Reflection for the 20th Sunday in Ordinary Time (17/08/2025) By Fr. Suhas Pereira
सामान्य काळातील विसावा रविवार
दिनांक
: १९/०८/२०२५
पहिले वाचन: यिर्मया ३८: ४-६,८-१०
दुसरे वाचन: हिब्री लोकांस पत्र : १२:१-४
शुभवर्तमान: लुक १२:४९-५३
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील विसावा रविवार साजरा
करत आहोत. आजच्या उपासनेची तिन्ही वाचने आपल्या आशा-अपेक्षांना आव्हान देत आहेत. आपण अनेक वेळा देवळात जाऊन आपल्यासाठी शांती, समाधान आणि आनंदाचं वरदान देवाकडून मागत असतो. परंतु प्रभू ख्रिस्त मात्र आजच्या शुभवर्तमानात म्हणतो, की तो या पृथ्वीवर आग लावण्यासाठी आलेला आहे. तो आज शांतीबद्दलचं नव्हे तर फाटाफुटीबद्दलचं भाष्य करत आहे.
प्रभू येशूचे आजच्या शुभवर्तमातील हे शब्द नक्कीच धक्कादायक वाटतात, आपलयाला भयभीत करणारे वाटतात. परंतु आपण जसजसे पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्ट्याबद्दल आणि दुसऱ्या वाचनात मूळ ख्रिस्ती समुहाबद्दल वाचतो आणि शुभवर्तमानात ख्रिस्ताचे शब्द ऐकतो तसतसे आपल्याला कळून चुकते कि, प्रभू येशू ज्या आगीबद्दल बोलत आहे, ती आग नाशाची, संहाराची नव्हे, तर शुद्धीकरणाची, सत्याची, प्रेमाची आणि विश्वासाची आहे. पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्ट्याला अन्याय सहन करावा लागला, परंतु त्या परिस्थितीतसुद्धा संदेष्टा देवाशी एकनिष्ठ राहतो. यिर्मया संदेष्टा आज आपल्याला कठीण परिस्थितींमध्येसुद्धा आपल्या विश्वासात मजबूत राहण्यास प्रेरणा देत आहे. आजचं दुसरं वाचन आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनप्रवासात चिकाटीने जगून ख्रिस्तावर आपलं लक्ष केंद्रित करून पुढे वाटचाल करण्यास आमंत्रण देत आहे. आणि आजचं शुभवर्तमान ख्रिस्ताच्या या पृथ्वीवर आणि आपल्या जीवनात परिवर्तनाची आणि शुद्धीकरणाची ज्वाला पेटवण्याच्या उद्देशाबद्दल बोलत आहे.
ख्रिस्ताचे अनुकरण करणे म्हणजे ख्रिस्ताने या भूमीवर आणलेल्या आगीद्वारे प्रज्वलित होऊन शुद्ध होणे. आग हे उत्साहाचे प्रतीक आहे. प्रभू येशूला आपल्याला तो आणत असलेल्या आगीद्वारे देवाबद्दलच्या, देवराज्याबद्दलच्या उत्साहाने आणि तळमळीने भरावयाचे आहे.
मनन चिंतन
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, "मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असते ". आग हि विविध गोष्टींचं प्रतीक आहे. आग प्रज्वलित करते, उब देते. आग ही ज्ञानाचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे नाशाचं किंव्हा शुद्धीकरणाचं प्रतिकसुद्धा आहे. पवित्र शास्रामध्ये आग हे देवाच्या उपस्थितीचं चिन्ह आहे. देव जळत्या झुडपामध्ये मोशेला प्रकट होतो आणि आगीच्या खांबाद्वारे आपल्या लोकांना मार्गदर्शन करतो.
प्रभू ख्रिस्ताला आग पसरवायची
होती. त्यासाठीच तो या पृथ्वीवर आला. त्याच्या हृदयातील आगीच्या ज्वालेने आपण सर्वजण पेटून उत्साहाने, प्रेमाच्या ज्वालांनी भरून जावेत, देवासाठी, देवराज्यासाठी, इतरांसाठी, अशी त्याची इच्छा आहे. या जगाच्या इतिहासामध्ये आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला कळून चुकेल, कि अनेक संत महात्मे देवाच्या प्रेमाच्या, आणि देवाबद्दलच्या उत्साहाने भरून गेलेलं होते. दैवी अग्निने दैदिप्यमान होऊन ते आपलं जीवन जगले.
पहिल्या वाचनातील यिर्मया संदेष्ट्याचं उदाहरण घेऊ या. यिर्मया संदेष्टा जणू काही देवाच्या प्रेमाचा कैदी झालेला. देवाच्या प्रेमात तो स्वतःला जणू हरवून बसलेला होता. इस्रायली लोकांना त्यांच्यावर येणाऱ्या संकटाबद्दलची बातमी देण्यासाठी आणि उपदेश करण्यासाठी देवाने त्याची निवड केलेली होती. परंतु त्यामुळे यिर्मयाला छळ सहन करावा लागला. त्याला देवापासून लपून बसावेसे वाटले. परंतु त्याच्या हृदयात मात्र जो दैवी अग्नी जळत होता, तो मात्र त्याला शांत बसू देत नव्हता.
अस्सिसीकर संत फ्रांसिससुद्धा दैवी प्रेमाच्या भट्टीत पेटून निघालेला होता. प्रभू प्रेमाचे निखारे त्याच्या हृदयात जणूकाही पेटत होते आणि त्याला अस्वस्थ करत होते. म्हणूनच तो रडत होता, शोक करत होता, कि प्रेमावर प्रीती केली जात नाही, आणि सतत प्रार्थना करत होता, की हे प्रभो जशी तुझ्या हृदयात प्रेमाची ज्वाला पेटत आहे, तशीच ज्वाला माझ्या हृदयातसुद्धा पेटू दे. संत मॅक्सिमिलिअन कोल्बे ज्याचा सण आपण गेल्या आठवड्यात साजरा केला, तोसुद्धा प्रभू प्रेमाच्या वणव्यात जळत होता म्हणूनच त्याने प्रभूवरील प्रेमाखातीर आपल्या जीवनाचं बलिदान करून दुसऱ्या व्यक्तीची मृत्युदंडाची शिक्षा स्वतःवर घेतली.
ज्या व्यक्तीला दैवी आगीचा स्पर्श होतो, त्या व्यक्तीला अनेक वेळा कठीण मार्गावरून चालायला लागते, क्रुसाची वाट चालावी लागते, अनेक कठीण निर्णय जीवनात घ्यावे लागतात, असे निर्णय कि ज्यामुळे त्या व्यक्तीला प्रसंगी मृत्यूलाच कवटाळावे लागते. प्रभू ख्रिस्ताच्या जीवनातसुद्धा तसंच काही घडलं. देवप्रेमाची आग त्याच्या नसा-नसात भरलेली होती. त्या अगीद्वारेच आणि आगीसाठी ख्रिस्ताला क्रूसाचा आणि मृत्यूचा स्विकार करावा लागला. जो कोणी प्रभू येशूचा शिष्य होऊन, त्याच्या आगीने प्रज्वलित होईल, त्यालासुद्धा प्रभू येशूने दाखवलेला मार्गच स्वीकारावा लागेल. आपल्या जीवनात आणि हृदयातसुद्धा दैवी आगीचा निखारा जळतोय का? आपणसुद्धा देवकार्याच्या उत्साहाच्या आगीने भरलेलो आहोत का? जर आपलं उत्तर नाही असेल, तर आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू या, कि त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये, आपल्या विश्वव्यापी ख्रिस्तसभेमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये देवप्रेमाच्या ज्वालेची नव्याने ठिणगी पेटवो. आमेन
विश्वासू लोकांची प्रार्थना
धर्मगुरू: ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने देवाबद्दलच्या आणि देवराज्याबद्दलच्या आगीने, उत्साहाने भरून जावे आणि कसलीही भीती न बाळगता ख्रिस्ताचे खरे सरदार म्हणून जीवन जगावे अशी
ख्रिस्ताची इच्छा आहे. त्याच ख्रिस्ताकडे आपण आपल्या विनंत्या आणि गरजा आणू या.
आपला प्रतिसाद :- हे परमेश्वरा आमची प्रार्थना एकून घे.
१) जे आमचे ख्रिस्ती बंधू-भगिनी ख्रिस्ती विश्वासामुळे अपमान आणि छळ सहन करत आहेत, अन्याय सहन करत आहेत, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्या विश्वासात आणि तुझ्यावरील प्रेमात दृढ ठेव.
२) आमचे परमगुरु, महागुरू आणि सर्व धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या आगीने प्रज्वलित होऊन ख्रिस्तराज्याची सुवार्ता जगाला द्यावी आणि संपूर्ण मानवजातीचे परिवर्तन व्हावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो.
३) आमच्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व आजारी व्यक्तींना तुझ्या कृपेद्वारे नवजीवनाचा आणि निरामय आरोग्याचा अनुभव यावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो.
४) जे आमचे बंधू भगिनी या जगातील त्यांचा जीवनप्रवास संपवून तुझ्याकडे आलेले आहेत, त्यांना तुझ्या स्वर्गीय राज्यात चिरंतन शांती दे.
धर्मगुरू: हे परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाशी मांडलेल्या आमच्या विनंत्या आणि गरजांचा स्वीकार कर आणि आमचं जीवन आनंदाने आणि तुझ्यावरील प्रेमाने परिपूर्ण कर. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू-ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
No comments:
Post a Comment