Tuesday, 3 September 2024

 Reflection for the 23rd Sunday in Ordinary Time (08/08/2024) By Fr. Brian Motheghar

सामान्य काळातील तेविसावा रविवार

दिनांक: ०८/०९/२०२४.

पहिले वाचन: यशया ३५:४-७.

दुसरे वाचन: याकोब २:१-५.

शुभवर्तमान: मार्क ७:३१-३७.


प्रस्तावना

आज आपण सामान्यकाळातील तेविसावा रविवार साजरा करीत आहोत. आज ख्रिस्तसभा धन्य कुमारी मरिया म्हणजेच आपल्या सर्वांची स्वर्गीय आई पवित्र मरियेचा जन्मोस्तव साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला देवाच्या तारणदायी प्रेमाविषयी आणि आनंदाविषयी स्पष्टीकरण देत आहे.

     पहिल्या वाचनात यशया संदेष्टा भविष्याविषयी उत्तेजनक उत्तर देत म्हणतो, ‘भिऊ नका पहा तुमचा देव; तुमचा उद्धार करावयास येत आहे. अनुरूप असे प्रतिफळ द्यावयास तो येत आहे. दुसऱ्या वाचनात याकोब हा, देव कोणत्याही प्रकारचा भेदभाव करीत नाही, त्याच्यासाठी सर्वजण सारखेच आहेत अशा प्रकारची ग्वाही देत आहे. तर  शुभवर्तमानात येशू आपल्या कृतीद्वारे देवाच्या चांगुलपणाविषयीची साक्ष देतो, तो त्याच्या  दैवी स्पर्शाने मूक आणि बधीर माणसाला बरे करतो. 

आज येशू आपणा सर्वांना आपल्या हृदयाचे दार उघडे ठेवून इतरांना आदराने वागविण्यासाठी सांगत आहे. आजू-बाजूला घडणाऱ्या गोष्टींची दखल घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास बोलावीत आहे व त्यासाठी लागणारी कृपा-शक्ती आपणास मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात परमेश्वराकडे प्रार्थना करुया.

बोधकथा

       मायरा ब्रूक्स वेल्च, "द टच ऑफ द मास्टर्स हँड" या त्यांच्या कथेत, एका माणसाची कथा सांगताना त्या सांगतात की, एक व्यक्ती त्यांच्या मृत वडिलांच्या संगीत संग्रहात सापडलेली जुणी व्हायोलिन लिलावासाठी ठेवतो, हा लिलाव चालू असताना, पहिल्या आणि दुसऱ्या बोलीकर्त्यांनी अनुक्रमे १० आणि २० डॉलर्सची किमत केल्यानंतर व्हायोलिन फक्त ३० डॉलर्समध्ये विकले जाणार होते. तिसरा बोली लावणारा ३० डॉलर्समध्ये व्हायोलिन घेण्याच्या तयारीत होता, तेव्हा तेथे एक वयोवृद्ध माणूस पुढे येऊन, त्याने व्हायोलिन उचलून, त्यावरची धूळ झाडून, त्याला ट्यून केल्यानंतर ते तो वाजवायला सुरु केले. त्या माणसाने इतके गोड संगीत वाजवले की, त्याच्या मधुर आणि मनोरंजक आवाजाने शेकडो प्रवासी आकर्षित झाले आणि लक्षपूर्वक ऐकू लागले. जेव्हा त्याने व्हायोलिन वाजवलं तेव्हा लोकांना त्या व्हायोलिनची खरी किंमत समजली. बोली लगेचच हजारो डॉलर्समध्ये वाढली. शेवटी ५०,००० डॉलर्समध्ये त्या व्हायोलिनचा लिलाव झाला. धुळीने माखलेल्या जुण्या व्हायोलिनचे मौल्यवान वाद्यात रूपांतर कशामुळे झाले? गुरूंच्या हाताच्या स्पर्शाने.

मनन चिंतन

       ख्रिस्तामध्ये प्रिय भाविकांनो, तोच “गुरूंचा हाताचा स्पर्श” (येशू ख्रिस्त) आजही आपले जीवन बदलत आहे. आजच्या शुभवर्तमानात, आपण येशूचा स्पर्श आणि परिणामी बरा झालेला बहिरा आणि तोतरा असलेल्या माणसाला पाहतो. या माणसाने गुरु येशूचा दैवी स्पर्श अनुभवला आणि त्याची स्थिती बदलली. तो खरोखरच एक स्पर्श होता ज्याने त्याची गमावलेली आशा, त्याचे मूल्य परत करून त्याला धीर दिला आणि पुनर्संचयित केले. त्याने परमेश्वराचे लेकरू म्हणून त्याच्या अस्तित्वाला तितकाच अर्थ दिला. वरील कथेतील धूसर निरुपयोगी व्हायोलिन ज्या वयोवृद्ध माणसाच्या स्पर्शाने मौल्यवान आणि कार्यक्षम बनले, त्याचप्रमाणे बहिरेपणा आणि मूकपणामुळे ज्या बहिऱ्या माणसाचे बाजार मूल्य कमी झाले होते ते येशू ख्रिस्त निर्माता आणि तारणकर्त्याच्या विशेष स्पर्शाने पुन्हा मौल्यवान बनले (इब्री १२:२). त्याचप्रमाणे, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जीवनातील आव्हाने आणि जीवनातील वाईट परिस्थितींमुळे त्यांची किंमत मूल्ये आणि अस्तित्वाची किंमत काही कारणास्तव कमी झालेली अनुभवली आहे. आपल्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्यासाठी गुरु येशूचा दैवी स्पर्श फार मोलाचा आहे.

       आजचे पहिले वाचन येशूला येणारा मशीहा म्हणून सादर करते ज्याच्या प्रभुत्वाच्या स्पर्शाने प्रत्येक स्थिती बदलते: “तो तुम्हाला वाचवायला येतो. मग आंधळ्यांचे डोळे उघडतील, बहिऱ्यांचे कान मोकळे होतील, लंगडे हरिणाप्रमाणे उडी मारतील, आणि मुक्यांची जीभ पुन्हा गाईल.” आजच्या शुभवर्तमानात आपण जे पाहतो ते एका युगानुयुगे केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता झाली आहे असे आपल्या निदर्शनास येते; आपल्याजवळ असा देव आहे जो कधीही चुकत नाही (स्तोत्र. १०४:१०; ३७:२५).

       प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात मूकपणा आणि बहिरेपणा हे सामाजिक-सांस्कृतिक आणि मानसिक-आध्यात्मिक बाधा होत्या. ग्रीक भाषेत बायबलमध्ये एक अत्यंत असामान्य शब्द वापरण्यात आला आहे तो म्हणजे “मोगिलालॉन” त्याचा शब्दशः अर्थ म्हणजे बोलण्यात अडचण येणे. आजच्या शुभवर्तमानातील बहिऱ्या आणि तोतऱ्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला आहे; त्याला काहीच ऐकू येत नव्हते कारण अनेकदा बहिरेपणा आणि मुकेपणा यांचा संबंध असतो, कारण मनुष्य ऐकून बोलायला शिकतो. ज्या व्यक्तीला स्वतःचा आवाज किंवा इतरांचा आवाज ऐकू येत नाही त्याला शब्द उच्चारण्यात अडचण येत असते. अशी स्थिती मनुष्याला मोठ्या प्रमाणात हतबल करत असते कारण, विशेषकरून जी सांकेतिक भाषा आणि इतर संप्रेषण मदत आजच्या युगात ठळकपणे अस्तित्वात आहेत त्या त्याकाळी अस्तित्वात नव्हत्या म्हणून अशा व्यक्तींना खालील त्रास सहन करावा लागत असे:

(१) “सामाजिक भेदभाव”

सुसंगतपणे ऐकू आणि बोलू शकत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला समाजात जवळजवळ अलिप्तपणाचा अनुभव येत असतो कारण ज्या समाजामध्ये ऐकणे आणि बोलणे ही संवादाची प्राथमिक साधने आहेत, अशा मनुष्याजवळ संपूर्णपणे समाज निःशब्द होताना आपल्याला आढळते. असा मनुष्य इतरांशी तोंडी संवाद साधण्यापासून रोखला जातो. मार्क ७:३२ मधील "अडथळा" या शब्दाचा अर्थ असा नाही की तो आवाज काढू शकत नव्हता परंतु त्याला बोलण्यात खूप अडचण येत होती. मार्कच्या शुभवर्तमानात असे म्हटले आहे की येशूने त्या माणसाची जीभ “मोकळी” केली, ज्यावरून ही समस्या जन्मजात असल्याचे सूचित होते. त्यामुळे लोकांशी व्यवहार करताना त्याला भेदभावाला सामोरे जावे लागत होते. म्हणून त्या व्यक्तीला हा सामाजिक आणि भेदभाबाचा कलंक सहन करावा लागत होता.

(२) “सांस्कृतिक कलंक”

समाज अशी एक संस्कृती आहे जिथे शारीरिक अपंगत्व आणि आजारपण सामान्यतः एखाद्या व्यक्तीच्या पापीपणाची चिन्हे म्हणून व्याख्यातली जातात. अशा मनुष्याला भूमीच्या अपवित्रतेची किंवा पिढीच्या शापाची परिणामी शिक्षा भोगणारा म्हणून ओळखले जात असे. अशा व्यक्तींना आपुलकीची आणि कोमलतेची काळजी दाखवून, प्रभू येशू ख्रिस्त समाजाला नव्याने दाखवून देतो की, तो समाजाने निर्माण केलेल्या कायद्याच्या शापापासून मानव जातीला तारण्यासाठी आला आहे (गलती ३:१३) आणि ख्रिस्त येशूमध्ये कसलाही भेदभाव किंवा निंदा नाही (रोम. ८:१).

(३) “आध्यात्मिक निषेध”

धार्मिक दृष्टीकोनातून, आजार (बहिरेपणा आणि मुकेपणा), हे देवाकडून मिळालेला "शाप" किंवा सैतानी  ताबा किंवा हाताळणीचे लक्षण मानले जाते. अर्थात, अनेक यहुद्यांनी या माणसाला देवाने शाप दिला आहे असे माणून तो एक पापी आहे असे मानले होते. दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास आपल्याला समजून येते की, जेव्हा आपण देवाचे वचन ऐकू शकत नाही किंवा ऐकण्यास नकार देतो, तेव्हा आपण स्वतःला मोठ्या प्रमाणात धोक्यात आणतो, पाप, शाप आणि शिक्षेचा मोह आपल्याला देवाच्या सेवकांचे किंवा संदेष्ट्याच्या शिकवणी विरुद्ध जाण्यास मोहात पाडतात. म्हणूनच बाप्तिस्म्याच्या वेळी, “एफाता” विधी आपले कान आणि तोंड मूकपणा आणि बहिरेपणापासून उघडे करते. अध्यात्मिक बहिरेपणा हा सर्व आध्यात्मिक आजारांपेक्षा अत्यंत वाईट आहे, तो शाश्वत मृत्यूकडे आपली वाटचाल करत असतो. जे देवाच्या वचनाला बहिरे आहेत त्यांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल योग्यरित्या बोलण्यात खूप अडचण येते. ज्याप्रमाणे येशूने मनुष्याला शारीरिकरित्या ऐकण्यास सक्षम केले, त्याचप्रमाणे त्याने आपल्याला आध्यात्मिकरित्या बरे केले पाहिजे जेणेकरून आपण देवाचे वचन ऐकून ते समजून घेण्याचा ध्येय आपल्यात जागृत होईल (योहान ८:४७; १ करिंथ २:९-१४).

(४) “मानसिक आघात”

ऐकणे आणि बोलता येत नसल्यामुळे अनेकदा माणसात नैराश्य निर्माण होते. ही मनोवैज्ञानिक समस्या  मनुष्याला दु:ख देते आणि नैराश्याने हतबल करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, बहिरेपणा आणि मूकपणाची स्थिती माणसात आनंद अभाव निर्माण करते. म्हणून, गुरुच्या स्पर्शाने त्याचा आनंद पुनर्संचयित होतो (यिर्मया ३१:१३). आजच्या शुभवर्तमानामध्ये, समाजाकडून नैराश्य, नकार, आणि अत्याचार सहन करणाऱ्या मूकबधिर माणसाला येशू ख्रिस्त नवीन आशा पुनर्संचयित करताना आपण वाचतो.

शिवाय, शुभवर्तमानामध्ये विविध उताऱ्यावर चिंतन केल्याने आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी अनेक अंतर्दृष्टी बोध प्राप्त होत असतात. सर्वप्रथम, शुभवर्तमानामध्ये त्या माणसाला इतरांनी येशूकडे आणले होते आणि त्यांनी येशूला त्याच्यावर हात ठेवण्याची विनंती केली होती.  आपल्या दैनंदिन जीवनात खूप असे प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या स्वतःला मदत करू शकत नाही आणि आपल्याला येशूकडे आणण्यासाठी इतरांची आवश्यकता असते. किंवा आपण आपल्या जीवनात अशा लोकांना भेटतो जे दुःख देतात किंवा आपली निंदा करतात, आपली विटंबना करतात, तेव्हा आपण आशा व्यक्तींना येशूकडे आणले पाहिजे, त्याच्या चरणी समर्पित केले पाहिजे.

बरे होण्यासाठी आणलेल्या माणसाला आपण पाहतो की त्याला येशूचे दयाळू प्रेम आणि काळजी प्राप्त झाली. आपण सुद्धा अशा व्यक्तींना ख्रिस्ताकडे आणूया ज्यांना त्याच्या स्पर्शाची गरज आहे. शुभवर्तमान आपल्याला सांगते की येशूने त्याला गर्दीतून बाजूला नेले. तो त्याच्याशी वैयक्तिक पातळीवर एकांकी आधारावर व्यवहार किंवा संभाषण करत होता. येशू त्याच्याबरोबर एकट्याने वेळ घालवतो, आणि त्याच्या कानात बोटे घालून त्याला स्पर्श करतो. तसेच, त्याच्या जिभेला थुंकी लावून त्याला बरे करतो. येशू त्याला दुरूनच बरे करू शकला असता पण तो त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्या दुःखामध्ये समरस होऊन त्याला उत्तम गुरुचा स्पर्श देत असताना स्वर्गाकडे पाहून आपल्याला आठवण करून देतो की त्याने सर्व काही चांगल्यासाठी निर्माण केले आहे आणी त्याला शक्ती स्वर्गीय पित्याकडून देण्यात आली आहे.

“जीवन संदेश”

(१) फक्त गुरुचा (येशू ख्रिस्ताचा) स्पर्श आपले आध्यात्मिक/शारीरिक बहिरेपणा, मूकपणा, अंधत्व आणि मनाचा शीतलपणा दूर सारू शकते.

गुरूच्या स्पर्शाचा अनुभव घेणारा तसाच राहतो असे काही नाही. गुरूचा स्पर्श आपल्या अस्तित्वाला अर्थ, मूल्य आणि चालना पुनर्संचयित करते आणि जीवन सफल बनवते. प्रत्येक स्थरावर - आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक कलंक सर्व नष्ट करून मानवता पुनर्संचयित करणारी गुरुकिल्ली म्हणून येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये स्वतःला प्रकट करतो.

·       रक्तस्त्रावाने पिढलेल्या स्त्रीला गुरूचा महान स्पर्श होऊन तिचे जीवन बदलले. (मत्तय ९)

·       पेत्राच्या आजारी सासूला महान गुरूच्या स्पर्शाने स्पुर्ती प्राप्त झाली (मार्क १:२९-३१).

·       सभास्थानाच्या शातापतीच्या मुलीला गुरुच्या स्पर्शाने मेलेल्यांतून उठवले (मार्क ५:४१-४२).

·       गुरुच्या त्याच स्पर्शाने कुष्ठरोगी (पापी) शुद्ध (संत) मनुष्य बनला (मार्क १३:१२).

आपण त्याच्या स्पर्शासाठी आतुरलेलो आहोत का? आज आपल्यासोबत जे काही घडत आहे त्यात त्याचा हात आहे यावर आपण विश्वास ठेवतो का? "आतुरलेले रहा!"

(२) आपण प्रत्येकजण बहिरेपणा आणि मुकेपणाने त्रस्त झालेलो आहोत.

आजच्या शुभवर्तमानाच्या मजकुरात सांगण्यात आले आहे की तो मनुष्य बहिरा होता आणि त्याच्या बोलण्यात अडथळा देखील होता. आपण असे बोलू शकतो की आपल्यात अशी कोणतीही समस्या नाही, आपण चांगले ऐकू शकतो आपल्याला बोलण्यात कोणतीही अडचण येत नाही. पण खरोखर आपण कोणत्याही अडचणीत नाहीत का? आपण खरोखर ऐकू शकतो का? लोक आपल्याला काय म्हणू पाहत आहेत हे आपण ऐकू शकतो का? आपण कोणत्या परिस्थितीत आहोत, हे आपण समजून घेऊ शकतो का? देव आपल्याला काय म्हणत आहे ते आपण ऐकू घेतो का? ह्या सर्व समस्यांवर प्रभू येशू ख्रिस्तच शेवटचा मार्ग आहे. आपल्या फक्त त्याच्या स्पर्शासाठी स्वतःला त्याच्यासमोर सादर करण्याची गरज आहे.

(३) आपल्याला जखमी मानवतेसाठी येशूच्या हातातील उपचार करणारी साधने बनण्याची गरज आहे

ख्रिस्ती या नात्याने, आजारी लोकांना बरे करणारा स्पर्श देण्यासाठी आपण येशूला आपले हात दिले पाहिजेत. आपल्याद्वारे आध्यात्मिकरित्या भुकेलेल्यांशी बोलण्यासाठी आपण येशूला आपली जीभ उदारतेने दिली पाहिजे आणि आपल्याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनातील लोकांना स्पर्श करण्यासाठी येशूला आपले हृदय बहाल करणे अत्यंत आवश्यक आहे. अविलाची संत तेरेजाने सांगितल्याप्रमाणे, "आज जगात येशू ज्या हातांनी स्पर्श करतो ते आमचे हात आहेत." आपण आपल्या स्वतःला उपलब्ध का करू नये? येशूला कलकत्त्याची संत तेरेजा, मोलोकाईचे संत डेमियन, संत विन्सेंट डी पॉल, असिसीकर संत फ्रान्सिस या सारख्यांची खूप गरज आहे कारण त्यांच्याद्वारे त्याने लाखो जीवांना आणि आत्म्यांना स्पर्श केला आहे.

       शेवटी, एक दिवस एक अनाथ मुलगी, तिच्या नेहमीच्या पद्धतीने, रस्त्याच्या कोपऱ्यात उभी राहून अन्न, पैसे किंवा जे मिळेल त्यासाठी भिक मागत होती. त्या मुलीने खूप फाटके, घाणेरडे आणि अगदी विस्कटलेले कपडे घातले होते. एक दिवस एक तरुण त्या रस्ताने जात होता परंतु त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे गेला. पण, जेव्हा तो त्याच्या महागड्या घरी परतला, तेव्हा त्याचे सुखी आणि आरामदायी कुटुंब त्याच्या जवळ होते, त्याचे जेवणाचे मेज विविध पंच पक्वनांनी भरलेले होते, परंतु त्या तरुणाच्या मनात त्या अनाथ मुलीविषयी कळवला आला आणि त्याचे विचार त्याला भेडसावू लागले. समाजात अशी सुद्धा परिस्थिती आहे म्हणून तो देवावर खूप रागावला होता आणि तो देवाला दोष देत म्हणाला, तू हे कसे काय होताना पाहतोस? तू या मुलीच्या मदतीसाठी का काही करत नाहीस? मग देवाने त्याच्या अं:तकरणाच्या गाभाऱ्यात त्याला उत्तर दिले, तू तिच्यासाठी काय करतोस?

       ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय मित्रांनो ज्याप्रकारे आपल्याला गुरुचा म्हणजेच ख्रिस्ताचा स्पर्श प्राप्त झालेला आहे, त्याच प्रमाणे ख्रिस्ताने आपल्या इतरांना सांत्वनदायक आणि आश्वासक स्पर्शाने प्रेम, दया आणि क्षमा करून गोर-गरीब आणि गरजवंत लोकांना त्याचा स्पर्श द्यावयास आपल्याला पाचारले आहे. तर मग ख्रिस्ताचा दैवी इतरांना देण्यास आणि इतरांना ख्रिस्ताकडे वळवण्यास तयार राहूया. 

    तसेच आज वेलकंनी मातेचा सन साजरा करत असताना, तिच्या मध्यस्तीने आम्हा सर्वाना प्रभूचा आशीर्वाद मिळावा. तिच्या प्रेमाची आणि करुणेची कृपा आपणा सर्वांवर असावी आणि ती आपल्याला सुसंस्कार, शांतता आणि यश प्रदान करो. तिच्या प्रेमाने आपल्याला आपल्या कामात शक्ती मिळो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात तिचे मार्गदर्शन असो.


विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रभू दया करून तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२)  आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५)  देशातील विविध भागात पूरच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे गेलेल्या सर्व लोकांना देवाच्या तारणदायी प्रेमाचा व चमत्कारिक कृपेचा अनुभव यावा. तसेच त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा मिळविण्यास इतरांनी मदत करावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया.

६) आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment