Reflection
for the 17th SUNDAY
IN ORDINARY TIME (28/07/2024) By Br. Trimbak Pardhi
सामान्य काळातील सतरावा रविवार
दिनांक – २८-७-२०२४
पहिले वाचन – २ राजे ४:४२-४४
दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:१-६
शुभवर्तमान – योहान ६:१-१५
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत.
आजची उपासना आपल्याला आपसात सुसंगतपणे राहण्यास आमंत्रित करत आहे.
आजच्या पहिल्या वाचनामध्ये अलीशा संदेष्टाने केलेल्या
बऱ्याच चमत्कारापैकी एका चमत्काराची नोंद केलेली आहे. एका उदार व्यक्तीने आणलेल्या
जवाच्या वीस भाकरी आणि काही कणसे शंभर माणसांच जेवण करून पुरून उरल्या होत्या.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास ख्रिस्ती ऐक्याची
मूलतत्वे म्हणजेच नम्रता, सौम्यता
व सहनशीलता याद्वारे एकमेकांना प्रीतीने वागून ऐक्य टिकून ठेवण्यास आव्हान करत
आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त पाच हजार लोकांना भाकर व मासळी देऊन
त्यांना तृप्त करतो. लोकाची भूक भागवून तो खरोखर देव आहे याची जाणीव करून देत आहे.
तेथे जमलेल्या लोकांनी येशू हा देव आहे हे ओळखावे या उद्देशाने येशू ख्रिस्ताने हा
चमत्कार केला.
ख्रिस्त स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, जी आपल्या दोन्ही, शारीरिक व आध्यात्मिक भूक भागवण्यास सामर्थ्य आहे. कोणतीही
परिस्थिती, येशू ख्रिस्ताला अवघड
वाटत नव्हती, त्याला सर्व काही
शक्य आहे. परमेश्वराचे उदारपण व दयाळूपणा ह्या आजच्या चमत्काराद्वारे स्पष्ट
झालेले आहे. देव आपल्याला क्षमतेपलीकडे व विपुल प्रमाणात देत असतो. जेणेकरून आपण
इतर गरजवंतांची मदत किंवा सेवा करावी.
बोधकथा
मदर तेरेजा आपल्या दोन सिस्टर्सला घेऊन कोलकात्याच्या
झोपडपट्टीत गरिबांना भेटी देत होत्या. त्यांच्या बरोबर चार-चार किलो तांदळाच्या
काही पिशव्या होत्या व त्या वाटून शेवटी एक पिशवी शिल्लक राहिली होती. मदर एका
विधवेच्या झोपडीत शिरल्या, त्या
विधवेची मुलं रडत होती, खायला
अन्न मागत होती. मदरनी ती शेवटची पिशवी तिला दिली आणि म्हटले, “एक आठवडा पुरव व नंतर आश्रमात ये.” त्या विधवेने सिस्टर्सला
बसायला सांगून मागच्या दारातून ती बाहेर गेली. सहा मिनिटांनी परतली मदरांनी
विचारले,
“अचानक कुठे जाऊन तू आलीस?” तिने उत्तर दिले, “मदर काही अंतरावर दुसरे एका विधवेची मुलं अन्नाकरता रडत
होती तर यातले अर्धे तांदूळ तिला देऊन आले.” मदरला आश्चर्य वाटलं की गरीब लोकांची
माणुसकी अजून कमी झालेली नाही. स्वतःला अन्नाची कमतरता असताना या गरजवंत स्त्रीने
स्वतःचा घास वाटला आणि दुसऱ्यांना खायला घातला. ही बाई खरोखर धन्य आहे. ईश्वर
आपल्याला कधीही सोडणार नाही यावर तिचा जबरदस्त विश्वास आहे.
मनन चिंतन
भूक लागते पोटात, जाणवते मनात, आणि चढते डोक्यात. पोटात लागली तर दुनिया कळते, मनात लागली तर माणुसकी कळते, आणि डोक्यात लागली तर लालसा जाणवते.
माझ्या प्रिय भाविकांनो मानवी जीवन जगत असताना, भूक हा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवी जीवनाची भूक कोणतेही
अन्न शांत करू शकत नाही. कारण मानवांची भूक ही कधी न संपणारी आहे. भूक
भागविण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज भासते,म्हणून आजची उपासना आपल्याला दुसऱ्यांची भूक भागविण्यासाठी
बोलावीत आहे ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त आज पाच हजार लोकांची भूक भागवीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात अलीशा चमत्कार करीत आहे. जेव्हा एका
उदार व्यक्तीने त्याच्या शेतातून नुकतीच काढलेली धान्याची कणसे, वीस जणांच्या भाकरी देऊ केल्या तेव्हा त्या सगळ्या
शिष्यांना पुरणार नाही, ही
त्याची स्वाभाविक समजूत होती. तरीही अलीशा संदेष्ट्याच्या चमत्काराने ती त्यांना
पुरून उरल्या होत्या.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास ऐक्याविषयी सांगत आहे.
मानवाने एकमेकांशी अति नम्रतेने सौम्यतेने वागण्यास, सनशीलतेने एकमेकांचे सहन करण्यास, ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकास वागवून घेण्यास संत पौल
आपणास सांगत आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला विविधतामध्ये जात, पंथ, रंगा
वरती वादविवाद दिसत आहे. म्हणून मानवांनी एकत्र राहण्यास, मतभेदाकडे दुर्लक्ष करून, एकमेकांशी जोडण्याचे मार्ग शोधले पाहिजे. जेणेकरून आपण
शांतपणे एकत्र राहू शकू. मानवी जीवनात जर
ऐक्य असेल तर दोन घरांच्या मधल्या झाडाला पाणी घालतील आणि जर ऐक्य नसेल तर त्या
झाडाला दोष देऊन झाडच कापून टाकतील. त्यामुळे एकदा सर्व माणसे एक झाली की बंध
तोडणे आणि वेगळे करणे कठीण असते.
माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या तीनही वाचनातून आपल्याला गरजवंतांना मदत करण्यास
पाचारण केले जात आहे. येशूला भेटण्यासाठी आलेले लोक कपर्णाहून ते बैथसैदा असं नऊ
मैलाचा प्रवास करून आले होते. साहजिकच प्रवास करून ते थकले असतील आणि भुकेले ही
असतील. येशूला त्यांना पाहून दया आली, येशूच्या हृदयात त्यांच्यासाठी कळवळा होता. म्हणून येशूने
आपल्या शिष्यांना जेवणाची व्यवस्था करावयास सांगितले. परंतु पाच हजार लोकांना
जेवणाची व्यवस्था करण्यास शक्य नव्हते. परंतु एका लहान बालकाकडे असलेल्या पाच
भाकरी व दोन मासे येशू जवळ आणण्यात आले. येशू ख्रिस्ताने त्या पाच भाकरी हातात
घेतल्या व देवपित्याचे आभार मानले. त्याने त्या भाकऱ्या मोडल्या. हवे तितक्या
त्यांना दिले. आपला प्रभू येशू किती समर्थ आहे. त्या पाच भाकरी आणि दोन मासळी खाऊन
पाच हजार लोक तृप्त झाले.
येशू ख्रिस्त हा देव आहे व हजारो लोकांना अन्न देण्यास
समर्थ आहे. परंतु त्यांनी आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. येशू ख्रिस्ताला
सर्व काही शक्य आहे.
तर
माझ्या प्रिय भाविकांना जगात हजारो लोक भुकेलेले आहेत. उपासमार हा देवाचा दोष
नाही. भूक ही श्रीमंती, लोभ, स्वार्थी यांनी निर्माण केली आहे. महात्मा गांधीजी म्हणतात
“ज्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे तो चोर आहे”. म्हणून आपण कोणाचाही हक्क हिरावून घेऊ
नये. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. भूक आणि अन्याय दूर करण्यासाठी एकमेकांना मदत
केली पाहिजे.
ज्याप्रमाणे बोधकथेतील एक विधवा बाई स्वतःचा विचार करत नाही, तर आपल्या शेजारी असणाऱ्या लोकांचा सुद्धा विचार करते व आपल्या वाटेतील अर्धा वाटा त्यांना देते व त्यांचीसुद्धा भूक भागवते. कारण पवित्र जेवणाच्या मेजावर येशू आमचा यजमान आहे आणि आणि आपण त्याच्या सहवासाचा आनंद घेत असतो. तो आपल्याला स्वर्गातून भाकर खायला देतो म्हणून कोणतेही अन्न नाश न होण्याची काळजी घेऊया आणि आनंदात व शांतीने जीवन जगूया.
विश्वासू लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: हे परमेश्वरा, आमची ओंजळ तू प्रेमाने भर
१.
ख्रिस्तसभेचे पुढारी पोप फ्रान्सिस तसेच बिशप्स व इतर सर्व सहकारी वर्ग, ह्यांनी देव प्रीतीचा संदेश संपूर्ण जगाला आपल्या
कार्याद्वारे द्यावा, व असे
करण्यासाठी त्यांना परमेश्वराचे योगदान लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२.
हे परमेश्वरा, सृष्टीतील वस्तूवर व
व्यक्तींवर अवलंबून न राहता, तुझ्यावर
विसंबून राहण्यास शिकव व आमचा विश्वास वाढव, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३.
समाजात जास्तीत जास्त देण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन जे गोर- गरीब आहेत, जे गरजवंत आहेत; अशा सर्वांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आजही आपल्या देशात अनेक लोकांना एक वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही, अशा लोकांची तू भूक भागवण्यासाठी उदार नागरिकांना पुढे पाठव, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपण आपल्या वैक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थाना करू या.