Thursday, 30 October 2025

Reflections for the homily of The Commemoration of All the Faithful Departed (All Souls) (02-11-2025) by Br. Oliver Munis

सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन

दिनांक: २/११/२०२५

पहिले वाचन: इयोब १९: १, २३-२७

दुसरे वाचन: पौलाचे रोमकरांस पत्र ५: ५-११

शुभवर्तमान: योहान ६: ३७-४०


प्रस्तावना

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज अखिल ख्रिस्तसभा ‘सर्व मृत भाविंकांचा स्मृतीदिन’, साजरा करत आहे. मरण हा जीवनाचा शेवट नाही, तर शाश्वत जीवनाची आशा आहे. येशू म्हणतो, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला मी शेवटच्या दिवशी उठवीन.” (योहान ६:४०) हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की जीवन क्षणभंगुर आहे, पण देवामध्ये आपल्याला कायमची शांती व आशा मिळते.

आपण आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, पण त्यांचे प्रेम आणि आठवणी आजही आपल्यात जिवंत आहेत आणि जेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आपणही देवाकडे अधिक जवळ जातो.

आजच्या जगात चिंता, भीती आणि ताण आहे.  पण देव आपल्याला सांगतो, “घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे.” म्हणूनच, या पवित्र बलिदानात सहभागी होताना, आपण आपल्या जीवनात प्रेम, क्षमा आणि शांततेची बीज पेरूया. कारण आपली प्रार्थना मृत आत्म्यांसाठी असली तरी ती आपल्याला नव्या आशेचे जीवन देईल.

मनन चिंतन

‘सर्व मृत भाविंकांचा स्मृतीदिन’, हा आपल्या प्रिय मृत भाविकांसाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. ही परंपरा यहूदी धर्मातून येशूकडे आणि प्रारंभीच्या ख्रिस्ती समुदायाकडे आली. सातव्या शतकात मठांमध्ये मृत आत्म्यांसाठी प्रार्थना करण्याची प्रथा सुरू झाली. इ.स. ९९८ मध्ये संत ओदिलो ह्याने आपल्या मठात २ नोव्हेंबर रोजी ‘सर्व  मृत आत्म्यांचा’ दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू केली. नंतर, सोळाव्या शतकापासून ही परंपरा संपूर्ण ख्रिस्तसभेत पाळली जाऊ लागली. इ.स. १९१५ मध्ये पोप बेनेडिक्ट पंधरावे  यांनी प्रत्येक धर्मगुरूंना तीन मिस्सा साजरे करण्यास सांगितले: एक स्वतःच्या हेतूसाठी, दुसरी सर्व मृत विश्वासूंसाठी आणि तिसरी पोपांच्या हेतूसाठी. ही पवित्र प्रथा आजही चालू आहे.

इयोब १९:२५-२७ आपल्याला आठवण करून देतो: माझा उद्धारकर्ता जिवंत आहे; शेवटी तो पृथ्वीवर उभा राहील.”  ही वचने आपल्याला खात्री देतात की, मृत्यू हा शेवट नाही. जरी आपण मरण पावलो, तरीही आपण आपल्या डोळ्यांनी देवाला पाहू. देह सोडल्या नंतरही आपण त्याचा अनुभव घेऊ, कारण मृत्यू हा देवाला भेटण्याचा मार्ग आहे.

योहान ६: ३७- ४० मध्ये येशू सांगतोजो माझ्याकडे येतो, त्याला मी त्याला मुळीच घालवून देणार नाही… त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला शेवटच्या दिवशी उठवीन.”  ही वाचने आपल्याला आशा देतात की देवाची दया अनंत आहे. पण स्वर्गात प्रवेश करण्यासाठी आत्म्याचे शुद्ध होणे आवश्यक आहे. म्हणूनच आपली ख्रिस्तसभा शिकवते की जे “देवाच्या कृपेत मरण पावतात पण अजून परिपूर्ण शुद्ध नाहीत” श्रद्धावंतांचा ग्रंथ १०३०- १०३२ (CCC #1030-1032) त्यांना शुद्धीस्थानात (Purgatory) शुद्ध केले जाते.

एक वयस्कर बाई दर आठवड्याला दफन भूमीत आपल्या पतीसाठी फुले आणायची. एकदा एक धर्मगुरू तिला म्हणाले, फुले सुंदर आहेत, पण त्यांच्या आत्म्यासाठी अजूनही मौल्यवान गोष्ट म्हणजे प्रार्थना.” त्या दिवसानंतर ती बाई रोज संध्याकाळी खिडकीजवळ बसून देवाला प्रार्थना करायची. ती आकाशात ताऱ्यांकडे पाहून शांतपणे म्हणायची, “तू सुखात असशील ना?” अशा प्रत्येक प्रार्थनेत तिच्या मनाला शांती मिळायची. कारण आता तिला ठाम विश्वास होता की तिचा पती देवाजवळ, स्वर्गात सुखाने आहे आणि एक दिवस तीही त्याच्यासोबत तिथे भेटेल.

फुले कोमेजतात, पण प्रार्थना स्वर्गात उमलते.

संत आगुस्तीन म्हणतात: माझ्या दफनाची जागा महत्त्वाची नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा, एवढेच मला हवे.”

जर मी तुम्हाला विचारले, “मृत प्रियजनांसाठी तुम्ही सर्वात चांगलं काय करू शकता?” तुम्ही काय उत्तर द्याल? अंत्यविधी नीट पार पाडाल? एक सुंदर स्मरणपत्र तयार कराल? त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलाल किंवा त्यांच्या समाधीची सजावट कराल? हे सर्व योग्य आणि सुंदर आहे, पण त्यांच्यासाठीची सर्वोत्तम भेट म्हणजे प्रार्थना. कारण ती त्यांना देवाच्या दिशेने नेते. एका धर्मगुरूने त्यांच्या करारामध्ये (testament)   किंवा वसीयतपत्रात लिहिले, माझ्याबद्दल बोलू नका; माझ्यासाठी प्रार्थना करा.” जसे आपले पवित्र शास्त्र म्हणते त्यामुळे, त्याने मृतांसाठी प्रायश्चित्त केले, जेणेकरून त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त केले जाईल.”(2 मक्काबीज १२:४६) मृतांसाठी प्रार्थना करणे ही पवित्र आणि शुद्ध गोष्ट आहे.

स्वर्गात सर्वांना जायचे आहे, पण कुणाला पहिला जायचे नाही। कोणीही आधी मरायला तयार नाही, पण स्वर्गात जाण्याची इच्छा सर्वानांच आहे। आपल्याला स्वर्ग हवे आहे, ह्यात काही शंका नाही, पण त्याच्यासोबत आपल्या पापाचे शुद्धीकरण असणे पण तेवढेच महत्वाचे आहे.  देव म्हणतो, “स्वर्गात काहीही अपवित्र प्रवेश करू शकत नाही” (प्रकटीकरण 21:27). म्हणून देव आपल्या प्रेमाच्या आगीने आत्म्यांना शुद्ध करतो. ही शिक्षा नव्हे, ही दया आहे. संत जॉन पॉल दुसरे म्हणतात,देवाच्या राज्यात प्रवेश करण्याआधी आत्म्यातील प्रत्येक दोष शुद्ध व्हावा”.

आपल्या प्रियजनांसाठी मिस्सा अर्पण करणे हा सर्वात मोठा आध्यात्मिक दान आहे. त्याचबरोबर रोज प्रार्थना करणेही महत्त्वाचे आहे. दानधर्म, उपवास आणि क्षमा हे आत्म्यांसाठी उपयोगी ठरतात श्रद्धावंतांचा ग्रंथ १०३२ (CCC #1032). दफन भूमीला भेट देताना फक्त गप्प बसून नव्हे तर श्रद्धेने प्रार्थना करणे आवश्यक आहे,  आपल्या स्वतःच्या आत्म्याचे शुद्धीकरण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण आपणही एके दिवशी त्या प्रवासावर जाणार आहोत, त्यामुळे आजपासूनच तयारी करणे गरजेचे आहे.

माता मरियेची आपल्याला शिकवण अशी आहे की, आपण पापी लोकांसाठी प्रार्थना करावी. फातिमा मातेचा  संदेश असा आहे की, “जगात शांतता मिळवण्यासाठी आणि पापांच्या शिक्षा टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना करावी, प्रायश्चित्त घ्यावे आणि आपले जीवन बदलावे”. सर्व आत्म्यांचा दिवस म्हणजे प्रेमाची नवी गाठ बांधण्याचा दिवस. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त एक बदल आहे. आपली प्रार्थना ही पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा सुंदर पूल आहे. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा स्वर्ग आपल्यासाठी प्रार्थना करतो.”

तर आज या मिस्साबलिदानात कृपा व शक्ती मागुया की, मी फक्त फुले ठेवणार नाही, तर दररोज मृत आत्म्यांसाठी प्रार्थना करीन.”

आपली प्रार्थना ही कधीही कोमेजत नाही; ती स्वर्गात उमलते.

आणि सर्व प्रियजनांना अनंत शांती मिळो हीच देवाचरणी प्रार्थना.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे ख्रिस्ता आम्हांला तुझ्यात नवजीवन दे.

१. आपले परमगुरु, महागुरू आणि सर्व धर्मगुरूंना येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग, सत्य आणि जीवन आहे, ही शुभवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी-सामर्थ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. धर्मगुरु व धर्मभगिनी ह्यांनी लोकांना मृत्यूविषयी योग्य ते मार्गदर्शन करावे; आपण सर्वांनी मृत्युच्या भयाने न भिता सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालावे व जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या कुटुंबातील प्रियजनांच्या आत्माला प्रभूपरमेश्वराने स्वर्ग-राज्यात चिरंतर शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ज्या मृत व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यासाठी कुणीही नाही व सर्व शुद्धी-स्थानातील आत्म्यांना परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय सु:खाचा आनंद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण हे ऐहिक जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवावा व आपणा सर्वांना एक दिवस चांगले मरण लाभवे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.    


Thursday, 23 October 2025

Reflections for the homily of 30th Sunday in Ordinary Time (26-10-2025) by Br. Criston Marvi 


सामान्य काळातील तिसावा रविवार

दिनांक: २६/१०/२०२५

पहिले वाचन: बेनसिरा ३५:१२-१४

दुसरे वाचन: २ तीमथी ४:६-८,१६-१८

शुभवर्तमान: लुक १८:९-१४


प्रस्तावना:

प्रिय भाविकांनो आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला प्रार्थना कशी करावी याविषयी आमंत्रण करत आहे. नम्र मनाने केलेली प्रार्थना ही प्रभू परमेश्वर ऐकतो. पश्चातापी अंतकरणाने क्षमेची जो याचना करतो तो देवाच्या दयेचा अनुभव घेतो. जो प्रभूच्या इच्छेप्रमाणे देवाची घोषणा करतो प्रभू त्याच्याजवळ उभा राहतो.

आजच्या ह्या मिस्साबालीदानात सहभागी होत असताना आपण परमेश्वराचा धावा करूया. जेणेकरून नीतीमत्वाचा मुकुट जो आपल्यासाठी राखून ठेवला आहे त्याचे आपण भागीदार बनू.

मनन चिंतन

मी पापी आहे.”

प्रिय भाविकांनो आपण जेव्हा प्रार्थना करतो, जे शब्द आपण उच्चारतो तेच शब्द आपले चरित्र प्रकट करतात. एखाद्याने प्रार्थना कशी करावी याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात परुशी व जकातदार ह्यांचा दाखला आपल्या पुढे मांडलेला आहे. जर का आपण परुशीच्या

प्रार्थनेवर बारकाईने  नजर मारली तर आपल्याला समजून येते की, तो परुशी काही खोटे बोलत नव्हता. तो जे काही त्याच्या जीवनात करत होता तेच तो त्याचा तोंडातून सांगत होता. परंतु येशूने त्याची प्रार्थना चुकीची ठरवली. का चुकीची ठरवली असेल? प्रिय भाविकानो प्रार्थना म्हणजे देवाबरोबर साधलेला संवाद होय. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना आपणाला देवाकडे वाहून घेऊन जाणारी असावी. दुसऱ्याच्याविषयी तक्रार किंवा स्वःताचा गर्व नसावा. म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितले की, तो जकातदार नीतिमान ठरला व आपल्या घरी गेला. आजच्या दुसऱ्या वाचनातसुद्धा संत पौल परुशीसारखा स्वःताविषयी अभिमानाने, त्याने जे काही केले आहे ते सांगत आहे. परंतु तो सर्वकाही परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वराच्या गौरवासाठी व स्तुतीसाठी करीत आहे. म्हणून तो सांगतो की, ‘तो प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, त्या प्रभूचा युगानुयुगे गौरव असो, आमेन.’

आपण जेव्हा देवाशी संवाद साधतो तेव्हा नम्र हृदयाने आपल्या अपात्रतेची जाणीव मनात बाळगून आपण परमेश्वरासमोर उभे राहिलो पाहिजे. कारण परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता, सर्वसमर्थ परमेश्वर आहे. त्याच्या प्रेमाला व कृपेला सीमा नाही. तोच क्षमाशील प्रभू, आपल्या अपराधांची क्षमा करतो. आजच्या लुकलिखित शुभवर्तमानातील दाखल्याचा संदेश हा केवळ परुशियांसाठीच नव्हे तर प्रत्येक व्यक्ती, जो स्वतःला सज्जन मानतो व दुसऱ्यांना तुच्छ लेखितो त्या सर्वासाठी आहे.

सज्जन असणे व स्वत:ला सज्जन मानणे ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. सज्जन व्यक्ती ही देवावर अवलंबून असते. त्या व्यक्तीसाठी देवाविना जगण्याला अर्थ नाही. केवळ देवाच्या सानिध्यात वस्ती करण्याचा ध्यास मनात बाळगते. प्रत्येक कार्य देवाच्या नावाने करीत असतो. याउलट जो व्यक्ती स्वत:ला सज्जन लेखितो, तो स्व:ताच्या नावासाठी व मोठेपणासाठी कार्य करीत असतो. अशा व्यक्तीस वाटते की, देव माझ्या कार्यावर अवलंबून आहे. ग्रविष्ट होऊन प्रत्येक ठिकाणी स्वत:ला प्राधान्य देतो. 

प्रिय भाविकांनो, प्रभू म्हणतो, “तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका”. (मत्तय ६:३) आपली कार्य ही दुसऱ्यांना दाखवून देण्यासाठी करू नयेत, देवाला आपण काय करतो ह्याची जाण असते. स्वत:चीच वाहवा करीत बसने म्हणजेच देवाच्या कृपेला मुकणे होय. जेव्हा आपण गुप्तपणे देवाची व लोकांची सेवा करतो तेव्हा आपल्याला विपुल प्रतिफल मिळत असते. जो पश्चातापी अंत:करणाने देवासमोर नतमस्तक होतो व आपले सर्वस्वी देवाला समर्पित करतो त्याला जकातदाराप्रमाणे देवाच्या दयेचा व प्रेमाचा अनुभव मिळतो.

ख्रिस्ती भाविक म्हणून समाजात जीवन जगत असताना, स्वता:च्या पदाचा किंवा प्रतिष्टेचा गर्व न बाळगता निस्वार्थीपणे दुसऱ्यांची सेवा करूया. आपल्या जीवनशैलीद्वारे व कार्याद्वारे देवाच्या प्रेमाला व करुणेला साक्ष देवूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभूतुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’

१. हे देवा ख्रिस्तसभेचे कारभार पाहणारे आमचे पोप लियो चौदावे, सर्व बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्त व प्रापंचिक ह्या सर्वांचे दृष्ट कार्यापासून संरक्षण व्हावे व प्रभूची सुवार्ता पसरविण्यात दैवी शक्ती लाभावी, म्हणून आपण प्रार्थना करु या.

२. संपूर्ण जगात वेगवेगळ्या पदावर असलेले नेते त्यांना स्वःताच्या पदाचे महत्व व जाणीव होऊन लोकांची सेवा नम्रतेने करण्यास कृपा लाभावी, म्हणून आपण प्रार्थना करु या.

३. आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व संपूर्ण जगात जे लोक आजारी व पिडीत आहेत. त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांची आजारापासून सुटका व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करुया.

४. आपण इथे जमलेल्या प्रत्येकाच्या कामा - धंद्यावर ,नोकरी-व्यवसायावर व शाळेय शिक्षनावर प्रभूचा आशीर्वाद लाभावा व आपल्याला यश मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करु या.

५. ह्या जगातून निघून गेलेले सर्व मृत-आत्म्ये, त्या सर्वांना त्यांच्या आत्म्यांना चिरकाळ शांती लाभावी व जे आत्म्ये स्वर्गीय नंदनवनात आहेत त्या सर्वांनी आपल्यासाठी मध्यस्थी करावी, म्हणून आपण प्रार्थना करु या.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिककौटुंबिकसामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Wednesday, 15 October 2025

 Reflection for 29th Sunday in Ordinary Time (World Mission Sunday) (19/10/2025) By Dn. Reon Andrades

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार

(जागतिक मिशन रविवार)

दिनांक १९-१०-२०२५

पहिले वाचन: निर्गम १७:८-१३ 

दुसरे वाचन: २ तिमथी  ३:१४-४:२

शुभवर्तमान: लूक १८: १-८

प्रस्तावना

आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार आणि मिशन रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला मिशन कार्य करण्यास आवाहन करीत आहे. सर्वसाधारणपणे मिशन हा शब्द  “मिस्सीओ” या लॅटिन शब्दातून आला आहे. ज्याचा अर्थ “पाठविणे.” असा होतो.

आज आपण प्रभूला धन्यवाद देण्यास व त्याच्याकडे प्रार्थना करण्यास एकत्र आलो आहोत. आजच्या वाचनांमधून देव आपल्याला एक अतिशय जीवनाशी निगडित आणि विश्वासवर्धक संदेश देतो प्रार्थनेत चिकाटी ठेवण्या बद्दल.

आधुनिक जगात सर्व काही “इन्स्टंट” झालं आहे. आपण काहीही मागितलं की ते ताबडतोब मिळावं अशी अपेक्षा आपण ठेवतो आणि हीच अपेक्षा कधी कधी आपण देवाकडेही ठेवतो — “मी प्रार्थना केली, मग देवाने लगेच उत्तर द्यायलाच हवं.” पण देवाची कृपा आणि वेळ ही नेहमी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळी आणि उत्तम असते.

आजच्या शुभवर्तमानात (लूक १८:१-८) येशू “विधवेचा” दृष्टांत सांगतो. ती स्त्री न्याय मिळेपर्यंत हार मानत नाही, शांत बसत नाही. तिच्या चिकाटीमुळे न्यायाधीश तिला न्याय देतो. येशू या दाखल्यातून आपणास सांगतो की, देव आपल्या प्रार्थना नक्की ऐकतो, पण तो आपल्या योग्य वेळेत आणि योग्य रीतीने उत्तर देतो.

म्हणून आजच्या या मिस्साबलिदानात आपण देवाला विनंती करूया की, आपल्या प्रार्थनेत आणि विश्वासात आपण कायम राहू, उत्तर मिळेपर्यंत नव्हे, तर देवाच्या इच्छेवर आणि वेळेवर पूर्ण विश्वास ठेवू.

मनन चिंतन

“प्रार्थनेतील चिकाटी  Perseverance in Prayer”

प्रिय बंधू-भगिनींनो,

आज आपण अशा काळात जगत आहोत, जिथे प्रत्येक गोष्ट “इन्स्टंट” म्हणजेच तत्काळ मिळावी अशी आपली सवय झाली आहे. बाजारात सर्व काही इन्स्टंट मिळतं — इन्स्टंट नूडल्स, कॉफी, सूप, अगदी फोटो आणि मेसेजेससुद्धा काही सेकंदांत तयार होतात. ही संस्कृती आपल्याला धीर न ठेवण्याची सवय लावते. परिणाम मिळेपर्यंत थांबण्याची सवय आपल्यात उरत नाही. हीच वृत्ती आपण आपल्या अध्यात्मिक जीवनात, विशेषतः देवाशी असलेल्या नात्यात, प्रार्थनेत आणतो. देवाने आपल्याला  “इन्स्टंट” उत्तर द्यावं अशी अपेक्षा ठेवतो. “मी प्रार्थना केली, तर देवाने लगेच ऐकायला हवं,” अशी मानसिकता आपण निर्माण करतो. पण जेव्हा देवाचे उत्तर ताबडतोब मिळत नाही, तेव्हा आपण निराश होतो, आशा हरवतो, आणि काही वेळा आपला देवावरचा विश्वास डगमगतो. आजच्या वाचनांमधून आणि सुवार्तेतून येशू आपल्याला याच गोष्टीबद्दल शिकवतो की, प्रार्थनेत असणे व आपल्या विश्वासात मजबूत असणे.

आजचे शुभवर्तमान (लूक १८:१-८) खूप अर्थपूर्ण आहे. येशू “अन्यायी न्यायाधीश आणि विधवा” हा  दृष्टांत आपल्या पुढे मांडत आहे. त्या बाईला न्याय हवा होता. ती सतत, दिवसेंदिवस, त्या न्यायाधीशाकडे मागणी करत रहाते. तो न्यायाधीश देवभक्तही नाही, त्याला माणसाची भीतीही नाही, पण ती विधवा इतकी चिकाटीने मागते की तो कंटाळून म्हणतो, “ही बाई मला त्रास देते; तिच्या मागण्यांवर अंमलबजावणी केलीच पाहिजे नाही तर मला हि विधवा शांत बसू देणार नाही.” येशू या दृष्टांतातून सांगतो की, जर एक अन्यायी माणूसही चिकाटीने मागणाऱ्याला न्याय देतो, तर आपला दयाळू देव किती अधिक आपल्या प्रार्थना ऐकतो!

येशू स्वतः म्हणतो:

मागा आणि तुम्हांस दिले जाईल; शोधा आणि तुम्हांस सापडेल; दरवाजा ठोठवा आणि तो उघडला जाईल.” (मत्तय ७:७)

हे वचनं म्हणजे प्रार्थनेत चिकाटी ठेवण्याचं आश्वासन आहेत. देव आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतो, परंतु तो आपल्याला ताबडतोब उत्तर देईल असं वचन दिलेलं नाही. देवाचं उत्तर त्याच्या वेळेनुसार, त्याच्या योजनेनुसार येतं. कधी कधी तो आपली मागणी विलंबाने पूर्ण करतो, कारण त्या वाट बघण्यातच आपला विश्वास मजबूत होतो, आपला स्वभाव तयार होतो, आणि आपली प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनते.

आपल्या जीवनात आपण अनेक वेळा पाहतो की “संयम” ठेवणाऱ्यांनाच खरी फळं मिळतात.

एक छोटी पण वास्तववादी कथा बघा. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात नारळाचं झाड लावलं. पहिल्या वर्षी झाड उगवलं पण फळं आली नाहीत. दुसऱ्या वर्षीही नाही. त्याच्या शेजाऱ्याने त्याची थट्टा केली, “अरे, किती दिवस या झाडाकडून वाट बघणार?” पण शेतकरी शांतपणे म्हणाला, “नारळाचं झाड हळू वाढतं, पण एकदा फळं येऊ लागली की अनेक वर्षं थांबत नाहीत.” काही वर्षांनी खरंच झाड उंच वाढलं आणि भरपूर नारळ देऊ लागलं. त्याचा संयम फळतां झाला, त्यच्या संयमाला यश आले.

ही कथा आपल्याला सांगते की, देवाच्या वेळेवर विश्वास ठेवणं म्हणजेच खरी श्रद्धा. आपली प्रार्थना देवाच्या समोर वाया जात नाही. ती मातीमध्ये पेरलेल्या बीजासारखी असते. ते बी लगेच फळ देत नाही, पण आतमध्ये मुळं घट्ट करतं. देव आपल्याला वाट बघायला लावतो, कारण तो आपल्याला मजबूत करतो, आपल्या श्रद्धेला खोल करतो.

संत ऑगस्टीन म्हणतात:

देव आपल्या मागण्या लगेच पूर्ण करत नाही, कारण त्याला वाटतं की वाट बघताना आपण त्याच्याजवळ अधिक जवळ जाऊ.”

कधी कधी आपण म्हणतो, “मी कित्येक वेळा प्रार्थना केली, पण काहीच घडलं नाही.” पण हे विसरू नका की देव नेहमी ऐकतो, फक्त तो वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. कधी “हो”, कधी “थांब”, आणि कधी “नाही” असंही उत्तर असू शकतं. पण त्याचं प्रत्येक उत्तर आपल्यासाठीच योग्य असतं. आपण देवाला वेळेचं बंधन घालू शकत नाही. त्याची वेळ नेहमी योग्य असते, जसे सूर्य आपल्याला योग्य वेळी उगवतो.

आजच्या वाचनाचा मुख्य हेतू म्हणजे – “प्रार्थनेत हार मानू नका.” देवाचं शांत उत्तर म्हणजे त्याची अनुपस्थिती नाही, तर आपला विश्वास तपासण्याची वेळ आहे. चिकाटी म्हणजे केवळ आग्रह नाही, तर देवाच्या प्रेमावर आणि योजनेवर विश्वास ठेवणं आहे. जेव्हा आपण प्रार्थनेत सतत राहतो, तेव्हा आपण देवाला बदलत नाही, आपण स्वतः बदलतो. आपलं हृदय त्याच्या इच्छेनुसार तयार होतं.

येशू म्हणतो, देवावर विश्वास ठेवा.” (मार्क ११:२२)

म्हणून, आपण कितीही कठीण प्रसंगात असलो तरी, देवाकडे विश्वासाने मागत राहूया, शोधत राहूया, ठोठावत राहूया. कारण देव कधीच आपल्याला निराश करत नाही. त्याची वेळ आली की तो आपल्या जीवनात चमत्कार घडवतो. आपण आज ठरवूया — आपल्या प्रार्थनेत सातत्य ठेवूया, संयम ठेवूया, आणि देवाच्या वेळेवर भरोसा ठेवूया. जशी शेतकऱ्याची नारळाची झाडं योग्य वेळी फळ देतात, तशीच आपल्या प्रार्थनाही योग्य वेळी फळ देतील.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१) आपल्या ख्रिस्तसभेच्या सर्व मेंढपाळांनी तसेच सर्व धर्मगुरू, धर्मबंधू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी असलेल्या नात्यात मजबूत व्हावे आणि देवावरील विश्वासाने जीवन जागून संपूर्ण ख्रिस्तसभेला आणि संपूर्ण जगाला ख्रिस्तावरील विश्वासाची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२) आपल्या समाजात आज प्रेम, दया, शांती या मूल्यांचा अभाव आहे आणि त्याऐवजी द्वेष, सूडभावना आणि हिंसाचार वाढत आहे. आज सर्व लोकांनी देवावर विश्वास ठेवावा आणि परमेश्वरमध्ये आपल्या सर्वांच्या निर्मात्याला आणि स्वर्गीय पित्याला ओळखावे आणि त्याच्यावरील विश्वासात दृढ होऊन प्रेम, क्षमा, शांतीच बीज आपल्या समाजात पसरवावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आपल्या कुटुंबातील आणि समाजातील ज्या व्यक्ती आजाराने पछाडलेल्या आहेत. त्यांना आपल्या करुणामय प्रभुने  प्रेमाचा स्पर्श करून त्यांना नवजीवनाचा निभाव द्यावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

४) आपल्या धर्मग्रामातील आणि धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती लोकांना प्रार्थनेमध्ये देवाचा अनुभव यावा आणि तोच अनुभव आपल्या जीवनाद्वारे त्यांनी इतरांना द्यावा आणि इतरांना परमेश्वराची गोडी लावावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपल्या हृदयाच्या शांततेमध्ये आपण आपल्या वैयक्तिक आणि खाजगी गरजांसाठी  प्रार्थना करूया.