Thursday, 2 November 2023

 


Reflection for the 31st Sunday in Ordinary Time (05/11/2023) 
by Br. Rockson Dinis


सामान्यकाळातील ३१ वा रविवार



पहिले वाचन: मलाखी १:१४-२:८-१०

दुसरे वाचन: १ थेस २:७-९,१३

शुभवर्तमान: मत्तय २३: १-१२


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील ऐकतीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास ठेऊन नम्रता अंगीकारण्यास बोलावीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि, मलाखी संदेष्ट्याने देवाचा संदेश लोकांपर्यत पोहोचवला. त्याने हा संदेश बंदिवासानंतर सुटलेल्या यहुदी राष्ट्राला सांगितला. सेनाधीश परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणतो की, “तुम्ही माझा मार्ग सोडून दिला आहे म्हणून मी तुम्हाला तुच्छ व नीच केले आहे”.

दुसर्या वाचनात संत पौल आपल्या पत्राद्वारे थेस्सलनिकाकरांस म्हणतो कि “विश्वास ठेवणाऱ्यात देवाचे वचन कार्य करते”, या विषयी सांगत आहे. जर आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडून येईल असे संत पौल आपल्याला उद्देशून सांगत आहे.

तसेच आजच्या  मत्तयलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री व परुशी ह्यांचे उदाहरण देऊन आपल्याला देवाच्या वचनावर अवलंबून राहण्यास व नम्रता अंगीकारण्यास आमंत्रित करीत आहे. येशू म्हणतो, “जो कोणी स्वतःला मोठा समजतो त्याला कमी समजले जाईल व जो स्वतःला लहान समजतो त्याला मोठे गणले जाईल.”

देवाने शिकवलेला नम्रतेचा धडा हा फार  महत्वाचा आहे. कारण नम्रता धारण केल्यानेच व्यक्ती महान होतो. म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपण नम्र बनण्यासाठी देवाची कृपा व सामर्थ्य मागूया.


बोधकथा:

एका गावात राघव नावाचा व्यक्ती राहत होता. तो अनेक संकटाना, दु:खाना अडी - अडचणीना सामोरे गेलेला होता. गावातील जमीनदाराला त्याची फार दया वाटली म्हणून त्याने राघवला आपल्या घरी बोलावले. राघव प्रमाणे देवही आपल्या घरी यावे अशी जमीनदाराची इच्छा होती. म्हणून, त्याने देवाला एके दिवशी  मेजवानीसाठी आमंत्रित केले. देवाने त्याला अन्न तयार करण्यास सांगितले आणि  जमीनदाराने तसे केले. नंतर जमीनदार देवाला आमंत्रण देण्यासाठी मंदिरात जाऊ लागला. त्या वेळेस जमीनदाराला वाटेत एक  म्हातारा, आणि तरुण व्यक्ती भेटली. म्हातारा जमीनदाराला म्हणाला, मला तुमच्या घरी मेजवानीसाठी येण्यास आमंत्रण मिळेल का? जमीनदार म्हणाला देवाने मला अन्न तयार करण्यास सांगितले आहे, आज माझ्या घरी देव मेजवानीसाठी येणार आहे. जेव्हा जमीनदार मंदिरात गेला तेव्हा देवाने त्याला सांगितले की तोच मी लोकांच्या रूपाने तुझ्याकडे आलो होतो तू मला ओळखले नाही. जमीनदाराला त्याच्या ह्या कृतीमुळे खूप वाईट वाटले. ह्या प्रसगा नंतर  जमीनदार  नेहमी लोकांशी दयाळू  व नम्रपणे वागू लागला.


मनन चिंतन:

“जो कोणी  स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल”

आज ख्रिस्तसभा आपल्या सर्वाना नम्रतेचा  आणि प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्यास संदेश देत आहे. तसेच इतरांच्या नजरेत स्वतःला उंच करण्याच्या मानवी प्रवृत्तीबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सावध करीत आहे. कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांसारखे आणि परुश्यांप्रमाणे सर्व गोष्टी  दाखवण्यासाठी आणि बाजारपेठेत आदर मिळवण्यासठी कार्य करीत होते. प्रभू येशू म्हणतो, “जो कोणी  स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल”.

आज ह्या धावपळीच्या जगात आपण पाहतो, प्रत्येक व्यक्ती स्वत:ला उंच करण्याच्या घडामोडीत भरकटून गेलेला आहे. माणूस हा  गर्व, अभिमान, आदर या मोहानमुळे,  आपल्या स्वतःला, इतरांपेक्षा प्रथम ठेवण्यास व  इतरांच्या नजरेत स्वतःला उंच करण्याच्या  मोहात पडलेला आहे. गर्व आपल्या स्वतःला इतरांपेक्षा प्रथम ठेवण्याचा मोह करतो. जे स्वत: ला उंचावतात ते केवळ अभिमानाचे दोषी ठरतात. कारण इतरांच्या नजरेत दाखवलेला अभिमान हा कधीच स्वतःला उंचावत नाही. जगामध्ये नाव रोषण करण्यासाठी व पृथ्वीवर प्रतिमा धारण करण्यासाठी गर्विष्ठ पणाचा किवा अभिमानाचा लोभ धरू नये. कारण लोभ मानवाला पापाच्या दरीत टाकतो. जे कोणी  शिखरावर दिसण्यासाठी  चढतात ते या जन्मात किंवा पुढच्या आयुष्यात मोठ्या पडझडीने नम्र होतील.

म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, “जे स्वतःला नम्र करतात त्यांना उंच केले जाईल.” आज प्रभू आपल्या सर्वाना, नम्रतेचे जीवन जगण्यास बोलावत आहे. नम्रतेची सुरवात ही स्वत:ला स्वीकारून व आपण कोण आहोत हे समजून होते. जीवनामध्ये नम्र असणे हे एक महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. कोणीतरी एकदा म्हटले आहे, जो कोणी स्वतःबद्दल कमी विचार करतो, तो जगाच्या नजरेत महान ठरतो.

प्रत्येक नम्र व्यक्ती हे जाणून असते  की त्यांच्याकडे जे काही आहे ते देवाच्या कृपा आशीर्वादामुळे आहे.  मत्तय लिखित शुभवर्तमानात अध्याय १८ वचन १ ते ५  मध्ये  येशू नम्रतेविषयी धडा शिकवत आहे. येशू म्हणतो , “ जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करितो तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होईल”.

नम्रतेच्या सर्वात प्रसिद्ध उदाहरणांपैकी अत्यंत म्हत्वाचे  उदाहरण म्हणजेच “ मदर तेरेसा”. ज्यानी स्वत:च्या जीवनाचा त्याग केला आणि आजारी, गरीब आणि मरणार्‍यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या ह्या नम्र कार्यामुळे  भारतातील  अनेकांना प्रेरणा मिळाली आणि जगामध्ये खरा बदल कसा घडवायचा हे मदर तेरेसानी  लोकांना दाखवले.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रेमळ परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक.

आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना देवाचे वचन अधिकारवाणीने सांगता यावे त्यासाठी त्यांनी चिंतन करावे म्हणून  आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

संतांचा आशीर्वाद आपल्या सर्वावर येऊन आपण आपले जीवन पवित्रशुद्धकरून वाईट जीवन सोडावे व नम्रतेचे जीवन जगण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून परमेश्वराकडे विनवणी करूया.

आपल्या पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, दुःखात आहेत, जीवनाला कंटाळलेले आहेत अशा सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद यावा आणि त्यांना लवकरात लवकर या सर्व त्रासातून मुक्तता मिळावी व नवीन जीवन जगण्याचा मार्ग दिसावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

आपल्या देशातील धार्मिक, राजकीय व सामाजिक प्रश्नावर सखोल चिंतन व्हावे विधायक मार्ग शोधण्यासाठी सर्वस्तरावर चांगला सुसंवाद घडावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

आपण प्रत्येक जण देवाची मुले आहोत ह्याचे स्मरण करून आणि त्याप्रमाणे सतत एक सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हावा म्हणून आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

६. आपण आपल्या वैतिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment