Reflection for the 24th Sunday in Ordinary Time (15/09/2024) By Fr. Brijol Lopes
सामान्य काळातील चोविसावा रविवार
दिनांक १५/०९/२०२४
पहिले वाचन: यशया
५०:५-९
दुसरे वाचन:
याकोबाचे पत्र २:१४-१८
शुभवर्तमान:
मार्क ८:२७-३५
प्रस्तावना
ख्रिस्ताठायी जमलेल्या
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील चोविसावा रविवार
साजरा करत आहे आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या शुभवर्तमानात, प्रभू येशू प्रश्न विचारतो की: “मी कोण आहे असे लोक म्हणतात?” हा प्रश्न आपल्याला केवळ येशू कोण आहे यावरच
नव्हे तर इतर आपल्याला कसे पाहतात यावर देखील विचार करण्याचे आव्हान देत आहे.
आपल्या कृतींमधून ख्रिस्ताच्या शिकवणी दिसून येतात का?
आजचे तिन्ही वाचने ऐकत असताना, आपल्याला जाणीव करून दिली जाते की चांगले जीवन हे येशूच्या
प्रेमाच्या, आत्मत्यागाच्या
मार्गाचे अनुसरण करणे आणि दुःखाच्या काळातही देवावर विश्वास ठेवणे असते.
कलकत्त्याच्या संत तेरेसा आणि धन्य (blessed) कार्लो
आकुतीस ह्यांच्या जगण्याची सुंदर उदाहरणे आहेत.
याकोब आपल्या पत्रात आपल्याला आठवण करून
देतात की क्रीयांशिवाय विश्वास मृत आहे. आपला विश्वास आपल्या कृतींमध्ये दिसला
पाहिजे - गरजूंना मदत करणे, सहानुभूती
दाखवणे.
या मिस्साची सुरुवात करताना, इतरांना आपल्या शब्दांतून, आपल्या
दयाळूपणाद्वारे आणि आपल्या प्रेमाद्वारे, आपल्यामध्ये
येशू दिसेल अशा प्रकारे जगण्याची कृपा मागू या. जेणेकरून आपल्याला आपल्या दैनंदिन
जीवनात ख्रिस्ताचे खरे प्रतिबिंब बनण्याची प्रेरणा देईल.
मनन चिंतन
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय
भाविकांनो, आजच्या शुभवर्तमानात
पाहतो की, प्रभू
येशू त्याच्या शिष्यांस विचारतो, “लोक मला
कोण म्हणून ओळखतात?” त्यांनी
त्याला उत्तर दिले, “काही जण
म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा
करणारा योहान आहात तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे
काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहा असे म्हणतात.” मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.” परंतु आजच्या या आधुनिक युगात हा प्रश्न आपण
आपल्यालाच विचारून बघूया:“लोक मला कोण म्हणून ओळखतात?” हा प्रश्न आपल्याला चांगले ख्रिस्ती बनवण्यास
व देवाच्या सानिध्यात राहण्यास मदत करेल. जेव्हा हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो, आपण विविध उत्तरे ऐकू शकतो. काही जण म्हणू शकतात की तुम्ही
उदार, दयाळू किंवा दानशूर
आहात, तर काहीजण एखाद्याला
स्वार्थी, फसवणूक करणारा किंवा
खोटे बोलणारा, चोरी करणारा म्हणू
शकतात. आपण मानव आहोत त्याचप्रमाणे आपण कमजोर सुद्धा आहोत. त्यासाठी आपण दुसरयाना
बोललेले नेहमी बरोबर असेल याची खात्री आपल्याला नसते. तर चांगल आणि वाईट काय हे
कसं ओळखायचं? एखाद्या व्यक्तीला
खरोखर चांगले काय बनवते किंवा एखाद्या व्यक्तीला वाईट काय बनवते हा प्रश्न
आपल्याला पडणार. त्यासाठी आपण कॅथोलिक असल्यामुळे अभिमान बाळगतो येशु ख्रिस्त
असण्याचा, कारण येशू ख्रिस्त हा
आपल्याला काय खरा मार्ग, काय खरे
सत्य आणि काय खरे जीवन त्याच्या शिकवनीद्वारे दाखवत आहे. तसेच आज आपल्याला
देऊळमाता चांगले ख्रिस्ती कसे व्हायचे हे आजच्या तिन्ही वाचनात दाखवत आहे.
१. दु:ख
असले तरी देवावर विश्वास व आशा ठेवून देवाचे काम चालू ठेवणे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि, यशया देवावर विश्वास ठेवून दुःख सहन करण्याविषयी
बोलतो. धन्य (Blessed) आकुतीस (leukemia) आजाराचा
सामना करत असताना त्याने आपले दु:ख देवाच्या हाती देऊन तो देवासाठी जगला आणि
देवाची शिकवण इंटरनेटच्या माध्यमातून द्यायचा त्यानी प्रयत्न केला. यशयामधील
सेवकाप्रमाणे, त्याने विश्वासाने
संकटांचा सामना केला आणि कधीही आशा गमावली नाही. हे आपल्याला आपल्या स्वतःच्या
अडीअडचणीत व संघर्षातही देवावर विश्वास ठेवण्याचे आव्हान देतो, हे जाणून की, देव
आपल्या दुःखात आपल्याबरोबर चालतो, त्याच्या
उद्देशाकडे आपले मार्गदर्शन करतो.
२.
कार्यात दाखवलेला विश्वास
याकोब आपल्याला सांगतो की, क्रीयांशिवाय विश्वास मृत आहे. आपला विश्वास आपल्या कार्याद्वारे दिसला पाहिजे. जसे भुकेल्यांना अन्न देणे, बेघरांना आश्रय देणे आणि जे असुरक्षित आहेत त्यांची काळजी घेणे. ज्याप्रमाणे याकोब आपल्याला चांगल्या कृतींद्वारे आपला विश्वास जगण्यासाठी बोलावतो, त्याचप्रमाणे आपल्याला, या प्रेमाच्या कृत्यांमध्ये भाग घेण्यास आमंत्रित केले जात आहे. आपल्या स्वतःच्या जीवनात, याचा अर्थ स्वयंसेवा करणे किंवा गरजूंना मदत करणे होय.
३.
आत्मत्यागाचे आमंत्रण (स्वत:साठी नाही तर इतरांसाठी जगणे)
आजच्या शुभवर्तमानात, प्रभू येशू स्पष्ट म्हणतो की, जर कोणाला
माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला
अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जिवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व
सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. प्रभू येशूचा मार्ग म्हणजे, ज्यात दुःख आणि आत्मत्याग स्वीकारावे लागते आणि हे
कलकत्त्याच्या संत तेरेसा यांच्या जीवनात आपल्याला दिसून येते, तिने स्वत:ला गरीब
लोकांसाठी समर्पित केले. येशूप्रमाणे तिनेही इतरांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण
केले. आपणसुद्धा स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगण्याकरिता महत्व दिले पाहिजे.
बोधकथा
एकेकाळी योसेफ नावाचा एक तरुण होता. योसेफ
श्रीमंत नव्हता; खरं तर, त्याच्याकडे फारच कमी संपत्ती होती. पण त्याच्याकडे जे होते
ते त्याने गरिबांना दिले विशेषकरून त्याचा वेळ आणि त्याचे प्रेम. एके दिवशी, कोणीतरी त्याला विचारले की, तू अनोळखी
लोकांसाठी इतके कष्ट का करतो? त्याने
उत्तर दिले, “कारण मी
त्यांच्यामध्ये येशू पाहतो आणि त्यांनी माझ्यामध्ये येशू पाहावा अशी माझी इच्छा
आहे.”
कालांतराने, लोकांना
योसेफची दयाळूपणा आणि समर्पण लक्षात येऊ लागले. त्याच्या जीवनामुळे इतरांना
त्याच्या सारखे चांगले होण्यासाठी प्रेरणा मिळाली. योसेफच्या साध्या, दैनंदिन चांगुलपणाच्या कृतींमधून ख्रिस्ताचे प्रेम
प्रतिबिंबित होते आणि त्याच्याद्वारे, अनेक
लोकांना येशूसारखे जगणे म्हणजे काय हे समजले.
ही कथा आपल्याला शिकवते की, जेव्हा आपण गरजूंना मदत केली करतो आणि जेव्हा आपण इतरांना करुणा दाखवतो तेव्हा आपण
ख्रिस्ताच्या प्रेमाचे जिवंत प्रतिबिंब बनतो.
आपल्यापैकी प्रत्येकासाठी आव्हान आहे की
लोकांना आपल्यामध्ये ख्रिस्त दिसेल अशा प्रकारे जगण्याचे. जेव्हा आपण दयाळू शब्द
बोलतो, जेव्हा आपण सत्यासाठी
उभे राहतो, जेव्हा आपण
दुखावलेल्या लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा आपण जगाला दाखवत असतो की येशूचे अनुसरण
करणे म्हणजे काय.
परंतु हे नेहमीच सोपे नसते. आजच्या
शुभवर्तमानात येशूने आपल्या शिष्यांना सांगितल्याप्रमाणे, त्याचे अनुसरण करणे म्हणजे आपला वधस्तंभ उचलणे होय.काही
वेळा कठीण क्षण येतात, जर आपण यशयामधील सेवक
आणि याकोबवर विश्वास ठेवणाऱ्यांप्रमाणे विश्वासू राहिलो, तर देव आपल्याला आपला वधस्तंभ वाहून नेण्याचे सामर्थ्य
देईल.
आजच्या वाचनावर विचार करताना, आपण स्वतःला विचारू या:
· आपली कृती येशूच्या शिकवणी प्रतिबिंबित करते का?
· जेव्हा लोक आपल्याला पाहतात तेव्हा त्यांना चांगली कामे, दयाळूपणा आणि करुणा दिसते का?
· त्यांना ख्रिस्तावरील विश्वासाने घडलेले जीवन दिसते का?
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे
प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१) आपले महागुरू पोप, बिशप्स, कार्डीनल, धर्मगुरू-धर्मभागिनी तसेच ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन सेवाकार्य करणाऱ्या या सर्व लोकांना प्रभूचे कार्य व्यवस्थितरित्या पुढे नेता यावे व त्यांना चांगले आरोग्य, कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) सध्या जगामध्ये अशांतता दिसून येत आहे. घातकी संकटे कोसळत आहेत. राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक व आर्थिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) सर्व ख्रिस्ती बांधवात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांना समजून घ्यावं, आप-आपसातली वैर-भावना या गोष्टींचा त्यांग करून प्रेम, सदभावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) जे लोक आजारी आहेत, ज्याचं मरण जवळ येऊन ठेपल आहे त्यांनी जीवनात निराश न होता त्यानां प्रभूची प्रेरणा मिळावी व धैर्याने जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) देव प्रीती आहे, तो आपली प्रार्थना ऐकतो म्हणून आता आपण आपल्या स्थानिक गरजा
शांतपणे प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment