Friday, 12 July 2024


Reflection for the 15th Sunday in Ordinary Time by Br. Roshan Nato


सामान्य काळातील पंधरावा रविवार

पहिले वाचन: आमोस ७:१२-१५

दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र १:३-१४.

शुभवर्तमान: मार्क ६:७-१३


प्रस्तावना

आज देऊळमाता सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करत आहे. आणि आजच्या दिवसाची उपासना आपणा प्रत्येकाला देवाने आपल्यासाठी आखलेली योजना जाणून घेऊन, एक आव्हानात्मक जीवन जगण्यास व देवाची सुवार्ता आणि त्याच्या मुक्तीचे व आरोग्याचे दान सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यास बोलावत आहेत.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, कशाप्रकारे परमेश्वर आपल्या प्रिय लोकांना आपला संदेश सांगण्यास आमोस संदेष्ट्याची निवड करतो. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या इफिसिकारास पाठवलेल्या पत्रातून, परमेश्वराने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडल्याबद्दल, तसेच आपल्याला पापमुक्त करून पवित्र आत्म्याच्याद्वारे शिक्कामोर्तब केल्याबद्दल देवाचा गौरव व आभार मानण्यास बोलावत आहे. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या निवडलेल्या बारा शिष्याना जवळ बोलावून देवराज्याची घोषणा करण्यास, कुठल्याही सुख-सोयींची आशा न बाळगता, भुते काढण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठवून देत आहे. म्हणून आपणही आमोस आणि बारा शिष्यांप्रमाणे परमेश्वराच्या हाकेला होकार देऊन देवाच्या योजनेप्रमाणे वागण्यास व जीवन जगण्यास सक्षम असावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन

      माझ्या प्रिय भाविकांनो देवाची योजना आपणा प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. देवाच्या योजनेत देवाने घेतलेला पुढाकार व माणसाने दिलेला प्रतिसाद याविषयी कळून येते. आजच्या वाचनामध्ये आमोस संदेष्ट्याला परमेश्वराकडून मिळालेल्या पाचरणाबद्दल ऐकतो की, कशाप्रकारे परमेश्वराने एका गुराख्याला तसेच एका माळ्याला, जो झाडाची निगा राखतो अशा मनुष्याला आपला संदेश, आपल्या प्रिय लोकांपर्यंत पोहोचवण्यास निवडले. पहिल्या वाचनात आमोस संदेष्ट्यासाठी देवाची योजना वेगळी होती.

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या पत्राद्वारे इफिसिकारास देवाच्या तारणदायी योजनेबद्दल त्याचा गौरव करण्यास सांगत आहे. “परमेश्वराने आपणाला आपल्या जगाच्या स्थापनेपूर्वी निवडून घेतले आहे.” म्हणून संत पौल आपल्याला ह्या पत्रातून, परमेश्वराने आपणास निवडून आणल्याबद्दल, आपल्याला पापातून मुक्त करून पवित्र आत्म्याच्याठायी शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्या दयाधनांचे आभार आणि गौरव करण्यास बोलावत आहे.

तसेच आजचे शुभवर्तमान, आपल्याला येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याना सुवार्तेची घोषणा करण्याअगोदर, केलेल्या उपदेशाबद्दल व अटीबद्दल वर्णन करत आहे. येशू ख्रिस्ताची आपल्या शिष्यांस आपले काहीही न घेता जगाच्या कानाकोपरात देवराज्याची घोषणा करून भुते काढून, रोग्यांना बरे करण्याची आखण्यात आलेली योजना आपणास कळते. या सर्व दृष्टांतांद्वारे, आज परमेश्वर आपणा प्रत्येकाला आपल्यासाठी देवाची योजना काय आहे. ते जाणून घेण्यास आव्हानात्मक हाक मारत आहे.

अशाच एका दैवी योजनेला प्रमाण मानून बाराव्या शतकातील एक तरुण परमेश्वराच्या प्रेमात अगदी गुरफटून गेला होता. आपल्या भूतकाली इच्छा, महत्वकांक्षा आणि एक धाडसी वीर होण्याच्या लक्ष्यावर दुर्लक्ष करून, आज तो परमेश्वराच्या प्रेमाखातर बेवारस जीवन जगून परमेश्वराच्या प्रेमाचा, दयेचा आणि शांतीचा संदेश आपल्या दीनदुबळ्या बंधूंद्वारे सर्व जगभर पसरवित होता. आणि आजही तोच संदेश आपल्या अनुयायीद्वारे पसरवित आहे आणि तो तरुण दुसरा तिसरा कोणीही नसून असिसिकर संत फ्रान्सिस होय.

माझ्या प्रिय भाविकांना जेव्हा असिसिकर संत फ्रान्सिस यांने देवाची हाक ऐकली तेव्हा, त्यांने आपल्या सर्व सुख-सोयीवर आळा घालण्याची वेळ आली. परंतु त्यांने माघार घेतली नाही. जे धाडस त्यांने आपले तारुण्य उज्वल करण्यास दाखवले, अगदी त्याच धाडसी वृत्तीने त्यांने आपल्यासाठी देवाने आपली आखलेली योजना पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले.  ही सर्व धडपड करीत असताना तेव्हा त्यांनेही येशु ख्रिस्ताच्या बारा शिष्यांप्रमाणे अनेक अशा आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यांने आपल्या सुख-सोयींसाठी लागणाऱ्या गोष्टीचा विचार न करता, परमेश्वराने निवडलेल्या कार्यासाठी आपले जीवन एका मेणबत्तीप्रमाणे झिजवले.

आज येशू ख्रिस्त आपणा सर्वांना आपल्या बारा शिष्यांप्रमाणे जवळ बोलावून, या आधुनिक जगातील सुख-सोयीवर आळा घालवण्यास पाचारण करत आहे. आज येशू ख्रिस्त आपणा सर्वांना एक उपभोगवादी पापवृत्तीला बळी न पडता, त्याच्या अनुयायाप्रमाणे गरजेयुक्त गोष्टीत संतुष्ट राहून, परमेश्वराचा शब्द, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यास आवाहन करत आहे. तसेच येशू ख्रिस्त आज आपणा सर्वांना आपल्याकडे असलेला धन संपत्तीचा योग्य तो वापर करून आपल्या समाजातील गरजू व्यक्तींना मदत करून परमेश्वराची उदारता इतरापर्यंत पोहोचवण्यास आपणास पाठवून देत आहे. याच दैवी योजनेला किंवा पाचरणाला योग्य तो प्रतिसाद आपणाकडून मिळावा म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :- हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1. आपल्या ख्रिस्तसभेचे आधारस्तंभ परमगुरु, महागुरू, धर्मगुरू यांनी प्रेषित कार्य करण्यास प्रयत्न करावे, यासाठी त्यांना परमेश्वराकडून शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.

2. आजच्या तरुण पिढीने प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी ईश्वरी पाचारणाला प्रतिसाद द्यावा म्हणून प्रार्थना करूया.

3. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांचे आजार व दुःखे हलकी व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

4. आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या समाजातील गरीब लोकांसाठी विकासाची कार्य करावेत व त्यातून खरा समाज बांधावा, म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करूया.

5. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment