Thursday 23 November 2023

 



Reflection for the Solemnity of Christ the King (26/11/2023) by Br. Jostin Pereira.




ख्रिस्तराज्याचा सण


दिनाक: २६/११/२०२३

पहिले वाचन: यहेज्केल ३४:११-१२,१५-१७

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६

शुभवर्तमान: मत्तय २५:३१-४६ 




प्रस्तावना:

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मोठ्या आनंदाने आम्ही देवाचा म्हणजेच आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताची, जो राजांचा राजा आहे, त्याचा राजेपाणाचा सोहळा साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा विषय आहे करशील जे गरीबांसाठी होईल ते माझ्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा राजा आहे. त्याचे राज्य कधीच संपणार नाही कारण त्याचे राज्य सर्वकालिक राज्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य होऊन आपल्यामध्यें आला. आज आम्ही हा सोहळा साजरा करत असताना, प्रभू येशू ख्रिस्त, आम्हा सर्वांना बोलावत आहे आणि सांगत आहे की, जेव्हा तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूजनांना चांगले करता ते तुम्ही माझ्यासाठी करता. जेव्हा आपण नम्र होऊन दुसऱ्यांची सेवा करतो, तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतो. याचे आपण भान ठेवून त्याच्या मार्गावर चालण्यास प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व सामर्थ्य आपणास लाभावे म्हणून या मिसाबलिदानमध्ये आपण प्रार्थना करू या.


मनन चिंतन:

“ख्रिस्त राज्याची सुवार्ता या जगीं सांगाल का, अल्लेलुया अल्लेलुया गौरवें गरजाल का?”

आज देउळमाता उपासना काळातील शेवटचा रविवार साजरा करीत आहे. आजच्या दिवशी आपण येशू ख्रिस्त हा विश्वाचा राजा आहे, ह्याचा सोहळा आपण साजरा करीत आहोत.

पोप पायस अकरावे, ह्यांनी १९२५ या साली ह्या सणाची स्थापना केली. हा सण साजरा करण्याचे कारण म्हणजे, पहिले विश्वयुद्ध संपले होते. जगात एकीकडे हुकूमशाही वाढत होती आणि हे तानाशाह लोकांचे शोषण करत होते. तर दुसरीकडे युरोप, रुस व मीक्सिको यथे धर्मनिरपेक्षता(Secularism), नास्तिकता(Atheism) व अज्ञेयवाद (Agnosticism) ह्यासारख्या विचारसरणीचा प्रसार वाढत होता. लोकांचा देवावरचा विश्वास उडालेला होता. प्रत्येक देश स्वतःला बलवान सिद्ध करण्यास प्रयत्न करत होता. अनेक हुकुमशाही स्वतःला उत्तम राजा सिद्ध करण्यास लोकांवर अन्याय करत होते. अशा वेळी पोप पायस विचार करतात की, लोकांचा विश्वास खरा राजावर असला पाहिजे. जो येशू ख्रिस्त आम्हा सर्वांसाठी क्रुसावर मरण पावला, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. या विचाराने या सणाची स्थापना करण्यात आली आहे.


करशील जे गरीबांसाठी होईल ते माझ्यासाठी, स्वर्गीचे सुख तुजसाठी’. शब्द आहेत आजच्या पवित्र शुभवर्तमानातले. आज अखिल ख्रिस्तसभा, अखिल विश्वामध्ये विश्वाचा राजा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याचा सोहळा आपण साजरा करीत आहोत. ख्रिस्त राजा हा आपल्या जीवनाचा राजा आहे. तो आपल्या कुटुंबाचा राजा आहे. तो आदि आणि अंताचा राजा आहे. तो जगाचा राजा आहे. असं आपण घोषित करत असतो. तरीसुद्धा या जगातील राजे, इतिहासातील राजे, आताचे राज्यकर्ते आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या जीवनामध्ये जमीन आस्मानाचा फरक असलेला आपल्याला आढळतो. राजांचा जन्म किंवा राज्य पुत्राचा जन्म राजवाड्यात होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा गाईच्या गोठयात झाला. जेव्हा राजा जीवनाच्या अंतिम क्षणास असतो मरत असतो तेव्हा त्याला सर्व सेवा पुरवल्या जातात. अनेक वैद्य आणि औषधे त्यांना पुरवली जातात. अनेक जीवनावश्यक व आधुनिक सेवा त्यांना पुरवल्या जातात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला जे मरण आले, ते मानव जातीच्या कल्याणासाठी, त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून क्रुसावरचे मरण आले. त्याच्याकडे इतर राज्यांसारखे वैद्य व औषधे नव्हती. ते कशा प्रकारचे मरण आहे ते आपल्याला येशू ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा इतिहास जेव्हा आपण वाचतो त्या वेळेला आपल्याला समजते. येशू ख्रिस्त इतका नम्र झाला कि, त्याने क्रुसावर मरण पत्करले आणि म्हणूनच परमेश्वर पित्याने प्रभूला उच्च केले आणि सर्वात श्रेष्ठ स्थान त्याला बहाल केले. आता तो परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान होऊन राज्य करत आहे. तो एक दिवस आपल्याला प्रगट होणार आहे. तो कशाप्रकारे दिसणार आहे आणि कोणत्या प्रकारचा त्याच्या आणि आपल्यामध्ये संवाद घडणार आहे याचं सुंदर असं विवेचन प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये देत असल्याचे आपल्याला आढळते.

माणूस या जगात जन्मास आला आहे, तो अमर नाही. तर माणूस या भूतलावर एक प्रवासी आहे. एक दिवशी त्याला मरणानंतर परमेश्वराच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावे लागणार आहे. ते कशा प्रकारचे प्रश्न असतील आणि मानवाचे उत्तर त्याला कसे असेल त्याबद्दलच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या शिष्यांना सांगताना आढळतो. आपण हे भौतिक जीवन जगत असताना, आपले मरणानंतर काय होईल याचा विचार करत नाही. परंतु प्रभू येशू आजच्या शुभावर्तमानामध्ये स्पष्टपणे सांगतो की, मरणानंतर जरी शरीर हे मातीला मिळले तरी आत्मा मात्र अमर असतो. आणि त्या आत्म्याचा न्याय होत असतो. या आत्म्यामध्ये नीतिमान आणि दुष्ट अशे आत्मे वेगवेगळे केले जातात. नीतिमान लोकांना मेंढराप्रमाणे उजवीकडे गोळा केले जाते आणि दुष्टांना डावीकडे केले जाते.


बंधू आणि भगिनींनो या प्रश्नामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते की, जे आपण गरीबांसाठी करतो तेव्हा ते आपल्यासाठी होत असते . जर मी भुकेलेल्यांना तहनेलेल्यांना त्यांच्या अवघड परिस्थितीमध्ये मदत करतो, तर माझी गणना त्या मेरामध्ये होते. म्हणजेच आपली गणना नीतिमानामध्ये होते, आपल्याला सर्वकालिक जीवन लाभते. त्याचप्रमाणे जेव्हा मी भुकेलेल्यांना व तहानेलेल्यांना मदत न करता, त्यांच्यावर दुर्लक्ष करतो, त्यांच्यासाठी मी एक पाण्याचा थेंबही त्यांना त्या अवस्थेत पाजवत नाही तर माझी गणना त्या दुष्ट लोकांमध्ये होत असते.

आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की, मी मेंढरु आहे की शेळी आहे? माझा जन्म फक्त माझ्यासाठी झालेला आहे, की दुसऱ्याच्या सेवेसाठी झाला आहे? जर माझा जन्म दुसऱ्यांच्या सेवेसाठी झाला असेल व त्या प्रकारची कृत्ये माझ्याने होत नसतील तर माझी गणना शेळ्यांमध्ये केली जाईल. जर मी मेंढरू असेल तर माझे जीवन दुसऱ्यांसाठी, माझ्या धर्मग्रामासाठी, गावासाठी, देशासाठी, गरीबांसाठी, वृद्धांसाठी व समाजाने तुच्छ लेखलेल्या लोकांसाठी समर्पित केलेले असे असावे व ते केल्याने माझी गणना मेंढरांमध्ये केली जाईल, असं सुंदर उदाहरण आपल्या निदर्शनास येते. आपल्या सर्वांचा न्याय करणारा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो राज्यांचा राजा आहे, ज्याने आपलं तारण केले आहे व आपल्याला पापांपासून मुक्त केले आहे त्याने मानवाचे स्वतःच्या रक्ताने कल्याण केले आहे. असा हा ख्रिस्तराजा शेवटच्या दिवशी आम्हा सर्वांचा न्याय करणार आहे. आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे कि, मेल्यानंतर माणसाला स्वर्ग आहे, तशाच नरकही आहे. आपल्या सर्वांना शाश्वत स्वर्गीय जीवन लाभावं यासाठी आपण देवाची मेढरे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमेन


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभोतुझे राज्य आम्हामध्ये येवो.

१. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्या सर्वांनी आपल्या कार्याद्वारे व शुभवार्ताद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषित करून सर्वत्र ख्रिस्ताच्या प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

२. समाजामध्ये ज्या लोकांना न्याय मिळत नाही अशा लोकांना ख्रिस्त राजाच्या कृपेने व आशीर्वादाने न्यायाचे वरदान मिळावे. त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबले जावे आणि त्यांना समाजाने सन्मान व आदर देऊन त्यांचा समाजामध्ये स्वीकार करण्यात यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

३. आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे व आपल्या देशाची व लोकांची निःस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

४. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत, विशेषतः दीर्घकाळ रोगाने बाधित आहेत, त्यांना ख्रिस्तराजाचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment