे प्रेम करतात ते पहा!” त्यांनी जो ख्रिस्त ओळखला आणि स्वीकारला तो ख्रिस्त प्रत्येक ख्रिश्चनामध्ये राहत होता.

 प्रार्थना हे मिशनरी कार्याचे दुसरे साधन आहे. येशू म्हणतो, “माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही.” म्हणून, येशूला प्रभु आणि तारणहार म्हणून स्वीकारण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना आवश्यक आहे. तसेच  सर्व मिशनरी प्रयत्नांना आर्थिक पाठबळाची देखील आवश्यकता असते कारण देवाचे प्रेम अनेकदा गरीबांना अन्न, औषध आणि उपजीविकेचे साधन देऊनच समजावून सांगितले जाऊ शकते. म्हणून, या मिशन रविवारी, आपण आपल्या मिशनरी कर्तव्याची जबाबदारी पार केली पाहिजे आणि पारदर्शक ख्रिश्चन जीवन जगून, उत्कट प्रार्थना करून आणि उदार देणग्या देऊन चर्चच्या मिशनरी उपक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे.

पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या पहिल्या जागतिक  मिशन रविवारच्या संदेशात, २०१३ मध्ये, आम्हाला धैर्याने आणि प्रत्येक परिस्थितीत ख्रिस्ताची सुवार्ता, आशा, सलोखा आणि सामंजस्याचा संदेश घोषित करण्याचे आव्हान दिले. आपल्या संदेशात, पोप यांनी  चर्चला आव्हान दिले की ते एक स्वागताही घर बनले पाहिजे.   “पवित्र देऊळमाता जगामध्ये एका मिशनवर आहे. आपल्यासर्वांतील प्रत्येकजन एक मिशन आहे.”  प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेला पुरुष आणि स्त्री हे एक मिशन आहे. म्हणून पोपमहाशय  सर्व कॅथोलिक भाविकास आणि चर्चला मिशनरी जागरूकता आणि वचनबद्धता पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन केले.

प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रेमाचा साक्षीदार, मिशनचा आत्मा, प्रत्येकाची चिंता करतो हे समजून घेण्यासाठी जागतिक मिशनरी दिन ही एक उपयुक्त संधी आहे . खरंच, सुवार्तेची  सेवा करणे हे एकट्याचे काम मानले जाऊ नये परंतु प्रत्येक ख्रिस्ती समुदायाने सामायिक करण्याची वचनबद्धता मानली पाहिजे. तसेच जे सुवार्तिकतेच्या कामामध्ये आघाडीवर आहेत, विशेषकरून सर्व धर्मगुरु व धर्मभगिनी जे विशेष मार्गांनी योगदान देतात, पृथ्वीवर देवाच्या राज्याचा प्रसार करण्यासाठी त्यांना कृपा व आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना केली पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो मिशन कार्य करण्यास आम्हांला सहाय्य कर.

१. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असलेले आपले पोप फ्रान्सीस, सर्व कार्डीन्ल्स, बिशप्स, धर्मबंधू-धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे कोणी जगात शांती, ऐकोपा, प्रेम प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराचे सामर्थ्य व मार्गदर्शन लाभावे व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

३. आपल्या सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया..

४. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना  देवाने आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी माते मरियेच्या मध्यस्थी द्वारे प्रभूचरणी प्रार्थना करुया.


Tuesday, 10 October 2023

  Reflections for the 28th Sunday in Ordinary Time (15/10/2023) by Br. Cajeten Pereira


सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार



 

दिनांक: १५/१०/२०२३

पहिले वाचन: यशया २५:६-१०

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र ४:१२-१४, १९-२०

शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४

प्रस्तावना:

आज परमेश्वर नावीन्यपूर्वक आणि वेगळ्या विचारसरणीचे आमंत्रण देत आहे, ज्यामध्ये गरीब आणि सामान्य जनता भाग्यशाली आहे. दयावंत परमेश्वर सर्वाना प्रेमाने आणि आपुलकीने स्वर्गीय मेजवनीचे आमंत्रण देत आहे. ही मेजवानी सर्वांसाठी खुली आहे, ज्यामध्ये कोणताही भेदभाव नाही अथवा कोणालाही वगळे नाही. यशया संदेष्टा पहिल्या वाचनात आणि येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये ह्याच गोष्टीवर जोर देत आहे. निवडक लोकाना आमंत्रण दिलेल आणि त्यांनी होकार दिला, परंतू सहभाग घेण्यास असमर्थन दर्शविले. गरीब आणि दिनदुबळया लोकानी आमंत्रणाचा स्विकार करून सहभाग घेतला. आमंत्रणाला आपले उत्तर काय आहे. मिस्साबलिदानामध्ये सहभागी होता असताना, देवराज्याच्या मेजवानीचे आमंत्रण स्विकारण्यास व त्यात सहभागी होण्यास तयार राहावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

लग्नाची मेजवानी तयार होती, तरीही आमंत्रित केलेले आले नाही. रस्त्यावरून मेजवानीसाठी आणलेल्यापैकी एका मनुष्याने मेजवानीसाठी साजेल असा पोशाख परिधान केलेला नव्हता. आज परमेश्वर आपणाला मेजवानीचे आमंत्रण देत आहे. त्याच्या आमंत्रणाला आपण उत्तर देऊ का? मेजवणीसाठी साजेल असा पोशाख परिधान करू का?

आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया आम्हाला सांगतात की देव सर्व लोकांसाठी मेजवानी देईल. सर्वांना आमंत्रित केले आहे. सर्वांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव मृत्यूचा कायमचा नाश करील. देवाने आपल्याला वाचवले याचा सर्वांना आनंद होईल.

आज माणूस स्वार्थाच्या जाळ्यात अडकलेला आहे. मला सर्व चांगल्या गोष्टीं कशा मिळतील, माझ जीवन आनंदाने कसे भरेल, मग दूसरा रडो कि मरो मला त्याच काहीही पडलेल नाही. देवाविषयीसुद्धा स्वार्थी व्रृत्ती बाळगतो, परमेश्वराने केवळ मलाच आशीर्वाद देऊन माझे जीवन सुखी- समृद्धी करावे. अशा विचारसरणीमुळे माणुसकी लयास पावत आहे. आपण सर्वोत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू शकतो-परंतु कधीही दुसऱ्याशी स्पर्धा करून नाही. आपण आपल्या क्षमतेनुसार इतरांची सेवा करण्याचा प्रयत्न करू शकतो-परंतु इतरांशी स्पर्धा करून नाही. आपणा सर्वांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे आणि तीच आपली नित्य नेहमीची प्रार्थना असावी. देवाने आपणा सर्वाना त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे आणि एखाद्याला चांगले बनवले असेल तर आपण कोण तुच्छ देखणारे किंवा कटूर्ता बाळगणारे.

संत पॉल फिलिप्पैकरांस लिहलेल्या पत्राद्वारे आपणास बोध करतो, “गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो”(४:१२). हे वचन आपणासाठी आव्हान आहे देवावरती विसंबून जीवन जगण्यासाठी. आपल्याकडे सामर्थ्य आणि संपत्ति असो किंवा आपल्याकडे काहीही नसले तरीही देवाच्या गौरवासाठी कसे जगायचे हे माहित असले पाहिजे.

शुभवर्तनामध्ये येशू ख्रिस्त मेजवणीच्या दृष्टांताद्वारे देवराज्याविषयी शिकवण देत आहे. परमेश्वर राज्यांचा राजा आपणाला आमंत्रित करीत आहे. आपण त्या आमंत्रणाला प्रतिसाद देणार आहोत का? परमेश्वर आपणावरती बळजबरी किंवा जबरदस्ती करीत नाही, आपल्या इच्छेविरुद्ध जाण्यास सक्ती करीत नाही. म्हणजेच कोणता मार्ग निवडावा हे आपल्या हाती आहे. येशू जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे (योहान१४:६), त्याच्या वाटेवरती चालण्याचे हे आमंत्रण आहे.

स्वार्थात आणि लोभात गुंफून गेल्यामुळे आपल्याकडे वेळ नाही आमंत्रणाला होकार देण्यास. सुखी-समृद्धीत जीवन जगण्यासाठी अनेकजण अहोरात्र काम करतात. काम आणि काम आणि काम इतकेच त्यांचे जीवन म्हणून सुख काही वाटेला येत नाही. गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे आपण येशूच्या मागे चालण्यास असमर्थ ठरतो.

आमंत्रितांनी आमंत्रण धिक्कारल्यामुळे रस्त्याच्याकडेला आणि कोपऱ्यात असलेल्याना आमंत्रणविना मेजवणीच्या सभागृहात प्रवेश मिळाला. लक्ष्यवेधीत गोष्ट म्हणजे, आलेल्यापैकी एका मनुष्याने मेजवानीसाठी साजेल असा पोशाख परिधान केलेला नव्हता. एकट्यानेच परिधान केला नव्हता म्हणजे साजेसा पोशाख परिधान करण्यास वेळ दिलेला किंवा पोशाख देण्यात आलेला. सभागृहातील गर्दीचा फायदा घेत, मी कोणाच्या लक्षात येणार असा विचार करून तो मळकटलेल्या कपड्याने आत येतो व त्याचा शेवट अंधार कोठडीत होतो.

शुभवर्तमानातील संदेश खूप महत्वाचा आणि गांभीर्याचा आहे. बाप्तिस्माद्वारे सर्व ख्रिस्ती भाविका समवेत (गर्दीत) आपोआप माझे पण तारण होईल, अशा विचारसरनीच्या लोकाना ही जेतावणी आहे. दयावंत देवपित्याने सर्वांनसाठी स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत, ह्याचा अर्थ गृहीत धरू नये. आपणाला त्यासाठी तयारी करावी लागेल, आध्यात्मिक पोशाख परिधान करावा लागेल. हा पोशाख आपणाला स्नानसंस्कारवेळी परिधान केलेला; जेव्हा धर्मगुरू म्हणतात, “तू नवी निर्मिती बनला/बनली आहेस आणि तू ख्रिस्ताला वस्त्राप्रमाणे परिधान केले आहेस. हे शुभ्र वस्त्र तुझ्या ख्रिस्ती प्रतिष्ठेचे दृश्य चिन्ह बनो. तुझ्या कुटुंबियांच्या व मित्रपरिवारांच्या शब्दाने आणि सदवर्तनाने प्रेरित होऊन स्वर्गराज्याच्या शाश्वत जीवनात प्रवेश करीपर्यंत तू तुझ्या प्रतिष्ठेला कलंक लावू देऊ नकोस.”

आपण परिधान केलेले आध्यात्मिक वस्त्र शुभ्र व नितळ ठेवणे, त्याला डाग किंवा कलंक लावू न देणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रार्थनेने, बायबल वाचनाने, पवित्र मिस्सामध्ये सहभाग घेऊन, पावित्र्याचे व सेवेचे जीवन जगून पाळू शकतोस.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची श्रद्धा ख्रिस्ताने शिकाविलेलेया प्रार्थनेद्वारे बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व आजारी व पिडीत लोकांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी. स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.