Reflection for the 19th Sunday in Ordinary Time (10/08/2025) By Dn. Jostin Pereira
सामान्य काळातील एकोणिसावा
रविवार
दिनांक: १०/०८/२०२५
पहिले वाचन: शालमोनाचा ज्ञानग्रंथ १८: ६-९
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ११: १-२ ; ८-१०
शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८
प्रस्तावना
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करत आहे. आजचा आपला मुख्य विषय ‘‘विश्वास आणि तयारी’’ आहे.
शेतकरी शेतात मेहनत करतो, बियाणे पेरतो, पाणी घालतो आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून पावसाची वाट पाहतो. यातून आपण शिकतो की, जीवनात हालअपेष्टा आणि अडथळे असली तरी, आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे.
पहिल्या वाचनात, इस्राएल लोकांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या मुक्तीसाठी तयारी कशी केली, हे आपल्याला दिसून येते. दुसऱ्या वाचनात आब्राहामने देवाच्या योजनांवर विश्वास ठेवून प्रत्येक पावलावर धाडसाने कसे पावले टाकली, हे उदाहरण दिले आहे आणि आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला तयार राहण्यासाठी व जबाबदारीची जाणीव ठेवण्याची आणि खऱ्या विश्वासाचे महत्त्व सांगतो
आजच्या ह्या मिस्साबलिदानात आपणास विश्वास ठेवण्यासाठी व नेहमी तयार राहण्यासाठी योग्य ती कृपा प्रभू परमेश्वराकडून मिळावी, म्हणून प्रार्थना करूया.
मनन चिंतन
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकूया. तो रोज सकाळी लवकर उठतो, आपल्या शेतात पाणी घालतो, बियाणं पेरतो आणि पावसाची वाट पाहतो. पाऊस कधी आणि कसा पडेल, हे फक्त देवालाच माहीत असते. तरीसुद्धा, तो थांबत नाही; तो आपले काम प्रामाणिकपणे करत राहतो, कारण त्याचा विश्वास असतो की देव त्याच्या कष्टाचं फळ नक्कीच देईल.
ही छोटीशी गोष्ट आपल्याला आजच्या वाचनांमधून मिळणारा संदेश सांगते: विश्वास आणि तयारी. आजच्या आधुनिक जगात आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत.
पहिल्या वाचनात आपण पाहतो की, इस्राएलच्या लोकांना देवाने त्यांच्या मुक्तीचा संकल्प आधीच सांगितला होता. त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तयारी केली. जेव्हा वेळ आली, तेव्हा ते तयार होते आणि देवाने त्यांना वाचवले. यातून आपल्याला शिकण्यासारखं म्हणजे, देवाच्या योजनेवर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ वाट पाहणे नाही, तर त्यासाठी तयारी करणेही तेवढंच महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातही, मग ते नोकरी असो, कुटुंब असो, किंवा इतर काही, आपण देवावर विश्वास ठेवायला हवा आणि मेहनत करायला कंटाळू नये.
स्तोत्रसंहितेत आपण वाचतो, “देवाची आशा ठेवणाऱ्यांवर त्याची कृपादृष्टी असते.” आजच्या काळात, जिथे कुटुंबातील तणाव, नोकरीतील स्पर्धा आणि पैशाच्या चिंता आहेत, ह्या सर्व प्रसंगी हे वचन आपल्याला आशा देते. देव आपल्याला कधीच एकटे सोडत नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर, तो आपल्याला संकटातून नक्कीच बाहेर काढतो. परंतु, याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करायचे नाही. म्हणूनच, आपल्याला प्रार्थना करायची, एकमेकांना मदत करायची आणि आशेने पुढे जायचे आहे.
इब्री लोकांस पत्रामधून आपण आब्राहमच्या जीवनातील उदाहरण पाहतो कि, आब्राहमने देवावर संपूर्ण विश्वास ठेवला. देवाचे त्याला “पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला.” त्याने कसलीही शंका ठेवली नाही; तो लगेच निघाला, कारण त्याचा विश्वास होता की देवाची योजना नेहमीच उत्तम असते. आजच्याही जगात आपल्याला असा विश्वास हवा आहे. मग ते नवीन नोकरी स्वीकारणं असो, कुटुंबासाठी त्याग करणं असो, किंवा स्वतःच्या चुका सुधारायच्या असोत, प्रत्येक गोष्टीत विश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे.
लूकच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला नेहमी सज्ज राहण्याचा संदेश देतात, जसे कि नोकर आपल्या मालकाची वाट पाहतो. जबाबदारी प्रामाणिकपणा आणि विश्वास हे तिन्ही गुण आपल्यात असायला हवेत. देवाने आपल्याला ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. “ज्याला जास्त दिले आहे, त्याच्याकडून जास्त अपेक्षित आहे.” म्हणून आपली जबाबदारी टाळू नये.
आजच्या आधुनिक जगात नोकरी टिकेल की नाही? पैसा पुरेल की नाही? मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे होईल का? अशा अनेक चिंता आपल्याला सतावत असतात. परंतु, आजची वाचणे आपल्याला सांगतात: “देवावर विश्वास ठेवा, पण मेहनत करायला विसरू नका.” विश्वास म्हणजे केवळ प्रार्थना करणं नाही, तर कृतीही करणं आहे. जो तत्पर रहातो व प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला देव नक्कीच फळ देतो.
आपण आपल्या आयुष्यात काय करू शकतो
दररोज प्रार्थना करा : दिवसातून पाच मिनिटं देवाशी बोला; चिंता त्याच्यावर सोपवा आणि मार्गदर्शन मागा.
इतरांना मदत करा : आजूबाजूला कुणाला मदतीची गरज आहे का, ते पाहा. शेजारी, मित्र किंवा कुटुंबातील कोणालाही मदतीचा हात द्या.
जबाबदारी घ्या : तुमचं काम, कुटुंब, समाज. यामध्ये जबाबदारीचे जीवन जगा. लहानसहान गोष्टींतही विश्वास ठेवा.
प्रामाणिक बना: आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करावे कि जेणेकरून आपल्याला कष्टाचे फळ नक्कीच मिळेल यात शंका नाही.
प्रिय बंधू-भगिनींनो, या आधुनिक जगात आपण देवावर आणि एकमेकांवर विश्वास ठेऊया. जसा शेतकरी पावसाची वाट पाहतो, तसे आपणही विश्वासाने आणि तयारीने पुढे जाऊया. देवाची योजना नेहमीच आपल्यासाठी चांगली असते. म्हणून, त्याच्यावर विश्वास ठेवा, जबाबदारी पार पाडा आणि आशेने आयुष्य जगा.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरु–धर्मभगिनी व व्रतस्त ह्या सर्वांनी प्रभूच्या आनंदात सहभागी होऊन, त्याच्या सेवेची घोषणा करून लोकांना मार्ग तयार करण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी व पिडीत आहेत, खाटेला खिळलेले आहेत त्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांचे दुःख सहन करण्यास त्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आज बरीचसी युवक पीडी वाईट मार्गाला जात आहे, बेरोजगारी वाढत आहे अश्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगले कार्य करून आपला व समाजाचा विकास करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी परमेश्वराने दिलेल्या दानांचा योग्य वापर स्वत:साठी न करता इतरांसाठी करावा व परमेश्वराचा आनंद इतरांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment