Tuesday, 18 June 2024

Reflection for the 12th Sunday in Ordinary time by Br. Justin Dhavde


सामान्यकाळातील बारावा रविवार

दिनाक: २३/०६/२०२४

पहिले वाचन: - ईयोब ३८: १, ८-११

दुसरे वाचन: - २ करिंथ ५: १४-१७

शुभवर्तमान: - मार्क ४: ३५-४१



प्रस्तावना:

    आज आपण सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो आणि आईच्या गर्भाशयातच किंवा जन्मताच मी मरण का पावलो नाही असा प्रश्न विचारतो. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात, ‘ख्रिस्ताच्या प्रेमाच्या नियंत्रणाखाली आम्ही आहोत, जो कोणी ख्रिस्ताशी संयुक्त झालेला आहे तो ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती आहे असे सांगत आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त समुद्रातील वादळाला शांत करून शिष्यांना धीर देत असल्याचे आपण पाहतो.

     आपल्या जीवनात येणाऱ्या कितीतरी लहान-मोठ्या संकटाना पाहून आपण भयभीत होत असतो, परंतु येशू आम्हाला आमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी विशेष कृपा देत असतो. तीच विशेष कृपा ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असतांना मागूया.

मनन चिंतन:

एकदा एक प्रवाशी बोट सागरातून मार्गक्रमण करत असताना वादळात सापडते. तुफानी वारा आणि खवळलेला समुद्र पाहून सर्व प्रवाशी घाबरून गेले होते. मात्र एक चिमुकला मुलगा बिनधास्तपणे बोटीत खेळत होता. जेव्हा त्याला  विचारण्यात आल: “बाळा तुला भिती वाटत नाही का?” तेव्हा तो उत्तरतो: “नाही, कारण माझे वडील ह्या बोटीचे कप्तान आहेत आणि ते हि नौका कधीही बुडू देणार नाहीत.”

आजचे शुभवर्तमान आपल्याला महत्वाचा संदेश देत आहे. आपलं जीवन एका बोटीसारखे आहे व जग एका समुद्रप्रमाणे आहे. त्या समुद्रात कधी वादळ, संकटे येतात. जर आपण येशूवर विश्वास ठेवला तर तो आपली बोट त्या वादळातून समुद्र किनारी नेईल. परंतु बऱ्याचदा शिष्याप्रमाणे एखादे संकट दिसू लागल्यास आपला विश्वास ढासळतो व आपण अविश्वासू बनतो. प्रत्येकाच्या जीवनात वादळे, संकटे येतात मग ती लहान किंवा मोठी असतात. परंतु त्या संकटांना कश्याप्रकारे सामोरे जावे ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. शांतपणे, दृढ विश्वासाने वादळांचा सामना करता यावा, म्हणून देवाने संत पेत्राला शक्ती पुरवली. बऱ्याच वेळा देव आम्हालाही संकटातून वाचव असतो. तो आम्हाला मरणाच्या दाढेतून सोडवतो आणि काही वेळा आमच्या मरणाने आपल्या नावाचा गौरव करून घेतो (उदा. त्याचे विश्वासू शिष्य बनून जगल्याचा बहुमान आपल्याला मरणानंतर प्राप्त होतो).

आज्ञापालनाच्या वाटेने चालताना व प्रभू येशूच्या आज्ञा पाळताना छळाची वादळे उठली, संकटाचे वारे घोंगावू लागले, आणि दुसरी काही जरी आपत्ती आली तरीसुद्धा आपण त्याच्यावर सर्वस्वी विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव आपला राखण करणारा आहे. हेच आपण आजच्या शुभवर्तमानात तसेच इतर दोन्ही वाचनात ऐकले. तो आपला फक्त निर्माणकर्ताच नव्हे तर तो आपला संरक्षणकर्ता देखील  आहे. कधी-कधी आपल्याला वाटते जेव्हा आपण आज्ञाभंग करतो तेव्हा आपल्या जीवनात संकटे येतात, परंतु हे नेहमीच खरे असते असे नाही. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्या समुद्रातून प्रवास करावा लागतो. संकटे बऱ्याचदा माणसाला देवाच्या जवळ आणतात. उदा. जसे शिष्य येशूच्या जवळ आले. पहिल्या प्रथम ते घाबरले नंतर त्यांनी येशूला उठवले, कारण त्यांना ठाऊक होते, येशूच त्यांना ह्या संकटातून बाहेर काढील. चमत्कार हा महत्वाचा नव्हता तर त्याहून महत्वाचे होते शिष्य व येशू ह्याचा संपर्क, कारण येशू त्यांना घडवत होता. जीवनात त्यांना धाडसी बनवत होता.

  जशी इयोब व पेत्र ह्यांच्या जीवनात किती तरी वादळे व संकटे येऊनसुद्धा त्यांनी त्यांचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ दिला नाही तर तो कायम ठेवला, ते देवाच्या आज्ञेत राहिले, तसेच आपणसुद्धा आपल्या जीवनात न डगमगता देवावर विश्वास ठेवावा म्हणून आजची उपासना आपणा सर्वांस पाचारण करीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

1. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिसकार्डीनल्सबिशपफादर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनीह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

2. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व त्यांनी देवाकडे वळून एक नवीनविश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3. जी कुटुंबे दैनिक वाद-विवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेतत्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला भर यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

4.  जी दांपत्येअसून बाळाच्या देणगीसाठी वाट पाहत आहेतत्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थाना करूया.

5. ह्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस पडावा व सर्व प्राणीपक्षी व शेतीची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून प्रार्थना करूया. 

6. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment