Reflection for the 14th
Sunday in Ordinary Time by Br. Jostin Pereira
सामान्य
काळातील चौदावा रविवार
यहेजकेल: - २:२-५
२ करिंथ: - १२:७-१०
मार्क: - ६: १-६
प्रस्तावना
आज
आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत.
आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्तावरील आपली श्रद्धा टिकवून ठेवण्यास आमंत्रित करीत आहे. चांगले कार्य करत असताना आपल्याला नेहमी संघर्षांना सामोरे जावे लागते. विशेष करून स्वतःच्या गावात कार्य करताना आपला स्वीकार होईलच असे नाही.
येशूच्या बाबतीत तसेच घडले. त्याला लोकांनी त्याच्या शिकवणूकीमुळे
स्वीकारले नाही. त्यामुळे प्रभुला जास्त काही महतकृत्ये स्वतःच्या समाजात करता
आली नाही. आपला अविश्वास आपल्याला चांगल्या गोष्टीपासून, चांगल्या माणसापासून दूर
ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला परमेश्वराच्या मळ्यात कार्य करीत असताना, स्तुती
बरोबर निंदा, व टीका आपल्या वाट्याला
येणार आहेत. परंतु आपण या कार्यामध्ये न डगमगता सतत पुढे जाण्यास, आपल्याला परमेश्वराची विशेष
कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
मनन चिंतन
माझ्या
प्रिय बंधू आणि भगिनींनो माणसाच्या जीवनात, एक प्रकारचा संघर्ष सुरू असतो आणि
प्रत्येक मनुष्य पापाच्या मोहाला बळी पडत असतो. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त
प्रत्येक वेळी आपल्याला जागृत करीत असतो. परंतु काही वेळी आपण त्याच्या दानाचा
स्वीकार करत नसतो. आपण प्रभूच्या शब्दाप्रमाणे चालत नसतो किंवा त्याप्रमाणे वागत
नसतो. हे आपल्याला आजचे तिन्ही वाचन सांगत
आहेत. आणि म्हणूनच हा अधिकार आपल्याला दिला
आहे. आपला संघर्ष आपणच करत असतो. जर माणसाने त्याच्या संघर्षाचा चांगुलपणाने वापर
केल्यास तो संघर्ष ही परमेश्वराची वाणी ऐकण्यास आपणास सहाय्यक ठरवू शकते. आपल्या
जीवनामध्ये चांगले आणि वाईट हे ठरवण्याअगोदर प्रथम प्रभू परमेश्वरावरती, आपला सदैव
विश्वास असला पाहिजे. जर आपण परमेश्वराला परमेश्वराच्या नजरेत पाहतो तर त्याचा
दृष्टीकोन चांगला असणार आणि वाईट असेल तर त्याचा दृष्टीकोन वाईट होणार आहे. कारण आपण
देवाच्या दृष्टीने पाहिलेच नाही. तर आपण माणसाच्या दृष्टीने पाहत असतो. हेच आपल्या
जीवनामध्ये सुद्धा होत असते. चांगले आणि वाईट आपण कोणत्या दृष्टीने पाहत आहोत, हे
खूप महत्त्वाचे आहे.
आजच्या
तिन्ही वाचनामध्ये आपल्याला तीन संघर्ष सादर करण्यात आलेले आहेत. पहिल्या वाचनात
आपण पाहतो, धार्मिक स्वरूपाचा संघर्ष. धार्मिक संघर्ष म्हणजे काय? आजच्या पहिल्या
वाचनात परमेश्वर यह्ज्केल संदेष्टाला आपल्या लोकांकडे पाठवतो. त्या लोकांचा नाश
होऊ नये, तर त्यांनी मागे फिरावे. पश्चाताप करावा आणि जगावे असे परमेश्वराला
वाटत होते. परंतु हे लोक ताठ मनाचे आणि कठीण मनाचे आहेत. त्यांनी पश्चाताप केला
नाही. त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि यह्ज्केलच्या संदेशाचे त्यांनी ऐकले
नाही. हे त्याला आधीच देवाने सांगितले होते की, हे लोक तुझे ऐकणार नाही. कारण हे
लोक कठीण मनाचे आहेत. गर्विष्ठ लोक आहेत आणि गर्विष्ठ माणूस देवाचा शब्द कधीच
आत्मसात किंवा प्राप्त करू शकत नाही. म्हणून या धार्मिक संघर्षातून जाताना यह्ज्केला
परमेश्वराचा शब्द दिलासा देत होता.
दुसऱ्या
वाचनात आपल्याला वैयक्तिक स्वरूपाचा संघर्ष दिसून येतो. संत पौल प्रामाणिकपणे,
आपले प्रेषितेय कार्य करत होता. परंतु त्याच्या शरीरात एक काटा होता, म्हणजे हा
त्याचा आजार असू शकेल किंवा त्याची दुर्बलता असू शकेल. परंतु संत पौल त्याला
सैतानाचा दूत म्हणून संभवतो. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे, आपण गर्विष्ठ होऊ नये,
म्हणून खुद्द परमेश्वराने केले असावे, असे पौल म्हणतो. आणि आपल्या अशक्तपणाची प्रौढी
आनंदाने मिरवितो. संत पौल आपल्याला सुद्धा सांगत आहे, तुमच्या अशक्तपणात तुम्ही
देवाकडे पहा, ख्रिस्ताकडे पाहा, म्हणजे सर्व काही शक्य होईल.
तिसरा
संघर्ष आपल्याला आजच्या शुभवर्तमानात दिसून येतो. तो म्हणजे सामाजिक स्वरूपाचा
संघर्ष. प्रभू येशू ख्रिस्त गालीलात फिरून सुंदर कार्य करत होता. तो जेव्हा नाझरेत
येथे आला, तेव्हा त्याला सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागले. त्याच्या ज्ञानावर
लोक थक्क झाले. कारण तो त्यांच्यापैकीच एक होता. आणि त्यांच्या या अविश्वासामुळे,
त्याची इच्छा असूनही तेथे प्रभू येशू ख्रिस्त
महतकृत्ये
करू शकला नाही. शुभवर्तमानात, शेवटचा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणजे,
ह्याशिवाय दुसरे कोणतेही महतकृत्य त्याला तेथे करता आले नाही. कारण त्यांच्या गर्विष्ठपणामुळे
व कठोरपणामुळे प्रभू येशूख्रिस्त महतकृत्य करू शकला नाही.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सुद्धा आपल्या जीवनात गर्विष्ठ किंवा कठोर होत असतो, त्यामुळे आपल्या जीवनात आपण कुठलेही महातकृत्ये करू शकणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना नम्रतेचा महामंत्र देत आहे आणि त्यासाठी आपण नम्र झालो पाहिजे. “नम्र होऊनी प्रभू तुज करितो वंदना. सर्वकाही माझे तू तुज करितो वंदना.” म्हणून आजच्या पवित्र मिस्साबलिदानामध्ये या तिन्ही संघर्षावरती मनन-चिंतन करूया. धार्मिक स्वरूपाचा संघर्ष, व्ययक्तिक स्वरूपाचा संघर्ष आणि सामाजिक स्वरूपाचा संघर्ष आणि पहा आपण कुठल्या संघर्षात येत आहोत. त्यावर मनन-चिंतन करूया आणि आजच्या मिसाबलीमध्ये प्रार्थनामय सहभाग घेऊया.
विश्वासू लोकांची प्रार्थना
प्रतिसाद:- नम्र होऊनी प्रभू तुज करितो प्रार्थना.
1. ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून,
त्याचे कार्य जगभर पसरविणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी
ह्या सर्वाना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा
म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. आपल्या जीवनात ख्रिस्ताला
अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात
सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
3. आपण प्रेषित कार्य करीत
असताना कौतुकाबरोबरच येणाऱ्या टिकेला, अडचणींना सामोरे
जाता यावे व अश्या प्रसंगाकडे आशावादी दृष्टीकोनातून पाहता यावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
4. आमच्या धर्मग्रामात जे लोक
आजारी आहेत त्यांना तुझा स्पर्श लाभू दे. तसेच जे लोक तुझ्या पासून दूर जात आहे
त्यांना तुझ्या प्रेमाची हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
5. आता आपल्या स्वतःच्या
कौटुंबिक हेतूसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment