Reflections for the Third Sunday In Ordinary Time (21/01/2024) by Br. Trimbak Pardhi.
दिनांक: २१/०१/२०२४
पहिले वाचन: योना ३:१-५, १०
दुसरे वाचन: १ करिंथ ७:२९-३१
शुभवर्तमान: मार्क १:१४-२०
सामान्य
काळातील तिसरा रविवार
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील तिसरा
रविवार साजरा करीत आहे. आज येशु ख्रिस्त मिशन कार्याला सुरुवात करताना आढळतो. आज पुन्हा एकदा आपणास पाचारणाची आठवण करून दिली जात आहे. आजच्या उपासनेतील
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रभू ख्रिस्त आपल्या पहिल्या शिष्यांना कसे पाचारण करतो
ह्याविषयी आपण ऐकतो.
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर योनाला पाचारण करत आहे त्याला परमेश्वराचा प्रवक्ता
बनण्यास पाचारण करत आहे.
परमेश्वर योनाला निनवेच्या पापी लोकांना त्यांच्या
पापांचा पश्चात्ताप
करायला सांगत आहे. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून तो तिथे चमत्कार घडवतो.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगत आहे कि, शेवट अगदी जवळ आला आहे, तो कोणत्याही क्षणी येईल म्हणून देवाच्या सानिध्यात राहण्यास आपणास आव्हान करत आहे.
आजच्या शुभवर्तमानात आपण पाचारणविषयी ऐकणार आहोत. येशु ख्रिस्त आपल्या मिशन
कार्यासाठी किंवा देवाची सुवार्ता गाजवण्यासाठी, शिष्यांची निवड करतो. शिष्य मागे-पुढे न पाहता अगदी मनापासून त्याच्या हाकेला सकारात्मकरित्या
प्रतिसाद देतात.
आपल्यालाही देवाने तसच पाचारण केलं आहे. देवाला आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असते. त्यासाठी आपल्याला आपली
वाईट वर्तणूक सोडून दिली पाहिजे. परमेश्वर आपल्याला बोलावित आहे त्याचं कार्य
करण्यासाठी.
आपण सर्वांनी
देवाने दिलेली ही जबाबदारी पार पाडावी. शुभवर्तमानात सांगितल्या प्रमाणे आपण देखील
मासे धरणारे नसून माणसे धरणारे बनूया.
मनन चिंतन:
आजची उपासना आपणाला पाचारणविषयी सांगत
आहे. जर एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितले
की, ही चाकू घे आणि त्या चाकूच्या साह्याने समोरचे झाड काप, तर ते ऐकून तुम्हाला
हसू येईल व तुम्ही म्हणाल, “ह्याला वेड तर नाही ना लागलं? कारण झाड तोडायला कुराड पाहिजे चाकू नव्हे.” परंतु परमेश्वर मात्र कधी-कधी
आपणाबरोबर असाच वागतो आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला करायला सांगतो. कस ते
आपण पाहूया....
जुन्या करारातला मोशे हा त्याच्या सासर्याच्या
शेळ्या पाळत असे.
परमेश्वर त्याला दर्शन देतो आणि इजरायेली लोकांचे, फेरो राज्याच्या तावडीतून सुटका करण्या सांगतो. परंतु मोशेला
ते अशक्य वाटले कारण कुठे तो मोठा बलवान फेरो व त्याचे सैन्य आणि कुठे हा निर्बल
व्यक्ती.
म्हणून मोशे देवाला म्हणतो कि, “मला
ते शक्य होणार नाही.”
तेव्हां परमेश्वर मोशेला म्हणतो कि, “मी तुझा बरोबर आहे”. तेव्हा देवावर विश्वास ठेवून मोशे इजरायेली लोकांची फेरो राजाच्या गुलामगिरीतून मुक्तता करतो.
पहिल्या वाचनानुसार योना नावाच्या
माणसाला परमेश्वर म्हणतो, “निनव्हेच्या पापी लोकांना त्यांच्या पापांचा पश्चाताप करायला जाऊन सांग.” तेव्हा योना घाबरतो व म्हणतो, तिथली लोकं माझं ऐकतील का? ते माझी चेष्टा नाही का करणार? मला ते ठार नाही का मारणार? योनाला हि अशक्य वाटणारी गोष्ट होती, म्हणून योना घाबरतो व पळून जातो.
परमेश्वर त्याला पुन्हा सांगतो, तु जा आणि निनव्हेच्या लोकांना पश्चातापाचा संदेश दे. आता मात्र योना देवाच्या शब्दावर
विश्वास ठेवतो आणि जातो. तेथे तो देवाच्या सहाय्याने चमत्कार घडवतो. योना निनव्हेत जाऊन लोकांना उपदेश करतो व त्याचा उपदेश ते मानतात.
दुसऱ्या वाचनात पौल आपल्याला आठवण करून देतो की, आपली वेळ कमी होत आहे म्हणून आपण सर्वांनी तयार
असले पाहिजे,
कारण पौलच्या
चेतावणीचा प्रत्येकावर
परिणाम होतो. विवाहित, अविवाहित ते शोक करणारे, आनंद
करणारे, श्रीमंत आणि
गरीब, नेते आणि
अनुयायी इत्यादि. हा
इशारा योग्य वेळी येतो. त्याद्वारे पौल आपल्याला देव आणि आपल्या जगाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाचे पुनरमूल्याकन करण्यासाठी बोलावतो. सुवार्तेचा
स्वीकार करणे आणि त्याबद्दल साक्ष देणे हे एक आव्हान आहे.
शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभु ख्रिस्ताचे शुभकार्य पुढे चालू
ठेवण्यासाठी तो अक्षीक्षित मच्छीमारांची निवड करतो. त्या काळातले लोक येशूला हे कृत्य करताना पाहून हसले असतील व म्हणाले असतील, ‘ही अशिक्षित
कोळी काय मदत करणार?’ तरी पण आपल्याला ठाऊक आहे की, या अडाणी अशिक्षित लोकांनी येशूची
शुभवार्ता जगाचा कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. अशा प्रकारे
परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो.
तर माझ्या प्रिय भाविकांनो, ज्याचा देवावर विश्वास आहे किंवा देवाच्या
शब्दावर विश्वास आहे त्यांना सर्व काही शक्य आहे. आज प्रभू येशू आपणाला
त्याच्या मिशन कार्यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे. हेच मिशनरी कार्य करण्यासाठी आपल्याला
आपलं घरदार अथवा वैयक्तिक कामकाज सोडून देण्याची गरज नाही. फार मोठा त्याग करण्याची आवश्यकता नाही, मात्र आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या परीने प्रामाणिकपणे जीवन जगून
गरजवंतांना मदत करून आपण देवाची सुवार्ता गाजू शकतो. खरं म्हणजे कार्य देव करतो आपण फक्त
त्याला सहकार्य केलं पाहिजे. असं म्हणतात की, फक्त
आपल्याला आवड असावी कारण आवड असली सवड आपोआप निर्माण होते.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा आम्हांला आशीर्वादित कर.”
१. ख्रिस्त मंडळाची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, व इतर सर्व ह्यांना संपूर्ण जगास
आध्यात्मतेच्यामार्गावर नेण्यास मार्गदर्शन व प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपले जीवन
परमेश्वराकडे वळवावे, वाईटाचा त्याग करावा म्हणून त्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराने द्यावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. वेगवेगळ्या संघटना आपल्या धर्मग्रामात
कार्यरत आहेत. परमेश्वराचे शब्द व प्रेम त्यांच्या विविध कार्याद्वारे घडून येवोत
व त्यांना त्यासाठी परमेश्वराचे बळ मिळो म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्त सभेची सेवा करण्यास आपल्या
धर्मग्रामातून अधिका-अधिक तरुण-तरुणींना पाचारण व्हावे व देवाचे प्रेम त्यांनी
अनुभवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, मृत्यूशी झुंजत आहेत, आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत अश्या
सर्व लोकांना प्रभूचे धैर्य व त्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment