Reflection for the 33rd Sunday in Ordinary Time (19/11/2023) by Br. Roshan Nato
सामान्य काळातील तेहतिसावा रविवार
दिनांक: १९/११/२०२३
पहिले वाचन: नीतिसूत्रे:
३१:१०-१३, १९-२०, ३०-३१
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस
पहिले पत्र: ५:१-६
शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०
प्रस्तावना:
ख्रिस्तामध्ये माझ्या सर्व भाविकांनो, आज देऊळमाता सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना लहानातल्या लहान गोष्टीत
विश्वासू राहून, श्रम करून, जागृत राहण्यास आमंत्रण करत आहे.
आजचे पहिले वाचन नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले
असून, त्यामध्ये आपल्याला सदगुणी स्त्रीच्या हितकारक वर्तनाबद्दल स्तुती
करते. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, हे आपल्या
पहिल्या पत्रामार्फत थेसोलोनिकरांस काळ आणि समय याविषयी सांगत असता, आपल्याला
प्रभूच्या दिवसाने चोरासारखे गाठू नये म्हणून जागृत आणि सावध राहण्यास सांगत आहे.
त्याचप्रमाणे आजचे शुभवर्तमान आपल्याला लहानातल्या लहान गोष्टीत विश्वासू राहून स्वर्गीय सुखात सहभागी होण्यास पाचारण करत आहे. म्हणून परमेश्वराने केलेल्या या पाचरणास आपण सर्व सज्ज व्हावे म्हणून प्रार्थना करूया.
मनन चिंतन
आज देऊळमाता सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करत
आहे, आणि आजच्या दिवसाची उपासना आपणा प्रत्येकाला
परमेश्वराकडून मिळालेल्या कृपादानांचे, तसेच गुण
कौशल्याचे चीज
करून, आपल्याला बहाल
केलेल्या सर्व गोष्टींमध्ये विश्वासू राहून, आपल्या दैनंदिन
जीवनात स्वस्त व आळशी न बनता कुठल्याही कामात परिश्रम करण्यास आपल्याला पाचारण
करीत आहे.
आजचे शुभ वर्तमान आपल्या सर्वांना आवर्जून लहानातल्या
लहान गोष्टींमध्ये विश्वासू राहण्यास सांगत आहे. येशू ख्रिस्त ह्या दृष्टांतातून
आपल्याला आज खूप काही शिकवत आहे. या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे कोणा एका सावकाराने
आपण परदेशी चाललो असता आपली काही रक्कम आपल्या तीन दासांमध्ये ज्याच्या त्याच्या
कुवतीप्रमाणे वाटून दिली आणि तो आपल्या कामास निघून गेला, लागलीच ह्या दासांनी आपल्याला मिळालेल्या रक्कमेची गुंतवणूक
करून त्याच्याहून अधिक रक्कम बनवली. परंतु एकाने आपल्याला मिळालेल्या रक्कमेचे मोल न जाणता
ती रक्कम जमिनीत धूळ खात लपवून ठेवली आणि स्वस्थ राहिला. परंतु सावकार आल्यावर
आपल्या तिन्ही दासांकडून आपला हिशोब घेतला तेव्हा पहिल्याने पाचशेचे दहा हजार केलेले
पाहून तो आनंदित झाला, तसेच दुसऱ्याने दोनाचे चार हजार केलेले पाहून त्या दोघांना शाब्बासकी देत सांगितले की, “माझ्या भल्या आणि
विश्वासू दासांनो तुम्ही लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलात मी तुमची नेमणूक
पुष्कळांवर करीन.” परंतु जेव्हा शेवटचा दास सावकाराजवळ येऊन आपल्याला
मिळालेली पुंजी जशीच्या तशी ना कमी ना जास्त देत असता सावकाराला त्याचा राग अनावर
झाला नाही आणि त्याची ह्या दासाला शिक्षा म्हणून एका काळकोठडीत टाकण्यात सांगितले.
जेव्हा आपण या दाखल्याची फोड करून पाहतो वा सावकाराच्या
जागी परमेश्वर आणि दासांच्या जागी आपण सर्व मनुष्यांना ठेवतो तेव्हा
आपल्याला कळून चुकते की, परमेश्वराने आपणा प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमाणे
अगदी भरभरून काही ना काही विशेष दिलेले आहे. आपल्यातले काहीजण आपल्याला मिळालेल्या
कृपादानांचा सांगितलेल्या दृष्टांतातील दोन दासाप्रमाणे
आपल्याला देवाकडून मिळालेल्या गुण कौशल्यांना आपल्या श्रमाची जोड देऊन ते आपल्या
जीवनात पुष्कळ गोष्टींवर आपले प्रभुत्व गाजवत आहेत. याच वास्तूस्थितीला अनुरूप
असे आजच्या पहिल्या वाचनात नीतिसूत्रे या पुस्तकातील सद्गुणी स्त्रीच्या
प्रशंसेबद्दल आपल्याला कळते की जी स्त्री आपल्या सौंदर्याला भुलून न जाता देवाचे
भय धरून आपल्या हातांनी काम करते त्या स्त्रीला आपल्या श्रमाचे फळ मिळते आणि तिची भर वेशित प्रशंसा होते.
त्याचप्रमाणे आपण जेव्हा तिसरा दास म्हणजे जो आपल्या
सावकाराची रक्कम जशीच्या तशी परत करतो, त्या दासासारखे आपल्यातही काही व्यक्ती आहेत की, जे आपल्याला
देवाकडून उदारतेने जे काही भेटलेले आहे ते त्याची मोल न जाणता आपल्या आळशी, दुराचारी बुद्धीने आणि निश्रमाने आपल्या गुण
कौशल्यांना तिलांजली
देऊन एक रिकामटेकडे जीवन जगत आहेत. परंतु या असल्या
व्यक्तींना उद्देशून आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल सांगत आहे की, “बंधू जन हो
प्रभुचा दिवस येत आहे. तो दिवस कसा व केव्हा अगदी चोरासारखा येईल ते कोणास ठाऊक
नाही म्हणून स्वस्त, आळशी, रिकामटेकडे राहून
झोपी जाऊ नका तर जागी आणि सावध राहा. कारण आपण सर्व प्रकाशाची तसेच दिवसाची प्रजा
आहोत, रात्रीची वा अंधाराची नव्हे.”
माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराकडून आपणा सर्वांना खूप काही गोष्टी, म्हणजे काम करण्याची क्षमता, नोकरी, व्यवसाय आणि अनेक अशा चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्या जीवनात खूप अशी चांगली माणसं म्हणजे, आपले आई वडील, बंधू-भगिनी आपले नातेवाईक, शेजारी व मित्रमंडळी दिली आहेत. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक जगात प्रसिद्ध असलेले प्रसार माध्यमांची वेगवेगळी साधन उपलब्ध करून आपले जीवन अगदी सुखमय आणि सोयीस्कर करून ठेवले आहे. परंतु आज परमेश्वर आपल्याला या सर्व देणग्यांचा चांगला वापर करून आपल्यातील श्रम करण्याची क्षमता जाणून घेऊन या आपल्या ला बहाल केलेल्या देणग्यांची गुंतवणूक करून परमेश्वराचे वचन सर्व जगभर पसरवण्यास आणि परमेश्वराने दिलेल्या देणग्यांबद्दल विश्वासू राहण्यास पाचारण करत आहे. म्हणून त्याच पाचरणाला होकार देऊन विश्वासू जीवन जगण्यास आपल्याला कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१) पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी यांनीं देऊळमातेच्या
उन्नतीसाठी दिलेली आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२) आपल्या
ख्रिस्ती बंधुभगिनीना बाप्तिस्मा संस्काराद्वारे दिलेल्या आपल्या ख्रिस्ती
जबाबदारीकडे दुर्लक्ष न करता ती विश्वासाने पार पाडण्यास त्यांना देवाची कृपा
मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.
३) हे दयावंत
परमेश्वरा आम्ही विशेषकरून दीर्घकाळ आजारांनी ग्रस्त आहेत अश्या लोकांसाठी
प्रार्थना करतो. त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास दैवी शक्ती व कृपा लाभावी
व ईश्वरी स्पर्श्याने ते निरोगी बनावेत म्हणून तुझ्याकडे याचना
करतो.
४) आपण आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया की, येशूच्या शिकवणीप्रमाणे चालून परमेश्वराचा आमच्या
कामाद्वारे गौरव होण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment