Reflection for 27th Sunday in Ordinary Time (05/10/2025) By Br. Vinon Souz
सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार
दिनांक
– ०५/१०/२०२५
पहिले
वाचन: हबक्कूक:१:२-३, २:२-४.
दुसरे
वाचन: २ तीमथ्यी:१:६-८, १३-१४.
शुभवर्तमान: लूक:१७:५-१०.
प्रस्तावना
प्रिय बंधू आणि भगिनींनो आज आपण सामान्य काळातील
सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आपल्याला ‘विश्वास आणि निःस्वार्थ
सेवा’ या विषयावर मनन करण्यास बोलावत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात, हबक्कूक संदेष्टा
देवाला प्रश्न विचारतो, दु:ख, अन्याय आणि हिंसाचार किती काळ सहन करायचा? पण देव उत्तर
देतो, ज्याचे मन सरळ
आहे, तो विश्वासाने जगेल. आजच्या दुसऱ्या वाचनात पौल त्याचा शिष्य
तीमथीला धैर्याने विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो , "देवाने आपल्याला
भीतीचा नाही तर सामर्थ्य, प्रेम व शहाणपणाचा आत्मा दिला आहे."
शेवटी, येशू आपल्या शिष्यांना सांगतो की, “जर
तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास असेल, तरी तुम्ही
अशक्य गोष्टी करू शकता.” पण येशू एक महत्त्वाचा धडा देतो, जेव्हा आपण सेवा करतो, तेव्हा
गर्व न करता, विनम्रतेने म्हणावे की, “आम्ही
आमचे कर्तव्यच पूर्ण केले.”
आजच्या ह्या उपासनेत
भाग घेत असताना,आपण या विचारांवर मनन चिंतन करूया की, आपली श्रद्धा कितीहि छोटी असली तरी ती
महान कार्ये करू शकते आणि आपण देवाच्या राज्यात जे काही करतो, ते केवळ आपले कर्तव्य समजून, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा
न ठेवता, निःस्वार्थ सेवा करूया.
मनन चिंतन
एका
दुमजली अपार्टमेंटच्या एका भागात एक वृद्ध महिला राहत होती. ती खूप गरीब होती, पण एक
चांगली बाई होती. ती खूप प्रार्थना करत असे. त्याच अपार्टमेंटच्या दुसऱ्या भागात मालक
राहत होता, ज्याचा देवावर, प्रार्थनेवर
किंवा धर्मावर अजिबात विश्वास नव्हता. तो त्या वृद्ध महिलेच्या देवावरील श्रद्धेची
नेहमी थट्टा करायचा. एक दिवस ती महिला खूप मोठ्या आवाजात प्रार्थना करत होती आणि देवाला
सांगत होती की माझ्या घरात खायला काहीच नाही. त्या घरमालकाने ते ऐकले आणि त्याने ठरवले
की, तिची गंमत करावी. त्याने एक भाकर घेतली, तिच्या दाराजवळ ठेवली, बेल वाजवली आणि
तिचे आनंदाचे शब्द ऐकण्यासाठी घाईघाईने आपल्या अपार्टमेंटमध्ये परत गेला. त्याने ऐकले:
“धन्यवाद प्रभू! तुझे खूप खूप आभार! मला माहित होतं, तू माझी प्रार्थना ऐकशील!” तेव्हा
घरमालक हसत बाहेर आला आणि म्हणाला: “अगं मूर्ख म्हातारे! तुला वाटते की देवाने तुझ्या
प्रार्थनेला उत्तर दिले? ती भाकर मी आणली आहे!” तरीही ती वृद्ध
महिला डगमगली नाही आणि म्हणाली: “प्रभूची स्तुती असो! तो नेहमी माझ्या गरजा पूर्ण करतो,
आणि गरज पडली तर तू सैतानालासुद्धा उपयोगात आणतोस!”
प्रिय बंधू-भगिनींनो, त्या वृद्ध महिलेचा विश्वास आपल्याला शिकवतो की, मदत
कोणीही करो, ती देवाचीच देणगी असते. तिच्यासाठी नास्तिक शेजारीसुद्धा देवाने वापरलेला
एक सेवक ठरला. आपला विश्वास इतका मजबूत असावा की, परिस्थिती कोणतीही
असो, देवाच्या कृपेवर आपले लक्ष केंद्रित राहायला हवे.
आजच्या शुभवर्तमानात प्रेषितांनी येशूला विचारले, "प्रभु, आमचा विश्वास वाढवा." ही एक खूप सुंदर आणि
खरी मागणी आहे. आपल्यालाही अनेक वेळा वाटतं की आपला विश्वास कमी आहे, किंवा कठीण प्रसंगी आपल्याला देवावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. पण येशू
यावर उत्तर देतो की, "जर तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढाही
विश्वास असेल, तर तुम्ही झाडालाही सांगू शकता की उखडून समुद्रात
लावून घे, आणि ते होईल." याचा अर्थ असा की विश्वासाचा आकार
महत्त्वाचा नाही, तर तो विश्वास किती खरा आहे हे महत्त्वाचं आहे.
मोहरीचा दाणा फार छोटा असतो, पण त्यात मोठं झाड होण्याची
क्षमता असते. तसंच आपल्या छोट्याशा विश्वासानेसुद्धा मोठमोठ्या गोष्टी घडवण्याची
ताकद असते, जर तो विश्वास देवावर पूर्ण आधारलेला असेल. विश्वास
म्हणजे सर्व काही समजून घेणं नाही, तर देवाच्या शब्दावर आणि त्याच्या
प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवणं. विश्वास म्हणजे, परिस्थिती जरी कठीण असली, तरी देव आपल्या सोबत आहे याची खात्री असणं.
आपण अनेकदा परिणाम किंवा चमत्कार पाहूनच विश्वास ठेवतो, पण येशू आपल्याला सांगतो की प्रथम विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे वाट पाहणं,
श्रद्धा ठेवणं, आणि न दिसणाऱ्या गोष्टीवरही चालत
राहणं. येशू सांगतो की विश्वास हा देवाशी जोडलेले नाते आहे, जे आपण दररोज प्रार्थनेत,
देवाच्या वचनात, आणि साध्या-साध्या गोष्टीत अनुभवू
शकतो.
पुढे, येशू ख्रिस्त गुलाम आणि मालक यांचा दृष्टांत सांगतो, आपण शेतात काम करून
किंवा गुरे चारून आल्यावर, मालक लगेच सेवकाला बसायला सांगत नाही,
तर तो त्याला आधी आपले काम करण्यास सांगतो. आणि जेव्हा सेवक आपले काम
पूर्ण करतो, तेव्हा मालक त्याचे आभार मानतो का? नाही. त्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही सर्व आज्ञा पूर्ण करता,
तेव्हा म्हणा की, “आम्ही तुझी सेवा करणारे साधे
नोकर आहोत." जे करायचे होते, तेवढेच आम्ही केले आहे!”
या दृष्टांताचा अर्थ असा आहे की, देवासाठी सेवा करणे
हे आपले कर्तव्य आहे. आपल्या विश्वासातून केलेल्या कार्यासाठी आपण देवाकडून कोणत्याही
बक्षिसाची अपेक्षा ठेवू नये, किंवा केलेल्या सेवेचा अभिमान बाळगू
नये. देवासाठी केलेली कोणतीही चांगली कृती, लोकांना क्षमा करणे
असो किंवा मोठ्या कार्याचे यश असो,
ती आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही विशेष धन्यवाद मिळण्याची
गरज नाही, कारण ते देवाच्या कृपेने आणि त्याच्या सामर्थ्याने
घडले आहे. आपला विश्वास आपल्याला नम्रता शिकवतो, जिथे आपण देवाच्या
इच्छेचे पालन करणे हेच आपले भाग्य मानतो. म्हणून, आपल्या 'मोहरीच्या दाण्याएवढ्या' विश्वासाला कृतीत उतरवा आणि
त्याचे फळ मिळाल्यावर नम्रपणे देवाचा गौरव करा, कारण देवाची सेवा
करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यात कोणताही स्वार्थ किंवा बक्षिसाची
अपेक्षा नसावी.
ज्याप्रमाणे संदेष्टा हबक्कूक व शिष्यांचा
विश्वास दृढ झाला त्याप्रमाणे आपणही आपला विश्वास बळकट व्हावा व ख्रिस्ताला जीवनात
प्रथम स्थान देऊन हा ख्रिस्त अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहचवावा म्हणून आपण देवाकडे कृपा
मागुया.
श्रद्धावंतांच्या प्रार्थना
प्रतिसाद – हे प्रभू आमचा विश्वास
वाढव.
१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी
जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी
इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे.
प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून
प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले
आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या
विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून
प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment