Reflection for the 25th Sunday in Ordinary Time (22/09/2024) By Fr. Pravin Bandya
सामान्य काळातील पंचविसावा रविवार
दिनांक २२/०९/२०२४
पहिले वाचन – शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०
दुसरे वाचन – याकोब ३:१६,४:३
शुभवर्तमान – मार्क ९:३०-३७
“जो
स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल; आणि जो स्वतःला नमवितो
तो उंच केला जाईल.”
प्रस्तावना
“जो
स्वतःला उंच करतो तो नमविला जाईल; आणि जो स्वतःला नमवितो
तो उंच केला जाईल.”
आज आपण सामान्यकाळातील पंचविसावा रविवार
साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणास ‘नम्रतेचा’ धडा शिकवत आहे. नम्रता हा गुण
आपल्या प्रत्येकांमध्ये फार महत्वाचा असतो.
कारण आपण जेव्हा नम्र होतो; तेव्हा आपण देवाच्या
योजनेत आपले स्थान ओळखतो. जेव्हा आपण नम्र होतो; तेव्हा आपण इतरांच
ऐकतो व त्यांना आपणासमोर उच्च स्थान देतो.
आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की, दुर्जन
नीतिमानांचा छळ करू पाहतात; कारण ते त्यांना त्यांच्या वाईट कामात अडथळा आणतात व
शास्त्राप्रमाणे त्यांची कानउघडणी करतात. परंतु परमेश्वर नेहमी नीतिमानांच्या
बरोबर असतो; तो
त्यांचा बचाव करतो, त्यांना सहाय्य करतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकोब
आपणास खरे व खोटे ज्ञान ह्यांविषयी सांगतो की, “वरून येणारे ज्ञान हे
मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत
होण्यायोगे, दया व
सत्फाळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.”
पुढे तो सांगतो कि, “तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही; कारण
तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या
चैनीकरता खर्चावे म्हणून मागता.” तसेच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या मृत्यू
बद्दल दुसऱ्यांना भाकीत करतो की, “मनुष्याचा पुत्र
माणसांच्या हाती दिला जाणार; ते त्याला जीवे मारतील; आणि मारला
गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल.” तसेच पुढे ख्रिस्त आपल्या शिष्यांना
नम्रतेचा एक उत्तम धडा शिकवतो की “जो कोणी पहिला होऊ पाहतो त्याने प्रथम सर्वांत
शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.” अशाच प्रकारची नम्रता अपणा सर्वांना मिळावी
म्हणून प्रार्थना करूया.
बोधकथा:
एकदा एका शेतात एक सुंदर असं फुलाच रोपटं
होत. त्याच्याच बाजूला थोडसं गवत होत. हे फुलाच रोपटं दरदिवशी त्या गवताला दोष देत
असे कि, “तुझा कसलाच उपयोग नाही. तू कुणालाही आवडत नाहीस. तू माझ्या बरोबरीने
केव्हाच येऊ शकणार नाही. तू फक्त खाली जमिनीवर रेंगत राहशील. परंतु मला बघ; मी
किती सुंदर आहे. अनेक लोक मला बघायला येतात. माझ्या फुलाचा सुगंध घ्यायला येतात.
आणि बघ मी कसा आकाशाकडे उंच वाढत आहे.” अशा प्रकारे ते फुलाचे रोपटे त्या गवताला
दोष देत असे; परंतु ते गवत काहीही न बोलता हे सर्व नम्रपणे ऐकत असे. ऐके दिवशी
त्या ठिकाणी सुसाट्याचा वारा आला आणि ते फुलाच झाड वर आकाशाकडे असल्या कारणाने
लगेच खाली कोसळले; व काही दिवसात त्याला मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. परंतु
हे गवत नेहमी प्रमाणे जमिनीवर पसरत गेले कारण त्याची मुळे जमिनीला घट्ट पकडून
होती.
मनन चिंतन
ह्या काल्पनिक कथेतून आपणास भरपूर काही
शिकायला मिळते की, इतरांच्या व्यर्थ बडबडीला प्रतिउत्तर देण्याऐवजी
नम्रतेने सर्व ऐकून घेतलेले बरे. कारण हिंदी मध्ये एक म्हण आहे,
“अपना टाईम आएगा.” म्हणून आपल्या वेळेसाठी थांबलेल
बरं. जेव्हा आपल्यात नम्रता नसते तेव्हा आपण अति आत्मविश्वासी
बनतो आणि आपण स्वतःला इतरांपेक्षा उच्च मानतो ज्यामुळे आपण इतरांशी आदराने वागत
नाही व त्यामुळे आपलं त्यांच्याशी नात तुटून जात.
आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या
शिष्यांना आपल्या मरणाविषयी भाकीत करतो; परंतु त्यांना काहीच समजत नाही; कारण ते
सर्व ‘आपल्यामध्ये सर्वात महान कोण?’ या विषयी चर्चा करत होते. म्हणून ख्रिस्ताला
त्यांच्या कडून काहीच उत्तर मिळत नाही. ह्या वेळेला ख्रिस्ताला काय वाटलं असेल?
कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यासमोर त्यांचे दुःख जाहीर करते; तेव्हा आपण
त्यांना सांत्वन देतो; त्यांना दिलासा देतो. परंतु शिष्यांनी ख्रिस्ताला दिलासा न
देता, आपणामध्ये सर्वात मोठा कोण याविषयी चर्चा करण्यास जास्त महत्व दिले; कारण
यावेळेला सर्वांमध्ये गर्व होता. ते सर्व नम्रता विसरून गेले. तीन वर्ष ख्रिस्ता
बरोबर राहून देखील; तीन वर्ष ख्रिस्ताचा अनुभव घेऊन देखील ते सर्व विसरले की,, आपणामध्ये सर्वात मोठा किंवा महान खुद्द ख्रिस्त आहे;
कारण तो देवाचा पुत्र आहे; स्वतः देव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सर्व
ख्रिस्ताकडून नम्रतेचा धडा शिकण्यास कमी पडले; कारण त्यांनी कदाचित त्याच्यावर
जास्त लक्ष दिले नसेल. ख्रिस्त स्वतः देवाचा पुत्र असून देखील तो आपणा सारखा
मनुष्य झाला. स्वर्ग सोडून तो आपणासाठी ह्या भूतलावर आला. म्हणूनच ख्रिस्त त्यांना
म्हणाला की, “जो कोणी पहिला
होऊ पाहतो त्याने प्रथम सर्वांत शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
कधी कधी आपण देखील आजच्या शुभवर्तमानातील
शिष्यांसारखे वागतो. विशेष करून जेव्हा आपण प्रार्थना करायला बसतो, जेव्हा आपण
पवित्र मिस्सामध्ये भाग घेतो किंवा जेव्हा आपण एखाद्या कुणा धर्मगुरुच प्रवचन ऐकत
असतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी आपलं लक्ष दुसरीकडे
असते. प्रभू शब्दावर मनन चिंतन करण्या ऐवजी आपण आपल्याच विचारांमध्ये गुरफटलेले
असतो. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला त्याचं महत्व द्यायला शिकलो पाहिजे. जेव्हा आपण
प्रार्थना करणार तेव्हा प्रार्थनाच केली पाहिजे. कारण जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा
आपण प्रार्थना करत नाही. मग प्रार्थना करीत असतांना आपण दुसरे विचार कशाला आणायचे?
जगाच्या नजरेत महान असणं महत्वाचं नसून
प्रभूच्या दृष्टीने महान असणं महत्वाचं आहे; कारण तो स्वःताला नम्र करणाऱ्यांना
उंच करतो. म्हणून आपण नम्र होण्यास परमेश्वराकडे प्रार्थना करूया की, “नम्र
हृदय तव येशू जैसे मजला लाभावे.”
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे प्रभू आम्हाला
तुझ्यासारखे नम्र बनव.
१) आपल्या ख्रिस्तसभेत
अखंडरीत्या कार्य करणारे परमगुरु, महागुरू, धर्म-गुरु आणि धर्म-भगिनी व इतर सर्व ख्रिस्ती-बांधव जे
देवाचे कार्य पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने
ख्रिस्तामध्ये नम्र होऊन करत आहेत, या
सर्वांना देवाने चांगले व निरोगी आरोग्य बहाल करावे, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२) नैसर्गिक
आपत्तीमुळे अनेक लोक रस्त्यावर येत असतात, त्यांची
पुष्कळ अशी हानी होत असते. ह्या सर्वांना प्रभूने दिलासा द्यावा व त्यांना नव्याने
जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून, आपण
प्रार्थना करूया.
३) जे लोक आजारी आहेत
अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास
सहनशीलता व शक्ती मिळावी, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या देशाच्या
आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण
अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी
निःस्वार्थीपणाने झटावे, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५) थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment