Friday, 7 June 2024

 



Reflection for the 10th Sunday in Ordinary Time by Br. Reon Andrades.




दिनांक: ०९/६/२०२४.  

पहिले वाचन: उत्पत्ती ३:९-१५

दुसरे वाचन: करंथीकरांस ४:१३-५:१ 

शुभवर्तमान: मार्क ३:२०-३५ 


सामान्य काळातील १० वा रविवार



प्रस्तावना:

आज आपण सामान्य करातील १०वा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास देवाशी आपले असलेले नातेसंबंध घनिष्ठ बनवण्यास पाचारण करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात उत्पत्ती या पुस्तकात आपणास ऐकावयास मिळते की, देव आदाम व एवा ह्या दोघांचा शोध घेत आहे. तो आपलं प्रेम त्याच्यावर व्यक्त करण्यासाठी व त्यांच्याशी आपले नातेसंबंध बनवण्यासाठी त्यांना बोलावत आहे. संत पौल म्हणतो, आपण एकाच आत्म्याने बांधलो गेलो आहोत, म्हणून आपण आपलं नातं जगाशी नव्हे, तर देवाशी व त्याने निर्माण केलेल्या निर्मितीशी नाते जोपासण्या सांगत आहे.

शुभवर्तमानात आपणास प्रभू येशू ख्रिस्त ठळकपणे सांगतो की, जे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे करता, ते त्याचे भाऊ, बहिण व आई आहेत. जर का आपणास देवाशी नातेसंबंध प्रस्थापित करायचे असतील तर एकच मार्ग असा आहे कि, देवाचें ऐकणे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे. आजच्या ह्या मिस्साबलीदानात आपण आपले नातेसंबंध देवाशी जुळवावेत ह्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

इंग्रजीमध्ये मरियामाते करीत एक गीत आहे, त्यातील काही ओळी अशा आहेत, “No one can live as an Island, journey to life alone….”. ह्याचा अर्थ म्हणजे कोणताही व्यक्ती एकागी जीवन जगू शकत नाही. जीवनाचा प्रवास एकटा करू शकत नाही, तर त्याच्या जोडीला कोणीतरी लागते, तरच तो दूरचा प्रवास करू शकतो. आज आपल्याला तंत्रज्ञानाच्या उगमामुळे एकटे जीवन जगायला आवडते तरीसुद्धा आपण जास्त वेळ एकटे राहू शकत नाही. आपल्याला कोणाची तरी साथ हवी असते, कोणाबरोबर तरी आपले नातेसंबंध बनवावे लागतात. आपण दुसर्यांसाठी जगत असतो. जुन्या काळात कठोर शिक्षा द्यायची झाली म्हणजे, त्याला समाजामधून बहिष्कृत केले जात असे. त्या काळात सर्वात कठोर शिक्षा म्हणजे हीच होती की, त्या व्यक्तीला एकटे राहावे लागत असे. आपण आयुष्यात वेगवेगळ्या लोकांची नातेसंबंध जोडत असतो, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, बहिण-भाऊ, प्रियकर-प्रियसी असले काही तरी नाते आपण जीवनामध्ये जोपासत असतो. हे सर्व आपण करतो कारण, आपल्याला कोणासोबत तरी राहाणे, कोणासोबत तरी जीवन जगणे आवडते व त्यांच्या सानिध्यात आपण स्वतःला सुरक्षित अनुभवत असतो. मित्रासोबत नातेवाईकांसोबत जीवन जगल्याने जीवनाचा पूर्ण आनंद आपल्याला घेता येतो म्हणून, आपण त्या लोकांसाठी दिवस रात्र परिश्रम करून, हे नातेसंबंध घनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करत असतो.

आजची उपासना आपणा सर्वास असाच काहीतरी संदेश देत आहे. परमेश्वर हां नातेसंबंधांचा देव आहे. आपला देव नातेसंबंधांचा (त्रैक्याचा) देव आहे ज्यामध्ये तीन व्यक्ती असून एक परमेश्वर बनत असतो. ह्याचा अर्थ म्हणजे, ते तीन व्यक्ती एकमेकांसोबत घनिष्ठ नातेसंबंध मध्ये राहत असतात. आपल्या देवाला, त्याने निर्माण केलेल्या निर्मित बरोबर नातेसंबंध जोडण्यासाठी आनंद होत असतो. ते नातेसंबंध जोडण्यासाठी दिवस रात्र अपनावर प्रेम करत असतो व आपली निगाह राहत असतो. हे नातेसंबंध जुळवण्यासाठी तो नेहमीच पहिले पाऊल उचलत असतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की, परमेश्वर आदाम व एवा ह्यांच्याशी संवाद साधण्यासाठी बागेत येतो व त्यांना प्रेमाने साद देतो. परंतु ते त्याची हाक ऐकून स्वतःला लपून घेतात.  जणू काही त्यांना परमेश्वराशी संवाद साधायचा नव्हता, त्याच्याशी नातेसंबंध त्याना जुळवायचे नव्हते. आपल्याला उत्पत्ति या पुस्तकामध्ये पहायला मिळतं की देवाला, त्यांनी फळ खाल्ल्याचे माहीत नव्हते. हा साहित्य लेखनाचा प्रकार आहे. परंतु खरं म्हणायचं झाला तर आपला देव ज्ञानाचा देव आहे, त्याला अगोदरच ठाऊक असेल की त्या दोघांने फळ खाली आहे, तरीसुद्धा  तो राग न बाळगता त्यांच्याशी बिघडलेले नातेसंबंध जुळवण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी तो बागेत येतो. तो त्यांना शिक्षा न देता त्यांच्याशी नातेसंबंध परत जोडण्यासाठी पुढे सरसावतो.

 दुसऱ्या वाचनामध्ये, संत पौल म्हणतो की, आपण एक आत्म्याने बांधलो गेलो आहोत. आपणामध्ये एक आत्मा आहे तो म्हणजे देवाचा आत्मा, म्हणून आपण एक-दुसऱ्यासाठी परके नसून एका विश्वासामुळे भाऊ बहिणी आहोत, म्हणून आपण एक दुसऱ्याला परके नसून एक दुसऱ्यांचे नातेवाईक आहोत. संत पौल म्हणतो आपण ह्या जगाचे नसून त्या देवाचे आहोत. जरी या जगातील जीवनात दुःख संकटे आली, आपण आपल्या देहाला हरवून बसलो तरी सुद्धा आपण अनंत काळाचे जीवन परमेश्वराद्वारे प्राप्त करत आहोत फक्त आपल्या विश्वासामुळेच हे साध्य होऊ शकते. आपण या जगाचे नसून त्या अनंत काळच्या जगाचे आहोत. याचा अर्थ असा नाही की हि सृष्टी अथवा ही निर्मिती वाईट आहे. ती वाईट नसून ती चांगली आहे कारण परमेश्वराने निर्मिलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असते.

 आज शुभवर्तमान मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आहे. मार्क या शुभवर्तमानकराची एक विशिष्ट लिहिण्याची पद्धत आहे त्याच्यामधली एक पद्धत म्हणजे इंग्रजीमध्ये सॅन्डविच कन्स्ट्रक्शन या नावाने ओळखली जाते. म्हणजेच एक गोष्ट संपण्या अगोदरच दुसरी गोष्ट  चालू होते आणि मग पहिल्या गोष्टीचा शेवट होतो. आपण पाहतो की, येशू आपल्या गावामध्ये आल्यानंतर त्याला आपले नातेवाईक व यरुशलेमहून आलेले पुरुषी त्याचा धिक्कार करतात त्याला नवे ठेवतात त्याला वेडा म्हणतात. अनेक  वेळी आपल्याला आपल्या नातेवाईका कडून तिरस्काराला सामोरे जावे लागत असते. आपल्या शेजारच्याकडूनही आपला छळ होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील तसाच काही तरी अनुभव, आपल्याला आढळून येत आहे.

मानवाचे देवाशी असलेले नातेसंबंध बिघडलेले होते, म्हणून देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतालावरती त्यांचा उद्धार करण्यासाठी हे बिघडलेले नातेसंबंध परत जुळण्यासाठी पाठवलेले होते. प्रभू येशू ख्रिस्त, हेच कार्य ह्या भूतलावर करत होता. हे कार्य करत असताना अनेक लोकांशी त्याचे पटले नाही व गैरसमज देखील झाला. तरीसुद्धा त्याने परमेश्वराच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिले. इथे प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाचे देवाशी असलेले नातेसंबंध कसे जोपासावे याचा मंत्र आपणास दिला आहे, तो म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे व त्याचे ऐकणे. जेव्हा त्याला सांगण्यात आले की, तुझी आई तुझे भाऊ तुला भेटण्यासाठी आलेले आहे आहेत तेव्हा त्याने उत्तर दिले माझी आई व माझे भाऊ बहिण तेच आहेत जे देवाचे ऐकतात व त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात. हा महामंत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आपणास आज दिल आहे तो आपण आपले जीवनात जोपासावा व त्याप्रमाणे वागावे म्हणजे, आपले नाते देवाशी अधिक घनिष्ठ होईल.

आजच्या शुभवर्तामानामध्ये दुसरा एक वृत्तांत आपल्या समोर मांडला आहे, तो म्हणजे देवाचे राज्य व सैतानाचे राज्य. सैतानाचे राज्य ह्या जगाचे आहे. तो या जगात बलवान आहे. जोपर्यंत तो बलवान आहे, तो शक्तिशाली आहे तोपर्यंत त्याला कसलीच काळजी नाही. परंतु  त्त्याच्याहून बलवाना, म्हणजे देव या जगात येतो व त्या सैतानाला बांधून त्याचे राज्य धुळीस मिळतो अथवा लुटून जातो याची भीती/ काळजी त्याला सतत लागलेली असते. ह्याचा अर्थ असा की, जरी आपण या जगात सैतानाचे राज्यामध्ये जगत असलो, तरी आपण ख्रिस्ताच्या राज्याची मूल्य जोपासावी व त्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी व सैतानाला बांधून चे राज्य लुटण्यासाठी आपणास आव्हान करत आहे. हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला देवाशी आपले असलेले नातेसंबंध घनिष्ठ करावे लागतील व त्याच्या मदतीने आपण त्या सैतानाला बांधू शकू व ख्रिस्ताचे राज्य या जगात स्थापित करण्याचा प्रयत्न करू. आमेन...


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा, दयेने आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सीससर्व बिशप्सधर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू-भगिनी ह्यांनी येशू ख्रिस्त हा खरा गुरु आहे आणि आपण सर्वजण त्याचे शिष्य आहोत ह्याची जाणीव लोकांना करून द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. अनेक तरुण-तरुणींनी ख्रिस्ताची “माझ्या मागे या” हि हाक एकूण त्याचा शिष्य होण्यास स्व:खुशीने पुढे यावे व ह्या त्याच्या निर्णयाला आई-वडिलांनी प्रोत्साहन दयावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जी मुलं शाळेत आणि कॉलेजात शिकत आहेत अशांना त्यांच्या अभ्यासात प्रभूने सहाय्य करावे आणि चांगले नागरिक होण्यास त्यांना योग्य ती कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जी तरुण पिढी आपल्या भावी आयुष्याची तैयारी करीत आहेतत्यांनी आपल्या कलागुणा व क्षमते नुसार योग्य त्या करियरची निवड करावी जेणेकरून ते जीवनात सुखी-समाधानी राहू शकतील म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपणास ह्या वर्षी चांगला पाउस मिळावा व आपल्या प्राथमिक गरजा भागवल्या जाव्यात म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

६. येथे जमलेल्या आपणा प्रत्येकाला येशूचे खरे व विश्वासू शिष्य होण्यासाठी आपणांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

७. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक गरजा ख्रिस्ता समोर मांडूया.


No comments:

Post a Comment