Reflection for the 19th Sunday in Ordinary Time (11/08/2024) By Fr. Rakesh Ghavtya
सामान्य काळातील एकोणिसावा रविवार
दिनांक : ११/०८/२०२४
पहिले वाचन - १
राजे १९:४-८
दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र
४:३०- ५:२
शुभवर्तमान – योहान ६:४१-५१
प्रस्तावना
आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करत
आहे. तसेच आज ख्रिस्तसभा असिसीकर संत क्लेरचा सण साजरा करते. आजची उपासना आपल्याला
प्रभू येशू हा जीवन देणारा व सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवणारा असल्यामुळे
त्याच्यावरील आपल्या विश्वास व श्रद्धा दृढ करण्यास पाचारण करते.
आजचे पहिले वाचन राजे या पहिल्या पुस्तकातून आपल्याला हाच
बोध देते की परमेश्वर एलिया संदेष्ट्याला भाकर व पाणी उपलब्ध करून त्याला जीवन
देतो व होरेब या आपल्या डोंगरावर पोहोचण्यास शक्ती देतो.
दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसिकारास लिहिलेल्या पत्रात
म्हणतात की, प्रभूयेशुने आम्हावर प्रीती केली. त्याने स्वतःला आपल्याकरिता अर्पण व
यज्ञ म्हणून दिले त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्या प्रीतीने चालावे.
“मम
अंतरी तूच वसावे
प्रभु
श्वास तुझा मज दयावे
ओठी
शब्द तुजेची असावे
माझे
जीवन प्रभू फुल व्हावे
मम तरी
तूच वसावे”
मनन चिंतन
साक्ष
बारा वर्षा अगोदर जेव्हा मी रोम या शहरामध्ये माझा उपासनेच्या
(Liturgy) विषयावर अभ्यास करत होतो, तेव्हा घडलेली एक सत्य घटना तुम्हाला सांगू
इच्छितो व या घटनेद्वारे माझ्या जीवनाच्या प्रवासात घडलेली व अनुभवलेली खरी साक्ष
देतो.
सुट्टीचे दिवस होते व त्या दिवसात मी पादुआ या ठिकाणी एका
धर्मग्रामात मदत करण्यासाठी गेलो होतो. एके दिवशी अचानक मला एका व्यक्तीचा फोन आला
व फोनवरील व्यक्ती रडून असे म्हणत होती की, फादर माझी आजारी आई दवाखान्यात शेवटची
घटका मोजत आहे, ती काहीच बोलत नाही, ती हळूहळू डोळे मिटत आहे, कृपया तुम्ही लवकरात
लवकर बाजूच्या दवाखान्यात या आणि माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिचे हे शब्द ऐकून
लगेच मी मागचा-पुढचा विचार न करता दवाखान्यात धाव घेतली. दवाखान्यात पोहोचल्यावर
मी त्या आजारी बाईजवळ गेलो, तेव्हा ती शेवटचा श्वास घेत होती. तिची सर्व घरची
मंडळी तिच्या आजूबाजूला जमा झालेली होती. जशी मी प्रार्थना सुरू केली तेव्हा
माझ्या निदर्शनास आले की, ही आजारी बाई माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती, तिचे
डोळे जड झालेले व तिच्या मुखातून तिला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. तेव्हा मी तिला
विचारले बाई तुला काय पाहिजे? तुला काय हवं आहे? तेव्हा ती म्हणाली मला ख्रिस्त
हवा आहे. मला ख्रिस्ताला सेवन करायचे आहे. हे ऐकताच माझ्याजवळ असलेले खिस्तशरीर मी
तिला देण्यास जवळ गेलो. परंतु तिची बिकट अवस्था पाहून तिला फक्त ख्रिस्त शरीराचा
छोटासा अंक्ष पाण्याद्वारे देऊ शकलो. जसे तिने ख्रिस्तशरीर सेवन केले इतक्यात
तिच्या चेहऱ्यावर तेज पसरले. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले व ती बोलू लागली. मग
तिने खाटेवर बसून म्हटले, “माझ्या ख्रिस्ताने मला बरे केले. ख्रिस्ताचे नाव धन्य
असो. मला माझ्या ख्रिस्ताने नवजीवन दिले. मला आरोग्याचे दान दिले. मी ख्रिस्ताचे
आभार मानते.”
हे दृश्य पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो, कारण हा
आमच्या डोळ्यासमोर घडलेला चमत्कार होता. त्या क्षणी खरोखर आम्हाला वाटलं की, प्रभुने
तिला तिच्या विश्वासाने बरे केले. तिला नवजीवन बहाल केले. प्रभूचा गौरव असो,
प्रभुची स्तुती असो.
ही साक्ष सांगण्याचा व तुमच्या समोर देण्याचा माझा हेतू हाच आहे की, ख्रिस्त खरोखर भाकरीच्या रुपात
उपस्थित असतो. जो विश्वासाने ख्रिस्तशरीर सेवन करतो, त्याला प्रभू येशू स्पर्श
करून आरोग्याचे दान देतो. कारण प्रत्येक पवित्र भाकरीत ख्रिस्त हजर असतो. म्हणून
आपण विश्वासाने हे मानायला हवे की, ख्रिस्त हा जीवन देण्यास व सर्वकालिक जीवनाचा
मार्ग दाखवण्यास आला आहे. त्यामुळे या ख्रिस्ताची आपण जवळून ओळख करणे गरजेचे आहे.
त्याचा अनुभव घेणे अगत्याचे आहे.
आजच्या शुभवर्तमानावर आपण नजर टाकली तर आपल्याला असे दिसून
येईल की, प्रभूयेशुने स्वतः विषयीची ओळख करून देताना तीन पवित्र वचनांद्वारे
स्वतःला प्रकट केले.
(१) मी
स्वर्गातून उतरलेली भाकर आहे.
(२) मीच जीवनाची भाकर आहे.
(३) स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे.
यावरून आपल्याला कळून येईल की, प्रभूयेशुला स्वतःविषयी
पुरेपूर ओळख होती व ते स्पष्ट करताना प्रभू मधील दैवीपणाची व अधिकाराची आपल्याला
जाणीव होते. प्रभू येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे व त्याला या भूतलावर सर्वांना
जीवन देण्यासाठी, सर्वांचे तारण करण्यासाठी व सर्वांना सार्वकालीक जीवनाकडे
नेण्यासाठी पित्याने पाठवले. म्हणूनच योहानलिखित अध्याय ३: १६-१७ मध्ये आपण ऐकतो, “देवाने
जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो
कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन
प्राप्त व्हावे व जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.”
आज खरी गरज आहे ती आपल्या प्रभूवरील विश्वास अढळ करण्याची,
कारण आपल्याला जे वरदान हव आहे ते देणारा एक मात्र प्रभू येशू आहे. या संदर्भात
खुद्द प्रभुने म्हटले आहे, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले
आहे.” (योहान ६: ४७)
जे काही प्रभूयेशुने मानव जातीच्या कल्याणासाठी केले
त्यामध्ये त्याने स्वर्गीय पित्याला श्रेय दिले. म्हणूनच प्रभूयेशूने म्हटले आहे, “मी
स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचे इच्छेप्रमाणे करावे
म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहान ६: ३८). प्रभूयेशुने आम्हाला त्याचा देह
दिला की त्याच्या बलिदानाने आम्हा प्रत्येकाचे तारण व्हावे. खुद्द प्रभू
आमच्यासाठी जिवंत भाकर झाला. प्रत्येक मिस्साबलीदानात प्रभू येशू, भाकरीचे रूपांतर
त्याच्या पवित्र शरीरात व द्राक्षरसाचे रूपांतर त्याच्या पवित्र रक्तात करतो. हाच
सर्वात मोठा चमत्कार घडवून, आमच्यासाठी स्वतःचे समर्पण करतो. आजही ख्रिस्ताची वाणी
हरएक मिस्साबलिदानात आपण ऐकू शकतो.
घ्या नी
खा देह माझा
छिन्नविछीन्न
तुमच्यासाठी,
घ्या
नि प्या रक्त माझे
घळघळ वाहे तुमच्यासाठी.
जर येशू आम्हासाठी एवढा मोठा त्याग करतो तर आम्हीही त्याच्यासाठी थोडा तरी त्याग करायला हवा. येशूची आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही, तसेच त्याला कुठलाही मोबदला नको आहे पण आम्ही आपल्या परीने आपल्या ख्रिस्ती विश्वासात व श्रद्धेत वाढायला हवे. आजच्या उपासनेत भाग घेत असताना, आपण प्रभू येशूच्या दुःख, मरण व पुनरुस्थानाच्या रहस्यात सहभागी होऊन याच प्रभू येशूची ओळख जवळून करूया.
विश्वासू लोकांची प्रार्थना
धर्मगुरू: बंधू-भगिनींनो आपण प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून
उतरलेली जिवंत भाकर आहे, हे सत्य मानून घेऊन त्याची ओळख करून घेऊया. कारण त्याच्या
सेवनाने आपल्या सर्वकालिक जीवन लाभते. म्हणून स्वर्गीय
पित्याकडे प्रभूयेशूच्याद्वारे आपल्या सर्व विनंत्या व गरजा विश्वासाने व
श्रद्धेने ठेवूया.
आपला प्रतिसाद :- स्वर्गीय प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१) हे स्वर्गीय पित्या आमचे
पोप महाशय
फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू, सिस्टर, ब्रदर्स व विश्वासू भावीक यांना तुझ्या कृपाछायेखाली ठेव, त्यांना तुझ्या
सेवेत अनेक आशीर्वादांचा अनुभव यावा व प्रत्येक घडामोडीत तुझ्या उपस्थितीची
त्यांना जाणीव व्हावी. म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो.
२) हे दयाळू पित्या, आम्ही आमच्या सर्व
सामाजिक व राजकीय पुढाऱ्यासाठी विशेष प्रार्थना करतो की, तू त्यांना
समाजकार्य करताना तुझी प्रेरणा दे, म्हणजे ते लोकांच्या हितासाठी झटून माणुसकीचा आदर्श
इतरांसमोर ठेवावेत. म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो.
३) हे प्रेमळ पित्या तुझी
नजर सर्व आजारी, वृद्ध, निराधार, दुबळे व गरीब यांच्यावर असू दे की जेणेकरून या सर्वांना चांगले
आरोग्य लाभावे, आसरा मिळावा व त्यांच्या गरजांमध्ये अनेकजण धावून यावेत. म्हणून प्रार्थना
करूया.
४) ह्या पवित्र मिसाबलिदानामध्ये
उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांवर देवाचे आशीर्वाद यावेत व आम्ही सर्वांनी ख्रिस्ताला भाकरीच्या
रूपाने सेवन करताना, भक्तिभावाने आमच्या अंतकरणाची तयारी करावी. म्हणून प्रार्थना
करूया.
धर्मगुरू: हे सर्व शक्तिमान पित्या, तुझी महिमा गौरव व स्तुती असो, कारण तू आमची प्रत्येक गरज पूर्ण करतोस व आम्हाला तुझ्या प्रेमाचा अनुभव देतोस. आज आम्ही सादर केलेल्या सर्व गरजा व विनंत्या तुझ्या चरणाजवळ श्रद्धापूर्वक अंतकरणाने ठेवले आहेत. त्यांचा स्वीकार कर व तुझ्या दयेने त्या पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन
No comments:
Post a Comment