Reflection for the 26th Sunday in Ordinary Time (29/09/2024) By Fr. Gilbert Fernandes
सामान्य काळातील सव्विसावा रविवार
दिनांक: २९/०९/२०२४.
पहिले वाचन: गणना ११: २५-२९.
दुसरे वाचन: याकोबाचे पत्र ५: १-६.
शुभवर्तमान: मार्क ९: ३८-४३, ४५, ४७-४८.
प्रस्तावना
आज आपण सामान्यकाळातील
सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला देवाचे खरे शिष्य बनण्यास
पाचारण करीत आहे.
पहिल्या वाचनात मोशे
आपल्या सेवाकार्यात हातभार लाभावा म्हणून इस्त्राएल लोकांतून सत्तर नेत्यांची निवड
करतो. याकोबाचे पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात धनवानांनी केलेली
कामकऱ्यांची पिळवणूक आणि त्यांच्या मजुरीवर चैनबाजी व विलास करणारे धनवान
ह्यांच्या जुलुमाचे प्रतिफळ काय असणार ह्याविषयी ऐकतो. तर मार्कलिखित शुभवर्तमानात, येशूने आपल्याला देवाच्या सेवाकार्यात इतरांचे सहकार्य घेऊन
एकत्रितपणे कार्य करण्यास सांगितले आहे.
परमेश्वर त्याचे कार्य
पुढे चालू ठेवण्यास आम्हा प्रत्येकाला आमंत्रण देत असतो व त्याच्या हाकेला साद
देण्याचे स्वातंत्र्यही तो आम्हांला बहाल करत असतो. ख्रिस्ताचे खरे शिष्य बनून
त्याचे कार्य करण्यास ईश्वरी प्रेरणा आपणास मिळावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात
प्रार्थना करू या.
मनन चिंतन
“जो आपल्या विरुद्ध नाही तो आपल्याला
अनुकूल आहे”. प्रिय बंधु-भगिनीनो, आजची उपासना आपल्याला
ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास व त्याचे खरे शिष्य होण्यास बोलावित आहे.
ख्रिस्ताचे कार्य हे फक्त ख्रिस्तीयांसाठी मर्यादित नाही तर अख्रिस्ती सुद्धा
ह्याचा भाग आहेत. ह्याचा प्रत्यय आपल्याला आजच्या शुभवर्तमानात पाहायला मिळतो. एक
मनुष्य ख्रिस्ताच्या नावाने भुते काढत होता. कदाचित ह्या मनुष्याने ख्रिस्ताविषयी
ऐकले असेल. कारण येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. त्यावेळी प्रख्यात
देवमनुष्याचे नाव घेऊन लोकांस बरे करणे हि प्रथा पॅलेस्टाईन प्रदेशात प्रचलित
होती. आणि म्हणून हा मनुष्य येशू हा एक दैवी रूप आहे हे जाणून येशूच्या नावाने
लोकांस बरे करणे व भुते काढण्यास यशस्वी ठरतो. येशूचे शिष्य हे दृश्य पाहून थक्क
झाले. आपण येशूच्या अधिक जवळ असून सुद्धा लोकांना बरे करण्यास असफल ठरलो ह्या
गोष्टीची त्यांना ईर्ष्या वाटली म्हणून योहानाने येशूकडे तक्रार केली. पण येशूने
त्याला सरळ शब्दांत त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. येशू म्हणाला, “जो आपल्या
विरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे.” ह्याचाच अर्थ म्हणजे त्या मनुष्याला
लाभलेले सामर्थ्य हे देवाकडून होते. देव त्याच्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता
पसरवित होता.
आज खिस्त आपणास काय
सांगत आहे? मोशेने
ज्याप्रमाणे परमेश्वराचे कार्य करण्यासाठी सत्तर जणांची मदत घेतली व परमेश्वराचे
कार्य पूर्णतेस नेले. येशू ख्रिस्ताने जसे आपल्या पित्याचे कार्य पुढे चालू
ठेवण्यासाठी बारा प्रेषितांची व बहात्तर (७२) शिष्यांची निवड केली. येशूच्या
शिष्यांनी ज्याप्रमाणे देवाच्या सेवाकार्यात हातभार लाभावा म्हणून बाराव्या
प्रेषिताची आणि पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुषांची
निवड केली (प्रेषितांची कृत्ये १:१२, ६:१-७). त्याचप्रमाणे
आपणही परमेश्वराचे कार्य करण्यासाठी इतरांची मदत घ्यायला हवी. योहानाप्रमाणे तो
किंवा ती ख्रिस्ताचा/ची अनुयायी नाही असे म्हणू नये. तर संत पौलाने करिंथकरांस
लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, “कृपादानांचे निरनिराळे
प्रकार आहेत, तरी आत्मा
एकच आहे; सेवा
करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे; आणि
कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व
कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी ऐकेकाला
होते. कारण आत्म्याच्याद्वारे एखाद्याला ज्ञानाचे वचन, तर कुणाला
विद्देचे वचन, तर कुणाला
विश्वास, तर कुणाला
निरोगी करण्याची कृपादाने, तर कुणाला अदभूत कार्ये करण्याची शक्ती, तर कुणाला
संदेश देण्याची शक्ती, तर कुणाला आत्मे ओळखण्याची शक्ती, तर कुणाला
विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व तर इतरांना भाषांचा अर्थ सांगण्याची
शक्ती मिळते; तरी हि
सगळी कार्ये तोच एक आत्मा करितो, तो आपल्या
इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देतो” (१ करीथ १२: ४-११). आपणासमोरील लोकसमुदाय फार
मोठा आहे. आपणाला ह्या जगात जर देवाचे सेवाकार्य प्रस्थापित करायचे असेल तर आपण
इतरांचे सहकार्य मागितले पाहिजे. मग ते सहकार्य देशाच्या नेत्याचे असो वा
राष्ट्रपतीचे, तो गावाचा
नगराध्यक्ष असो वा गावाचा पाटील असो. जर आपण ‘एकत्रितपणे व संघटीतपणे कार्य केले
तर देवाचे राज्य ह्या भूतलावर प्रस्थापित करू शकतो’. देवाचे हे कार्य करण्यासाठी
आपले एकमत असू द्या. कारण ‘एकीचे बळ मिळते फळ’. एकटा एकाचवेळी प्रत्येक ठिकाणी
पोहचू शकत नाही. एकटाच सर्वकाही करू शकत नाही. म्हणून जर अन्यायाविरुद्ध लढा
द्यायचा असेल तर एकाने मुक्याची वाच्या व्हायला हवे, तर दुसऱ्याने
आंधळ्याचे डोळे, तर तिसऱ्याने
लंगड्याची काठी, तर
चौथ्याने अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे.
आज आपण आणखी एक
महत्त्वाचा धडा शिकला पाहिजे तो म्हणजे देव रहस्यमय मार्गांनी कार्य करतो आणि तो
माणसांप्रमाणे तर्क करत नाही. म्हणूनच, तो यशया
संदेष्ट्याद्वारे आपल्याला सांगतो: “माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत आणि माझे विचार
तुमचे विचार नाहीत. जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे विचार आणि माझे मार्ग
तुमच्यापेक्षा उंच आहेत” (यशया ५५: ८-९). इथे इतकेच सांगायचे आहे की, त्याच्या
आत्म्याला मोशेच्या दर्शनमंडपा बाहेरील लोकांमध्ये आणि येशूच्या शिष्यांमध्ये
कार्य करण्यास अनुमती देऊन, देव आपल्या मानवांपेक्षा खूप चांगले पाहतो. तो ज्याला
पाहिजे त्याची निवड करतो आणि त्याच्या ध्येयासाठी त्याला किंवा तिला सक्षम करतो.
तसेच, त्याची
इच्छा आहे की आपण सर्व त्याच्या मुलांनी त्याच्या आत्म्याने परिपूर्ण व्हावे
जेणेकरून सर्वांच्या हृदयात आपण त्याचे राज्य स्थापित करू शकू.
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे
प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१. हे परमेश्वरा
तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे कार्य करण्यास
शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी
म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे तरुण-तरुणी
देवापासून दूर गेले आहेत, जे
व्यसनाच्या आहारी गेले आहेत, ज्यांना
नोकरी नाही, अश्या सर्वांना
प्रभूने त्याच्या प्रकाशात आणावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. जी कुटुंबे दैनिक
वादविवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या
कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून
४. जी दापत्ये अजून
बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची
प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्यांचे जीवन आनंदमय व्हावे
म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करू या.