Reflection for the 22nd Sunday in Ordinary Time (31/08/2025) By Br. Oliver Munis
सामान्य काळातील बाविसावा रविवार
दिनांक: ३१ /०८
/२०२५
पहिले वाचन: बेनसिरा ३: १९–२१, ३०–३१
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८–१९, २२–२८
शुभवर्तमान: लूक १४ : १, ७
–१४.
प्रस्तावना
समाज्यात वावरत असताना प्रत्येकाला वाटते की,
मला यश मिळावे, मी नाव कमवावे, मला प्रतिष्टा मिळावी, तसेच प्रसिद्धी मिळावी. लहान
मुलांना वाटते की, वर्गात प्रथम स्थान पटकावे, तरुणांना वाटते की, नोकरीत उच्च पद
मिळवाव. इतर क्षेत्रातसुद्धा बऱ्याच जणांना वाटते की, अव्वल दर्ज्या मिळावा. हे
सर्व स्वाभाविक आहे.
जग सांगते पैसा, पद, सत्ता, अधिकार, मान
सन्मान, प्रतिष्टा, प्रसिद्धी मिळण्यात माणूस मोठा बनतो. परंतु येशू म्हणतो की, या
गोष्टीच्या पलीकडे खरा मोठेपणा माणसाला नम्रता, लीनता व स्व:ताला कमी लेखण्यात
मिळतो. असा मनुष्य देवाच्या नजरेत मोठा आहे. कारण प्रभूचे वचन म्हणते, “जो कोणी
स्व:ताला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्व:ताला नमविल तो उंच केला जाईल.”
नम्रता म्हणजे स्व:ताला कमी समजणे नाही, तर
इतरांना महत्व देऊन, इतरांसमोर कमी लेखणे आहे. आजच्या उपासनेद्वारे आम्हला नम्र
अंत:करण धारण करण्यास पाचारण करण्यात आले आहे. प्रभू येशू नम्र झाला व इतरांची
सेवा करत राहीला, म्हणून देवाने प्रभू येशूला आपल्या उजवीकडे बसवून उच्च स्थान
दिले. त्याचप्रमाणे आपण सुद्धा नम्र बनूया व इतरांची सेवा करूया, त्याद्वारे
आम्हला सुद्धा स्वर्गात देव योग्य स्थान देवो.
या मिस्साबलिदानात प्रार्थना करताना याच
प्रभूयेशुची प्रेरणा व नम्रतेचा आदर्श घेऊन कृपेचे जीवन जगूया व देवाच्या नजरेत
मोठे होण्यास आपली पात्रता दाखवूया.
मनन चिंतन
“नम्र
हृदय तव येशू तैसे, मजला लाभावे”
ज्या देवाने आपणा प्रत्येकाला त्याच्या
चांगुलपणाने निर्माण केले, त्या देवाचा चांगुलपणा, आपण सतत टिकून ठेवतो की घालवून
देतो? हे तर प्रत्येकावर अवलंबून आहे. जर हा चांगुलपणा आपण टिकवून ठेवला, तर आपल्या
अंतकरणातून नम्रता, लीनता व स्वतः कमी लेखण्याची भावना दिसून येईल. जर का हा
चांगुलपणा आपण घालवून दिला, तर आपल्या अंतकरणातून गर्विष्ठपणा, स्वार्थीपणा व अहंकार
दिसून येईल, त्यामुळे देवाने दिलेल्या चांगुलपणाचा अंगरखा परिधान करून, आपण इतरांसमोर
नम्र बनायला हवे व आपण लीनता धारण करायला हवी. तसेच स्व:ताला इतरांसमोर कमी लेखून
देवाच्या नजरेमध्ये मोठे बनायला हवे.
परंतु बऱ्याच वेळेला आपण लोकांच्या
नजरेमध्ये मोठे बनण्यास पाहतो. त्यासाठी आपण पद, मान-सन्मान, अधिकार, सत्ता, नावलौकी
मिळावी, म्हणून प्रयत्न करतो. या गोष्टी आपल्याला तात्पुरत्या समाधान देतात, पण जर
का आपणाला कायमचे समाधान लाभायचे असेल, तर आपणाला देवाचे वचन पाळायला हव.
मत्तयलिखित २३:१२ देवाचे वचन म्हणते, जो कोणी स्वतला उंच करील तो नमविला जाईल आणि
जो कोणी स्वताला नमविल तो उंच केला जाईल.
आजची तिन्ही वाचणे आपणाला नम्रता, लीनता,
कमीपणा धारण करण्यासाठी पाचारण करत आहेत. आजचे पहिले वाचन हे बेनसिरा ह्या
पुस्तकातून घेतले आहे आणि या पुस्तकामध्ये असे नमूद केले आहे की जर आपण खरी नम्रता
धारण केली तर देव आपल्यावर अनेक असे उपकार करणार आहे व इतर आपणांवर प्रेम करणार
आहेत. माणूस जितका मोठा होईल, तितका अधिक विनयशील
व्हायला हवा, कारण
परमेश्वर नम्रांचा आदर करतो. बेनसिराक
३:१८-२० आपण ऐकतो, तुजी प्रतिष्टा वाढत जाईल तसा-तसा तू अधिक विनयाने वाग म्हणजे
तुला परमेश्वराची कृपा मिळेल. परमेश्वराचे सामर्थ्य महान असूनही तो नम्र लोकांचा
उच्च भाव स्वीकारतो. दुसरं वाचन आपल्याला आठवण करून देते की आपण फक्त या जगाच्या
गोष्टींसाठी नाही, तर स्वर्गीय येरुशलेमसाठी बोलावलेले आहोत आणि तिथे जाण्याचा
मार्ग नम्रता आणि विश्वासातून जातो.
आजच्या शुभवर्तमानात येशू आम्हाला शिकवतो
की, सम्मानाच्या
जागा निवडू नका, तर
सर्वांत खालच्या जागी बसून राहा. ह्यातून तो आपणाला नम्रतेच्या सद्गुणाची शिकवण
देतो. नम्रता म्हणजे स्वतःबद्दल कमी विचार करणे नाही किंवा
स्वतःच्या मूल्याबद्दल कमी मत असणे नाही. नम्रता म्हणजे स्वतःपेक्षा इतरांबद्दल
चांगले विचार करणे. इतरांना अधिक महत्त्व देऊन, आपण आपले महत्त्व
गमावत नाही, उलट ते
वाढवतो. कारण नम्रता म्हणजे उदारता आणि उदारता म्हणजे इतरांना स्वतःपेक्षा
पुढे ठेवणे. इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणे. आजच्या स्पर्धात्मक जगात
नम्रतेला जास्त महत्व दिले गेलेले नाही. कारण आपण नाव आणि कीर्तीच्या मागे धावत
आहोत आणि आपण सम्मान आणि आदर कसा मिळावा हे शोधत आहोत. आपणाला जेव्हा मोठे बनायचे असेल
तर आपण कधी-कधी इतरांना खाली पाडत असतो, परतू नम्रता हा स्वभाव याच्या पूर्णपणे
विरोधात आहे.
नम्रता म्हणजे इतरांना उंची गाठण्यास सक्षम
करणे. जितकी व्यक्ती मोठी, तितकी ती अधिक नम्र असावी. नम्रतेचं सर्वोत्तम उदाहरण स्वतः
येशू आहे. संत पौल म्हणतात: “जरी तो देवाच्या रूपात
होता, तरी
त्याने स्वतःला नम्र करून मानवी रूप धारण केले.” (फिलीपकरांस
२:६)
आपल्याकडे दुसरं सुंदर उदाहरण आहे ते
म्हणजे धन्य कुमारी मरिया. तिने स्वतःला नम्र केले म्हणून ती (मरीयेचे स्तोत्र) (मॅग्निफिकेटमध्ये)
म्हणते: “त्याने
आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पाहा, आतापासून
सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.” (लूक १:४८)
म्हणून आपणही येशूकडून आणि मरियेकडून नम्रतेचा
व लीनतेचा आदर्श घेऊन चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास कृपा मांगुया. व शेवटी हीच
शिकवण आत्मसात करूया की, “जो स्वतःला नम्र करतो, त्याला देव उंचावितो.”
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- ‘हे
परमेश्वरा, आमची
प्रार्थना ऐक’
१) आपले पोप लिओ, सर्व
बिशप्स, धर्मगुरू
व व्रतस्थ बंधुभगिनी यांना त्यांच्या प्रेषितीय कार्य करण्यासाठी तुझी कृपा दे
त्याच प्रमाणे त्यांना नम्र हृद्य दे.
२) आपल्या समाज्यात, कुटुंबात
व धर्मग्रामात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून
प्रार्थना करूया.
३) समाजात वावरत
असताना, आपण
ख्रिस्ती म्हणून इतरापर्यंत नम्रतेची शिकवण आपल्या वागन्याद्वारे द्यावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या धर्मग्रामात
जे कोणी आजारी असतील, त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा, त्यांना
चांगले आरोग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.
५) अतिवूर्ष्टीमुळे
कितेकांची घरे
उद्वस्त झाली आहेत, परमेश्वराने त्याच्या सांभाळ करावा आणि
त्याच्या गरजा पुरवाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक
हेतूंसाठी प्रार्थना करूया.