Reflection for the 4th SUNDAY IN ORDINARY TIME (28/01/2024) By Fr. Benjamin Alphonso.
दिनांक: २८/०१/२०२४
पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:३२-३५
शुभवर्तमान: मार्क १:२१-२२
सामान्य काळातील चौथा रविवार
प्रस्तावना:
आज पवित्र देउळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत
आहे. आजच्या चिंतनाचा मुख्य विषय म्हणजे, “येशु
ख्रिस्ताचा त्याच्या शब्दांवर आणि कृत्यांवर असलेला अधिकार होय”. आजच्या पहिल्या वाचनात अनुवादक
मोशेद्वारे देवाचा संदेश लोकांना सांगत आहे. देव लोकांमधून संदेष्ट्याची निवड करणार याची जाणीव आपल्याला या
वाचनातून दिसून येते. दुसऱ्या वाचनात संत पौल, विवाह म्हणजे काय, त्यांनी त्यांचे वैवाहिक जीवन कसे जगावे ह्याबद्दल बोध करत आहे. तसेच विवाहित स्त्री
आणि पुरुषाने जीवनात प्रभू येशूला अधिकाधिक महत्त्व देऊन, ख्रिस्ताची सेवा करावी म्हणून सांगत आहे.
शुभवर्तमानात येशू ख्रिस्त सभास्थानात अधिकाराने शिकवण देत आहे असे आपण ऐकतो: ह्याच अधिकाराने येशू ख्रिस्त अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याला मुक्त करतो, त्यामुळे सर्वलोक याविषयी थक्क होता.
आपण सर्वजण बाप्तीस्म्याद्वारे देवाचें निवडलेले लोक आहोत. येशू
आपल्याला त्याची सुवार्ता प्रसारित करण्यासाठी आमंत्रित करत आहे. आपण ते कार्य
प्रामाणिकपणाने व विश्वासाने करतो का? हा प्रश्न या मिसाबलिदानात स्वतःला विचारूया.
मनन चिंतन:
आपल्या दररोजच्या जीवनात आपण अनेक पुढारी/नेते पाहत असतो. परंतु काही ठराविक नेते आपल्या
जीवनावर छाप पाडत असतात, कारण
त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळ्या प्रकारची असते. ते अधिकारवाणीने व अनुभवाने
त्यांची मते व शिकवण आपल्या समोर मांडत असतात. आपण मराठीत म्हणतो “बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले.” होय, आपल्याकडे फार थोड्या नेत्यानी अशी उदाहरणे आपणासमोर ठेवली आहेत, व त्यांनी आपल्या शिकवणीद्वारे समाजात मोठा बदल
घडवून आणला आहे. त्यापैकीं
काही प्रसिद्ध व पवित्र लोक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, मदर तेरेसा, महात्मा गांधी व नेल्सन मंडेला हे होय.
आपण नेल्सन मंडेला ह्यांचे जीवन
पडताळून पाहूया.
नेल्सन मंडेला यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील
मेव्झो या भागात
झाला. त्याचे वडील ठेंबू जमातीचे प्रमुख
होते. ते नेल्सन
मंडेला ह्यांना धाडसी कथा
सांगायचे, आपल्या
लोकांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी
लढण्याची प्रवृत्ती त्यांना ह्या संस्कृतीच्या
प्रेमातून झाली. गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांवर कुठे-कुठे अन्याय केले आहेत ह्याची जाणीव त्यांना होती. आपल्या जाती
जमातीच्या नेतृत्वाची कल्पना त्याच्या संस्कृतीनिष्ठेतून त्यांना प्राप्त झाली. त्यांचे शिक्षण कॅथोलिक शाळेत झाले. तेथे त्याचे नाव नेल्सन
मंडेला हें देण्यात आले. ते जेव्हा जोहान्सबर्गला आले व त्यांनी काळ्या लोकांवर होत असलेला अन्याय बघितला व त्यांच्यातील
क्रांतिकारक जागा झाला. त्यांनी आपल्या लोकांच्या हक्कासाठी स्वतः कायद्याचा
अभ्यास केला होता. त्यांनी इतर आफ्रिकन देशांचा प्रवास
केला. १९५२ साली त्यांनी आपल्या लोकांचे नेतृत्व करायला सुरुवात केली.
मंडेलाची वाणी अधिकारवाणी होती. त्याने
आपल्या काळ्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा स्वीकारला व ते गोऱ्या लोकांविरुद्ध उभे राहिले. त्यांना जवळ
जवळ २७ वर्षाचा कारावास झाला, परंतु ते डगमगले नाही. १९९७ साली काळ्या लोकांना स्वातंत्र्य मिळाले,
त्यांना त्यांचे हक्क अधिकार नेल्सन मंडेला ह्यांनी मिळवून दिले. नेल्सन मंडेला आफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. नेल्सन मंडेला
याच्या यशाविषयी ते म्हणतात “दृष्टीकोण सकारात्मक असला म्हणजे यश धावून येते, मी आशावादी असून यशाचे स्वप्न पाहून
अखंड कष्ट करतो.”
येशू ख्रिस्त अधिकारवाणीने शिकवतो आणि
भूत लागलेल्या माणसाला मोकळे करतो. येशूच्या शब्दामध्ये शक्ती आहे. ह्या शक्तीचा अनुभव लोकांच्या दृष्टीने नवीनच
आहे. येशू आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करतो. आपल्या चुकीच्या कल्पना, सवयी किंवा अंधप्रथा यांच्यातून आपल्याला तो सोडवतो. तो आपले विचार सुधारतो.
आपण देव राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला समाजात असलेला भेदभाव, अनिष्ट रूढी व पद्धती दूर केल्या पाहिजेत. ह्यासाठी प्रभू येशू प्रमाणे अधिकारवाणीने बोलण्याचे व वागण्याचे गरजेचे आहे. आपल्याला न्यायची व देवाच्या प्रेमाची प्रस्थापना करण्याची काळाची गरज आहे. आपण संपूर्ण जीवन युद्ध करायला हवं. माणसे या युगात विशेषकरून मोबाइल, अनिष्ट पद्धतीत गुरफटलेले आहेत, त्यामुळे कुटुंबसंस्था, विवाह अडचणीत आले आहेत. ह्यापासून मनुष्याला मुक्त केले पाहिजे. ख्रिस्ताचे जीवनमूल्ये आपल्याला नवीन जीवन देऊ शकतात. ख्रिस्ताची अधिकारवाणी त्याच्या निर्मल जीवनातून तयार झाली होती. त्यांची मुळे स्वर्गात होती. आपल्या बाप्तीस्म्याद्वारे आपण देवाची मुले बनलो आहोत. आपलासुद्धा येशू ख्रिस्ता प्रमाणे महान देणग्या भेटल्या आहेत. आपण खऱ्या संदेष्ट्या प्रमाणे धाडसी बनण्याचा प्रयत्न करूया व अधिकाराने देवाचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझा शब्द कृतीत आणण्यासाठी आम्हाला शक्ती दे.
१. सर्व जगाला सेवेचा आदर्श देण्यासाठी
ख्रिस्ती महामंडळाच्या पदाधिकार्यानी विशेषकरून पोप फ्रांसिस, सर्व महागुरुनी आपल्या अधिकाराचा
वापर केवळ सेवेसाठी करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. आपल्या राष्ट्राच्या सर्व राजकर्त्यांनी आपल्या
जनतेची न्यायाने सेवा करून आपल्या राष्ट्राची प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना
करू या.
३. आपल्या धर्मग्रामाच्या बंधू-भगिनीनी आपल्या प्रभु ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची
घोषणा गर्विष्ठपणे आणि स्वाभीमानाने न करता ती नम्रपणाने करावी म्हणून प्रार्थना
करूया.
४. आपल्या देशात शांततेचे, अहिंसेचे आणि
माणुसकीचे वातावरण निर्माण करून सर्वांनी इतरांच्या सेवेसाठी प्रयत्न करावे म्हणून
आपण प्रार्थना करू या.
५. वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रार्थना करू
या.