Reflection for the 1st Sunday of Advent (03/12/2023) by Br. Roshan Nato
आगमन काळातील पहिला रविवार
दिनांक: ०३-१२-२०२३
पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, १९ब, ६४:२ब-७
दुसरे वाचन: १ करिंथ १:३-९
शुभवर्तमान: मार्क १३:३३-३७
प्रस्तावना:
ख्रिस्तात माझ्या प्रिय भाविकांनो, आज देउळमाता आगमन
काळातील पहिला रविवार साजरा करत आहे. आजच्या दिवसाची उपासना आपणा सर्वांना सावध, दक्ष आणि तयार
राहण्यास पाचारण करत आहे.
आजचे पहिले वाचन हे यशाया प्रवत्याच्या पुस्तकातून
घेतलेले असून ते आपल्याला परमेश्वराचा महिमा वर्णित सांगते कि, ‘हे परमेश्वरा तू
आमचा पिता आमचा त्राता आहेस, आम्ही माती आहोत व तु आमचा
कुंभार आहे, तर तू आम्हाला
तुझ्या मार्गातून का बहकू देतोस?’ अशा प्रश्नार्थक भावनेतून आपल्या
परमेश्वराची स्तुती करतो.
आजचे दुसरे वाचन पौलाचे करंथीकरास पहिल्या
पत्रातून घेतलेले आहे. या पत्रातून संत पौल आपल्याला येशू ख्रिस्ताच्या प्रकटी करणाची वाट
पाहत असता त्या दिवसापर्यंत आपण निर्दोषी राहावे म्हणून शेवटपर्यंत तोच आपल्याला
राखील असे आश्वासन देत आहे. तसेच आज शुभवर्तमान आपल्याला सावध राहून, घरधण्याने सोपवलेल्या जबाबदारीची अमलबजावणी
करण्यास, त्याच्या स्वागतास नेहमी
तयार राहण्या सांगत आहे. आज आपण या आगमन काळाची तयारीस सुरुवात करत असता आपल्याला प्रभु
ख्रिस्ताची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
आज देउळमाता आगमन काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजच्या दिवसाची उपासना आपणा सर्वांना सावध आणि तयार राहण्याचे आवाहन करत आहे. कारण ती घटका किंवा वेळ केव्हा आणि कधी येईल हे आपणा कुणालाही ठाऊक नाही.
आजच्या शुभवर्तमानातून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना
सावध राहाणे शिकवत असताना,
दाखल्याद्वारे एका घरधण्याबद्दल सांगतो की, एका धन्याने आपले घर
सोडून जात असताना, ते आपल्या नोकरांच्या स्वाधीन
केले आणि प्रत्येकाला आपआपली जबाबदारी समजावून देत असता दक्ष राहण्यास म्हणजे
सावधान राहण्यास सांगितले. या दाखल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे
दक्ष किंवा सावध राहण्याचे कारण म्हणजे तो घरधणी केव्हा व कधी येईल हे
कोणालाही ठाऊक नाही. म्हणून तो जेव्हा येईल त्यावेळी आपण झोपलेले नसावे किंवा
त्याने केलेल्या आज्ञांचे उल्लंघन करताना आपण त्याच्या हातात सापडू नये म्हणून, दक्ष किंवा सावध राहण्यास
सांगितले आहे. कोणत्याही वेळी आपला घरधण्याचे स्वागत करण्यास
तयार असावे म्हणून आपण आपणास प्रबोधन करत आहे.
आपले संपूर्ण जीवन लहानपणापासून ते मरणापर्यंत आपण आपली तयारी
करण्यात घालवत असतो. अंगणवाडीतून आपण आपल्या प्राथमिक शाळेच्या जीवनात, त्यानंतर
उच्चशिक्षण, मग नौकरी व व्यवसाय
तदनंतर लग्न आणि संसार, शेवटी म्हातारपण आणि मरण. अशा एकामागोमाग एक आपल्या
जीवनातील विशिष्ट टप्प्यांची तयारीस लागलेलो असतो. परंतु अगदी
प्रामाणिक राहून जर आपण कधी विचार केला, आणि स्वतःला प्रश्न विचारला की आपण कधी आपल्याला
परमेश्वर आणि वाढलेल्या आयुष्यासाठी तयार आहोत काय? किंवा तयार राहतो का नाही?
आपण आपले जीवन जगत असताना आपल्या उभ्या
आयुष्यात खूप अशा चांगल्या चांगल्या संधी आपल्यापुढे येतात. परंतु या सर्व संधींचा
फायदा घेण्यासाठी किंवा त्या वापरात आणण्यासाठी जे घाम, कष्ट आणि तयारी करावी लागते त्यामागे आपल्याला खूप काही
गोष्टी करायच्या राहून जातात. उदाहरणार्थ मौज-मज्जा, सहली, खेळ इत्यादि.
हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की,’ कुछ पाने के लिये
कुछ खोना पडता है.’ अगदी त्याच प्रमाणे आपण जर आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल जर विचार केला तर, आपल्या
आध्यात्मिक जीवनातसुद्धा अशा प्रकारचे अनेक चढ-उतार येतात. आपल्या
आत्म्याची तयारी असावी म्हणजे आपली “प्रार्थना”. जेव्हा येशू
ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर गेत्सेमनी बागेत प्रार्थना करण्यास गेले
होते तेव्हा, त्याचे शिष्य आपल्याला आलेल्या शारीरिक थकावामुळे झोपी जात
होते, तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की ‘जागे व्हा दक्ष राहा आणि
प्रार्थना करा’ (मत्तय २६:४०-४१).
होय अगदी अशाच प्रकारे आपल्या आध्यात्मिक
जीवनाची दशा आपल्याला आलेल्या शारीरिक थकावाटीमुळे, आजारामुळे, भरकटून जाते आणि आपले अध्यात्म खालावते. म्हणून या असल्या कारणास्तव आपली आध्यात्मिक
जीवनाची दिशाहीन करणाऱ्या फुटकळ कारणांना रामबाण उपाय आज आपला प्रभू येशू
ख्रिस्त आपणा सर्वांना देत आहे. तो म्हणतो की, दक्ष रहा किंवा सावध
रहा आणि नेहमी तयार असा कारण येणाऱ्या वेळेबद्दल कोणालाही ठाऊक
नाही. म्हणून आपण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी नेहमी प्रार्थना करून तयार राहिले पाहिजे.
प्रार्थनेत तत्पर याचे उत्तम उदाहरण
म्हणजे अमेरिकेतील सिनसिनाटी येथे १९७२ ते १९८२ मध्ये राहून गेलेले आज तदनंतर कार्डिनल पदाचे
मानकरी झालेले जोसेफ बर्नार्डीन आहेत. आपल्या परम दु:खातून परमानंद कडे (द गिफ्ट ऑफ पीस) या पुस्तकात
आपल्या वाचकांना आपली कॅन्सरग्रस्त कथा सांगत असताना उपदेश करतात की, ‘जोपर्यंत आपण
निरोगी आहोंत, तोपर्यंत खूप चांगल्या प्रकारे प्रार्थना करा
कारण, एकदा आपल्याला रोगाने किंवा आजाराने गाठले तर त्यामागील येणारा त्रास थकवा ही
प्रार्थना न करण्याचे सहज कारण बनू शकतात’.
आगमन काळ हा येशू ख्रिस्त येण्याचा काळ आहे. ज्याप्रमाणे
शुभवर्तमानांमध्ये घरचा धनी आपल्या शिष्यांना आपापली जबाबदारी देऊन सावध किंवा
दक्ष राहण्या सांगतो, त्यांचप्रमाणें आज येशु ख्रिस्त आपल्या सर्वांना
त्याची वेळ आली असता तो केव्हा व कसा येईल हे आपल्याला
ठाऊक नसल्याने तो आपल्याला आपली आध्यात्मिक तयारी पूर्ण करण्यास पाचारण करत आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आम्हाला तयार ठेव.
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू, व धर्म बंधू-भगिनी
ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती
त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर
असावे, पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या
आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
३. जी लोकं देऊळमाते पासून दुरावलेली आहेत व पापांच्या
अंधारात खितपत पडलेली आहेत, अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास त्याची
शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि त्यांना आपल्या अपराधांची जाणीव व्हावी, म्हणून प्रभूकडे
प्रार्थना करूया.
४. ह्या आगमन काळाची सुरुवात करत असताना आपण
सर्वांनी ख्रिस्ताचे रूप गरीब, अपंग, लुळे, व बहिरे ह्या सर्वांमध्ये पाहावे व त्यांना त्यांच्या
दु:खात व संकटात मदत करावी, ह्यासाठी लागणारी कृपा परमेश्वर चरणी मागुया.
५. चैनबाजी, अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हांला
व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना
करूया.