Friday, 14 June 2024

 Reflection for the 11th Sunday in Ordinary Time (16/06/2024) By Br. Rockson Dinis.





                                सामान्य काळातील अकरावा रविवार

दिनांक: १6/०६/२०२4

पहिले वाचन:- यहेजकेल १७: २२-२४

दुसरे वाचन:- २ करिंथ ५:६-१०

शुभवर्तमान:- मार्क ४: २६-३४



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो की, ‘मी निचास उंच व जे स्वत:ला उंच असे मानतात त्यांना नमविल’. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथिकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये, ‘सांगतो कि देव आम्हामध्ये कार्य करत आहे व त्याचा आत्मा आम्हाला मिळाला  आहे ह्याच खात्रीमुळे संत पौल त्याचे जीवन धैर्याने जगत आहे. तर संत मार्कलिखित शुभवर्तमानात येशू देवराज्याची तुलना ‘मोहरीच्या बी’ बरोबर करतो. मोहरीचे बी दिसण्यात जरी लहान असले तरी रुजल्यानंतर ते सर्व झाडांमध्ये मोठे होते आणि त्याच्या सावलीत पक्षांना बसण्यास आसरा मिळतो. आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर जर आपल्या जीवनात वाढवला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते. म्हणून त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया व प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गराज्याची तुलना अनेक अशा छोट्या - छोट्या गोष्टींनी करीत आहे. स्वर्गाचे राज्य हे खमीरासारखे आहे, तर कधी स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवी सारखे आहे, तर कधी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे, तर कधी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्या सारखे आहे. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, स्वर्गाचे राज्य हे एक जमिनीत टाकलेल्या बी सारखे आहे.

असं म्हणतात की “नम्रता” हा सर्व गुणांचा भक्कम पाया आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की  जे स्वतःला उंच व गर्विष्ठ समजतात त्यांना प्रभू येशू ने खाली आणले आहे व जे नीच, व नम्रपणे जीवन जगतात त्यांना प्रभू येशूने उंच केले आहे.

प्रभूचे वचन ही सर्वात महान शक्ती आहे. जो कोणी व्यक्ती प्रभूचा शब्द अंतकरणांमध्ये एका  बी प्रमाणे रुजवतो व जगतो तो कोणालाच घाबरत नाही, कारण देवाचा आत्मा त्याच्यात कार्य करत असतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल म्हणतो की देव आम्हांमध्ये कार्य करत आहे व त्याचा आत्मा आम्हाला मिळाला आहे हयाच खात्रीमुळे संत पॉल त्याचे जीवन धैर्याने जगत आहे.

आजच्या शुभवर्तमानामध्ये संत मार्क आपल्याला आध्यात्मिक वाढीसाठी एका मोहरीच्या दाण्याचां दाखला सांगत आहे. ह्या मोहरीच्या दाण्या मागे काय असे विशिष्ट आहे, हे आज आपण समजून घेऊया.

माझ्या प्रिय बंधूंनो कुठल्याही मोठ्या झाडाची सुरुवात ही एका छोट्या बियाणे होते, म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग राज्याची तुलना एका छोट्या बी प्रमाणे करत आहे

मोहरीचा दाणा (बी) : मोहरीचा दाणा म्हणजेच येशू ख्रिस्ताचा “शब्द”, जो कोणी प्रभूचा शब्द अंतकरणात रुजवतो व नम्रतेने जीवन जगतो तो जीवनात सर्वात यशस्वी होतो.ज्याप्रमाणे जमिनीत रुजवलेली बी आवाज न करता शांतपणे वाढत असते, त्याच प्रकारे जो कोणी देवाचा शब्द हृदयात रुजवतो तो नम्रपणे त्या बी प्रमाणे वाढत असतो.

"एके दिवशी हेच लावलेलं बी सर्व झाडांमध्ये मोठे होते आणि त्याला मोठमोठ्या फांद्या फुटतात": म्हणजेच जो व्यक्ती देवाच्या वचनावर आपलं जीवन जगत आला आहे तो एक दिवशी महान व्यक्ती बनतो व त्याच्या सहाय्याखाली अनेक असे लोक कार्य करत असतात.  कारण ज्या प्रकारे झाडाची मुळे खोलवर जाऊन पूर्ण झाडास मजबूती देते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने देवाच्या वचनावर आपला पाया  उभारला तो त्या झाडाप्रमाणे मजबूत व महान बनतो, व ज्याप्रकारे आकाशातील पाखरे झाडाच्या सावलीत वस्ती करतात त्याच प्रकारे, अनेक गरजवंत लोक कष्टाने थकलेले लोक त्या व्यक्तीकडे आसरा घेण्यासाठी येत असतात.

प्रिय मित्रांनो, आपले डोके किंवा मन म्हणजेच एक बाग आहे, व आपले विचार ह्या बागेमध्ये बी आहेत, व ह्या बागेमध्ये फुले लावावीत की गवत लावायचे हे आपल्यावरती अवलंबून आहे. फुले लावल्यास म्हणजेच देवाचे वचन पाळल्यास अनेक लोक ज्याप्रकारे फुलांकडे आकर्षित होतात, त्याचप्रमाणे ते तुमच्याकडे आकर्षित होतील, पण जर का गवत लावल्यास म्हणजेच देवाचे वचन न पाळल्यास, ज्या प्रमाणे लोक गवतावरती चालतात त्या गवताप्रमाणे आपले जीवन होईल.

प्रिय भाविकांनो देवाने आपल्याला सर्वांना पवित्र आत्म्याचे दान दिलेले आहे तर त्याच पवित्र आत्म्याकडे आपण आज प्रार्थना करूया व देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत मागूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद :- हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

. यंदाच्या वर्षी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवाना चांगले पिक घेता यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

. जे कोणी आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत अशांना प्रभूचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करू या

. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजासाठी देवाकडे प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment